ओटी, पडवी आणि स्वयंपाकघर यांच्या कोंदणात बसवलेलं माजघर म्हणजे कोकणातल्या आमच्या घराचा प्राण आहे म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. आमचं घर तसं मोठंच असल्याने साहजिकच माजघरही मोठंच आहे. पुलंच्या शब्दात सांगायचं तर एका वेळेला पंचवीस पानं सहज उठेल एवढं मोठं. माजघरात सगळं सामान भिंतीकडेलाच असल्याने ते जास्तच मोठं आणि मोकळं वाटतं. घराच्या मधोमध असल्याने फार सूर्यप्रकाश आणि उजेड यायला वाव नाहीये, पण काचेच्या कौलांमुळे दुपारी मात्र भरपूर प्रकाश असतो माजघरात. भिंतीमध्ये कोनाडे आणि खुंटय़ा अजूनही आहेत. भिंतीतल्या कोनाडय़ात नेलकटर, पावडरचे डबे, टिकल्यांची पाकिटं, रोज लागणारी औषधं, मुलांचे छोटेमोठे खेळ, त्यांची पेनं, गोष्टींची पुस्तकं अशा एकमेकांशी संबंध नसलेल्या अनेक वस्तू सुखेनैव नांदत असतात. आणि खुंटय़ावर मुलांची दप्तर, पिशव्या, शर्ट, हात पुसायचे टॉवेल पावसाळ्यात कंदील, वगैरे वगैरे..

आमचं घर तसं फार जुन्या वळणाचं नाहीये, पण तरीही माझ्या सासूबाईंचा वावर स्वयंपाकघर आणि माजघर इथेच जास्त असे. त्यांना खरं तर झोपाळा फार आवडत असे, पण फक्त दुपारी जेवण झालं की जेव्हा पुरुष मंडळी वामकुक्षी घेत असत तेव्हाच फक्त त्या थोडा वेळ ओटीवरच्या झोपाळ्यावर येऊन बसत असत. एरवी कधी त्या ओटीवर फारशा येत नसत. अगदी टीव्हीही त्या माजघरातूनच बघत असत. जणू काही माजघराचा उंबरठा ही मर्यादाच घालून घेतली होती त्यांनी स्वत:साठी!

2nd March Panchang Shani Krupa In Abhijat Muhurta These Rashi among Mesh to meen Will Get Benefits Of Massive Income Horoscope Today
२ मार्च पंचांग: शनी कृपेने अभिजात मुहूर्तात ‘या’ राशींच्या कुंडलीत धनलाभाचे योग; मेष ते मीन, कोण आहे नशीबवान?
Upvas special naivedya special batata bhaji
बटाटयांची सुकी भाजी; नैवेद्याच्या पानावर वाढली जाणारी बटाटा भाजी एकदा नक्की ट्राय करा
Budh Gochar 2024
होळीनंतर ‘या’ राशींचे सुखाचे दिवस सुरु? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात प्रचंड श्रीमंत
Sankashti Chaturthi 2024
Sankashti Chaturthi 2024 : संकष्टी चतुर्थीला ‘या’ राशी होतील मालामाल; गणपतीच्या कृपेने होणार धनसंपत्तीत वाढ

आमच्या जॉनीने मात्र उलटी मर्यादा घालून घेतली आहे. तसा त्याचा घरात अगदी मुक्त आणि सर्वत्र संचार असतो. मुलं सुट्टीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपलेली असली किंवा बराच वेळ खोलीत अभ्यास करत असली आणि याला दिसली नाहीत तर एखाद्या मोठय़ा माणसासारखं दार उघडून मुलांची खबरबात घ्यायला खोलीतही जातो. पण कधीही माजघराचा उंबरठा ओलांडून आत येत नाही. अगदी भुकेने व्याकुळ झाला असला तरी उंबरठय़ावर बसून राहतो, पण माजघरात पाऊल टाकत नाही.

पूर्वी आमच्याकडे दुपारची आणि रात्रीची जेवणं तर माजघरात पंगत मांडून होत असतच, पण सकाळची भात-पिठल्याची न्याहरीही पंगत मांडूनच होत असे. दुपारची पंगत वाढताना घरच्या सगळ्यांनी कपडे बदलून तयार व्हायचं हा आमच्या घरचा शिरस्ता. सकाळपासूनची साडी काम करताना खराब झालेली असते म्हणून माझ्या सासूबाईही साडी बदलत असत आणि आम्ही कधी कंटाळा केलेलाही त्यांना चालत नसे. पानं मांडून तयारी झाली की माझे तिथे राहणारे सासरे घंटा वाजवत असत. त्या आवाजाने दोन मिनिटात सगळी जणं पानावर हजर होत असत. आता त्यांच्यानंतर मात्र ही डिनर बेल बंद झाली आहे. मध्यंतरी माझ्या मुलीने मला परदेशातून एक डिनर बेल भेट म्हणून आणली आहे. सगळ्यांना जेवायला बोलावणारी. इथल्या भातुकलीच्या संसारात ती डिनर बेल काही वापरली जात नाही, पण तरीही मी ती जेवणाच्या टेबलावर ठेवली आहेत. तिच्याशी माझ्या सासऱ्यांची आणि माजघरातल्या पंगतींची आठवण जोडली गेली आहे म्हणून. आता बदललेल्या काळानुसार रोजची माजघरातली पंगत बंद झाली असली तरी अजूनही सणावारी, कार्यप्रसंगी किंवा कोणी पाव्हणे आले असतील तर माजघरात पंगत मांडूनच जेवणं होतात.  वाढायच्या वेळी कपडे बदलून तयार होण्याची परंपरा अजूनही आवर्जून पाळली जाते. मुख्य अतिथीचे पान सर्वाना त्यांच्याशी बोलणे सोईचे होईल असे मांडले जाते. बाकीची मंडळी वयाच्या ज्येष्ठतेनुसार बसतात. एरवी स्वत:च्या हाताने जेवायचा कंटाळा करणारी लहान मुलंही आनंदाने पंगतीत बसतात आणि छान व शिस्तीने जेवतात. हसत खेळत जेवणं होतात. अशी पंगत बघणं हेही माझ्या आनंदाचे निधान आहे.

गणपती, नवरात्र या उत्सवांच्या दिवसात माजघरात एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो. कारण गणपतीची स्थापना देवघरात न होता माजघरातच केली जाते. कितीही आधीपासून तयारी करू या असं ठरवलं तरी रात्री जागून गणपतीची सजावट करणं ही आमच्या घरची रीत आहे. त्यामुळे त्या दिवशी माजघरालाही झोप मिळत नाही. गणपतीच्या दिवसात गणपतीपुढे काढलेल्या मोठय़ा मोठय़ा रांगोळ्या, हौसेने केलेली सजावट, गणपती पुढे उजळलेल्या समया, पेटी, तबला, झांजा, मृदंग यांच्या साथीमुळे रंगलेल्या आरत्या, भजनं, अथर्वशीर्षांची केली जाणारी आवर्तनं, जेवणाच्या उठणाऱ्या पंगती, दर्शनासाठी येणारे परिचित, या सगळ्यामुळे माजघरात एक वेगळंच चैतन्य नांदत असतं.

हरितालिका पूजन, हळदीकुंकू, डोहाळजेवण, बारसं, महालक्ष्मी पूजन असे खास स्त्रियांचे समारंभ माजघरातच साजरे होतात. पण खऱ्या अर्थाने माजघर दणाणून जातं ते घरात कोणाची मंगळागौर असेल तर. एरवीही माजघरावर सत्ता असते ती स्त्रियांचीच. पण मंगळागौरीच्या दिवशी पुरुषांना मज्जावच असतो माजघरात. चौरंगावर फुलांच्या सजावटीत विसावलेली देवी आणि आजूबाजूला चेष्टा मस्करी, हास्यविनोद, उखाणे, झिम्मा, फुगडय़ा, नाच ग घुमा, बस फुगडी, कोंबडा असे निरनिराळे खेळ खेळण्यात रमलेल्या बायका आणि मुली.. या सगळ्यात रात्र कधी सरते ते कळत नाही. पहाटे पहाटे खास जायफळ घातलेली कॉफी घेऊन मगच सगळ्या आपापल्या घरी जातात, तेव्हाच माजघराला विश्रांती मिळते.

आमचं घर आहे मोठं, पण पै-पाव्हणेही असतातच. अगदी छोटासा काही समारंभ असेल तरीही सगळे जिवाचा आटापिटा करून घरी जातात. त्यामुळे पाव्हणे असले की जागा कमीच पडते झोपायला. अशा वेळी मधे जायला यायला वाट सोडून दुसरीकडे लायनीत गाद्या घातल्या जातात. गादीवर पडून गप्पा मारत मारत मंडळी झोपी जातात. पण एक आहे, रात्री मांजरांचा मुक्त संचार असतो माजघरात आणि ती हमखास आपल्या गादीत येऊन आपल्याला चिकटतात. हे ज्याला सहन होत नाही तो मात्र नाही झोपू शकत माजघरात.

घरात चिमुकल्या बाळाचं आगमन होणार असलं की आधीच मायाळू असलेलं माजघर जास्तच मायाळू बनतं. तसं तर बाळंतिणीची खोली आहे वेगळी, पण बाळाचा पाळणा टांगायचा मान माजघरातल्या वाशालाच मिळतो. बाळाबरोबरच आईलाही विश्रांती मिळावी म्हणून एखादा माचाही टाकला जातो पाळण्याशेजारी. बाळाची झोपमोड होऊ  नये म्हणून शांत आणि काळोखं असलेलं माजघर मग अधिकच शांत बनतं. आपली सगळी माया त्या लहानग्या जिवावर पाखरत राहतं. उदा-धुपाचा आणि वेखंडचा वास, खुळखुळ्याचा आवाज, थोडय़ा मोठय़ा मुलांचा बाळाला खेळवण्यासाठी वाढलेला माजघरातला मुक्काम, हळू आवाजात म्हटलेल्या ओव्या आणि अंगाई, बाळाचं वेळीअवेळी सुरू होणार रडणं आणि मोठय़ाचं त्याला शांतवणं.. माजघरालाही या सगळ्याची भुरळ पडत असेल.

कधी तरी आपल्याला उदास, एकटं वाटत असेल तर माजघरात थोडा वेळ बसलं तर आपली उदासी नाहीशी होते. एरवी काळोख आपल्याला जास्त उदास करतो. पण काय जादू आहे माहीत नाही, माजघरातला काळोख, तिथला गारवा, तिथली शांतता आपल्या मनाला मायेने थोपटत राहतात आणि आपलं मन थोडय़ाच वेळात शांत होतं..

पूर्वी आमच्याकडे दुपारची आणि रात्रीची जेवणं तर माजघरात पंगत मांडून होत असतच, पण सकाळची भात-पिठल्याची न्याहरीही पंगत मांडूनच होत असे. दुपारची पंगत वाढताना घरच्या सगळ्यांनी कपडे बदलून तयार व्हायचं हा आमच्या घरचा शिरस्ता. सकाळपासूनची साडी काम करताना खराब झालेली असते म्हणून माझ्या सासूबाईही साडी बदलत असत आणि आम्ही कधी कंटाळा केलेलाही त्यांना चालत नसे. पानं मांडून तयारी झाली की माझे तिथे राहणारे सासरे घंटा वाजवत असत. त्या आवाजाने दोन मिनिटात सगळी जणं पानावर हजर होत असत.

velankarhema@gmail.com