19 January 2021

News Flash

कायद्याच्या चौकटीत : मालमत्ता आणि मृत्युपत्र

मृत्युपत्र हा आपल्या मालमत्तेची व्यवस्था लावण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात काही ठरावीक टप्पे येत असतात. बालपण म्हणे मजा, नंतर शिक्षण आणि उद्योग, त्यानंतर सगळे स्थिरस्थावर झाल्यावर मजेत जगण्याचा काळ आणि शेवटचा टप्पा म्हणजे जेव्हा आपला प्रवास संपत आल्याची जाणीव होऊन आपली नजर पैलतीरी लागते तो. आपल्याला उतरायचे स्थानक जवळ आल्यावर जशी आपण सामानाची आवराआवर करतो, तसेच काहीसे या शेवटच्या टप्यात करणे आवश्यक आणि इष्ट आहे.
आपण सक्षम असतानाच आपल्यानंतर आपण आपल्या आयुष्यात जी काही मालमत्ता विशेषत: अचल मालमत्ता म्हणजे घर, जमीनजुमला इत्यादी कमावली त्याची व्यवस्था कशी असावी याचा निर्णय करणे आवश्यक आहे. असा योग्य निर्णय केल्याने पुढील पिढीचे बरेचसे प्रश्न आपोआप निकाली निघतात.
मृत्युपत्र हा आपल्या मालमत्तेची व्यवस्था लावण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. आजही आपल्यापैकी अनेकांना मृत्युपत्र करायचे म्हटले की, अनेकानेक प्रश्न सतावायला लागतात. वास्तविक मृत्युपत्र ही अतिशय साधी सोपी गोष्ट आहे, त्यात घाबरून जाण्यासारखे काही नाही.
बऱ्याचदा अशी शंका येते की मृत्युपत्र नक्की लिहायचे कसे? त्याचा ठरावीक मसुदा आहे काय? तर तसे काहीही नाही. मृत्युपत्र ठरावीक साच्यातच लिहिले पाहिजे असे कोणतेही कायदेशीर बंधन नाही. सर्वसामान्य लेखनाच्या नियमांचे पालन करून मृत्युपत्र लिहावे. म्हणजे प्रथमत: ते वाचनीय असायला हवे, दोन- त्यातील मजकूर मृत्युपत्र करणाऱ्याची इच्छा स्पष्टपणे कळेल असा असावा.
मृत्युपत्र म्हटले की, ते साहजिकच कर्त्यांच्या मृत्यूनंतरच उघडण्यात येते. त्यामुळे त्यातील मजकुराबाबत खातरजमा करण्यासाठी त्याचा कर्ता हयात नसतो. म्हणूनच सामान्यत: कोणत्याही मृत्युपत्राला मृत्युपत्रातील मजकूर ठाऊक असणारे किमान दोन साक्षीदार असावेत. जेणेकरून मृत्युपत्राबाबत वाद निर्माण झाल्यास अथवा मृत्युपत्र न्यायालयात सिद्ध करायची वेळ आल्यास, मृत्युपत्रातील मजकूर साक्षिदारांद्वारा सिद्ध करता यावा.
केवळ बौद्धिक आणि मानसिकदृष्टय़ा सक्षम व्यक्तीच मृत्युपत्र करू शकते, म्हणूनच प्रत्येक मृत्युपत्रासोबत कर्त्यांच्या मानसिक आणि बौद्धिक सक्षमतेचा वैद्यकीय दाखला असावा. जेणेकरून नंतर कर्त्यांच्या सक्षमतेबद्दल वाद निर्माण झाल्यास वैद्यकीय दाखल्याने किंवा प्रसंगी वैद्यकाच्या साक्षीने अशा वादाचे निराकारण होऊ शकेल.
कोणत्याही व्यकीला आपला अंत निश्चितपणे सांगता येणे केवळ अशक्य आहे. त्यामुळेच बदलत्या परिस्थितीनुसार आणि काळानुसार मृत्युपत्र बदलायचे झाल्यास तसे करता येते. प्रत्येकास आपले मृत्युपत्र कितीही वेळा करता येते, मृत्युपत्र किती वेळा करावे यावर काहीही कायदेशीर बंधन नाही. प्रत्येक मृत्युपत्र त्याच्या आगोदरचे मृत्युपत्र रद्द करते आणि मयत व्यक्तीचे केवळ शेवटचेच मृत्युपत्र ग्राह्य़ धरण्यात येते. आपल्या मृत्युपत्राची अंमलबजावणी विशिष्ट व्यक्तीमार्फत व्हावी अशी इच्छा असल्यास, मृत्युपत्रात प्रशासक नेमता येतो. प्रशासकाची नेमणूक केल्यास, मृत्युपत्राची अंमलबजावणी करायची जबाबदारी आणि अधिकार प्रशासकास असतात.
नोंदणी कायदा हा सर्व प्रकारची कागदपत्रे आणि त्याची नोंदणी याबद्दल अत्यंत महत्त्वाचा आहे. या नोंदणी कायद्यानुसार मृत्युपत्राची नोंदणी ऐच्छिक आहे. इच्छा असल्यास मृत्युपत्राची नोंदणी करता येऊ शकते, मात्र नोंदणी करण्याचे बंधन नाही. वाद निर्माण झाल्यास अनोंदणीकृत मृत्युपत्राच्या तुलनेत नोंदणीकृत मृत्युपत्र सिद्ध करणे सोपे असते, म्हणूनच मृत्युपत्र नोंदणी करणे केव्हाही श्रेयस्कर ठरते.
आजही अनेकांचा असा गैरसमज आहे की, मृत्युपत्र केले की सर्व मालमत्ता आपल्या इच्छेप्रमाणे आपोआप हस्तांतरित होते. मात्र असे नसते. मृत्युपत्रातील लाभार्थी अथवा प्रशासक यांस सक्षम न्यायालयात जाऊन न्यायालयामार्फत मृत्युपत्राची अंमलबजावणी करून घ्यावी लागते, त्याशिवाय मालमत्तेचे अभिलेखात लाभार्थ्यांच्या नावाची नोंद केली जात नाही.
वरील सर्व विवेचनावरून आपल्या असे लक्षात येईल की, मृत्युपत्र करणे ही एक अतिशय उत्तम सोय आहे. प्रत्येकाने सर्व कायदेशीर बाबी ध्यानात ठेवून किंवा तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन या सोयीचा लाभ अवश्य घ्यावा.

मृत्युपत्राबाबत महत्त्वाचे मुद्दे
* अविवाहित व्यकीने विवाहापूर्वी केलेले मृत्युपत्र विवाह झाल्यावर आपोआप रद्द ठरते.
* मृत्युपत्रात परस्परविरोधी मजकूर असल्यास शेवटचा मजकूर ग्राह्य़ धरण्यात येतो.
* मृत्युपत्रात उल्लेखिलेल्या संपत्तीपैकी मृत्युपत्र करणाऱ्याच्या निधनाच्या वेळेस शिल्लक संपत्तीच केवळ विचारात घेतली जाते.

अ‍ॅड. तन्मय केतकर – tanmayketkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 12:41 am

Web Title: property and will
टॅग Property
Next Stories
1 थंडगार पाणी देणारे ‘माठ’
2 घराला परिसस्पर्श देणारा इंटिरियर डिझायनर
3 वस्तीचे ‘वोट’ वास्तव
Just Now!
X