22 September 2020

News Flash

वस्तु स्मृती : पानाची गादी

फार पूर्वीपासून मुंबई शहरात दोन दुकाने इतर दुकाने उघडण्यापूर्वी म्हणजे अगदी पहाटे पहाटे उघडत.

पानाची गादी

फार पूर्वीपासून मुंबई शहरात दोन दुकाने इतर दुकाने उघडण्यापूर्वी म्हणजे अगदी पहाटे पहाटे उघडत. ती म्हणजे, सकाळी लवकर उठणाऱ्या मुंबईकरांची चहाची तलफ भागवणारी अमृततुल्य चहा बनविणारी लहान हॉटेल्स. टपऱ्या आता आता आल्या. नाक्या नाक्यावर इराण्यांची हॉटेल्स होतीच. शिवाय केवळ चहा, कॉफी, खारी, नानकटाई तत्सम खाद्यपदार्थ विकणारी लहान हॉटेल्स मुंबईभर सर्वत्र होती, आजही त्यातली काही आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्याचबरोबर अगदी पहाटे अजून एक दुकान उघडत असे- ते म्हणजे पानाची गादी. म्हणजे, पान, सुपारी, तंबाखू, सिगारेट, विडी वगैरे विकणाऱ्या पानाच्या गाद्या. या दुकानांना पानाच्या गाद्या का म्हणत असत हा एक संशोधनाचा विषय आहे. पान किंवा विडा उभ्या उभ्या खायची गोष्टच नाही, ती  ऐसपैस गादीवर पाय पसरून लोड तक्क्याला रेलून साग्रसंगीत विडा बनवून आरामात चघळत त्याचा मनमुराद आस्वाद घ्यायची गोष्ट. पण तरीही किरकोळ पान-सुपारी-तंबाखू विकणाऱ्या किरकोळ दुकानाला पानाची गादी म्हणण्याची पद्धत म्हणा किंवा प्रथा म्हणा होती.

अशा पानांच्या गाद्यांचे प्रमुख गिऱ्हाईक म्हणजे कष्टकरी कामगारवर्ग. तो वर्ग ज्या ठिकाणी असेल तेथेच या गाद्या प्रामुख्याने असणार हे ओघानेच आले. मुंबईतील जो भाग पूर्वी गिरणगाव म्हणून ओळखला जायचा त्या गिरणगावात अशा पानाच्या गाद्या सर्वत्र आढळत असत. शेकडो गिरण्यांतून काबाडकष्ट करणारे लाखो कामगार या पानाच्या गाद्यांवरील प्रमुख गिऱ्हाईक. पहाटे उठून पहिल्या पाळीला कामावर जाणारा, कडक चहा ढोसून झाला की प्रथम भेट देई ती पहाटेच त्याच्या सेवेला हजर असलेल्या पानाच्या गादीला. पानाच्या गादीवर येणाऱ्या गिऱ्हाईकाच्या तऱ्हा वेगवेगळ्या. काही सुपारीचे किरकोळ व्यसन करणारे, ते अख्खी सुपारी, सुपारीची अर्धुकं, किंवा तुकडा सुपारी पुडीत बांधून घेऊन जात. फावल्या वेळात गादीवाला मोठय़ा अडकित्त्याने सुपारीचे तुकडे करून ठेवताना दिसे. त्यासाठी बहुतेक दुकानदार मोठा लाकडी वाडगा वापरत. काही फक्त तंबाखू आणि चुना डबीत भरून घेणारे. तंबाखूमध्येही वेगवेगळे प्रकार. पंढरपुरी, काळा, साधा, सुगंधी, विविध ब्रॅण्डचा लहान लहान पुडय़ांतून मिळणारा. सर्वाना चुना मात्र मोफत. तो एका मोठय़ा भांडय़ात पाणी घालून ठेवलेला असे, त्यात एक धातूची कांडी असे. या कांडीने चुना घेऊन डबी फूल करून घ्यायची. चुना बनविणाऱ्या कंपन्यांचा चुना त्या कंपनीच्या डब्यातून विकत मिळत असे. पण असे चोखंदळ गिऱ्हाईक कमीच. त्या चुन्याच्या सार्वजनिक डब्याच्या बाजूची भिंत किंवा दुकानाच्या दरवाजाची फळी गिऱ्हाइकाची चुन्याची बोटे पुसण्यासाठी खास मोकळी सोडलेली असायची. काही गिऱ्हाईके आपल्या चंचीचे वेगवेगळे कप्पे, तंबाखू, सुपारी, कात, यांनी फूल करून घेत आणि एका रेग्झिनच्या तुकडय़ात देठाची पाने गुंडाळी करून घट्ट आवळून बरोबर अडकित्ता आणि चुन्यांनी भरलेली डबी ठेवून चंची चांगली आवळून त्यासाठी बरोबर घेतलेल्या खास हातपिशवीत ठेवून मिलचा रास्ता धरत. काही पान सुपारी खाणारे मोठे दिलदार, त्यांच्याकडे पान सुपारीचा सर्व सरंजाम ठेवण्यासाठी रेग्झिनची लहान हातपिशवी मुद्दाम बनवून घेतलेली, त्यात वीस-पंचवीस देठाची पाने रेग्झिनच्या तुकडय़ात गुंडाळून घेतलेली, बरोबर एक तंबाखू भरलेला टीनचा डबा, चुन्याची भरगच्च डबी, काताचा खडा ठेवलेली पत्र्याची डबी, वेलची आणि लवंग असलेली डबी, अडकित्ता, विडी बंडल आणि माचिस असा सगळा जामानिमा कायम यांच्याबरोबर जातील तेथे असणार. चार लोक भेटले की हा दिलदार माणूस ती पिशवी सर्वासाठी मोकळी ठेवणार. ज्यांनी-त्यांनी आपल्या आवडीप्रमाणे त्यातील वस्तू घेऊन त्यांचा मनमुराद आस्वाद घ्यावा. काही फुकटे अशा या दिलदार गृहस्थाची चातकासारखी वाट पाहत राहणार. आणि हे दिलदार महाशयदेखील आल्या आल्या त्याची अवस्था लक्षात घेऊन त्याच्याकडे ती लहानशी पिशवी सुपूर्द करून टाकणार. काही गिऱ्हाईके मात्र विडीच्या झुरक्यात आपले कष्ट विसरून जाणारी, त्यांच्यासाठी लाल धागा, पांढरा धागा, काळा धागा, पुत्तूशेट, उंट छाप आणि इतर ब्रॅण्ड उपलब्ध असत. अगदी किरकोळ दोन-चार विडय़ांपासून अख्खे विडी बंडल घेणारे गिऱ्हाईक गादीवर येत असे. बरोबर माचिस हवीच- तीही मिळत असे. काही गिऱ्हाईके रुबाबदार धूम्रपान करणारी, त्यांच्यासाठी सुटय़ा आणि वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या सिगारेट. त्यात पिवळा हत्ती, चारमिनार, पासिंग शो, यांना मागणी अधिक. त्यांच्यासाठी एका कायम ज्योत पेटत असलेल्या एका दिव्याची व्यवस्था दुकानाच्या बाजूच्या भिंतीवर किंवा दुकानाच्या दरवाजाच्या फळीवर उपलब्ध असे. त्याच्या बाजूला एका डब्यात सिगारेटची रिकामी पाकिटे कातरून विडी सिगारेट पेटविण्यासाठी ठेवलेली किंवा जाडजूड दोरखंडाचा तुकडा एका टोकाला कायम आपल्या पिळाबरोबर विस्तव जागृत ठेवणारा. काही गिऱ्हाईके मात्र नेमस्त, म्हणजे ऊठसूट पान खाणारी नाही. ती दुकानावर येणार, दुकानात समोरच कच्च्या देठांच्या खायच्या पानांची एका टोपलीवरती ओले फडके टाकून दुकानाच्या फळीवर जय्यत तयार असणार, बाहेरच्या बाजूला देठे ठेवून ती गोलाकार टोपलीभर नीट रचून ठेवलेली. त्यातून गादीवाला एक पान निवडून घेणार, त्याच्यावरचे पाणी बाहेर झटकून गिऱ्हाईकासमोर ठेवणार. गिऱ्हाईक त्यावर पाहिजे तेव्हढय़ाच चुन्याची बोटे ओढणार, दुकानदार गिऱ्हाईकाच्या पसंतीची तंबाखूची चिमूट त्यावर अलगद सोडणार, काताचा तुकडा नखलून टाकणार, विचारून सुपारीचे तुकडे ठेवणार, असे साधे पान तयार झाले की गिऱ्हाईक त्याची घडी गुंडाळी करून दाढेखाली धरून बाजूच्या भिंतीला किंवा फडक्याला चुन्याची बोटे पुसून, पैसे देऊन चालू पडणार. हे नेमस्त थोडेसे शिष्ट गिऱ्हाईक.

नेहमी दुकानावर येणाऱ्या गिऱ्हाइकांना दुकानदाराला काही सांगायची गरज पडत नसे, ते गिऱ्हाईक समोर येताच त्याला जे हवे ते सर्व दुकानदार सवयीने त्यांच्या समोर ठेवत जाणार.

याव्यतिरिक्त तपकिरीचे व्यसन असणाऱ्या गिऱ्हाईकाची गरज भागविण्यासाठी दोन-तीन चिनी मातीच्या उभ्या बरण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आणि सुवासाची तपकीर ठेवलेली असे. ज्याच्या-त्याच्या आवडीनुसार तीदेखील या दुकानातून विकत मिळत असे. तपकिरीची पुडी मात्र सिगारेटच्या पाकिटात येणाऱ्या चांदीच्या कागदात बांधून द्यायची.

या पानाच्या गादीवर पान-सुपारी, तंबाखू, कात, विडीकाडी, सिगारेट, तपकीर याचबरोबर इतरही किती तरी किरकोळ वस्तू विकत मिळत असत. एखाद-दुसरी गुडगुडी बाजूच्या भिंतीवर किंवा फळीवर किरकोळ विक्रीकरिता ठेवलेली, काळ्या मातीच्या चिलमी, साबणाच्या वडय़ा, केशतेले, अगरबत्ती, मेणबत्ती, वेगवेगळ्या कंपन्यांच्या दंतमंजनाच्या पुडय़ा, बामाच्या डब्या, दुकानाच्या दरवाजावर वरच्या बाजूला चहापत्तीच्या लहान लहान पुडय़ा पताकासारख्या दोऱ्यात ओवून लावलेल्या. दोन्ही बाजूला झाकणे असणाऱ्या पत्र्याच्या दोन-तीन प्रकारच्या तंबाखू आणि चुना ठेवायच्या रिकाम्या डब्या. गिरणीत काम करणाऱ्या कामगारांना, काम करण्यासाठी एका वीतभर लांबीच्या तारेसारख्या उपकरणाची गरज पडत असे, ते देखील काही गाद्यांवर विकत मिळत असे. सामान्य माणसाची अहोरात्र सेवा करणाऱ्या या दुकानामध्ये गरजूला पोस्टाचे किरकोळ साहित्यदेखील ऐन वेळी उपलब्ध होऊन जाई. काही लहान मुले या दुकानदाराकडून रिकामी सिगारेटची पाकिटे गोळा करून त्यांनी आपली खेळाची हौस भागवत. किंवा रिकामी सिगारेटची पाकिटे आडवी कापून ती एकमेकांत गुंफून त्यातून बसण्यासाठी चटई तयार करीत.

या पानाच्या गादीचे मालक बहुतांशी दक्षिणी समाजातील बहुतेकांचे दुकानाला लागूनच मागच्या बाजूला घर, कुटुंबातील कोणी ना कोणी गल्ल्यावर येऊन बसत असे. त्यामुळे अगदी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत पानाची गादी उघडी असायची. गिरण्या-कारखान्यातील कष्टकरी कामगार, कामावर जाताना आणि घरी परत जाताना या पानाच्या गादीवर खरेदीसाठी गर्दी करीत असत.

गिरणगावातील गिरण्या जाऊन त्या जागी मोठे मॉल, कॉर्पोरेट ऑफिसे आली. श्रीमंतांचे गगनचुंबी इमले उभे राहिले. तिथल्या सफेद कॉलर नोकरांच्या आणि गगनचुंबी इमारतीत राहणाऱ्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, त्या प्रकारच्या दुकानांची तेथे आता गर्दी होऊ  लागली आहे. आणि पूर्वी कष्टकरी कामगारांच्या रोजच्या गरजा भागविणारी दुकाने तेथून हळूहळू हद्दपार होऊ  लागली आहेत. तंबाखूसेवनाने कर्करोग होतो म्हणून आता तंबाखूच्या वापरावर बरेच कायदेशीर र्निबध आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून आता पूर्वी घरोघरी आढळणारी तंबाखू खाणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. पानाच्या गाद्या अजूनही काही ठिकाणी आपले अस्तित्व कसेबसे टिकवून आहेत. परंतु आता ती ऐसपैस आकाराची पानाची गादी सापडणे कठीणच.

पानाच्या गादीचे मालक बहुतांशी दक्षिणी समाजातील बहुतेकांचे दुकानाला लागूनच मागच्या बाजूला घर, कुटुंबातील कोणी ना कोणी गल्ल्यावर येऊन बसत असे. त्यामुळे अगदी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत पानाची गादी उघडी असायची. गिरण्या-कारखान्यातील कष्टकरी कामगार, कामावर जाताना आणि घरी परत जाताना या पानाच्या गादीवर खरेदीसाठी गर्दी करीत असत.

पानाच्या गादीवर येणाऱ्या गिऱ्हाईकाच्या तऱ्हा वेगवेगळ्या. काही सुपारीचे किरकोळ व्यसन करणारे, ते अख्खी सुपारी, सुपारीची अर्धुकं, किंवा तुकडा सुपारी पुडीत बांधून घेऊन जात. फावल्या वेळात गादीवाला मोठय़ा अडकित्त्याने सुपारीचे तुकडे करून ठेवताना दिसे. त्यासाठी बहुतेक दुकानदार मोठा लाकडी वाडगा वापरत. काही फक्त तंबाखू आणि चुना डबीत भरून घेणारे. तंबाखूमध्येही वेगवेगळे प्रकार. पंढरपुरी, काळा, साधा, सुगंधी, विविध ब्रॅण्डचा लहान लहान पुडय़ांतून मिळणारा. सर्वाना चुना मात्र मोफत.

मोहन गद्रे gadrekaka@gmail.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 1:07 am

Web Title: pan shop in mumbai
Next Stories
1 हवेहवेसे अंगण
2 वास्तु-मार्गदर्शन
3 अपुरी संपर्कसाधने परवडणाऱ्या घरांच्या वाढीतील मोठा अडथळा
Just Now!
X