18 January 2019

News Flash

जुन्या वास्तू आणि त्या काळचे पाहुणे

पाहुणे आल्यावर ते आणि त्यांची मुले सर्वप्रथम देवांना नमस्कार करीत.

हल्लीच्या काळात एकमेकांकडे पाहुणे म्हणून जाऊन राहणे, ही संकल्पना पूर्णपणे बदलली आहे. लोक एकमेकांकडे जातात, पण लॉजमध्ये उतरतात. काही ठिकाणी यजमानच पाहुण्यांची (पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणे) व्यवस्था लॉजमध्ये करून त्यांना जेवणाखाण्यासाठी घरी बोलावतात. आता पाहुणे म्हणून जाण्याची पद्धत किती बदलली आहे, त्याचा हा धांडोळा.

हल्ली नात्यामध्ये एकमेकांकडे जाऊन राहण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. सगळीकडेच फोन आलेले आहेत. त्यामुळे खुशाली कळते. खरे सांगायचे तर हल्ली माणसे दोनदा निश्चितपणे भेटतात. ती म्हणजे लग्नात नाही तर दहाव्याला. हे कटू वाटले तरी वास्तव आहे. आत्तासारखी पूर्वी दळणवळणाची साधने, फोन्स, ई-मेल, व्हॉटस् अ‍ॅप या गोष्टी नव्हत्या. त्यामुळे नातेवाईक एकमेकांकडे जाऊन राहत.

पाहुण्यांच्या येण्याबद्दल जे वर्णन पुढे दिले आहे ते साधारण १९४० ते १९६० या काळातले आहे. त्याकाळी कुणाकडे पाहुणे म्हणून जाण्याची प्रथा चांगलीच प्रचलित होती. घरी पाहुणे येणार म्हणून अगोदरपासूनच सगळीकडे गाजावाजा झालेला असायचा. त्याकाळी १९४८ पर्यंत युनियनच्या गाडय़ा होत्या. नंतर लाल डब्याची एसटी गाडी आली. तेव्हा ही गाडी खेडेगावांतून येत नसे. त्यामुळे पाहुण्यांना आणण्यासाठी यजमान बैलगाडी वा छकडा असे काही तरी वाहन आपल्या गडय़ाबरोबर त्या गाडी स्थानकावर पाठवीत असे. रात्र झाल्यास बैलगाडीला पुढे कंदील बांधलेला असे आणि या बैलांच्या गळ्यातील घुंगरांच्या आवाजात पाहुण्यांची बैलगाडी गावात पोहचत असे. तेव्हा डांबरी अथवा सिमेंटचे रस्ते नव्हते. खेडय़ांतील रस्ते मातीचेच असत. प्रवासी गाडय़ांकरिता खडीचा रस्ता असे.

तेव्हाच्या युनियनच्या गाडय़ांना आत्तासारखा कंडक्टर नसे. क्लीनरच सर्वाकडून तिकिटाचे पैसे गोळा करायचा. मात्र प्रवाशांना तिकीट दिले जात नसे. गाडी सुरू करताना प्रत्येक वेळी गाडीला हॅण्डल मारावे लागे. हे हॅण्डल इंग्रजी या झेड अक्षरासारखे असे. ते मारण्याचे काम क्लीनरच करायचा. गाडी प्रवाशांनी खच्चून भरलेली असे. अशा वेळी पुरुष प्रवासी गाडीच्या टपावर बसूनही प्रवास करायचे. प्रवासात भुकेसाठी भाकरी, घावन असे पदार्थ बरोबर असत. पिण्याचे पाणी फिरकीच्या तांब्यातून घेतलेले असे.

पाहुणे घरी आले की त्यांना घरापुढील अंगणात पाय धुण्यासाठी तांब्याच्या घंगाळात पाणी ठेवलेले असे. हे अंगण चोपलेल्या मातीचे असे. थंडीचा मोसम असल्यास गरम पाणी असे. तिथे हात-पाय पुसण्यासाठी पाहुण्यांना पंचा देण्यासाठी कोणी तरी उभे असे. नंतर हे पाहुणे ओटीवर प्रवेश करते होत. त्यांना ओटीवर बसण्यासाठी सतरंजी आणि भिंतीला टेकून तक्के ठेवलेले असत. नंतर पाहुण्यांचा चहा होत असे. संध्याकाळची वेळ आणि ताज्या दुधाचा चहा असल्यास त्याला निरशा दुधाचा चहा म्हणत. त्या काळी लोक चहा बशीत ओतून तोंडाने फुंकर मारत, फुरफुर असा आवाज काढत पीत पाहुण्यांना मुलांना, ‘लहान मुलांनी चहा प्यायचा नसतो,’ असे सांगून त्यांना चहा अजिबात दिला जात नसे. त्या वेळी चहाबरोबर बिस्किटे वगैरे असे काहीच नसे.

पुरुष पाहुणे धोतर, कोट आणि टोपीवर असत. बायका नऊवारी लुगडय़ांत असत. त्यांच्या कपाळावर मोठे अडवे कुंकू असे. या कुंकवाला ‘चिरी’ म्हणत. साधारण दहा वर्षांपर्यंतच्या मुली परकर-पोलक्यात असत. पोलके म्हटले तरी खरी ती चोळीच असे. या पोलक्यांना बटणे नसून, बटणांच्या जागी पोलक्याला गाठी मारलेल्या असत. बायकांच्या चोळ्याही तशाच असत. आम्ही मुले पाहुण्या मुलींकडे नजरेला नजर लावून बघत नसू. पण त्यांच्याकडे तिरप्या नजरेने हळूच चोरून पाहायचो. काहीवेळा त्यांना दाराच्या फटींतूनपण हळूच बघायचो.

पुरुष पाहुणे सदरा (शर्ट), विजार (पॅन्ट), कोट आणि टोपी ओटीवर खुंटीला अडकवत. या काळ्या टोपीला ताठपणा राहण्यासाठी आतून पुठ्ठा असे. हा पुठ्ठा डोक्यात टोपी घालून घालून कमालीचा घामटलेला असे. काही वेळा या पुठ्ठय़ाचा घाण वास समोरच्या माणसालाही शिसारी आणत असे.

पाहुण्यांसोबत तीन प्रकारचे सामान असे. पहिली म्हणजे पत्र्याची ट्रंक. ही ट्रंक गंजलेली असे. बहुतेकदा तिला पोचेही आलेले असत. पाहुणे लोक त्यांच्या ट्रंकेला कुलूप लावीत. ट्रंकेची चावी पाहुणा आपल्या जानव्यात अडकवे. बायका त्यांचे पैसे आपल्या कापडी बटव्यांत ठेवत आणि तो बटवा त्या कमरेला अडकवीत. दुसरा प्रकार म्हणजे वळकटी. ही वळकटी सतरंजीत गुंडाळलेली असे आणि ती चारी बाजूंनी दोरीने बांधलेली असे. तिसरा प्रकार म्हणजे हातात धरावयाच्या दोन बंदवाल्या पिशव्या. परत जातान सामान बरेच असल्यास ते पोत्यांत बांधून नेत.

पाहुणे आल्यावर ते आणि त्यांची मुले सर्वप्रथम देवांना नमस्कार करीत. त्यानंतर प्रथम वृद्धांना आणि नंतर इतर मोठय़ांना नमस्कार करीत. नंतर आम्ही यजमानांची लहान मुले आलेल्या पाहुण्यांना नमस्कार करीत असू. त्या वेळी पाहुणे मंडळी आम्हाला, ‘तू कितव्या येत्तेत आहेस? तुझी उंची किती? रोज सूर्यनमस्कार घालतोस का? दिवे लागण्याच्या वेळी देवाला आणि मोठय़ा माणसांना नमस्कार करतोस का? वर्गात कितवा नंबर आहे? संध्याकाळचा परवाचा आणि रामरक्षा म्हणतोस का?’ असले वैताग देणारे प्रश्न विचारीत. आमचे मरण येथेच संपत नसे तर नंतर ते पाढे म्हणण्यास सांगत. इतिहास – भूगोल, ऱ्हस्व-दीर्घ शब्द असले प्रश्न विचारून ते आमच्या मेंदूचा भुगा पाडत. त्यामुळे मनातल्या मनात आम्ही पाहुण्यांचे माता-पिता उद्धरायचो.

त्यानंतर पाहुण्यांनी आणलेला खाऊ आमच्या आईकडे दिला जाई. हा खाऊ म्हणजे दुधी अथवा कोहळ्याच्या वडय़ा, बेसनवडय़ा असे काही तरी असे. हा खाऊ जुन्या धोतराच्या फाडलेल्या फडक्यात गाठी मारून बांधून आणलेला असे. थोडय़ा वेळाने लहान मुलांना प्रथम जेवायला वाढले जाई. जेवणात पिठलं-भात नाही तर आमटी-भात ठरलेला असे. पिठलं-भात भुरकून खाल्ला जाई. नंतर मोठी माणसे जेवायला बसत. त्यांच्यासाठी जेवणाबरोबर काही तरी तुकडा म्हणजेच घावन किंवा भाकरी असे. पोळी कधी तरी असे. पोळी असल्यास आम्हा मुलांना एकएक चतकोर पोळी मिळे. नाही तर इल्ला. पाहुणे जेवावयास पाटावर बसत, तर मुले जमिनीवर.

जेवताना मुलांचे श्लोक होत. मुंज झालेल्यांनी चित्रावती घातल्या आहेत की नाही हे पाहिले जाई. रात्रीची जेवणे झाल्यावर मुलांना झोप आलेली असतानाही मोठी माणसे त्यांना फेऱ्या मारण्यास सांगत. आम्हा मुलांना त्याचा वैताग वाटे. पाहुण्यांना हाताने वारा घेण्यासाठी पंखे दिले जात. हे पंखे पुठ्ठय़ाचे तयार केलेले असत. पुरुष मंडळी तक्क्याला टेकून बसत. जेवणानंतर ते विडय़ाचे पान खात. नंतर पिकदाणीत थुंकत. याची आम्हा मुलांना घाण वाटे.

आम्ही मुले सकाळी उठलो की गोवरीपासून केलेल्या राखुंडीने दात घासत असू. नंतर परडीत फुलझाडांवरची फुले खुडत असू. त्यांसोबत दुर्वा खुडून २१ दुर्वाच्या जुडय़ा बनवायचो. नंतर मुलांना पितळी भांडय़ातून पिण्यासाठी दूध दिले जाई. त्यानंतर मुलांच्या अंघोळी होत. अंघोळीसाठी साबण नसे. अंघोळ झाल्यावर सकाळी न्याहारी होत असे. या न्याहारीसाठी काण्हेरी, मऊ भात आणि बाजूला लोणचे असे काही तरी असे. एखाद्दिवशी ओल्या फेण्यांचा प्रकार असे. दुपारच्या खाण्यासाठी लाडू-चिवडा नाही तर हातफोडणीचे पोहे असे काही तरी असे.

सकाळचा मऊ भात जेवून झाला की आम्ही मुले खेळावयास जायचो. खेळपण ठरलेले असायचे. लपंडाव, आटय़ापाटय़ा, लगोऱ्या, विटी-दांडू वगैरे. मुली वेगळ्या खेळत. त्यांचे खेळ म्हणजे सागरगोटे, भेंडय़ा, गाणी, भातुकली वगैरे. आम्हा मुलांना पाहुण्या मुलींबरोबर एकत्र खेळण्यास जवळजवळ मिळत नसे. तरी त्यांचा त्यांची वस्तू देताघेताना किंवा एरवीही स्पर्श झाला की गोड स्पर्शाचा सुखद आनंद वाटे. त्या वेळी मुलींमध्ये दोन शेपटे घालण्याची पद्धत होती. मुलींची नावे नद्या किंवा देवींची असत. म्हणजेच गंगु, यमु, गोदु, सीता, रुक्मिणी, लक्ष्मी वगैरे. आत्तासारखी ऐश्वर्या, करिश्मा असली नावे नसत.

मुली आणि बायकांच्या अंघोळीअगोदर वेण्या घालण्याचा कार्यक्रम असे. एक जण कुंकवाच्या उघडझापीच्या पेटीसमोर आरशासमोर बसे आणि प्रौढ बाई तिची वेणी घाले. वेण्या घालता घालता बरीच बडबड चाले. त्या काळी लाकडी फणीने वेण्या विंचरत. आत्तासारखे कंगवे नसत. मुलींच्या डोक्यांतून उवा काढून त्या उलटय़ा नखाने मारण्याचा खास कार्यक्रम चाले. त्या वेळी ऊ मारण्याचा टचकन आवाज येई. मुलींच्या केसांना चापून तेल लावून नंतर वेण्या घातल्या जात. मे महिन्यात नदीवर ुअंघोळीला जाण्याचा कार्यक्रम असे. प्रथम मुलांच्या अंघोळी होत. नंतर मुलांना घरी पिटाळले जाई. नंतर मुली अंघोळीसाठी नदीत उतरत.

पाहुणे मंडळी पाच-सहा दिवस तरी राहत. रोजचा कार्यक्रम थोडय़ाफार फरकाने असाच असे. खासकरून मोठय़ा पुरुषांच्या गप्पा चालत. बायकांच्या स्वयंपाक करताना भरपूर गप्पा व्हावयाच्या. संध्याकाळची पुरुष मंडळी देवळात नाही तर नदीकिनारी, समुद्रकिनारी असे फिरावयास जात. हे फिरणे कोरडे असे. आत्तासारखे भेळ, पाणीपुरी, पावभाजी, पिझ्झा असले प्रकार नव्हते. नाटक-सिनेमाची तर बातच नको. पाहुण्यांची खास काळजी घेतली जाई. सकाळचे गरम पाणी, थंडीसाठी शेकोटी वगैरे वगैरे. पाहुण्यांसाठी खास पदार्थ म्हणजे मोरंबा, केळ्याचे शिकरण, चक्का लावून घरी केलेले श्रीखंड असे काही तरी असे. नंतर पाहुण्यांचा परतण्याचा दिवस जवळ येत असे. त्या वेळी गप्पांना ऊत येई. हे लोक रात्री अंगाभोवती पांघरुणे गुंडाळून काळोखात रात्रभर गप्पा मारत.

निंघताना पाहुण्यांना घरचे धान्य, भाजीपाला भेट म्हणून दिला जाई. धान्य शेर-पायलीने मोजले जाई. कंदमुळे म्हणजेच आळकुडय़ा-कारंदेपण दिले जात. निघताना बायकांचे डोळे भरून येत. त्यांना, ‘परत या, परत या’ असे सारखे सांगितले जाई. जाणाऱ्या बायकांची ओटी भरून त्यांना चोळीचे कापड दिले जाई. निघताना पाहुणे प्रत्येक मुलाच्या हातात एक रुपया घालीत. तो त्वरित आईकडे द्यावा लागे याचे आम्हा मुलांना वाईट वाटे. पाहुण्या मुली निघताना आम्हा मुलांना चांगलेच वाईट वाटे.

पाहुण्यांसाठी घरापुढे बैलगाडी अथवा छकडा तयार असायचा. त्यांना प्रवासात खाण्यासाठी दुधाचे घावन, दशम्या असे काही तरी पदार्थ केळीच्या अथवा पळसाच्या पानात बांधून दिले जात. पाहुणे गेल्यावर चांगलेच ओकेबोके वाटे. बरेच दिवस गप्पांत त्यांचा उल्लेख येई. आठ-दहा दिवसांत पाहुणे पोचल्याचे कार्ड येत असे. आता हे सारे काळाच्या आड गेले असले तरी मनात चांगलेच घर करून आहे. आठवणींनी मनाला उजाळा मिळून मन सुखावते.

vasturang@expressindia.com

First Published on December 23, 2017 12:32 am

Web Title: old structure old guest