भव्यता, सौंदर्य व वास्तुकौशल्याचा सुरेख नमुना रामनाथ मंदिर समूहाभोवती अभेद्य अशी दगडी भिंतीची संरक्षक तटबंदी आहे. आतील विस्तीर्ण प्राकार व अजस्र एकसंध कोरीव खांब, त्यावरील कोरीव काम  तसेच शिल्पकृती यासाठी हे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे.

निळसर रंगाच्या विविध छटा उधळणाऱ्या आकाशाच्या असीम विस्ताराखाली मैलोन्मैल पसरलेल्या अथांग समुद्राचा धीरगंभीर आवाज, त्याच्या अंतरंगात स्फुरणाऱ्या विशालकाय लाटांचं अविरत चक्र श्रीलंकेकडच्या क्षितिजावरून येऊन उत्साह व संकल्प जागवणारा उगवता सूर्य, सामुद्रधुनीतल्या शंभर धडधाकट खांबाच्या पुलावरून समुद्रपार धडधडत जाणारी रेल्वे. समुद्रामुळं देशापासून विलग झालेल्या शंखाकृती बेटाकडे नेणारी अनामिक ओढ, आस्था व श्रद्धा.. या सर्वाचं कारण आहे, पूर्णपणे वाळू व शाडूनं बनलेल्या तमिळनाडूच्या रामनाथपुरम् जिल्ह्यतलं रामेश्वराच्या नावानं प्रसिद्ध असलेल्या बेटावरचं रामायण काळात विकसित झालेलं रामनाथ मंदिर! हे अतिभव्य वास्तुकल्पना, कारागिरी व कौशल्य याबरोबरच आकर्षक प्रमाणबद्धता असलेली ही जगप्रसिद्ध वास्तुकृती केवळ सश्रद्ध रामभक्तांचंच नव्हे, तर जगभराच्या वास्तुअभ्यासक व इतिहासकारांचं वर्षांनुवर्ष आकर्षण केंद्र बनलं आहे.

Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
bhau rangari ganpati temple fire marathi news
भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद
khajina vihir Vitthal temple
सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल मंदिरात चोरी

लाटांनी अलंकृत असं हे पवित्र क्षेत्र, मुख्य चार धामांपैकी एक व बारा ज्योतिर्लिगांपैकी अत्यंत महत्त्वाचं व जागृत असं शिवस्थान असलं, तरी ते शैव व वैष्णव दोहोनाही पूज्य आहे. आसेतुहिमाचल विखुरलेल्या व त्या काळातील राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक समरसतेचं भान ठेवून पूर्वजांनी स्थापन केलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी रामेश्वर हे इतरही अनेक कारणांमुळे लेकप्रियतेच्या शिखरावर आहे. हे अनेक अर्थानी समानतेचं द्योतकही आहे. विविध पंथांना एका धाग्यात गुंफण्याचं अजब सूत्र इथं वापरलं गेलं आहे. म्हणून यासाठी गंगेचं पवित्रजल रामेश्वराला व रामेश्वरची वाळू गंगेत जाऊन अर्पण करण्याची प्रथा होती. हे केवळ धार्मिक स्थान नाही तर एक अप्रतिम पर्यटन स्थळ व निसर्गस्नेही जीवनपद्धती अजूनही तशीच राखलेला असा देशाचा एक भाग आहे. रामायण काळाच्या आधीपासून अस्तित्वात असल्याचेही ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत.

पौराणिक ग्रंथातील उल्लेखानुसार लंकाविजयानंतर श्रीराम, लक्ष्मण व सीता हे परतत असताना इथल्या गंधमादन पर्वतावरील तपस्व्यांनी रावणवधामुळे रामाच्या हातून झालेल्या ब्रह्महत्येबद्दल घृणा केली व त्यावर एकमेव उपाय म्हणून शिवलिंगाची स्थापना करण्यास सांगितले. त्यासाठी अगस्तिऋ षींच्या सांगण्यावरून शाळिग्रामाचं शिवलिंग आणण्यासाठी हनुमानाला कैलासावर पाठविले गेले. हनुमानास येण्यास उशीर झाल्यामुळे मुहूर्त टळू नये म्हणून सीतेने वाळूचे शिवलिंग बनविले व विधिवत स्थापना केली. त्याच वेळी आलेल्या हनुमानाला त्याचा राग आला व तो शमविण्यासाठी त्याने कैलासहून अत्यंत मेहनतीनं मिळवून आणलेल्या अजस्त्र, पण सुबक अशा अस्सल शाळिग्रामाच्या शिवलिंगाची स्थापना करण्यासाठी वाळूचं शिवलिंग हटवण्याचा प्रयत्न करताना लक्षात आले, की ते पक्के झाले असून हलविणे शक्य नाही, म्हणून शालिग्राम शिवलिंग जवळच दुसऱ्या ठिकाणी स्थापन करण्यात आले.

रामेश्वर मंदिर समूहापैकी मुख्य मंदिराचे गर्भगृह हे अतिप्राचीन असून ते श्रीलंकेच्या वनराजशेखर असे डुंबल (श्रीलंका) येथील शिलालेखावरून समजते. पंडय़ा राजघराण्यावर  विजय मिळाल्याची कृतज्ञभावना ठेवून पराक्रमबाहू राजानेही या मंदिराचे वाढीव बांधकाम इ. स. ११७३ मध्ये केल्याचे उल्लेख सापडतात. तरीही या मंदिराचे मुख्य बांधकाम हे उदयन सेतुपती याने इ. स. १४१४ मध्ये नागपट्टीनम्च्या एका धनाढय़ व्यापाऱ्याच्या आर्थिक मदतीतून केले. पूर्व गोपूर इ. स. १६४९ मध्ये दलवाई सेतुपती याने बांधले. या संपूर्ण मंदिर समूहाभोवती अभेद्य अशी दगडी भिंतीची संरक्षक तटब्ांदी आहे. आतील विस्तीर्ण प्राकार व अजस्र एकसंध कोरीव खांब, त्यावरील कोरीव काम  तसेच शिल्पकृती यासाठी हे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. हे मंदिर ८६५ फू. लांब व ६५७ फू. रुंद असून मुख्य छताला आधार देणाऱ्या खांबांची उंची ४९ फूट आहे. यावरून याच्या उंचीचा अंदाज यावा. इथले प्राकार हे त्यांच्या लांबी-रुंदीमुळे प्रसिद्ध आहेत.  येथील  दक्षिणोत्तर प्राकार (ू११्र१ि) ६४० फू. लांब असून पूर्व पश्चिम प्राकार ४०० फू. लांबीचा आहे. त्याच्या आतील पूर्व पश्चिम दिशेने लांबी २४४ फू. असून दक्षिणेकडील  प्राकार २४४ फू. लांबीचा आहे. तीनही प्रकारात  शेकडो अजस्र आकाराचे कोरीव दगडी खांब असून या प्रकारांची एकूण लांबी जवळजवळ ४००० फूट आहे. आत मुख्य मंडप असून त्या मंडपात एकूण १२०० भव्य खांब आहेत. प्राकारांची रुंदी १५१ ते १७१ फूट आहे. दोन्ही बाजूंना ५ फूट उंचीचे प्लॅटफॉम्र्स असून बाजूला असलेले स्तंभ उत्तम बांधणी व शिल्पकलेचे नमुने आहेत. मंदिर पूर्वाभिमुख असून पूर्वेकडील गोपूर १३० फूट उंचीचे आहे. पश्चिमेकडील गोपूर ८० फू. उंच आहे. ते पाहाण्यासाठी देशोदेशीचे पर्यटक व कलाप्रेमी सतत येत असतात. ही संपूर्ण बांधणी मानवी हातांनी केली असावी हे अशक्य वाटते. या मंदिराचा अवाढव्य विस्तार असला तरी ते पूर्णपणे कलात्मक व सौंदर्यपूर्ण आहे. मंदिराच्या ईशान्य कोपऱ्यात काशांची अत्यंत मनोहारी अशी मूर्ती आहे. जवळच विघ्नेश्वर गणेशाची सुंदर मूर्ती आहे. नंदी मंडपात भव्य नंदी असून, त्याची जीभच नव्हे तर संपूर्ण नंदी अक्षरश: जिवंत वाटतो. हा नंदी शंखचूर्णापासून बनविलेला असल्याचे बोलले जाते. नंदीच्या समोर रामनाथचे मूलमंदिर आहे. श्रीरामाच्या  करकलमानी  ज्याची पूजा केली ते विशेष शिवलिंग म्हणजेच सीतेने बनविलेले (वाळूचे) शिवलिंग आहे. हे शक्तियुक्त असून पूर्व मंडपात राम सीता, हनुमान तसेच सुग्रीव यांच्या दगडी मूर्ती दिसतात. हनुमान आपल्या दोन्ही हातात विश्वेश्वर शिवलिंग (कैलासाहून आणलेले) घेऊन  उभा आहे. विनम्र भावाने हे रामाला सांगणारा सुग्रीव बाजूला आहे. हे दृश्य अगदी जिवंत वाटते. वरच्या तीन मंडपात हनुमान अगस्तिलिंग व गंधमादन लिंग अशी सुंदर लिंग आहेत. रामनाथ मंदिराच्या उजव्या बाजूस हनुमानाने कैलासाहून आणलेली शाळिग्राम शिलेचे विश्वेश्वर लिंग आहे, उजव्या बाजूस पर्वतवर्धिनी मंदिर, शयनगृह (पल्लीयरै), पल्लिकोडू, पेरुमल, संतान गणपती व सेतुमाधव मंदिर आहे. इथल्या शुक्रवार मंडपात अष्टलक्ष्मीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या पूर्वेस लाल रंगाची क्रोधीत हनुमानाची उभी मूर्ती आहे. याने पायाखाली समुद्र दाबला असून त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तीतही इथली पाण्याची पातळी याने वाढू दिली नाही असे मानतात. मंदिराच्या आवारातच २४ तीर्थे आहेत. त्यांच्या २४ स्वतंत्र विहिरी आहेत. चंद्र, सूर्य, इ. नावांची ही तीर्थे वेगवेगळी आहेत. त्यांच्या पाण्याचे घटक, गुणधर्म, तापमान, चव व रंग भिन्न आहेत. या रोगनाशक व पुण्यकारक तीर्थाचे विशेष रक्कम भरून स्नान करता येते. पश्चिम गोपुराजवळ मंदिराच्या बाहेर शंखशिंपले, समुद्रातील इतर वस्तू – पूजा साहित्य, इ. ची विक्री करणारी दुकाने आहेत. इथे धार्मिक साहित्यही उपलब्ध असते. मंदिराच्या तिसऱ्या प्रकाराजवळ  मुदपाकखाना असून तिथे नैवेद्य बनवितात. इथेच जवळ एका कोपऱ्यात रामेश्वरच्या बहुमूल्य अलंकारांचा खजिना आहे. मंदिराच्या दक्षिणेस शिवतीर्थ व नवग्रह प्रतिमा आहेत.

याशिवाय या बेटावर वनौषधींसाठी प्रसिद्ध गंधमादन पर्वत आहे व येथील हवाही रोगनाशक आहे. इथेच कोदंड राम मंदिर, देवी पट्टनम, नव पाषाणम् म्हणजेच लंकास्वारीपूर्वी  रामाने स्थपलेल्या नवग्रहांच्या प्रतिनिधी शिला व दर्भशयनम् अशी प्रेक्षणीय, रामायणकालीन व विविध घटनांचे पुरावे देणारी व त्याचबरोबर इतिहास कथन करणारी स्थाने वा खुणा आहेत. मुख्य शहरातच अब्दुल कलाम यांचे घरही आहे. मंदिराजवळ अवकाशातील याने वा आक्रमणविरोधी विद्युत चुंबकी शक्तीने भारित एक संरक्षक लोहस्तंभाची जागा दाखवितात, जो स्तंभ संशोधनासाठी ब्रिटिशांनी नेल्याचं कळतं. चेन्नईपासून ४२५ कि. मी. अंतरावर असलेल्या रामेश्वर मंदिरात समोरच्या समुद्राच्या पाण्यात स्नान करून रामलिंगेश्वराचे दर्शन घेणे हे श्रद्धाळू लोकांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे कार्य मानले जाते. भारतवर्षांत अनेक तीर्थे व मंदिरे असली तरी एकाच स्थानी तीर्थस्नान व दर्शन म्हणजे अलभ्य लाभ! श्री रामचंद्र राज्याभिषेकानंतरही इथे येऊन रामलिंगाची पूजा व प्रार्थना करीत असत. पाच पांडव, व बलराम हेसुद्धा या पवित्र क्षेत्री येत असत. वाल्मिकी महर्षीच्या मतानुसार, सेतूक्षेत्र देवादिकांनाही पूजनीय वाटत असे, असे येथील कोकण प्रदेशातून खास आणलेले  मुख्य पुजारी  सांगतात. धर्म गुप्त व अश्वत्थामा या ऐतिहासिक पुरुषांनी  इथे स्नान व दर्शन केल्याचे उल्लेख प्राचीन ग्रंथात सापडतात. येथील दोन समुद्र (बंगालचा उपसागर व हिंदी महासागर)व त्यांचा संगम हे सर्वश्रेष्ठ तीर्थ असले तरी इथे एकूण मंदिराच्या आत व बाहेर अशी एकूण ५० च्या जवळपास तीर्थ आहेत. इथले पाणी  गंगाजलसारखे  वर्षांनुवर्षे टिकते. या पवित्र जलस्नानाने स्नान केल्याने कोटीतीर्थाचे स्नान होते असे मानतात व त्यामुळे स्वास्थ्यलाभ होतो असा अनेकांचा अनुभव आहे. असं हे पुण्यक्षेत्र इथल्या अन्य स्थानांप्रमाणे इथल्या वास्तुसौंदर्यासाठी, शिल्पकलेसाठी व अप्रतिम कारागिरीसाठी प्रसिद्ध आहे. मानवी हातांना बनविणं अशक्य वाटणारं हे मंदिर  शिल्प विश्वकम्र्यानं जणू अवकाशातून आणून या बेटावर अलगदपणे ठेवले असं वाटतं व ते पुन्हा पुन्हा पाहाण्याची इच्छा प्रबळ होते.

डॉ. उदयकुमार पाध्ये cosmic_society_india@yahoo.co.in