21 April 2019

News Flash

दिवाळीसाठी घर नटते..

दाराला तोरण लावण्यासाठी कधीकधी आधीपासूनच लोकरीचे किंवा मण्यांचे वगैरे नवीन तोरण विणले जाते.

माधुरी साठे madhurisathe1@yahoo.com

दिवाळी हा आपला आनंदाचा, उत्साहाचा, झगमगता मोठा सण. या सणासाठी बरेच दिवस आधीपासून आपली तयारी चालू असते. अर्थात ही तयारी आपल्या रहात्या घरापासूनच आपण सुरू करतो. दिवाळी आली की घराची, दारे- खिडक्यांपासून साफसफाई चालू होते. जुन्या वस्तू टाकून दिल्या जातात. काहीजण घराची रंगरंगोटी करतात. दिवाळीच्या स्वागतासाठी व पाहुण्यांच्या सरबराईसाठी पहिले घरच दिमाखात उभे राहते.

दिवाळी म्हटलं की दारापुढे रांगोळी आलीच. दारापुढे रेखिली सुंदर रांगोळी, घर हसून म्हणते- व्हा प्रसन्न पाऊल आत टाकण्यापूर्वी, असे रांगोळी बघून वाटायला काहीच हरकत नाही. अंगणात मोठी रांगोळी काढण्यासाठी भलामोठा चौकोन आखला जातो. किंवा जेथे अंगण नसेल तेथे आपापल्या दारासमोर छोटासा चौकोन गेरूने सारवला जातो. रांगोळीचा पेपर तयार करण्यासाठी, एक पेपर घेऊन त्यावर पेन्सिलीने बरोबर चौकोन पाडून, उदबत्तीने भोके पाडली जातात. हे काम  व्हरांडय़ात बसून आरामशीर करता येते. रांगोळीच्या पुस्तकाची घरात शोधाशोध होते किंवा नवीन पुस्तक बाजारातून आणले जाते. बाजारातून रांगोळीचे साहित्य म्हणजे गेरू, रांगोळी, वेगवेगळे रंग, चकमक घरी आणून ठेवली जाते. फुलांचा, पानांचा उपयोगही करून रांगोळी काढता येते. आता रांगोळीचा कागद विकतही मिळतोच, तसेच रांगोळीचे छापही घरी आणले जातात.

रांगोळीच्या तयारीसोबतच, व्हरांडय़ातच किंवा घराच्या आत रंगीबेरंगी कागद घेऊन आकाशकंदील बनविण्याची घाई चाललेली असते. घरापुढे दारात तसेच तुळशी वृंदावन असेल तर तेथे चारी बाजूला ठेवण्यासाठी किंवा ते नसेल तर बाल्कनीत ठेवण्यासाठी आणलेल्या नवीन पणत्या, कोणाचा धक्का लागू नये अशा ठिकाणी एका बाजूला पाण्यात घालून ठेवलेल्या असतात. म्हणजे त्या कमी तेल पितात. बाल्कनीत लावायला रंगीबेरंगी दिव्यांची तोरणेही घरी आणली जातात.

दाराला तोरण लावण्यासाठी कधीकधी आधीपासूनच लोकरीचे किंवा मण्यांचे वगैरे नवीन तोरण विणले जाते. त्याशिवाय आंब्याची पाने व झेंडूची फुले आणून त्याचे तोरणही आदल्या दिवशी केले जाते किंवा विकत आणले जाते.

घरापुढे किंवा अंगणात लहान मुलांचा गोंधळ चाललेला असतो. लाल माती आणून ती भिजवून त्याचा किल्ला ते तयार करीत असतात. किल्ल्यावर छोटी झाडे येण्यासाठी अळीव पेरण्यासाठी आणून ठेवलेले असते. किल्ल्यावर उभे करण्यासाठी सैनिकही गोळा केलेले असतात. किंवा हल्ली तयार किल्लेही मिळत असल्यामुळे काहीजण तेही घराच्या अंगणात ठेवतात. नातेवाईक, मित्रांसाठी नावे घालून ग्रीटींग्ज्ही तयार केली जातात. पाहुण्यांना घरी यायचे आमंत्रण दिले जाते. भाऊ-बहिणींसाठी व पाहुण्यांसाठी द्यावयाच्या भेटी घरी तयार असतात.

मुख्य म्हणजे, दिवाळी म्हटली की फराळ हा आलाच. प्रत्येक घरात त्यासाठी वाणसामान आणले जाते. दळणं आणली जातात. चकलीचा सोऱ्या करंजीचे कातण काढले जाते. घराघरातून लाडू, चकली, चिवडा वगैरे दिवाळीच्या पदार्थाचा घमघमाट येतो व कोणाकडे काय पदार्थ चालू आहे याची कल्पना येते.

दिवाळीसाठी सर्वाना नवीन कपडे, दागिने, किमती वस्तू घरी आणतात. गृहिणींसाठी सुवासिक गजरे, दिवाळीच्या दिवशी, बाजारात महाग असले तरी घरी आणलेले असतात. घरात या गजऱ्यांचा व महागडय़ा सेंटचा सुवास सगळीकडे दरवळत असतो. एकूण काय, आपल्याबरोबरच आपले घरही दिवाळीचे स्वागत तयार करण्यासाठी नटूनथटून सज्ज झालेले असते.

 

First Published on November 3, 2018 1:04 am

Web Title: preparation for diwali festival