07 March 2021

News Flash

परवडणारी घरे साकारताना..

घराचा प्रवेशभाग सुनियोजित असायला हवा आणि सभोवताली पटकन व सहजपणे फिरण्यासाठी पुरेशी जागा हवी.

(संग्रहित छायाचित्र)

अमित पाल

वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था, झपाटय़ाने वाढणारे शहरीकरण आणि वाढती शहरी लोकसंख्या यांमुळे देशात घरांची समस्या निर्माण झाली आहे. शहरी लोकसंख्या कित्येक पटींनी वाढल्यामुळे अनियोजित आणि अनधिकृत घरे उभी राहत आहेत; जी असुरक्षित असतात व तेथील पायाभूत सुविधाही अपुऱ्या असतात. देशातील निम्मी लोकसंख्या २०३० पर्यंत शहरी भागात राहणार असल्याचा अंदाज असून, सामाजिक पातळीवर गृहबांधणी क्षेत्रात सध्या  मागणी व पुरवठय़ातील लक्षणीय दरी दिसत आहे. त्यावर उपाययोजना करणे महत्त्वाचे झाले आहे. किंबहुना, यातली बहुतेक मागणी मध्यम व कमी उत्पन्न गटातून (एमआयजी आणि एलआयजी) येत असल्यामुळे सर्वासाठी परवडणाऱ्या घराचा समग्र आणि व्यापक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे झाले पाहिजे.

आजच्या घर खरेदीदारांच्या गरजा लक्षात घेणे आवश्यक आहे. मात्र, त्याचबरोबर आपण सध्याच्या व भविष्यातील घर खरेदीदारांना पूरक ठरतील अशा मूल्यवर्धित सेवा ओळखून त्या पुरवण्यावर काम केले पाहिजे. यासाठी सध्याच्या आणि संभाव्य घर खरेदीदारांच्या प्राधान्यक्रमाची माहिती घेऊन त्याला सर्वसमावेशक, पर्यावरण आणि समाजउभारणीच्या दृष्टिकोनातून भविष्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या धोरणाची जोड द्यायला हवी.

परवडणारी घरे तयार करण्यात डिझाइनचा मोठा वाटा असतो आणि त्याचा पुढील बाबींवर परिणाम होतो –

टिकाऊपणासाठीचे डिझाइन

घरासाठीची गुंतवणूक ही बहुतेकांच्या आयुष्यातली सर्वात महाग गुंतवणूक असते. म्हणूनच घरांचे डिझाइन करताना त्याची दीर्घकालीन टिकाऊपणा, वावर आणि संभाव्य आर्थिक परिणाम या बाबी लक्षात घ्यायला हव्यात. बांधणीचे डिझाइन आणि कच्च्या मालाची निवड या गोष्टी घराचे आयुष्य तसेच वापराच्या पद्धतीनुसार आवश्यक देखभाल यांचा विचार करून करायला हव्या.

जास्तीत जास्त जागेचा उपयोग करून घेता येणारे डिझाइन- कामाचे ठिकाण सोडल्यास आपण सर्वाधिक वेळ घरात घालवत असतो. त्यामुळे अंतर्गत जागेचा पुरेपूर वापर करणे महत्त्वाचे ठरते. नियमित आकार आणि भिंतींची योग्य जाडी यांमुळे अंतर्गत जागेचा पूर्ण वापर करण्यास मदत होते. घराचा प्रवेशभाग सुनियोजित असायला हवा आणि सभोवताली पटकन व सहजपणे फिरण्यासाठी पुरेशी जागा हवी. स्वयंपाकघरात सर्वात जास्त धावपळ असते, त्यामुळे इथे उभे स्टोअरेज करणे आणि ओटय़ाखाली जागा पुरवणे सोयीचे पडते. त्याशिवाय उभ्या पद्धतीने लॉफ्ट, स्टोअरेजसाठीच्या जागा, भिंतींवर कपाटे करणे.. यातूनही जागेचा पुरेपूर वापर करता येतो. ‘स्पेस विदिन स्पेस’ यासारख्या स्मार्ट डिझाइन संकल्पना ेउत्तम ठरते. उदा- टेलिस्कोपिक किंवा फोल्ड करता येण्यासारख्या अंतर्गत, वजन न सहन करू शकणाऱ्या भिंतीमुळे अतिरिक्तजागा किंवा गरजेनुसार छोटी खोली तयार करता येते. त्याचप्रमाणे फोल्डेबल फ्रेंच विडोंमुळे उत्तम सूर्यप्रकाश  मिळतो. तसेच प्रभावी वायुविजन साधता येते.

मुलांची खोली

घराचे बांधकाम करताना कच्च्या मालाची निवड, मुख्यत: डब्ल्यू.आर. टी इमारत एन्व्हलप, इंटर्नल प्लॅस्टर, पेंट, फिटिंग्ज्, फिट आउट्स, दरवाजे खिडक्या आणि अ‍ॅक्सेसरीज्, पाणी आणि सॅनिटेशन पायिपग यंत्रणा, इत्यादी अशा फिनिशिंग घटकांचा डिझाइन करताना विचार करणे आवश्यक आहे, कारण त्यामुळे इमारत वापरली जात असतानाच्या काळातला खर्च कमी होतो.

निरोगी जागा

अंतर्गत जागा अधिकाधिक निरोगी करण्यामध्ये दरवाजे आणि खिडक्या महत्त्वाची भूमिका बजावतात. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी भिंत आणि खिडक्यांचे गुणोत्तर किमान २० टक्के असणे गरजेचे असते. इमारतीचे तोंड कोणत्या दिशेने आहे, याचाही पुरेसा सूर्यप्रकाश येण्यात महत्त्वाचा वाटा असतो.

भविष्यातील गरजांसाठीचे डिझाइन

घर खरेदीदारांना योग्य पद्धतीची रचना असलेले घर आवडतेच. शिवाय त्यांना स्वच्छ, प्रदूषणमुक्त, नियमित वीज व पाण्याच्या सुविधा असलेल्या जागेत राहायला आवडते. शाळा, हॉस्पिटल आणि दुकाने यांसारख्या सामाजिक पायाभूत सुविधा सहजपणे उपलब्ध होणे, चांगली कनेक्टिव्हिटी असणेही आवश्यक असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 1:05 am

Web Title: making affordable housing
Next Stories
1 नवी मुंबई सोयी-सुविधांनी युक्त शहर
2 वस्तू आणि वास्तू : प्रवासी बॅगा आणि आयत्या वेळची धावाधाव
3 झोपाळा.. आमचा विरंगुळा
Just Now!
X