25 February 2021

News Flash

नवी मुंबई सोयी-सुविधांनी युक्त शहर

नवीन पनवेल म्हणजेच खांदा कॉलनी येथे अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींना शासनाने दिलेला एफएसआय, गावांच्या विकासासाठी लागू करण्यात आलेली क्लस्टर योजना आणि एमआयडीसीच्या माध्यमातून झोपडपट्टी भागात भविष्यात राबविण्यात येणारी झोपडपट्टी पुर्नवसन योजना.. यामुळे नवी मुंबई हे ४५ वर्षांपूर्वी वसविण्यात आलेले नवीन शहर कात टाकणार असून, सध्या असलेली बारा लाख लोकसंख्या दुप्पट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काळात नवी मुंबईत मोठय़ा प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प तयार होत आहेत.

मुंबईवर आदळणारे लोकसंख्येचे लोंढे कमी करता यावेत म्हणून शासनाने ४५ वर्षांपूर्वी सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई ही दुसरी मुंबई निर्माण केली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने तिची सर दुसऱ्या, तिसऱ्या मुंबईला येणारी नाही. नवी मुंबईची भौगोलिक रचना ही मुंबईशी मिळतीजुळती आहे. सिडकोने वसविलेले सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईचा बोलबाला आहे. त्यात बीबीसीने केलेल्या एका सर्वेक्षणात नवी मुंबई सुपर सिटीत आल्यापासून काहीसा या शहराचा भाव वधारला आहे.

खाडी आणि डोंगर यांच्या मधील एका बेटावर वसलेल्या या शहरात नगरविकासाचे नियम कडक केल्याने शहरात शिस्तबद्ध नियोजन सुरू आहे. तरीही अनधिकृत बांधकामेही येथे होत आहेत. या अनधिकृत लोकसंख्येच्या भरीनंतर अधिकृतरीत्या उभ्या राहणाऱ्या टोलेजंग टॉवरमधील लोकसंख्या या शहराच्या अस्तित्वात भर घालत आहे.

नवीन पनवेल म्हणजेच खांदा कॉलनी येथे अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. इथे शहरीकरण झपाटय़ाने वाढत आहे. अनेक विकासक उत्तम गृहप्रकल्प उभारत आहेत. त्यामुळे येथेही घरांना मोठी मागणी आहे.

इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी अनेक प्रस्ताव पालिकेच्या नियोजन विभागाकडे प्रलंबित आहेत.  त्यांना लवकरच संमती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाशी, ऐरोली, नेरुळ यांसारख्या उपनगरांत आहे त्यापेक्षा दुप्पट लोकसंख्या येत्या काळात नवी मुंबईच्या अन्य भागांमध्ये वाढेल.

तळोजा पाचनंद

पनवेल परिसरातील सिडको नोड म्हणून संबोधला जाणारा तळोजा पाचनंद परिसर विकासकांना खुणावत आहे. सर्वच दृष्टीने योग्य आणि मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण या शहरांपासून जवळ असल्याने विकासाचे वारे तळोजा पाचनंद परिसरात वाहत आहेत. सर्वच दृष्टीने सोयीचा ठरणारा हा परिसर असल्याने गृहनिर्माण प्रकल्पांसाठी उत्तम संधी आहे. त्या दृष्टीने अनेक विकासक येथे गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यास इच्छुक आहेत. अत्यंत शांत, निसर्गरम्य परिसर असल्याने आपलं स्वत:चं हक्काचं घरकुल या भागात असावं असं प्रत्येकाला वाटू लागलं आहे.

 कळंबोली

सिडकोच्या दक्षिण स्मार्ट सिटीमधील एक कळंबोली नोड हे सध्या रहिवाशांसाठी सोयीची वसाहत बनली आहे. प्रस्तावित आंतराराष्ट्रीय विमानतळापासून चारचाकी वाहनाने अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध असतील. अडीच लाख लोकवस्तीच्या या वसाहतीमध्ये वीज व पाण्याच्या इतर वसाहतींना भेडसावणाऱ्या कोणत्याही पायाभूत समस्यांना येथील रहिवाशांना सध्या तरी तोंड द्यावे लागत नसल्याची सोय सिडकोने येथे केली आहे.

– प्रतिनिधी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 1:01 am

Web Title: navi mumbai city with facilities luxurious
Next Stories
1 वस्तू आणि वास्तू : प्रवासी बॅगा आणि आयत्या वेळची धावाधाव
2 झोपाळा.. आमचा विरंगुळा
3 रेरा कायदा लागू होण्याची तारीख
Just Now!
X