24 November 2017

News Flash

रेशमी घरटे : एका उबदार घराची गोष्ट

दोघांनाही वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे दोन हजारांहून जास्त पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे आहे!

अंजली कुलकर्णी-शेवडे | Updated: February 11, 2017 2:29 AM

‘मी माझा’ या चारोळ्यांमुळे सर्व मराठी मनांत घर करणारे कवी चंद्रशेखर गोखले यांच्या घराविषयी.. हे घर केवळ चार भिंतींचं नाही. इथे वसते आपुलकी,  माणुसकी आणि अपरंपार जिव्हाळा. हे घर माणसांसाठी नेहमी आसुसलेलं असतं.

चंद्रशेखर गोखलेंचं ‘मी माझा’ हे पुस्तक हा मला वाटतंय माझ्या पिढीच्या कॉलेज जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. चार ओळीत संपूनही चार ओळींच्या पलीकडचं बरंच काही मनात रेंगाळत ठेवणाऱ्या त्यांच्या ‘चारोळ्या’ आणि ‘मी माझा’च्या मुखपृष्ठावरचा त्यांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो हे कॉम्बिनेशनच तेव्हा अनेक जणांना (खरं म्हणजे ‘जणीं’ना) खूप आवडलं होतं! कॉलेजमध्ये असताना ज्यांच्या कविता आवडीने वाचल्या, त्या कवीला नंतरच्या आयुष्यात प्रत्यक्ष भेटण्याचा योग येईल असं कधी वाटलं नव्हतं. पण काही वर्षांपूर्वी एका रेकॉर्डिंगच्या निमित्ताने आमची प्रत्यक्ष भेट झाली. अनेक विषयांवर गप्पाही झाल्या. त्यात ते ‘घर’ या विषयावरही मनापासून बोलले होते. ‘वास्तुरंग’मध्ये घराविषयी लिहायचंय म्हटल्यावर या सगळ्या गोष्टी आठवल्या आणि घराविषयी बोलण्यासाठी चंद्रशेखर गोखलेंना गाठलं.

मी आणि जग यामध्ये

माझ्या घराचा उंबरठा आहे

आणि छतापेक्षा मला

त्याचाच आधार मोठा आहे

असं म्हणणारे कवी-लेखक चंद्रशेखर गोखले आणि त्यांची पत्नी गायिका-अभिनेत्री उमा गोखले गेली १२ वर्षे कांदिवली-चारकोपला राहतायत. तळमजल्यावरच त्यांचं 2BHKचं छानसं घर आहे. मुख्य रस्त्यापासून आत गल्लीत असल्यामुळे खूप रहदारी नाही आणि अगदी एकांतही नाही, अशी हवीहवीशी वाटेल इतपत गजबज तिथे असते. गोखलेकाका आणि उमाताई हे दोघेही पक्के मासेखाऊ, त्यामुळे घराच्या जवळच असलेले तीन-चार ‘बाजार’ हे त्यांच्यासाठी घराचा ‘प्लस पॉइंट’ आहेत! त्यांच्या घराची मांडणी सुटसुटीत आहे. स्वामी समर्थाची तसबीर आणि मूर्ती त्यांच्याकडे आहे. ती बघायला लोक आवर्जून त्यांच्या घरी येतात. त्यांच्याकडचा देवासमोरचा दिवा अखंड तेवत असतो. बाकी घरात वस्तूंची फार गर्दी नाहीये.

दोघांनाही वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे दोन हजारांहून जास्त पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे आहे! त्यांचा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप एकमेकांना भेटीदाखल पुस्तकंच देतो. उमाताई सध्या शूटिंग्जमध्ये खूप व्यस्त आहेत. पण तरीही रात्री झोपण्यापूर्वी अर्धा-पाऊण तास त्या रोजचं वर्तमानपत्र आणि एखादं पुस्तक वाचतातच. त्यांना पुस्तक मोठय़ाने वाचून दाखवायला आवडतं. त्यामुळे मध्यंतरी काही बायकांना जमवून पुस्तक वाचनाचा उपक्रमही उमाताईंनी राबवला होता. वाचनाबरोबरच दोघांना संगीताचीही आवड आहे. त्यांच्याकडे ग्रामोफोन आणि जुन्या रेकॉर्डस्सुद्धा आहेत. वाचन आणि गाण्यामुळे कठीण काळही सुस झाला असं गोखले काकांनी आवर्जून सांगितलं.

आणखी एक वैशिष्टय़पूर्ण गोष्ट म्हणजे एक मडकं त्यांच्या घरात आणि मनात गेली २२ वर्षे घर करून आहे! या मडक्यात ते आणि उमाताई सुरुवातीपासून पैसे जमवतात. असे हजारो रुपये त्यात जमले. कुणाला मदतीची गरज असेल तर त्या मडक्याने खूप आधार दिला. जितकी घरं बदलली त्या प्रत्येक घरात ते मडकं अगदी जपून आणलं गेलं.

आणखी एक वैशिष्टय़पूर्ण गोष्ट म्हणजे एक मडकं त्यांच्या घरात आणि मनात गेली २२ वर्षे घर करून आहे! या मडक्यात ते आणि उमाताई सुरुवातीपासून पैसे जमवतात. असे हजारो रुपये त्यात जमले. कुणाला मदतीची गरज असेल तर त्या मडक्याने खूप आधार दिला. जितकी घरं बदलली त्या प्रत्येक घरात ते मडकं अगदी जपून आणलं गेलं.

या घरात येईपर्यंत त्यांनी पुष्कळ घरं बदलली आहेत! अगदी सुरुवातीला म्हणजे लग्न झाल्यावर लगेचच त्यांना काही कारणाने गोखल्यांचं घर सोडावं लागलं. महिनाभर ते बेघर होते, म्हणजे उमाताईंच्या माहेरी आसरा होता, पण स्वत:चं म्हणावं असं घर नव्हतं. मग गोकुळधामची कामगार वस्तीतली छोटीशी जागा मिळाली. त्या घराला एकच छोटीशी पायरी होती. त्या काळात त्या दोघांकडेही फारसं काम नव्हतं, त्यामुळे त्या पायरीवर बसून चहा पीत गप्पा मारत त्यांनी अनेक तास घालवले होते! ती कामगार वस्ती असल्यामुळे तिथे गोखले कुटुंब वेगळंच वाटायचं. संसार नवीन असल्यामुळे ते दोघेही तसे बावरलेले असत. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांशी काहीच संवाद नव्हता. एकदा रात्री लाईट गेले. काळोखात बाहेर त्या पायरीवर बसल्याबसल्या उमाताई गायला लागल्या. चाफा बोलेना गायलं, मीराबाईचं एक भजन गायलं. तेवढय़ात लाईट आले. बघितलं तर उमाताईंचं गाणं ऐकत आजूबाजूला

३०-३५ लोक उभे होते! तेव्हापासून ते दोघेही त्या सगळ्यांशी जोडले गेले. आताही उमाताई रोज पहाटे उठून रियाज करतात, तेव्हा कुणी ना कुणीतरी बाहेर उभं राहून ऐकत असतं! एखाददिवस त्यांनी रियाज केला नाही तर ‘आज रियाज का केला नाही’ असं शेजारीपाजारी आवर्जून विचारतात. साधारणत: शेजाऱ्याची बायको गाणारी असेल तर आजूबाजूला एकंदरच दहशत असते, पण उमाताईंचं गाणं सुरेल असल्यामुळे इथे परिस्थिती वेगळी आहे!

गोकुळधामच्या घरानंतर इतरही तीन-चार घरं बदलल्यावर त्यांना हिरानंदानीमध्ये सरकारी कोटय़ातून घर मिळालं. कला क्षेत्रातल्या मित्रमैत्रिणी आणि राजकीय हितचिंतकांमुळे त्यांना तीन महिन्यांत ते घर मिळालं. या सगळ्यांची मदत आयुष्यभर लक्षात राहण्यासारखीच आहे. लक्षात राहण्यासारख्या कविताही त्यांनी हिरानंदानीतल्या घरात असताना लिहिल्या. ते घर तेराव्या मजल्यावर होतं. त्यामुळे खिडकीशी उभं राहिलं की लांबवरचा मोकळा परिसर दिसायचा. एकदा संध्याकाळी गोखलेकाका खिडकीशी उभे होते. अंधार व्हायला लागला तसे आजूबाजूचे एकेक दिवे लागायला लागले. उमाताई तेव्हा गाण्याचे क्लासेस घेऊन घरी परत आल्या. दार उघडताना गोखलेकाकांनी घरातलं दिव्याचं बटण लावलं आणि त्यांना कविता सुचली,

दिवेलागण वणव्यासारखी पसरते

रात्र झाल्यावर

पण आपलं घर मात्र उजळतं

तू दाराशी आल्यावर..

डोक्यावर आपलं हक्काचं छत असणं म्हणजे काय हे पुरेपूर अनुभवल्यामुळे घराचा विचार त्यांच्या कवितेतही डोकावतो. गोखले काका आणि उमाताईंच्या घरात आजवर अनेक जण गरज म्हणून राहून गेले. त्यांच्याकडून कसलाही मोबदला त्यांनी घेतला नाही. या बाबतीत-

खरं सांगतो बेघर माणसाला

दिवेलागण झेपत नाही

त्याच्या डोळ्यातला पोरकेपणा

त्या अंधुक प्रकाशात लपत नाही

ही त्यांची कविता फारच बोलकी आहे. मध्यमवर्गीय पालकांनी आपल्या मुलांना कधीही ‘हे आमचं घर आहे’ असं म्हणू नये, ‘ हे आपलं घर आहे’ म्हणावं असं सांगतानाच प्रत्येकाला आपला हक्काचा आसरा मिळावा, कुणावरही बेघर होण्याची वेळ येऊ  नये असं वाटत असल्याचंही काकांनी आवर्जून सांगितलं. या आश्वासक शुभेच्छेनेच आमच्या घराविषयीच्या गप्पांचा समारोप झाला!

अंजली कुलकर्णी-शेवडे – anjalicoolkarni@gmail.com  

First Published on February 11, 2017 2:29 am

Web Title: poet chandrashekhar gokhale home