शुभदा देशपांडे

‘श्र  मसाफल्य’ कानाला गोड वाटणारे नाव धारण केलेले बांधणचे आमचे घर तितकेच रम्य आणि सुंदर होते. अलिबाग तालुक्यात पोयनाडपासून आत साधारण एक-दीड किमी अंतरावर असलेले हे बांधण गावसुद्धा माझ्या लहानपणी तिथल्या पांढऱ्या आणि लाल चाफ्याच्या डवरलेल्या झाडांनी आच्छादलेल्या मोजक्याच घरांमुळे आणि स्वच्छतेच्या जागोजागी दिसणाऱ्या खुणांमुळे मला खूप आवडायचे.

अगदी खूप दिवस नाही तरी उन्हाळ्याच्या सुटीत दोन-चार दिवसांसाठी आणि गणपतीचे पाचही दिवस आमचा मुक्काम या तीनही बाजूला छान, सारवलेल्या प्रशस्त अंगण असलेल्या श्रमसाफल्यमध्ये असायचा. तिथे कायम राहत नसूनही आपला त्या घराशी असलेला संबंध मला नेहमी एका वेगळ्याच श्रीमंतीची अनुभूती द्यायचा. अगदी लहान असतानाही मी त्या घराचा ‘आमचे बांधणचे घर’ म्हणून मत्रिणी किंवा बाकीच्यांशी गप्पा मारताना जेव्हा उल्लेख करायचे तेव्हा ‘तुमच्यापकी कुणालाही या घराचे सौंदर्य, वैभव आणि वेगळेपण चाखता येणार नाही’ असा तोरा मिरवणारा भाव माझ्या चेहऱ्यावर आणि मनात असायचा.

बांधण गाव तसे समुद्रसपाटीपासून बऱ्यापकी उंचावर. पंचक्रोशीतल्या इतर गावांपासून कदाचित त्यामुळेच स्वत:चे ‘हटके ’ वेगळेपण जपणारे. पेझारीच्या एस. टी. स्टॅण्डवर उतरून बांधणच्या घराकडे येणारा रस्ता खूप लांबचा, पण रम्य.. ५-१० मिनिटे चालल्यावर गावाच्या दर्शनी भागाच्या टोकाचे, पण गर्द झाडीत लपलेले आमचे कुवळेकरांचे आवार (फक्त आवारच- कारण गर्द झाडीत लपलेल्या श्रमसाफल्यचा एखादा कौलाचा तुकडाच दिसू शकायचा) दिसायला लागले की पायांना दिलेल्या एवढय़ा श्रमांचे साफल्य होई. रस्ता मध्येच सोडून मग माळावरून आणि नंतर शेताच्या बांधावरून आम्ही ‘खैरा’च्या विहिरीपर्यंत यायचो आणि तिथून सुरू होणाऱ्या आमच्या उंचावरच्या आवाराच्या पायऱ्या चढत एकदाचे आवारात शिरायचो.

आंबा, चिंच, फणस, सीताफळ, चिकू, जांभुळ अशा झाडांच्या सावलीत लपलेल्या ‘श्रमसाफल्य’ची ही मागची बाजू असायची. आवारात दोन-तीन ठिकाणी मोठी बांबूची बेटेही होती.. कालांतराने मग काही कारणाने ती बेटे एकेक करून काढून टाकली गेली. थोडीशी चढण चढले की मग ‘गोकुळ’ हा गुरांचा वाडा आणि त्याच्या शेजारच्या छानशा बागेत फुललेली गुलाब (त्यावेळी तो ‘कलमी गुलाब’ म्हणून फारच भाव खायचा), मोगरा, गुलबक्षी, अबोली, सोनटक्का, शेवंती, कर्दळी, जास्वंद अशी त्या त्या मोसमातली फुले मला मोहवून टाकायची. जास्वंदी तर एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारच्या वेगवेगळ्या रंगाच्या.. लाल, गुलाबी, गर्द गुलाबी, पिवळी, पांढरी आणि जांभळीसुद्धा.. हे वैविध्य इतके मनमोहक की परडीभरून देवासाठी काढून आणलेली फुले फक्त पाहात राहावीत! शेवंतीचेही तसेच वैविध्य! गणपती उत्सवात संध्याकाळच्या आरतीच्या वेळी गुलबक्षीच्या पिवळ्या, गुलाबी आणि पांढऱ्या फुलांची बाप्पाला वाहिलेली वेणी त्या मूर्तीचे सौंदर्य अधिकच खुलवीत असे.

‘कुवळेकर काका’ या नावाने आजूबाजूच्या परिसरात परिचित असलेले माझ्या वडिलांचे काका आणि त्यांचे कुटुंब या ‘श्रमसाफल्य’मध्ये राहायचे. आई-वडिलांचे छत्र लवकरच हरवल्यामुळे बाबांसाठी हे काकाच वडीलधारे. त्यामुळे साहजिकच आमचेही तेच आजोबा-आजी.

‘चौसोपी’ या रचनेला साजेसे हे घर तसे दुमजली, पण वरच्या मजल्यावर एकच प्रशस्त खोली. त्या खोलीकडे जाणारा लाकडी जिना माजघराच्या एका कोपऱ्यात होता. जिन्याच्या त्या अध्र्या िभतीने काहीसे अर्धवट विभागले गेलेले प्रशस्त माजघर.. शेणाने सारवलेले.. त्याच्या आतल्या बाजूला लांबच लांब मोठे स्वयंपाकघर. या स्वयंपाकघरातली स्वच्छता कुणाचेही लक्ष पटकन वेधून घेणारी.. गोबर गॅसवर चालणारी शेगडी- त्यासाठीचा खास बनवलेला छोटासा ओटा आणि िभतीच्या आधाराने दोरीने स्वत:ला बांधून घेऊन उभी असलेली ताक घुसळण्याची लांबलचक दांडय़ाची रवी.. या काही वैशिष्टय़ांसाठी सकाळी आणि संध्याकाळी चहाच्या वेळी एकत्र बसलेल्या सगळ्या मोठय़ांच्या बरोबर तिथे लुडबुड करायला मला फार आवडायचे.

माजघरातून स्वयंपाकघरात येण्यासाठीच्या मस्तपकी गुळगुळीत झालेल्या पायरीवर बसून गप्पा मारणे हा आणखी एक आनंद. याच स्वयंपाकघरात गणपतीच्या वेळी सुबक आणि देखणे मोदक करण्याची गुरुकिल्ली मला आई-बाबा, काका-काकू, आजी, आत्या यांच्याकडून मिळाली.

गणपती उत्सवाचे पाचही दिवस रोज काहीतरी पक्वान्नाचा नवेद्य. माझी आई, दोन-तीन काकू, आजी या कुटुंबातील स्त्रिया मिळून हा स्वयंपाक करायच्या. पाच दिवसांचा मुक्काम असलेले आणि फक्त दर्शनासाठी एक दिवस येऊन जाणारे असे सगळे मिळून रोज २० ते २५ पानांचा स्वयंपाक असे. त्यातही ऋषिपंचमीची सात प्रकारच्या भाज्या घालून सिद्ध झालेली ‘बडगम’ ही अप्रतिम चवीची भाजी हे या गणपती उत्सवाचे वैशिष्टय़.

पाच दिवस गोडधोड खाऊन कंटाळलेल्या जिभांना मग विसर्जनाच्या रात्री आजोबांनी केलेल्या खास त्यांच्या शैलीतील ‘तिखट भाजी’चे वेध लागायचे. एक काकू त्यांना हवे असलेले मसाल्याचे वाटण तयार करत असे, एकजण भाज्या चिरून देई तर कुणीतरी छान शुभ्र तांदळाच्या भाकरी भाजत असे. नाकाडोळ्यांत पाणी आणणाऱ्या त्या झणझणीत भाजीची प्रशंसा करत आणि तो झणझणीतपणा सहन न होणाऱ्या स्त्रीवर्गाच्या मिळमिळीत खाण्याची चेष्टा करत मग आनंदात रात्रीचे जेवण पार पडे.

स्वयंपाकघराच्या मागे एक प्रशस्त पडवी.. तिथे चूल- ज्यावर रोज सकाळी एका मोठय़ा तपेल्यात अंघोळीचे पाणी तापवले जाई. त्या पडवीत एका बाजूला हात-पाय धुण्यासाठी असलेली मोठी मोरीवजा जागा.. या पडवीच्या समोर सारवलेले स्वच्छ अंगण आणि तुळशी वृंदावन. आजूबाजूला अबोली, झिपरी, सोनचाफा, सोनटक्का, बकुळी, दवणा-मरवा.. अशी हिरवीगार सोबत. थोडय़ा अंतरावर पाणी साठवण्याची भलीमोठी सिमेंटने बांधलेली टाकी.. त्याच्या एका बाजूला नळाखाली कपडे धुण्यासाठी केलेली छानशी जागा. जवळच अळूचे बन आणि या टाकीच्या मागच्या बाजूला बांधलेली मोठी खोपी- लाकूडफाटा ठेवण्यासाठी.

खैराच्या विहिरीच्या बाजूलाही एक छान सारवलेले लांबलचक अंगण. उन्हाळ्याच्या सुटीत रात्रीची जेवणे आलटून-पालटून या दोन्ही अंगणात पार पडत. गरमगरम आमटीभात, पिठीभात, लोणचे, ताक अशा जेवणाचा सोहळा चंद्रिबबाच्या साक्षीने अधिकच रंगतदार होई. मुंबई, कोकण, कोल्हापूर आलेल्या एखाद्-दुसऱ्या नातेवाईकाने रंगवलेला गप्पांचा फड हे या पंगतीचे वैशिष्टय़ ठरत असे.

दुपारची जेवणे मात्र प्रशस्त माजघरात व्हायची. माजघराच्या एका बाजूला आणखी खोली (आतल्या बाजूला अगदी खास मोराची सोय असलेली)- खरे तर बाळंतिणीची खोली- पण माझ्या पाहण्यात तरी हा दोनखणी भाग बरीच वष्रे कुणा ना कुणाला तरी भाडय़ाने राहायला दिला जायचा.

माजघराच्या पुढे ओटी. या ओटीचे खास आकर्षण म्हणजे सागवानी लाकडाचा बनलेला गुळगुळीत सुंदर पितळी कडय़ांचा झोपाळा. अगदी गाण्यांच्या, गावांच्या, नावाच्या भेंडय़ा, गाडीगाडीचा खेळ किंवा काहीच नाही तर नुसत्या गप्पा असे वेगवेगळे आठवणींचे कितीतरी पदर या झोपाळ्याच्या प्रत्येक झोक्याबरोबर झुलतील इतका हा झोपाळा माझा आणि इतर सगळ्या चुलत भावंडांचा लहानपणचा आवडता सखा होता. या झोपाळ्यावर बसले की मागच्या आणि पुढच्याही बाजूला- ओटीच्या दोन्ही कडेला दोन छोटय़ा खोल्या. त्यापकी समोरची- म्हणजे छान सूर्यप्रकाश येणारी, रस्त्याकडेची खोली म्हणजे मी आणि माझ्या छोटय़ा भावासाठी आनंदाचे धाम. कारण ही माझ्या काका आणि आत्याची अभ्यासाची खोली.. प्रचंड टापटीप, व्यवस्थित, प्रत्येक वस्तू जागच्या जागी अभ्यासाचे टेबल, त्यावरची पुस्तके-वह्य (त्यातल्या सुंदर, नीटनेटक्या अक्षर आणि आकृत्यांसारख्या), टेबललॅम्प, खिडकीत लावलेला छोटासा मनीप्लँट.. हे सगळे त्या लहान वयात इतके मोहक आणि आकर्षक वाटे, की चोरटा का होईना स्पर्श केल्याशिवाय राहवत नसे. पण आम्ही छोटी मुले त्या सुंदर, नीट मांडणीला हाताळून बिघडून टाकू अशा भीतीने आत्या-काका तिकडे जाऊ देत नसत.. मग तर ते स्वप्नातलेच चित्र वाटत असे.

दुसऱ्या बाजूची खोली धान्याची पोती वगरे ठेवण्यासाठी वापरली जाई. आणि या सुंदर, देखण्या वास्तूसमोर शिरपेचातील मोरपिसाप्रमाणे असलेला आम्हा सगळ्यांचा आवडता भाग म्हणजे ऐसपस ‘पुढचे अंगण.’ पाऊस सरला की साधारण दिवाळीच्या सुमाराला ते सारवून त्यावर भलामोठा पेंढय़ांचा मांडव घातला जाई. त्या अंगणाच्या दुसऱ्या बाजूला घराला समांतर बांधलेली एक चाळवजा वास्तू. तीन-तीन खोल्या आणि मागे प्रशस्त पडवी असलेले हे दोन खण खास भाडेकरूंसाठी बांधलेले. त्याच्या मागच्या बाजूला आमच्या सगळ्यांचा आवडता ‘खोबरी आंबा’ आणि केळीचे बन.

अंगणासमोरच्या या वास्तूलाही एक प्रशस्त लांब ओटी होती आणि तिथेही एक झोपाळा. आळीपाळीने दोन्ही झोपाळ्यांवर बसून खेळताना, उडय़ा मारताना ना जेवणाची वेळ आठवे ना टीव्ही.. मग  व्हिडीओ-गेम्स, टॅब, आयपॅड, स्मार्टफोन यांचा काय टिकाव? (ते तेव्हा अस्तित्वात असते तरी बॅगेतून/ कपाटातून बाहेर पडायची त्यांना हिम्मत झाली नसती, इतकी त्या ‘झोपाळा’ प्रकरणाची जबरदस्त पकड आम्हा मुलांवरती असे.)

रात्री एखाद्-दोन जण सोडले तर कुणीही घरात झोपत नसे.. उन्हाळ्याच्या सुटीत शेणाने सारवलेल्या जमिनीवर पसरलेली चटई किंवा सतरंजी, एखादं पातळ  पांघरूण आणि वर मांडवांचं छत.. आजूबाजूला छान बहरलेली हिरवाई.. एवढय़ा वैभवात मग पंख्याचीसुद्धा गरज  भासत नसे. डास किंवा सापांना नावालाही शिरकाव नव्हता एवढा कडेकोट बंदोबस्त आवारातील स्वच्छता आणि नसíगक पर्यावरणाने राखला होता.

आवारात आंब्याच्या इतक्या वेगवेगळ्या जातींची झाडे होती की सकाळी उठल्यावर आम्हा मुलांचे सगळ्यात पहिले काम असे ते संपूर्ण आवाराला प्रदक्षिणा घालून आंब्याखाली पडलेले जास्तीत जास्त आंबे वेचून आणणे आणि मग त्याची दिवसभर खादाडी करणे.

‘गोकुळ’मधल्या म्हशी आणि स्वयंपाकघरातल्या मांजरी हा आमच्यापकी काही छोटय़ांचा आनंदाचा ठेवा. घरचेच दूधदुभते असल्याने दही, लोणी, तूप याचा सुकाळ असे. तीच कथा आमरसाची. चिंचेची भरपूर झाडे असल्याने चिंचा उतरवून त्याची टरफले सोलून, चिंचोके काढून चिंचगोळे बनवले जात.

कुठल्याही गावाकडच्या घराचे वैशिष्टय़ असलेली बलगाडीही आमच्या या घरी होती. खूप वष्रे काम करणारे परशुरामकाका ती घेऊन आम्हाला काही वेळेला एस. टी. स्टॅण्डवर सोडायला किंवा उतरवून घ्यायला आल्याचे आठवतेय.

शक्य असेपर्यंत घरातली सगळी मंडळी गडीमाणसांच्या मदतीने हे भलेमोठे वैभव जपत राहिली. पण हळूहळू काळाच्या प्रवाहात वेगवेगळ्या कारणांनी स्वच्छता, सांभाळ अशक्य होऊ लागले. घरालाही आपल्या वृद्धत्वाची चाहूल लागली आणि मग एके दिवशी त्याला धक्का न लावता शेजारीच आरसीसीचे बांधकाम करून बंगला बांधण्याचा निर्णय घेतला गेला. तोपर्यंत आधुनिकतेचे थोडेफार साज या घरानेही अंगावर चढवून घेऊन आपली नव्याशी जुळवून घेण्याची वृत्ती दाखवून दिली होती, पण तरीही शहरीकरणाचे वाहू लागलेले वारे आमच्या ‘श्रमसाफल्य’च्या शेजारीच येऊन थबकले आणि त्याला पूर्ण अंधारमय करत दिमाखात त्याचे आधुनिक भावंड शेजारीच उभे राहिले.

आधुनिक सुखसोयींनी युक्त असलेल्या त्या घरात सर्वप्रथम पाऊल ठेवण्याआधी मी जुन्या घरात डोकावले आणि ‘जुनं ते सोनं’ च्या मानसिकतेच्या गत्रेत कितीतरी वेळ स्वत:ला हरवून बसले. आजही ते जुने घर पूर्णपणे पाडण्याचे धर्य कुणालाही झालेले नाही.

नवीन ऋतूबरोबर नवीन रूप धारण करणे हा सृष्टीचा नियम आहे. बदलणाऱ्या काळाप्रमाणे तसे गृहरचनेचे बदल स्वीकारलेही, पण तरीही भूतकाळाची समृद्धी विसरणे कसे शक्य आहे?

shubh.deshpande@rediffmail.com