News Flash

आनंदाश्रम

आज संध्याकाळपासूनच आकाश भरून आलं होतं.

आज संध्याकाळपासूनच आकाश भरून आलं होतं. दिवेलागणीची वेळ झाली, तसा पाऊस जोरात कोसळायला लागला. गडगडाटही सुरू होताच. त्यातच विजाही चमकत होत्या. अनिलकाकांचा अनुभव त्यांना सांगत होता की, आज आनंदाश्रमात कोणीतरी नवीन मूल येणार आहे.. हे असं वातावरण असलं, की अंधाराचा फायदा घेऊन बंगल्याच्या दरवाजापाशी कोणीतरी एखाद्या बाळाला सोडतं. बंगल्याची ओसरी आणि मुख्य दरवाजा यामध्ये साधारण शंभर फूट लांब आणि तितकंच रुंद असं मोठं अंगण आहे. त्यामुळे मग सोडून दिलेल्या बाळाच्या रडण्याचा टाहो सुरू व्हायच्या आत आणि बंगल्यातून कोणीतरी त्या बाळाला उचलून घ्यायला यायच्या आत मुलाला सोडून जाणारी व्यक्ती दिसेनाशी होते. मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून मग अनिलकाका दरवाजापाशी जाऊन त्या बाळाला घेऊन येतात. हे असं कितीतरी वेळा झालं होतं. त्यामुळे बंगल्याच्या दरवाजावर लावलेल्या आनंदाश्रम या नावाच्या पाटीवरचा दिवा आणि बंगल्याच्या मुख्य दरवाजाकडून ओसरीकडे येण्याच्या मार्गावरचे दिवे लावावेत, असा विचार करून अनिलकाका उठले आणि बंगल्याच्या ओसरीवर असलेलं दिव्याचं बटण लावलं. दिवे पेटवून अनिलकाका आत घरात जायला वळले इतक्यात वीजच गेली. ओसरीवर एकदम गुडूप काळोख झाला. आत जाऊन मेणबत्ती आणावी, असा विचार करून ओसरीवरून चाचपडत ओसरीच्या कठडय़ाला धरून घराच्या दरवाजाकडे अनिलकाका जात असताना, त्यांना बंगल्याच्या फाटकाचा आवाज ऐकू आला. त्यांनी फाटकाच्या दिशेने वळून पाहिलं. साधारण सात वाजून गेले होते. त्यातच ढगाळ वातावरणामुळे अंधार बराच पडला होता. त्यामुळे फाटकातून नेमकं कोण येतंय ते दिसत नव्हतं. पण धूसरपणे दोन आकृत्या दिसत होत्या. एक व्यक्ती- बहुतेक वयाने ज्येष्ठ असावी. कारण थोडीशी वाकलेली दिसत होती. एक पाय थोडासा ओढत चालत होती. त्या व्यक्तीबरोबर दुडूदुडू चालणारी दुसरी आकृती मात्र, दोन-अडीच फूट दिसत होती. म्हणजे छोटं मुलं होतं. हळूहळू ते दोघं बंगल्याच्या ओसरीपर्यंत पोहोचले. इतक्यात वीजही आली. ओसरीवरचे, अंगणातले आणि बंगल्यातले असे सगळेच दिवे लागले. बंगल्याची ओसरी तशी ऐसपस होती. ओसरीवर यायला तीन पायऱ्या चढून यावं लागत होतं. या छोटय़ाशा जिन्याला असलेल्या कठडय़ाचा आधार घेत ते आजोबा हळूहळू त्या तीन पायऱ्या चढून ओसरीवर आले. बरोबर असलेल्या बाळानेही कठडय़ाखाली असलेले उभे लाकडी दांडे धरून धरून जिना चढला आणि ते बाळही ओसरीवर येऊन आजोबांना बिलगून उभं राहिलं. आजोबांनी अनिलकाकांना आपली ओळख सांगितली. नमस्कार, मी केशव देशमुख आणि हा माझा नातू निनाद!

आनंदाश्रमात कोणीतरी चोरून मूलं सोडून जायचं. एकदा एका मुलाला पोलिसात तक्रार नोंदवूनही कोणी न्यायला आलं नाही, त्यावेळी माणुसकी म्हणून ते मूल ज्याला सापडलं, ती व्यक्ती त्या मुलाला आनंदाश्रमात घेऊन आल्याचं उदाहरण होतं. पण नातं सांगून मूल आणून सोडायचा हा प्रकार अनिलकाकांसाठीही नवीन होता. अनिलकाकांनी त्या बाळाकडे बघितलं. त्याच्या कपाळावर डोळ्याच्या वर बँडेजची पट्टी चिकटवलेली होती. बाळ दिसायला गोंडस आणि गुटगुटीत होतं. पण इवल्याशा डोळ्यांमध्ये प्रचंड भीती दिसत होती. अनिलकाकांनी त्याच्याकडे बघताच ते आजोबांच्या मागे जाऊन लपलं. अनिलकाकांनी प्रेमानं त्याच्याकडे बघत त्याच्या गालाला हात लावला आणि त्याला सांगितलं, ‘‘निनाद घाबरू नको. हे तुझ्या काकांचं घर आहे. इकडे तुझ्याबरोबर खेळायला तुझे भाऊ आणि बहिणी आहेत. ते बघ, बाहेर अंगणात बघ, घसरगुंडी आहे, झोपाळा आहे, खेळायला भरपूर जागा आहे. आपण खूपखूप मजा करू या. या आजोबा, त्याला घेऊन या,’’ असं म्हणत अनिलकाकांनी ओसरीवरच्या बठक व्यवस्थेकडे त्या दोघांना नेलं. ओसरीवर चढून आल्यावर डाव्या बाजूला सोफा अणि खुच्र्या ठेवल्या होत्या, तर ओसरीच्या उजव्या भागात छताला टांगलेला झोपाळा होता. आजोबा आणि निनाद बसल्यावर त्यांना पुढय़ातल्या टेबलावर ठेवलेल्या तांब्यातून पेल्यात पाणी ओतून दिलं. एवढय़ात आठ-दहा वर्षांचा एक मुलगा बाहेर आला. अनिलकाकांनी त्याला विचारलं, ‘‘काय झालं चिन्मय?’’
‘‘काही नाही काका. देवाकडे दिवे लावले होते. शुभं करोती म्हणायला येणार का, म्हणून विचारायला आलो.’’
अनिलकाका म्हणाले, ‘‘चला आपण नंतर बोलू या, आधी देवाकडे दिवेलागणीची प्रार्थना म्हणून येऊ या.’’
आत गेल्यावर निनादला काही त्याच्या बरोबरीचे, तर काही मोठे दादा-ताई दिसले. त्यांनी देवाकडे शुभंकरोती म्हणून झाल्यावर त्याला ओसरीवरच्या झोपाळ्यावर नेलं. सुरुवातीला थोडासा बुजलेला निनाद हळूहळू या दादा-ताईंच्या बरोबर झोपाळ्यावर बसायला गेला. निनादला त्यांच्यात थोडासा रूळलेला पाहून मग अनिलकाकांनी आजोबांना हळूच ओसरीवर यायची खूण केली. मघ ते दोघं बाहेर जाऊन सोफ्यावर बसले.
अनिलकाका म्हणाले, ‘‘हां, आजोबा आता बोला.’’
आजोबांनी सांगायला सुरुवात केली. ‘‘अहो, काय सांगायचं, या पोराच्या नशिबात काय आहे काही कळत नाही. गेल्या महिन्यात तो त्याच्या आई-बाबांबरोबर बाहेरगावाहून मुंबईला यायला निघाला होता. रात्री दहा-साडेदहाची वेळ होती. हायवेवर समोरून येणारा टँकर पान ४ पाहा श्व्
पान २ वरून श्व् त्याचा टायर फुटल्यामुळे तिरपा आला आणि त्याने गाडीला समोरून धडक दिली. यात गाडी समोरून पूर्णपणे चेपली.’’ एवढं सांगितल्यावर आजोबांना हुंदका आवरला नाही. अनिलकाकांनी काहीही न बोलता केवळ त्यांच्या पाठीवरून हात फिरवत त्यांना शांत केलं. थोडय़ा वेळाने आजोबा पुन्हा सांगायला लागले.
‘‘निनादचा बाबा म्हणजे माझा मुलगा गाडी चालवत होता. त्याच्या बाजूला निनादची आई- माझी सून बसली होती. निनाद झोपला होता म्हणून त्याला मागच्या सीटवर झोपवला होता. माझा एकुलता एक मुलगा आणि सून मला सोडून गेले आणि हे बाळही पोरकं झालं हो..’’ एवढं बोलून त्यांना पुन्हा कढ अनावर झाला.
अनिलकाका म्हणाले, ‘‘ठीक आहे आजोबा, तुम्ही आता काही बोलू नका मला सगळं लक्षात आलंय.’’
आजोबा डोळ्यांच्या कडा पुसत म्हणाले, ‘‘अहो नाही, तुमचा काहीतरी गरसमज झाला आहे. केवळ त्याचे आई-वडील वारले म्हणून त्याला इथे आणण्याइतका मी निष्ठुर नाही. अहो, मीच त्याचं सगळं केलं असतं. पण माझ्या पायावर कॅन्सरची गाठ आली होती. सहा महिन्यांपूर्वीच माझं ऑपरेशन झालं आहे. ती गाठ काढून टाकली असली, तरी अजूनही मला चालताना त्रास होतो. माझी पत्नी चार वर्षांपूर्वीच वारली. मी एकटय़ाने निनादचं कसं आणि किती दिवस करणार? उद्या मी जर गेलो, तर त्याचं कोण बघणार? त्यामुळे आता माझ्या हयातीतच त्याला योग्य ठिकाणी ठेवावं, तो रडला तर मध्येमध्ये मला किमान त्याला येऊन भेटता तरी येईल, असा विचार केला. इतर अनाथाश्रमांपेक्षा तुमचा हा अनाथाश्रम वेगळा असल्याचं कळलं आणि त्याला तुमच्याकडे घेऊन आलो. छातीवर दगड ठेवून मी त्याला तुमच्या ताब्यात सोपवतो आहे. तुम्ही त्याची नीट काळजी घ्याल, असा मला विश्वास वाटतो.’’
अनिलकाका म्हणाले, ‘‘तुम्ही काही काळजी करू नका आजोबा. माझं नावं अनिल साळुंखे आहे. माझंही वय आज बासष्ट आहे. पण मुलं मला अनिलकाका म्हणतात. गेल्या १२ वर्षांपासून मी अनाथ मुलांना माझ्या या घरात सांभाळतो आहे. माझ्या मदतीला हा गंगाराम आणि त्याची बायको सावित्री ही दोघंजणं आहेत. त्यांनाही मी नोकर मानत नाही. तेही माझ्या घरातलेच सदस्य आहेत. माझ्याइतकंच तेही मुलांचं प्रेमाने करतात. पहिला अनाथ मुलगा माझ्या या घरात आला, तेव्हा तो १२ वर्षांचा होता. दिलीप त्याचं नाव. आज दिलीप २४ वर्षांचा आहे. तो मुंबईला नोकरी करून एमबीएचं शिक्षण घेतो आहे. या माझ्या घराचं नाव जरी आनंदाश्रम असलं, तरी मी ते ठेवलेलं नाही. मी ज्यांच्याकडून हा बंगला विकत घेतला, त्यांनीच ते नाव ठेवलं होतं. इथे जरी अनाथ मुलं राहात असली, तरी मी त्याला अनाथाश्रमाचं स्वरूप येऊ दिलेलं नाही. हा माझा व्यवसाय वगरे तर मुळीच नाही. हे माझं स्वत:चं घर आहे, कोणा धर्मादाय ट्रस्टने चालवलेला हा आश्रम नाही आणि मी स्वत: इथे राहून मुलांचं संगोपन, शिक्षण, त्यांचं जेवणखाण या सगळ्याकडे जातीने लक्ष देतो. घराच्या पुढच्या अंगणात मुलांसाठी घसरगुंडी, सीसॉ, झोपाळे वगरेसारखे खेळ बसवून घेतले आहेत, तर मागच्या बाजूला त्यांच्यासाठी पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण देणारी शाळा सुरू केली आहे. त्यानंतरच्या शिक्षणासाठी मुलं बाहेरच्या शाळेत जातात. तोपर्यंत ती थोडी मोठीही झालेली असतात. पण चौथीपर्यंतच्या शाळेत आम्ही त्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, मातीची भांडी तयार करणं, शाळेच्या अवतीभवती असलेल्या जागेत बागकाम करणं अशा गोष्टीही शिकवतो. आनंदाश्रमातले थोडे वयाने मोठे असलेले म्हणजे १२-१५ वर्षांचे मुलगे, कपडे धुणं, लहान मुलांचा अभ्यास घेणं अशा जबाबदाऱ्या पार पाडतात, तर त्याच वयोगटातल्या मुली सावित्रीला स्वयंपाकघरात, साफसफाईत वगरे मदत करतात. काही दानशूर लोक, स्वयंसेवी संघटना आणि आमचा दिलीप मला आíथक मदत करतात, त्यावर माझा हा डोलारा उभा आहे.
आजोबांनी मध्येच अनिलकाकांना अडवून विचारलं, ‘‘तुम्ही हे १२ र्वष करताय? पण हे सुरू कसं केलंत?’’
अनिलकाकांनी पुन्हा सांगायला सुरुवात केली. ‘‘हे काही मी खूप आधीपासून ठरवून वगरे सुरू केलेलं नाही. झालं असं की, १५ वर्षांपूर्वी माझी पत्नी वारली. तेव्हा माझी मुलगी १८ वर्षांची होती. जुन्या घरात आईच्या आठवणींनी तिला त्रास व्हायला लागला म्हणून मग मी घर बदलायचा निर्णय घेतला. तेव्हा हे ठिकाण मुख्य शहरापासून तसं थोडं लांब होतं. पण शांत निसर्गरम्य परिसरात मुलीला थोडं बरं वाटेल असा विचार करून हे घर, म्हणजे हा आनंदाश्रम बंगला मी विकत घेतला. मी ज्यांच्याकडून हा बंगला विकत घेतला, ते तेव्हा इथे राहत नव्हते. हा बंगला बंदच होता. कारण विचारलं तेव्हा मला त्यांनी सांगितलं की, यायला जायला लांब पडतं, म्हणून येणं होत नाही. तेव्हा घर नुसतं बंद करून ठेवून काय करायचंय, म्हणून विकायला काढलाय. आम्ही घर विकत घेतलं खरं, पण तेव्हा मुलीचं शिक्षण सुरू होतं. म्हणून शेवटी शहरातच भाडय़ाने दुसरं घर घेतलं आणि तिथे तीन र्वष राहिलो. तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मग तीन वर्षांनी म्हणजे १२ वर्षांपूर्वी इथे राहायला आलो. मुलीला ट्रेकिंगची आवड होती. तिने हिमालयात ट्रेकिंगला जायचा हट्ट धरला. ती तिच्या ट्रेकिंगच्या ग्रुपबरोबर हिमालयात गेली होती. शिखर काही अंतरावरच होतं आणि अचानक वादळ सुरू झालं. त्यात तिचा तोल गेला आणि अवघ्या एकविसाव्या वर्षी तिचा मृत्यू पाहणं माझ्या नशिबी आलं. तिच्या मृत्यूची बातमी कळल्यावर गावातले एक ज्येष्ठ गृहस्थ मला भेटायला आले होते. ते म्हणाले की, मी हा बंगला विकत घेतला, तेव्हा ते इथे गावात नव्हते. नाही तर, हा बंगला विकत घेऊ नका, असा सल्ला त्यांनी मला दिला असता. त्यांनी मला असंही सांगितलं की, हा बंगला अपत्यासाठी वाईट आहे आणि म्हणूनच आधीच्या माणसाने माझ्यापासून ही माहिती लपवून मला तो विकला. नंतर मला त्या गृहस्थांनी अशी माहिती दिली की, मी ज्यांच्याकडून हा बंगला विकत घेतला, ते इथे राहायला येणार त्याच्या आदल्या दिवशीच त्यांचा मुलगा वारला आणि म्हणूनच त्यांनी हा बंगला पाच-सहा र्वष बंद ठेवून नंतर तो मला विकला. हे सगळं सांगून झाल्यावर मला त्यांनी हा बंगला विकून जायचा सल्लाही दिला. पण माझा या असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता आणि माझी मुलगी तर गेलेलीच होती. मग मी हा बंगला विकून वयाच्या पन्नाशीत दुसरं घर शोधायचा घाट कोणासाठी घालायचा होता? पण मी एकटाच इतक्या मोठय़ा बंगल्यात राहून काय करणार होतो? खूप विचार केला आणि मग ठरवलं की, बस्स मला अपत्याचं सुख नाही, म्हणून रडत बसण्यापेक्षा किंवा एखादं कोणीतरी मूल दत्तक घेण्यापेक्षा आपल्याला जसं मूल नसल्याचं दु:ख आहे, तसंच काही मुलांना आई-वडील नसल्याचं दु:ख आहे, अशा मुलांकरीता त्यांचं पालकत्व स्वीकारायचं. त्यांना आधार द्यायचा आणि मग घरातच अनाथ मुलांना सांभाळायला सुरुवात केली. या वास्तूत अपत्यसुख आहे की नाही वगरे मला माहीत नाही, पण ही निराधार पोरकी मुलं मात्र, इथे १२ र्वष गुण्यागोिवदाने नांदत आहेत. आता हे ठिकाण पूर्वीसारखं गाव राहिलेलं नाही. खूप सुधारणा झाल्या आहेत. दिलीपचं लग्नही ठरवलं आहे. पुढल्या वर्षी त्याचं एमबीएचं शिक्षण पूर्ण झालं की, त्याचं लग्न मी लावून देणार आहे. दिलीपने मला सांगितलंय की, त्याचं शिक्षण पूर्ण झालं की, तो स्वत: इथे येऊन सपत्निक राहणार आहे. माझ्यानंतर आनंदाश्रमाची जबाबदारी तो स्वीकारणार आहे. कारण त्याला या आनंदाश्रमाचं ऋण फेडायचं आहे. बोलता बोलता अनिलकाकांचं आजोबांकडे लक्ष गेलं. दिवसभराचा प्रवास आणि मानसिक थकव्यामुळे झोप येऊन त्यांचे डोळे खूप जड झालेले दिसत होते. काकांनी त्यांना सांगितलं की, तुम्ही आता आत या आणि झोपा आपण सकाळी बोलू.’’
मुलांच्या सकाळच्या प्रार्थनेच्या आवाजाने आजोबांना जाग आली. त्यांनी अंघोळ वगरे उरकली आणि ते अनिलकाकांचा निरोप घेण्याकरता आले. ‘‘अनिलकाका, मी निनादला योग्य ठिकाणी घेऊन आलोय याची आता मला खात्री पटली आहे. निनाद इथे नाही, तसा मी आता निघतो. नाहीतर तो खूप रडेल आणि मला ते बघवणार नाही. त्याची काळजी घ्या.’’ एवढं बोलल्यावर
छोटय़ा निनादला सोडून जाताना त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. अनिलकाका आजोबांच्या जवळ गेले. त्यांचा हात हातात घेऊन त्यांनी आजोबांना सांगितलं, ‘‘आजोबा, तुम्ही काहीही काळजी करू नका. पण तुम्ही आता कुठे जाणार? आणि तुम्ही तरी अशा परिस्थितीत एकटेच कसे राहणार? त्यापेक्षा तुम्हीही
इथे राहिलात तर मला काही जड नाही. शिवाय नुसत्या निनादलाच नाही,
तर इतर मुलांनाही एक आजोबा मिळतील. त्यांना तुम्ही गोष्टी सांगा, गाणी म्हणून घ्या, त्यांच्यावर संस्कार करा.’’ तोपर्यंत तिथे निनाद त्याच्या नव्या मित्रांबरोबर आला होता. आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी होकार दिला आणि मुलांनी एकच गलका केला. मुलांच्या जल्लोषामुळे आनंदाश्रम आनंदात
न्हाऊन निघाला..anaokarm@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 6:45 am

Web Title: orphan home
टॅग : Orphan
Next Stories
1 ‘नकोत नुसत्या भिंती’ घनकचरा एक समस्या
2 गृहनिर्माण नियामक आयोग सदनिका खरेदीदारांसाठीचा आशेचा किरण
3 सुरक्षित स्वयंपाकघर
Just Now!
X