15 December 2017

News Flash

रेशमी घरटे : सप्तसुरांचं घरकुल

रेशमी घरटे’ मध्ये आज पत्की काकांच्या सूरमयी घराला भेट देऊया.

अंजली कुलकर्णी-शेवडे | Updated: April 29, 2017 3:05 AM

रेशमी घरटे’ मध्ये आज पत्की काकांच्या सूरमयी घराला भेट देऊया.

कोणे एके काळी ‘मिले सुर मेरा तुम्हारा..’ दूरदर्शनवर नेहमी लागायचं. पण त्याची ठरावीक अशी वेळ नव्हती. टी.व्ही. लावल्यावर ते ऐकायला मिळेल का याची उत्सुकता वाटायची. मग दुसऱ्या खोलीत अभ्यास करत असलं तरी ‘मिले सुर..’ लागलं की येऊन तेवढं बघून परत जायचं असं होत असे. तसंच काहीसं ‘पूरब से सूर्य उगा..’च्या बाबतीत व्हायचं, ‘बीज अंकुरे अंकुरे’च्या बाबतीतही व्हायचं. म्हणजे ‘गोटय़ा’ ही मालिका तर बघावीशी वाटायचीच, पण मालिकेचं शीर्षकगीतही ऐकत राहावंसं वाटायचं. असं वाटण्यात शब्द आणि स्वरांइतकाच महत्त्वाचा वाटा होता या रचनांच्या चालींचा. अजूनही मनात रेंगाळणाऱ्या या चाली दिल्या होत्या संगीतकार अशोक पत्की यांनी. ‘रेशमी घरटे’ मध्ये आज पत्की काकांच्या सूरमयी घराला भेट देऊया.

पत्कीकाकांची पंचाहत्तरी नुकतीच झाली असली तरी अजूनही ते खूप बिझी असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून थोडातरी निवांत वेळ देता येईल का अशा विचारातच त्यांना फोन केला. फोनवर काका अगदी आपुलकीने बोलले आणि एका प्रसन्न सकाळी मी त्यांच्या माहीमच्या घरी पोचले. शिवाजी पार्क हाकेच्या अंतरावर असल्याने त्यांच्या घराचा सगळा परिसरच एकदम छान आहे. १९६५ सालचं बांधकाम असलं तरी त्यांची ‘हॅपी हेवन’ सोसायटी अजूनही मजबूत आहे. जिने चढून वर गेल्यावर एक बेडरूम-हॉल-किचन असं आटोपशीर घर दिसलं. अगदी कुठल्याही मध्यमवर्गीय मराठी माणसाचं असतं तसं छान साधंसुधं, आपुलकीचं वातावरण असलेलं.. त्यांच्या घराने एकदम मनात घर केलं. पत्कीकाकांच्या घराचं अगदी सुटसुटीत इंटिरियर ‘सुयोग’च्या सुधीर भटांनी केलं होतं. तिसेक वर्षांपूर्वी जेव्हा पत्कीकाकांनी हे घर घेतलं तेव्हा भटांनी इंटिरियर करताना हॉलमध्ये तिन्ही भिंतींना लॉफ्ट केला, काकांना भविष्यात मिळणारे पुरस्कार ठेवायला जागा हवी म्हणून! सुधीर भटांनी दूरदर्शीपणाने केलेली ती योजना एकदम सफल झाली, कारण आता त्या लॉफ्टवर काकांना मिळालेल्या सगळ्या ट्रॉफीज अगदी दिमाखात विराजमान झाल्या आहेत. हॉलची गॅलरी आत घेण्याची कल्पनाही सुधीर भटांचीच. काकांकडे संगीतविषयक कामासाठी अनेक लोक येणार, त्यांच्या मीटिंग्ज, तालमी तिथे होणार, तेव्हा हॉल ऐसपैस पाहिजे या विचाराने गॅलरी हॉलमध्ये समाविष्ट झाली आणि खरोखरंच नंतरच्या काळात पत्कीकाकांकडे कामासाठी माणसांच्या रांगा लागल्या.  एक विशिष्ट प्रकारचं ‘लॉक’ ही सुधीर भटांची खासियत. त्यांनी ज्या ज्या कलाकारांची घरं सजवली त्या त्या घरांमध्ये ते लॉक दिसतं. पत्कीकाकांकडेही अर्थातच दारांना त्या लॉकचा वापर केलेला दिसून येतो.

माहीमसारख्या भागात घर घेण्याचा योग कसा जुळून आला ते मात्र काकांच्याच शब्दांत सांगायला हवं. ते म्हणाले, ‘‘आम्ही पूर्वी खारला राहायचो. ते घर तसं छोटं होतं. भावाच्या लग्नाचं बघायला सुरुवात झाली होती. सगळ्यांना त्या घरात राहणं शक्य नव्हतं. म्हणून वडिलांनी मला जागा शोधायला सांगितलं. तेव्हा मी वरळीला रेडिओवाणी या स्टुडिओत काम करायचो. मला रोज सकाळी आठला तिथे पोहोचावं लागायचं. त्यामुळे वरळीला जाण्याच्या दृष्टीने सोयीच्या ठिकाणी घर असावं असं वाटत होतं. एक दिवस सकाळी नेहमी प्रमाणे मी स्टुडिओत जाण्यासाठी तयार होत होतो तेव्हा सुखटणकर नावाच्या एजंटचा फोन आला. माहीमला एक घर बघायला येण्याविषयी त्याने सांगितलं. पण त्याकाळी त्या भागात जागेचा भाव ८-१० लाख रुपयांपर्यंत चालू होता आणि माझं बजेट साधारण दोन ते अडीच लाखांपर्यंत होतं. त्यामुळे माहीम एरियात जागा परवडणार नाही असं मी त्या एजंटला सांगितलं. पण त्याने जागा पाहायला येण्याचा आग्रहच केला. मी जागा बघितली. फ्लॅट एक बेडरूम-हॉल-किचन असा असला तरी प्रशस्त होता. हवा, उजेड भरपूर होता. मला तर घर खूपच आवडलं. घराचे मालक परदेशात राहत होते. त्यांनी चार लाख किंमत सांगितली. माझं बजेट तर तेवढं नव्हतं. मी तेव्हा वैद्यनाथन आणि वनराज भाटियांकडे काम करायचो. दोघांकडे घरासाठी पैसे मागायला मला खूपच संकोच वाटत होता. शेवटी नाही-होय करत मी त्यांच्याकडे शब्द टाकला. दोघांनीही ताबडतोब एकेक लाखाचे चेक लिहून दिले. अशा तऱ्हेने पैशांचा प्रश्न मिटला आणि मला अत्यंत आवडलेल्या घरात आम्ही राहायला आलो!’’

पत्कीकाकांना नऊ  हा अंक खूप लाभदायक ठरतो, अशी त्यांची श्रद्धा आहे. त्यांच्या या बिल्डिंगचा प्लॉट नंबर ६०३ आहे आणि घराचा नंबरही नऊ  आहे.

हे घर पत्कीकाकांना सर्वार्थाने लाभदायक ठरलं. आठ हजारांहून जास्त जिंगल्स, चारशे नाटकांचं संगीत, सव्वाशे चित्रपटांचं संगीत, ५०० मालिकांची शीर्षकगीतं अशी त्यांची सांगीतिक कारकीर्द तिथे आल्यावर बहरली. शिवाय वैयक्तिक आयुष्यातही मनाजोगत्या घटना घडल्या. नवीन घरात राहायला आल्यावर अपत्यप्राप्ती झाली. आता त्यांचा मुलगा- आशुतोष हा सध्याच्या काळातला एक प्रॉमिसिंग अभिनेता म्हणून ओळखला जातोय. ‘दुर्वा’ या मालिकेतली त्याची ‘रंगा’ची भूमिका खूपच लोकप्रिय ठरली होती.

‘हॅपी हेवन’ मधल्या घरात राजदत्त, गिरीश घाणेकर, कमलाकर तोरणे अशा दिग्दर्शकांपासून ते सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, दिलराज कौर, साधना सरगम, स्वप्नील बांदोडकर, अमेय दाते, केतकी माटेगांवकर अशा गायक-गायिकांपर्यंत अनेक प्रथितयश कलाकार येऊन गेलेत. याच घराच्या दिवाणखान्यात तयार झालेली ‘न कळता असे ऊन मागून येते..’ या ‘आपली माणसं’ चित्रपटातल्या गाण्याची चाल काकांसाठी आजही संस्मरणीय आहे.

पत्कीकाकांशी या सगळ्या गप्पा चाललेल्या असतानाच एक छान गबदुल असा बोका दारातून आत आला. या बोक्याला हवं तेव्हा घरात येता यावं आणि बाहेर जाता यावं म्हणून मुख्य दरवाजाला खालच्या कोपऱ्यात एक झरोका ठेवलाय, त्याची झडप ढकलून हे बोकेमहाराज हवं तेव्हा येऊ-जाऊ  शकतात. आशुतोषने इंटरनेटवरून माहिती शोधून ही छोटय़ा खिडकीची सोय करून घेतलीय. त्या बोक्याचा संपूर्ण रंग करडा, पण पायाचे पंजे आणि थोडा भाग तेवढा पांढऱ्या रंगाचा असल्यामुळे त्याने पायात सॉक्स घातलेत असं वाटतं, म्हणून त्याचं नाव ‘सॉक्सी’ ठेवलंय!

पत्कीकाका एवढे यशस्वी, लोकप्रिय असूनही ्रत्यांचे पाय एकदम जमिनीवर आहेत. त्यांचं साधं-सरळ, निगर्वी असणं, मनमोकळं बोलणं, आपुलकीचं वागणं मनाला स्पर्शून गेलं. अशोक पत्की आणि अश्विनी पत्की यांच्याशी त्यांच्या घरानिमित्ताने झालेला संवाद एक खूप छान अनुभव देणारा ठरला, हे नक्की!

अंजली कुलकर्णी-शेवडे anjalicoolkarni@gmail.com

First Published on April 29, 2017 3:05 am

Web Title: musician ashok patki home in mumbai