घरातला एक कोपरा विशिष्ट अशा वस्तूंनी सजलेला असतो. त्यामागे अनेक साऱ्या आठवणीही दडलेल्या असतात. घरातल्या अशा कोपऱ्याविषयी..

आठवणींना वस्तूचे रूप लाभले की त्या वस्तू आणि आठवणी एक होऊन जातात. त्या वस्तूंचे माहात्म्य वाढते आणि अशा आठवणींशी बांधलेल्या वस्तू अनेक वर्ष आपण सोबत बाळगतो. कुठेतरी प्रेमाने साठवून ठेवतो. बऱ्याचदा या वस्तू कलात्मक असतात. आपल्या संस्कृतीत घरामध्ये अशा वस्तूंचा संग्रह करण्याची पद्धत नाही. वस्तुसंग्रहालयाचे महत्त्व आपल्याला फार नसते. संग्रहालयातील वस्तूइतके त्याचे मूल्य नसते ना सौंदर्य, पण तरीही या वस्तू आपल्या असतात. त्याला असंख्य आठवणी मौल्यवान करतात. केवळ एकाच आशेने या आठवणीतल्या वस्तू जपताना दिसतात. ते म्हणजे आपलं मोठं- व्यवस्थित घर झालं की हे सजवून ठेवू. काही त्यात यशस्वी होतात देखील.

या सदरामध्ये आपण अशाच यशस्वी, सौंदर्यवेडय़ा रसिकांच्या घरातील आठवणींचे कोपरे पाहणार आहोत.

ठाण्यातील हॉटेल व्यावसायिक व साहित्य प्रसारक किरण भिडे व मुग्धा भिडे दाम्पत्याच्या घरी अगदी दर्शनी भागात असणारा हा कोपरा पाहू. प्रकाश केळकर हे मुग्धा भिडे यांचे वडील! हयात असताना कायम पेटीत बंद असणाऱ्या व त्यानंतरही या सॉफ्ट वूड, साबणाच्या कलाकृती त्यांनी अनेक वर्षे जपून ठेवल्यात. नव्या घरात आग्रहाने त्यासाठी शोकेस बनवले. गेले ३०-३२ वर्ष कोणालाही न दिसणाऱ्या कलाकृती घरी येणाऱ्या सर्वाना पाहता येतात. इतकी वर्षे दबून राहिलेल्या मूर्तीना योग्य जागा मिळाली आणि कलेचा प्रवास उशिरा का होईना पण पूर्णत्वाला गेला.

सर्व कलाकृती या घरातील सुई, पीन, कात्री, चाकू वापरून केल्या आहेत. काही मूर्ती या नखाएव्हढय़ा आहेत तर काही मूर्ती या दोन्ही बाजूने कोरल्या आहेत. यातील लक्स साबणातील वस्तू लक्ष वेधून घेतात. कलेशी थेट संबंध नसल्याने जमेल तितकी काळजी घेत या वस्तूंची सफाई केली जाते. घराच्या दर्शनी भागातच असणारा हा आठवणींच्या साठवणीचा कोपरा घराचा कलावारसा अधोरेखित करतो.

श्रीनिवास बाळकृष्णन chitrapatang@gmail.com