12 December 2018

News Flash

माझी बागसखी!

सुदैवाने सर्वच गोष्टी जुळल्या आणि चक्क एका बागेची मी मालकीण झाले.

असं म्हणतात की, माणसाला एखादा तरी चांगला छंद असावा. पण काही गोष्टींचा नाद कसा लागतो, की तो मुळातच असतो कोण जाणे! दादरच्या दहा बाय दहाच्या चाळीतल्या खोलीत जन्माला आलेले मी, पण आपली एक बाग असावी अशी खूप इच्छा होती. पुढे ब्लॉकमध्ये राहायला गेल्यावर आई-बाबांनी बाल्कनीत कुंडय़ांमध्ये छोटीशी बाग लावली आणि काही अंशी माझी बागेची इच्छा पूर्ण झाली. पुढे वरसंशोधन सुरू झालं. सासूबाईंना नुकताच हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याने ‘मुलगी दाखवायला तुम्हीच आमच्या घरी या,’ असा निरोप सासरहून आल्यावर बंगला नि घराभोवती बाग असं समजल्यावर मन हुरळून गेलं नि मुलगा बघायचा सोडून मी त्या घराच्याच ठार प्रेमात पडले. माझ्या स्वप्नातली बाग मला खुणावत होती. सुदैवाने सर्वच गोष्टी जुळल्या आणि चक्क एका बागेची मी मालकीण झाले. या बागेत निरनिराळी झाडे लावली. आता साठीला आल्यावर हीच बाग माझ्या आनंदाचे निधान झाले आहे.

सकाळी उठल्यावर झाडांना पाणी घालणे, झाडांशी गप्पा मारणे, त्यांची खुशाली विचारणे यांनीच माझा दिवस सुरू होतो. अडुळसा, वेखंड, हळद, इन्शुलीन, मघई पान, कढीपत्ता यांसारखी औषधी झाडे, पन्नास वर्षांपूर्वी सासरेबुवांनी लावलेला आंबा नि जांभूळ आणि मी आवडीने लावलेली भोपळ्याइतके फळ देणारी पपई, काल्र्याची वेल, सीतेची वेणी, जास्वंदीच्या जोडीला मधुकांता, रातराणी, सोनटक्का यांसारखी मधुर सुगंधाची पखरण करणारी झाडे, झालेच तर कर्दळ, पांढरी-पिवळी कोरांटी, पिवळसर केशरी फुलांची पखरण करणारी बिट्टी, साधी सोज्वळ मंद वासाची दुहेरी आणि एकेरी तगर आणि तिचा भाऊ  शोभावा असा सुगंधी अनंत.. बागेतल्या या जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी माझं आयुष्यच सुंगंधी केलं आहे.

सावलीत जगू शकतील अशी दर्शनी, मनी प्लांट व रंगीत पानांची झाडे. वर्षांतून एकदाच दर्शन देणारी मे फ्लावर, ऑर्किड, लिली यांनी माझी बाग बहरली आहे.

दरवाजातून आत प्रवेश करताना ‘‘वा! गावच्या घरी आल्यासारखं वाटलं!’’ असे पाहुण्यांचे उद्गार ऐकले की धन्य वाटतं. बागेत एखादी शेजारीण जास्त रमली तर ‘शीला वागळेची लागण झाली वाटतं?’ असा नवऱ्याचा खोचक टोमणा ऐकावा लागतो, असं माझ्या शेजारणीनं सांगितलं. पण मला याचा राग नाही, उलट गंमतच वाटते.

या बागेबरोबर अजूनही काही छंद जडले. अनेक रंगांची फुलपाखरे माझ्या बागेला भेट देत असतात. हळद्या, तांबट, शिंजीर, नाचरा बी इटर, बुलबुल, साळुंकी, चिमण्या, कबुतरं, आंब्याला मोहोर आल्यावर येणारे कोकीळ, रावे त्यांची साद ऐकू आली की कॅमेरा घेऊन धावत फोटो काढत फिरणं हे जर वेड असेल तर चालतंय की!

एक नमूद करू इच्छिते, या बागेत माझ्या आजूबाजूला राहणाऱ्यांचाही तेवढाच वाटा आहे. माझ्या खताच्या खड्डय़ाला नियमित खाद्य पुरविण्याचे काम हे आजूबाजूचे स्नेही करतात. निर्माल्य, भाज्यांचे देठ, साली.. ज्यापासून गेली कित्येक वर्षे खत बनवून माझी बाग अधिकच फुलली आहे. शिवाय जमा झालेला पालापाचोळा असतोच!

या बागेने मला माझ्या वाईट दिवसांत खूपच मोलाची साथ दिली. जोडीदार अचानकपणे आयुष्यातून निघून गेल्यानंतर आलेलं रितेपण मैत्रीण बनून भरून काढलं ते या बागेनं. आजही दोन शब्द झाडांशी बोलल्याशिवाय माझा दिवस काही छान जात नाही. तुम्हाला सांगते, माझा राग,आनंद, प्रेम सर्व काही माझ्या या सुहृदांना समजतो. बागेमुळे  विविध झाडं, फुलपाखरं, पक्षी.. सगळ्यांतलीच रुची वाढली. पिवळी, काळी, केशरी, करडी फुलपाखरं पाहिली आणि चक्क  बटरफ्लाय अ‍ॅप डाऊनलोड करून त्यांची नावं, जाती शोधण्याचा नवा छंद लागला.  ब्ल्यू मॉरमॉन, कॉम टायगर, स्वॉलोवटेल अशी अनेक फुलपाखर माझ्या बागेला भेट देतात हे समजलं. पक्ष्यांची साद ऐकून हळद्या, शिंपी की ब्राऊन स्पॉटेड बी इटर काम करता करताच ओळखता येऊ लागले. सोनटक्कय़ाला खाणारी, पान गुंडाळणारी अळी, कढीपत्त्याचा फडशा पाडणारी जाडी हिरवी अळी, स्पिटल बग, पाकोळ्या, चतुर, विविध रंगीत किडे आणि रेशमाच्या किडय़ांनीही बागेला भेट दिली; पावसाळ्यात येणाऱ्या विविध गोगलगायी आणि बेडूक सुध्दा! माझं अवघं भावविश्व समृध्द केलं माझ्या या बागसखीनं. काही दिवसांसाठी बाहेर जायची वेळ आली तर त्यांचा निरोप घेताना मन जड होतं. अशी माझी ही बाग माझ्या आनंदाचे निधान.

saw1958@gmail.com

First Published on December 30, 2017 12:31 am

Web Title: small garden terrace garden