18 September 2020

News Flash

नंदनवन

पराग केन्द्रेकरबांधकामात वापरली जाणारी खनिजे म्हणजे वाळू, खडी, माती (विटांसाठी), फरशी दगड, सिमेंट, चुना व इतर.

 निर्जीव झालेली खाण    

पराग केन्द्रेकरबांधकामात वापरली जाणारी खनिजे म्हणजे वाळू, खडी, माती (विटांसाठी), फरशी दगड, सिमेंट, चुना व इतर. ही सगळी खनिजे आपल्याला निसर्गातून मिळतात. वाळू नदीच्या पत्रातून मिळते, तर खडी खडकाळ जमीन अथवा डोंगरातून मिळते. माती तर जमिनीचा वरचा स्तर आहे त्यामुळे सगळीकडेच मिळते. सिमेंट हे समुद्राच्या एका विशिष्ट  वाळूपासून बनविलेले असते, तर चुन्याचे तर खडक असतात. स्टील, अलूमिनम, सिरामिक, कांच, रंग,  इतर गोष्टी पण निसर्गातून मिळालेल्या काही मूळ धातूंपासून बनवलेल्या असतात. मिळेल त्या ठिकाणावरून ही खनिजे आणली जातात आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून बांधकामामध्ये त्याचा वापर होऊन एक सुंदरशी इमारत तयार होते आणि त्याकडे समाधानाने बघत आपण आनंदून जातो.

पण ती खनिजे ज्या ठिकाणाहून खोदून आणली जातात त्या ठिकाणाचे, जागेचे काय होते? – हा प्रश्न आपल्याला कधीच पडत नाही आणि कधी पडणारही नाही. पण थोडा विचार केला तर लक्षात येईल की पदार्थ विज्ञानाच्या सिद्धांतानुसार ऊर्जा फक्त स्वरूप बदलते, नष्ट किंवा निर्माण होत नाही. यावरून सहजच लक्षात येईल की, जेवढे मोठे शहर तुम्ही निर्माण करता आपोआपच  तेवढय़ाच मोठय़ा खाणी तयार

झाल्या असतात. हो- हे सत्य आहे. सामान्यत: या खाणी दुर्गम भागात असतात आणि आपल्या रस्त्यात दिसत नाहीत.  त्यामुळे त्या आपल्यासाठी ‘नसतात.’  पण लोकहो जसजशी शहरांची व्याप्ती वाढत आहे तसे या खाणीही वाढत आहेत. आणि त्या शहराच्या जवळ येत आहेत.

जमेल तसा उपसा केल्यामुळे खाणीला एका मोठय़ा अक्राळविक्राळ खड्डय़ाचे स्वरूप येते. तळाला कडक पाषाण, बाजूंना भुसभुशीत मुरूम खडक, सुरुंगाचे अवशेच,जेसीबीचे ओरबडे. काही ठिकाणी तर डोंगर पोखरून खनिजे काढली जातात, त्या ठिकाणी तर डोंगर नाहीसाच होतो, अर्धवट राहतो, नापीक होतो. झाडे-फुलांचे तर नामोनिशान राहात नाही. प्राणी-पक्षी तर दूरच! अगदी भंगलेल्या, निर्जीव, निस्तेज दिसतात या जागा. पुरेपूर वापर झाल्यावर, कंत्राटदार या खाणी आहे त्या स्थितीत सोडून जातात आणि या खाणी ओस पडतात. याला कोणी माय बाप नसतो, सरकार खाली त्यात हाच शब्द वापरला जातो.

या निर्जीव ठिकाणाला आपण काही करू शकतो का? त्याला सजीव बनवू शकतो का? एका संवेदनशील मनाला हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. पडीक खाणींना सजीव बनवायचे अनेक प्रयत्न झाले आहेत आणि बहुतांश यशस्वीही झाले आहेत.

गुजरातमधील ‘तीम्बा’ या गावी अशीच एक पडीक खाण होती. खूप उपसा झाल्यावर खाण पडीक झाली आणि त्या परिसराला भकास स्वरूप प्राप्त झाले. सुप्रसिद्ध लँडस्केप आर्किटेक्ट प्रभाकर भागवत यांनी या भागाला सजीव बनवायचा पण केला. सभावोतालच्या परिसराचा पूर्ण अभ्यास झाल्यावर त्यांनी कामाला सुरुवात केली. सर्वात आधी खाणीच्या बांधांवर मातीचा थर देण्यात आला, या  मातीच्या थराला स्थिर करण्यासाठी त्यावर छोटी विशिष्ट प्रकारची गवत, झुडपे, वनस्पती लावण्यात आली. त्याची काही काळ विशेष निगा राखून वाढवण्यात आली. जसजशी ही झुडपे, गवत वाढले तशी ती माती स्थिर झाली आणि पाण्यामुळे मातीची धूप पूर्ण बंद झाली. नंतर टप्पा होता तो वृक्षारोपणाचा. स्थिर झालेली जमीन, झुडपांनी, गवतांनी सजीव केलेली जमीन आता वृक्षारोपणासाठी तयार होती. पूर्ण परिसरात वृक्षारोपण झाले. पाणी धरलेली आणि झाडाझुडपांनी सजीव झालेल्या जमिनीने वृक्षांची सोय झाली. काही काळानंतर वृक्षांनी जम धरला आणि हळूहळू जंगल फुलायला लागले. काही ऋतूंच्या आवर्तनानंतर खाणीच्या

बाजूंना पूर्ण जंगल फुलले होते! खाणीमध्ये पाणी जमा होऊन सुंदर तलाव तयार झाला होता. पाणवनस्पतीही फुलल्या होत्या. पक्ष्यांचा, फुलपाखरांचा संचार सुरू झाला आणि  एक संपूर्ण जंगल तयार झाले. अगदी नंदनवन! आता तिथे पर्यटनस्थळ आहे. विशेष म्हणजे  हे सगळे प्रयत्नपूर्वक आणि योजनाबद्ध पद्धतीने झाले आहे.

‘तीम्बा’ तर एक उदाहरण आहे. अशा अनेक जागा आहेत जिथे हे परिवर्तन होऊ  शकते. भारतामध्ये जवळ जवळ अशा ३७०० खाणी आहेत. तुमच्या-आमच्या घराजवळ, शहराजवळ नक्कीच अशा खाणी आहेत. ठरवले तर हा कायापालट आपण घडवून आणू  शकतो. ह्य़ातून पर्यावरणाबरोबर सामाजिक फायदाही होतो. पर्यटन, रोजगार निर्मिती, पाण्याची साठवण होते, जागेचा दुरुपयोग टळतो व इतर असे अनेक फायदे होतात. वाचकहो, आपल्या शहरी आयुष्याच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत.  एक आपल्या ‘सुसज्ज इमारती’ आणि दुसरी  ‘पडीक खाणी’ आपल्या सोयीची इमारत बांधण्यासाठी जी जागा आपला आत्मा  हरवून बसते तिला पुनर्जीवित करण्यासाठी आपण नक्कीच काही तरी करू शकतो . तिथे नंदनवन फुलवू शकतो!

 

पराग केन्द्रेकर

 

parag.kendrekar@gmail.com

 

 

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 6:18 am

Web Title: minerals used to build a house
Next Stories
1 घोषणापत्र : महाराष्ट्र अपार्टमेंट कायदा १९७०
2 पाचूपक्षी
3 रोगापेक्षा इलाज भयंकर!
Just Now!
X