10 December 2018

News Flash

आखीव-रेखीव : घरसजावटीचे नवे पर्याय

नवीन वर्षांत घरसाजावटीच्या नवनवीन पर्यार्याविषयी माहिती देणारं सदर..

घरसजावटीचे नवे पर्याय

नवीन वर्षांत घरसाजावटीच्या नवनवीन पर्यार्याविषयी माहिती देणारं सदर..

नवीन वर्ष येतानाच आपल्यासोबत उत्साह, आनंद आणि अनेक आश्चर्यकारक गोष्टी घेऊन येते. नवीन वर्षी कोणत्या फोनचे कोणते नवीन व्हर्जन येणार, कोणते गॅझेट येणार याचबरोबर कोणत्या प्रकारचे सिनेमा या वर्षी येऊ  शकतात, कोणत्या कपडय़ांचा ट्रेंड असेल.. या सर्व गोष्टींबद्दल आपल्या सगळ्यांना फारच उत्सुकता असते. विविध क्षेत्रांप्रमाणेच इंटिरिअर डिझाइन या क्षेत्रातही दर वर्षी नवनवीन ट्रेंड्स येतात. त्यानुसार या वर्षीचे होम डेकोर ट्रेंड्स  कोणते आहेत हे आपण बघूयात. गृहसजावटीची मासिके, या क्षेत्रातील दिग्गज आणि सव्‍‌र्हे यांच्या मदतीने हे ट्रेंड्स ठरतात. आपल्या भौगोलिक स्थानानुसार वा वातावरणानुसार, जीवनशैलीनुसार ज्या ट्रेंड्स आपल्याला सहज अमलात आणता येतील आणि त्या इथे छान वाटतील असेच ट्रेंड्स आज आपण जाणून घेऊ.

*    फर्निचर- सुटसुटीत, ग्राहकाच्या मागणीनुसार बनविलेल्या फर्निचरला लोकांची पसंती असते. खूप बोजड, उपयुक्तशून्य अशा फर्निचरचा फारसा वापर यंदा होणार नाही. आपल्या गरजेनुसार स्टोरेज बनवून घेण्याचा काळ असेल. हे बनवतानाच नैसर्गिक साहित्याला फारच मागणी असेल. फर्निचरच्या रंगासाठी डार्कवुड कलर वापरणे. फर्निचर डिझाइन करताना मिश्र साहित्याचाही वापर होईल.

* वैशिष्टय़पूर्ण सीलिंग- ज्याला आपण ‘स्टेटमेंट सीलिंग’ म्हणू अशाच डिझाइनला यंदा पसंती मिळेल. साध्या सीलिंगपेक्षा हटके सीलिंग करण्याकडे लोकांचा ओढा असेल. बोल्ड टेक्स्चर, स्ट्राइप असणारे वॉल पेपर सीलिंगला लावणे, ब्रास किंवा धातूचे थोडे मोठे असणारे दिवे वापरण्यात येतील.

* रंगसंगती- पॅनटोन या कंपनीने २०१८ साठी ‘अल्ट्रा व्हॉयलेट’ या रंगाची निवड केली आहे. तुम्हाला प्रश्न पडेल की, हा रंग भिंतीवर कसा दिसेल?  कारण सगळ्यांनाच हा रंग आवडेल असे नाही. पण हा रंग तुम्ही लाइट इफेक्टस्मध्ये वापरू शकता. या रंगाशिवाय मिलेनिअल पिंक, लव्हेंडर, ऑलिव्ह ग्रीन आणि काही ठळक छटाही घेऊ  शकतो.

* वॉल आर्ट- या वर्षी मोकळ्या भिंती ठेवण्याचा ट्रेंड नाही. भिंती सजवण्यासाठी आपण टेक्स्चर वॉल पेपरबरोबरच, थ्रीडी डिझाइनचे वॉल पेपर, एखादा आर्ट पीस, याशिवाय मार्केटमध्ये खूप विविध प्रकारचे वॉलला लावता येतील असे मटेरियल उपलब्ध आहे जसे- चारकोल, कोरियनचे शीट; असे काही वेगळे, पण सुंदर मटेरियल वापरून आपण एखाद्या भिंतीला त्या खोलीच्या केंद्रस्थानी ठेवू शकतो.

* मिक्स मेटल- २०१७ मध्ये ‘रोझ गोल्ड’ या धातूला पसंती होती. या वर्षीही ‘ब्रास’ या धातूने आपली जागा समर्थपणे टिकवून ठेवली आहे. त्यामुळे परत एकदा काही वस्तू, धातू हे टाइमलेस असतात हे सिद्ध झालंय. ब्रासबरोबरच ग्रे, चारकोल शेडच्या धातूलाही पसंती असणार आहे.

* फॅब्रिक- फर्निशिंग- या वर्षी ‘फ्लोरल’ पॅटर्नचा ट्रेंड असेल. फ्लोरलबरोबरच भौमितिक आकारांचेही प्रिंट असतील. हाताने तयार केलेले कुशन कव्हर्स, कार्पेट यांना छान बाजारपेठ मिळेल. तसेच वेलवेट आणि सॉफ्ट लेदर हे जास्त पसंतीस उतरतील. काळा-पांढरा, नारंगी-लाल या रंगसंगतीचा वापर कुशन कव्हर्समध्ये जास्त असेल, तर मिलेनिअल पिंक, पिक्कट जांभळा, निळा या रंगांच्या काही छटा सोफा, खुर्ची यांच्यासाठी वापरल्या जातील.

* नैसर्गिक मटेरियल- ज्याला आपण नैसर्गिक म्हणतो अशाच साहित्याचा वापर जास्तीत जास्त होईल. लॅम्पशेड, वॉल आर्ट, फर्निचर, गालिचे, शोभेच्या वस्तू या नैसर्गिक साहित्यापासून बनवल्या असतील तर त्या वापरण्याकडे ग्राहकांचा कल असेल.

* गडद रंगाचे किचन- गेल्या वर्षी स्वयंपाकघरात सफेद रंगाला पसंती होती. या वर्षी गडद रंगाचा वापर करून स्वयंपाकघराला एक वेगळाच लुक मिळेल.

* शांतताप्रिय जागा- शांततेचा अनुभव घेण्यासाठी, छान रिलॅक्स होण्यासाठी घरात, आपल्या खोलीत एखादा कॉर्नर तयार करणे- जिथे बसून आपल्याला उत्साहआणि सकारात्मक ऊर्जा  मिळेल.

* घरातली हिरवाई  पुन्हा एकदा ‘गो ग्रीन’. घरात जे रोपटं ठेवू त्यामध्ये ज्या रोपटय़ांची पाने वैशिष्ट्यपूर्ण त्यांनाच विशेष पसंती दिली जाईल. ज्यांना या वर्षी इंटिरिअर करायचे आहे त्यांना या ट्रेंड्सचा वापर करून आपले घर अधिक सुंदर करता येईल. या  सगळ्या ट्रेंड्सचा वापर करताना आपली आवड आणि आपल्या गरजा लक्षात ठेवून घराची सजावट करून घेतली तर घरात शांततेचा अनुभव घ्याल.

(इंटिरियर डिझायनर)

kavitab6@gmail.com

First Published on January 20, 2018 3:40 am

Web Title: new home decoration options