मृण्मयी गोडबोले

प्रायोगिक नाटकं तसेच नुकत्याच येऊन गेलेल्या चि. व चि. सौ. का.या सिनेमातून भेटलेली गुणी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी गोडबोले. तिचा लाडका कुत्रा शेरलॉकविषयीच्या गमतीजमती सांगतेय..

तशी मला प्राण्यांची भीती वगैरे कधी वाटली नाही. कारण मी पाळीव प्राणी असलेल्या घरातच वाढले आहे. माझ्या माहेरी, सायरस आणि मुन्शी असे दोन झक्कास कुत्रे आहेत. माझं लग्न झाल्यावर मी माझ्या दिग्दर्शक नवऱ्यासोबत मुंबईला शिफ्ट झाले. इथे आम्ही दोघंच राजाराणी. मस्त नवव्या मजल्यावरचा फ्लॅट. अभिनेत्री म्हणून माझ्या आणि दिग्दर्शक म्हणून नवऱ्याच्या स्वप्नांना रंगरूप देणारी बंबई नगरिया.. पण तरीही आम्ही दोघं काहीतरी मिस करत होतो. थोडय़ाच दिवसांनी आमच्या लक्षात आलं, आम्ही आमच्या लाडक्या कुत्र्यांना मिस करतोय. नवऱ्याच्या घरीसुद्धा एक कुत्री होती. माझ्या माहेरी तर दोन भूभू होतेच. मग आम्ही शेरलॉकला घरी आणलं.

साधारण ५० दिवसांचं हे पिल्लू मला आवडलं ते त्याच्या मिश्कील डोळ्यांमुळे. त्यावरच फिदा होऊन मी त्याला घरी घेऊन आले. सध्या दोन वर्षांचा असलेला शेरलॉक हे आमचं लाडकं बाळ आहे. बीगल जातीचा हा भूभू जात्याच खेळकर आहे. खरं तर भयंकर खेळकर आहे. मुंबईतलं आमचं घर हे आता आमचं नसून त्याचंच आहे. तो या घराचा राजा आहे, आम्ही आपले जमेल तसे राहतो. सिनेइंडस्ट्रीत असल्याने आमच्या दोघांच्या कामाच्या वेळा अगदीच अनिश्चित असतात. पण शेरलॉक तसा शहाणा आहे. शिवाय आमचे मित्रमैत्रिणी, सासू-सासरे यांचीही खूप मदत होते.

याआधी जेव्हा माझ्या पुण्याच्या घरी म्हणजे माहेरी कुत्रे होते, तेव्हा मी फक्त त्यांच्याशी खेळले होते. कधी त्यांची काळजी वगैरे घेण्याची फारशी वेळ आली नाही. कारण आई, आजी दोघी घरात होत्या. शेरलॉकच्या बाबतीत मात्र मला जबाबदारी घेणं भाग होतं. इथे हे बाळ आम्हाला दोघांनाच सांभाळायचं होतं. त्याला दात येत असताना धम्मालच आली. म्हणजे त्याचे दात शिवशिवत असल्याने तो दिसेल ते चावायचा, फाडायचा. आमचा कोच त्याने चावून चावून एवढा फाडला की पार आतल्या वायरींपर्यंत त्याने आपल्या दातांचे पराक्रम दाखवले होते. एकदा गंमतच झाली. त्या कोचला याच्या उपद्व्यापांमुळे एक भगदाड पडलं होतं, त्यामध्ये स्वत: शेरलॉकच पडला. आमची हसून हसून पुरेवाट झाली. त्याला चपला आणि मोजे भयंकर आवडतात. माझ्या जवळपास सगळ्या चपलांवर ‘शेरलॉक खूण’ आहेच. म्हणजे एखाद्या जुन्या हिल्स मी घालायला काढल्या की मला अचानक जाणवायचं की यातल्या एकीचा शेरलॉकने चक्क तुकडा पाडलाय. मोजेप्रेम तर त्याला इतकं आहे की काय सांगावं.. एकदा माझ्याकडे माझी एक मैत्रीण आली होती. तिचे दोन्ही मोजे शेरलॉने चक्क गिळून टाकले. आम्ही त्याला मोजे घेऊ नको म्हणून ओरडायच्या आत, अगदी काही सेकंदातच ते शेरलॉकच्या पोटात विसावले होते. नंतर ते बाहेर काढून टाकायलाही आम्हाला बरेच उद्योग करावे लागले, तो भाग निराळाच. एकदा तर साहेबांनी चक्क स्क्रॉचब्राइट गिळलं होतं.

शेरलॉकला गाजर खूप आवडतं. त्याशिवाय मटण वगैरे तर आवडत्या गोष्टी आहेतच. पण त्याला व्हॅनिला आईस्क्रीम विशेष आवडतं. बाहेर गेल्यावर मला कधी रस्त्यावर तहानलेले भूभू दिसले तरी मी त्यांना व्हॅनिला आईस्क्रीम देते. कारण उन्हाळ्यात पाण्याविना व्याकूळ झालेल्या, थकलेल्या हैराण झालेल्या कुत्र्यांसाठी व्हॅनिला आईस्क्रीम हा एक त्वरित ऊर्जा देणारा प्रकार असतो.

शेरलॉकची आमच्या घरातली आवडती गोष्ट म्हणजे बिनबॅग. त्याच्यासाठी आणलेलं हाडूक तो त्या बिनबॅगमध्ये खणून आत लपवतो आणि मग नाकाने पुन्हा वास घेत ते बाहेर काढतो. कुत्रे जसं वाळूतलं अन्न वास घेऊन शोधतात किंवा लपवतात, त्यातलाच हा प्रकार असावा. त्याच्यातल्या मूलभूत ऊर्मी त्याला स्वस्थ बसू देत नाहीत. बीगल्स हे अत्यंत खेळकर, चपळ असतात. शेरलॉकही त्याला अपवाद नाही. त्याला पळायला खूप आवडतं. नवव्या मजल्यावरच्या माझ्या फ्लॅटचं दार उघडं राहिलं की हा थेट नऊ मजले उतरून, उडय़ा मारत पळतो. त्याच्यामागे मीही पळत असते. भलताच गमतीशीर प्रकार असतो. शेरलॉकमागे पळताना अनेकदा आमच्या घराचं लॅच लागलेलं आहे. आम्ही बाहेर किल्ली आत, असले प्रकार तर अनेकदा  झालेले आहेत.

त्याच्या बाबतीतली सर्वात कठीण गोष्ट म्हणजे प्रवास. त्याला प्रवास आवडत नाही. त्याला लवकरात लवकर गंतव्य ठिकाणी पोहाचायचं असतं. त्यामुळे तो गाडीत खूप दंगा करतो. त्रास देतो. एकदा आम्हाला कोणीतरी सांगितलं की कुत्र्यांसाठी खास सूदिंग म्युझिक असतं. शेरलॉक ते ऐकूून शांत होतो. पण खरं सांगायचं तर आपल्यालाच झोप येते. एकदा आम्ही शेरलॉकला घेऊन निघालो होतो. गाडीत डॉग्ज सूदिंग म्युझिक सुरू होतं. थोडय़ा वेळाने ड्रायव्हरने गाडी एका बाजूला थांबवली आणि म्हणाला, मॅडम काय होतंय माहिती नाही; पण झोप येतेय. आमचं हसूही थांबेना आणि उपायही सुचेना. शेवटी म्युझिक बंद करून आम्ही शेरलॉकची मस्ती अनुभवायचं ठरवलं. अगदी मुलांसारखंच त्यालाही भरपूर नाचायचं असतं. गवतावर खेळायचं असतं. मोकळ्या हवेत राहायचं असतं. मुंबईच्या घरात ते शक्य होत नाही. त्यामुळे तळेगाव आणि अहमदाबादच्या मोठय़ा घरात गेल्यावर तो भयंकर खूश असतो.

एवढं सगळं असलं तरी घरी आल्यावर त्याचं आपल्यावर प्रेम करणं, आपल्या अंगावर उडय़ा मारणं या लोभस गोष्टींमुळे शेरलॉकवरचा राग टिकत नाही. त्याचा रागच आम्हाला येत नाही. त्याने दिलेल्या त्रासाचंही काही वाटत नाही. कारण तो खरोखरच आमच्या घराला आणि कुटुंबाला परिपूर्ण करतो.

swati.pandit@expressindia.com