15 December 2017

News Flash

पत्र्याचे उतरते छप्पर हिताचे कसे?

पावसात जरी वर पत्रे असले तरी कुठच्याही कामासाठी गच्ची वापरता येणार नाही.

शैलेश कुडतरकर | Updated: May 6, 2017 3:49 AM

वास्तुरंगमधे (१ एप्रिल) महादेव पंडित यांचा गच्चीवर उतरत्या छपराची परवानगी आणि सक्तीहा लेख प्रसिद्ध झाला होता.  या लेखाची दुसरी बाजू मांडणारा लेख.

लवकरच पावसाला सुरुवात होईल. तसा तो दर वर्षीच येतो. मुंबईकरांच्या दृष्टीने तो येतो, आपले पराक्रम करून जातो आणि गेल्यावर मुंबईकर त्याला पार विसरूनही जातो. कारण पराक्रमच तसे असतात, त्यांची आठवण नको. घरभर लावलेली भांडी, बादल्या, तो कुजलेला कुबट वास, अर्धवट भिजलेल्या गाद्या, अंथरुण, कपाटातून येणारा तो सडलेला अंगावर शिशिरी आणणारा दर्प, नाही रात्रभर झोप, नाही दिवसा आराम! घरभर घाणेरडा वास, भिंतीवर जमिनीवर सगळीकडे ओल, दमटपणा! घराचा स्वर्ग बनवता बनवता अक्षरश: नरक बनलेला असतो.

मग त्यातून वाचण्यासाठी निरनिराळे मार्ग चोखाळले जातात. कुठे  क्रॅक्स भर कुठे कोटिंग कर, कुठे डांबर घाल तर कुठे प्लास्टिक लाव. हे सर्व करून जेमतेम आठ दिवस जात नाही तोपर्यंत निरनिराळे साक्षात्कार होऊ  लागतात. ‘ते मटेरिअलच खराब होतं, नाही तो कॉन्ट्रॅक्टर चोर होता, ती काम करणारी माणसंच बरोबर नव्हती, त्यांना काही येतच नव्हतं.. मुंबईचा पाऊसच असा आहे, इकडे काहीच चालत नाही, मुंबईची हवा खारी आहे, इथे बिल्डिंगला लगेच भेगा पडतात. याच कारणाबरोबर मग कोणी कमिशन खातो, कोणी आपल्याच माणसांना कामं देतो वगैरे वगैरे.’’ बघता बघता पाऊस संपतो व नको त्या आठवणी म्हणून मुंबईकर पुढील पाऊस येईपर्यंत विसावतो.

गळतीच्या भयानक अनुभवापासून सुटका मिळवण्यासाठी लोक काय काय नाही करत! कोणी कड्डप्पा बसवतो तर कोणी सरळ प्यारापेटवर पत्राच ठोकतो, कोणी निरनिराळी केमिकल्स चोपडतो तर कोणी संपूर्ण इमारतीलाच प्लास्टिकचा कोट घालून टाकतो. कोणी आणखी काही करतो, पण एकजण मात्र गच्चीवर सरळ पत्र्याचं छप्परच बसवतो.

छप्पर बसवायचं आहे? बसवा की, पण त्याअगोदर जिथे असं छप्पर बसवलं आहे तिथली परिस्थिती तर पाहून घ्या.

आजकाल मुंबईच्या उपनगरात जे छप्पर इमारतीच्या वर घालण्याची प्रथा सुरू झाली आहे त्याची थोडीशी चिकित्सा करूया. हे छप्पर असते तरी कसे? याची रचनाही लोखंडी आय बीम, चॅनेल्स, अँगल्स वगैरे वापरून त्याचा एक सांगाडा बनवून त्यावर पत्रे ठोकून केली जाते. छप्पर आणि पॅरापेट यामधला भाग हा मोकळाच असतो. छप्पराची उंची साधारणपणे गच्चीच्या तळापासून सातआठ फूट असते. सभोवताली ठरावीक अंतरावर आय बीम रोवून त्यावर हा सर्व डोलारा उभा केला जातो. उभे खांब हे बहुधा कॉलममध्ये खड्डा करून बसवले जातात. गच्चीच्या रुंदीच्या भागात मोठय़ा लोखंडी कैच्या बसवल्या जातात. जेवढी रुंदी मोठी तेवढी कैची भारी. उभे-आडवे वासे बसवून त्यावर ‘जे’ बोल्टस्किंवा इतर प्रकारचे फासनर वापरून कोरुगेटेड शीट्स बसवल्या जातात. या सर्व सामग्रीचे वजन काही टन भरते. जे इमारतीचा सांगाडा बनवताना हिशोबात घेतलेले नसते. आपण अगोदरच्या काही लेखात हे बघितले आहे की लोखंड पाण्याच्या संपर्कात येऊन त्याच्याभोवती असलेल्या काँक्रीटवर रासायनिक क्रिया होऊन तेथे  काम्बिनेशन होते, सोप्या भाषेत काँक्रीट सडू लागते व त्या भागात खड्डे निर्माण होऊन सांगाडय़ाच्या गर्भ भागात पाणी जाऊ  लागते.

इमारतीच्या कॉलम व बीमशी छेडछाड करायच्या अगोदर खूप विचार होणे जरुरीचे आहे. या भागात कन्स्ट्रक्शन जॉइंट नावाचा एक प्रकार असतो, जो मूळ सांगाडय़ाशी कधीही एकरूप होत नाही. जर का कॉलमवरून पाणी वाहत राहिले व ते या भागात पोहचले तर इथून ते कुठे रस्ता करेल व कुठल्या भागात पोहचेल हे जाणून घेण्यासाठी ब्रह्मदेवाचीच मदत घ्यावी लागेल. पत्र्यावरती गोलगोल आलटूनपालटून नाल्या असतात, किंवा ठरावीक अंतरावर रिब असतात. अशा पृष्ठ भागावरून जेव्हा वारे वाहू लागतात तेव्हा पत्रे उचलले जातात. याला एरोडायनॅमिक्स असे म्हणतात. ऐंशी टन वजनाचे विमान याच शक्तीने उचलले जाते. पत्रे उचलले जाऊ नयेत म्हणून गावाकडे या पत्र्यांवर काँक्रीटचे अथवा दगडांचे लोडे बसवले जातात. तरीसुद्धा पत्रे उडतातच. मुंबईत इमारती फार जवळ जवळ असतात. लोकवस्तीसुद्धा दाट असते. पत्रे उडण्यासारखी घटना झालीच तर काय अनर्थ होईल? सोसायटीने नुकसानभरपाई देण्याची तयारी ठेवली पाहिजे.

सततच्या एरोडायनॅमिक्स परिणामामुळे संपूर्ण छपर हे कंप पावत असते व ही कंपने लोखंडी खांबांमार्फत इमारतीच्या मूळ आरसीसी सांगाडय़ापर्यंत पोहचतात. जिथे लोखंडी खांब पुरून बसवले असतात तिथे हळूहळू लहान खड्डे पडतात व तेथून पाणी आत झिरपू लागते. पत्रे हे सांगाडाच्या वरच्या बाजूला बसवले जातात, खाली चोहू बाजूने पॅरापेटवर सर्व काही खुलेच असते. पावसाचे पाणी हे एकाच बाजूने न येता चारही बाजूने येते व गच्चीच्या तळावर संपूर्णपणे पसरते व गळणाऱ्या टेरेसमधून इमारतीत सगळीकडे पसरते. पावसात जरी वर पत्रे असले तरी कुठच्याही कामासाठी गच्ची वापरता येणार नाही. सोसायटीने तेथे काही ऑफिस, लायब्ररी बनवली तर तेथील फर्निचरची पूर्णत: वाताहत होईल. सततच्या एरोडायनॅमिक्स परिणामांमुळे संपूर्ण छप्पर हे कंपन पावत असते व ही कंपने लोखंडी खांबांमार्फत इमारतीच्या सांगाडय़ापर्यंत पोहचतात. कालांतराने इमारतीचे कॉलम्सना भेगा पडू लागतात, जेणेकरून इमारतीचे अतोनात नुकसान होते.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे शहर बनण्याच्या मार्गावर आहे. काय आपण आपल्या इमारतींच्या डोक्यावर पत्र्याच्या टोप्या घालून शहराला झोपडपट्टीचे स्वरूप आणू इच्छितो? महापालिकेने व सरकारी यंत्रणेने याची खास दाखल घ्यावी. आपल्या बाजूच्या राज्यात गोव्यामध्ये कायद्याने एक तृतियांश छप्पर हे उतरते असावे लागते व फक्त एक चतुर्थाश छप्पर हे सपाट गच्ची स्वरूपात ठेवण्यास परवानगी असते. त्यामूळे मूळ आराखडय़ातच उतरत्या छपराचा अंतर्भाव होतो व असे बंदिस्त छप्पर हे इमारतीचा भाग बनून राहते. तिथे पत्र्याच्या टोपीची गरज नसते. मुंबईतील जुन्या चाळी तीनचार मजल्याच्या असायच्या व त्यांचे छप्पर उतरते कौलारू असायचे. पण हे छप्पर इमारतीचा भाग असायचे व म्हणून त्याची पूर्ण व्यवस्था निराळया प्रकारची असायची. आजही काही अत्याधुनिक इमारतींवर आपण उतरते छप्पर बघतोच की. पण ते इमारतीचा भाग होऊन राहिलेले असते. पत्र्याची टोपी घालून काही फुटकळ, नसलेल्या फायद्या साठी आपण संपूर्ण इमारतीची नासाडी का करावी?

जाताजाता आणखी एक धोक्याची घंटा वाजवावीशी वाटते. पत्र्याच्या छपराच्या फायद्याच्या पुष्टी संदर्भात एक गोष्ट सांगितली जाते की पत्र्यावरून पाणी गोळा करून ते जिरवता येईल. हे निव्वळ चुकीचेच नाही तर धोकादायक आहे. मुंबईचा पाणीपुरवठा हा विहिरीमधून होत नसतो. त्यामुळे मुंबईत वॉटरटेबलचा प्रश्नच नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईचा खुपसा भाग हा भराव घालून निर्माण केला आहे. निसर्गाशी खेळ करताना योग्य ती काळजी घेतली नाही तर निसर्ग माफ करत नाही. निसर्गाने मुंबईकरांना ‘सिंक होल’ म्हणजे काय याची झलक दाखवली आहे. ‘सिंक होल’बद्दल जास्त माहिती नेटवर आहे ती वाचावी. पाणी गोळाकरून जमिनीत साठवण्यासाठी मुंबई नाही.

कुठचेही महत्त्वाचे निर्णय घेताना त्यांचा चहूबाजूने विचार केला पाहिजे. त्यात भरकटून न जाता संपूर्ण विचारपूर्वक निर्णय झाला पाहिजे व महत्त्वाचे म्हणजे त्यातून होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, मग तो निर्णय वैयक्तिक असो अथवा सामायिक असो. अशी व्यवस्था आली तर बेजबाबदारपणे निर्णय घेण्याला आळा बसेल व सारासार विचार करून सर्वाच्या हिताचेच निर्णय घेतले जातील.

shaileshkudtarkar81@gmail.com

First Published on May 6, 2017 3:44 am

Web Title: steel sheet roof importance