20 November 2017

News Flash

उद्यानवाट : कमी प्रकाशात वाढणारी झाडे

मागच्या लेखापासून आपण घरात ठेवण्यायोग्य झाडांच्या प्रजातींविषयी माहिती घ्यायला सुरुवात केली आहे.

जिल्पा निजसुरे | Updated: April 29, 2017 3:09 AM

पसरून वाढणाऱ्या झाडांच्या प्रजातींपैकी हा एक प्रकार आहे. याची पाने हिरवट जांभळी छटा असलेली असतात.

मागच्या लेखापासून आपण घरात ठेवण्यायोग्य झाडांच्या प्रजातींविषयी माहिती घ्यायला सुरुवात केली आहे. आजच्या लेखातून पण अशाच काही प्रजातींविषयी जाणून घेऊ या.

१ ट्रेडस्कॅन्शिया (Tradescantia) :

पसरून वाढणाऱ्या झाडांच्या प्रजातींपैकी हा एक प्रकार आहे. याची पाने हिरवट जांभळी छटा असलेली असतात. पानांचा खालचा भाग जांभळा असतो. उन्हाच्या व सावलीच्या तीव्रतेनुसार पानांच्या छटांमध्ये फरक दिसून येतो. ही झाडे सावलीत तसेच थोडा वेळ सूर्यप्रकाश मिळत असेल अशा दोन्ही ठिकाणी ठेवता येतात. ही झाडे पसरणारी असल्यामुळे ही झाडे हँगिंग बास्केटमध्ये जास्त छान दिसतात. ही झाडे तीव्र सूर्यप्रकाशात ठेवू नयेत. चांगली खतयुक्त भुसभुशीत माती याच्या वाढीसाठी आवश्यक आहे. पानांवर अधूनमधून पाणी फवारले तर ही झाडे जास्त तजेलदार दिसतात.

 २ सिंगोनियाम (Syngonium) :

विविध रंगछटा असलेली पाने असलेली ही झाडे त्यांच्या त्रिकोणी आकाराच्या पानांमुळे वेगळी दिसतात. यात हिरव्या व पांढऱ्याच्या रंगछटा असलेले विविध प्रकार मिळतात. या झाडांना मॉसपोलवर छान वाढवता येतात. झाड लहान असताना कुंडीत नुसतेच वाढवता येते. नंतर त्याची वाढ झाल्यावर ते खाली पडू लागते तेव्हा छोटी काठी लावून किंवा मॉसपोलवर वाढवता येते. यांना योग्य प्रमाणात ओलावा लागतो. तीव्र सूर्यप्रकाशात ही झाडे ठेवू नयेत. पण पुरेसा उजेड असेल तर ही झाडे छान वाढतात.

३ रोहियो (Rhoeo) :

कुंडीत तसेच जमिनीत अशा दोन्ही ठिकाणी वाढणारी ही प्रजाती आहे. अनेक ठिकाणी बागांमध्ये उंच झाडांच्या सावलीत ही झाडे लावलेली बघायला मिळतात. यांच्या पानांचा वरचा रंग हिरवा व खालचा रंग जांभळा असतो. पानांच्या गुच्छांमधून कधी कधी बारीकसे फूल आलेले बघायला मिळते. याच्या पानांच्या गुच्छामुळे कुंडीत लावलेले झाड छान दिसते. याची जास्त वाढ झाली की मातीतून नवीन रोपे बाजूने वाढू लागतात. अशी रोपे वेगळी करून दुसऱ्या कुंडीत लावावीत. किंवा जर कुंडी भरगच्च दिसायला हवी असेल तर ते मोठय़ा कुंडीत लावून घ्यावे. पण झाडांची खूप जास्त गर्दी होऊ  देऊ  नये. अशा गर्दीमुळे झाडांची वाढ नीट होत नाही.

jilpa@krishivarada.in

First Published on April 29, 2017 3:09 am

Web Title: plants growing in low light