आमचं कोकणातलं घर आहे जुन्या पद्धतीचं.. कौलारू.. ओटी, माजघर, देवघर, स्वयंपाकघर आणि परसदार अशी रचना असलेलं. घर खूप मोठं असलं तरी त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे या घराला खोल्या तशा जास्त नाहीत. मुख्य घराच्या लेवलला एकच खोली आहे. तीच ही बोळाची खोली. बाकीच्या सगळ्या खोल्या चार-पाच पायऱ्या खालच्या लेवलला आहेत.

या खोलीला माजघरातून आत जायला दार आहे. एका बाजूला ओटीची भिंत आणि एका बाजूला माजघराची भिंत असल्याने हिला फक्त एकाच बाजूने दोन छोटय़ा छोटय़ा खिडक्या आहेत, ज्या उघडल्या तरी खोलीत फारसा प्रकाश येत नाही. माजघराच्या दारातून प्रकाशाचा काय कवडसा येईल तेवढाच प्रकाश. पूर्वीच्या काळी काही घरातून बाळंतिणीची खोली अशी असे, काळोखी. पण ही आमची खोली बाळंतिणीची नाहिये. बाळंतिणीची दुसरी स्वतंत्र खोली आहे. ही खोली फारशी मोठीही नाहिये. असेल आठ-नऊ  फूट रुंद आणि दहा-अकरा फूट लांब. अशा लांबोडक्या, बोळासारख्या रचनेमुळेच हिला बोळाची खोली हे नाव पडले असेल. तशातच माजघरातून माळ्यावर जाणाऱ्या जिन्यानेही या खोलीचा काही भाग व्यापला आहेच.

book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता
light pollution effect on human health
अंधेरा कायम रहे!!
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!

या खोलीत आहे एक माचा, ज्यावर भरपूर गाद्या रचून ठेवलेल्या असतात. त्यामुळे एक छोटीशी उडी मारल्याशिवाय या माच्यावर बसता येत नाही. एका भिंतीच्या कडेला एक छोटंसं कपाट आणि एक मोठंसं फडताळ आहे. एका छोटय़ा लाकडी स्टुलावर एक भरपूर आवाज करणारा टेबल फॅन आहे. ह्या खोलीची जमीन आम्ही कित्येक वर्ष सारवणाचीच ठेवली होती आग्रहाने, पण अलीकडेच ह्या खोलीलाही फरशी बसवून घेतली आहे. आणि हो बाकी उजेडाच्या दृष्टीने उजेडच असल्याने उजेडासाठी एक पिवळ्या प्रकाशाचा बल्ब आहे. एकंदर खोलीच्या सजावटीला तो शोभून दिसणाराच आहे.

ह्या खोलीच्या मध्यवर्ती स्थानामुळे माझे तिकडे राहणारे सासरे दुपारी ह्याच खोलीत झोपत असत. त्यामुळे त्यांना सगळीकडे नजर ठेवणे सोपे जाई. पण आता ते गेल्यानंतर मात्र घरातल्या बायकांनी दुपारच्या विश्रांतीसाठी हिचा ताबा घेतला आहे. दुपारी जेवणं झाली की आम्ही सगळ्या जणी ह्याच खोलीत आडव्या होतो. एक-दोघीजणी माच्यावर, दोघीजणी खाली चटईवर, एखादी त्यांच्या पायाशी.. कधी कधी न झोपता हळूहळू आवाजात मस्त गप्पाही रंगतात आमच्या. हं, पण पुरेसा उजेड नसल्याने वाचत वाचत झोपण्याचे सुख मात्र इथे मिळत नाही. उन्हाळ्यात दुपारी लाइट गेले तर मात्र एरव्ही बाहेर आडव्या होणाऱ्याही ह्याच खोलीत झोपायला धडपडतात, कारण उन्हाळ्यात गार आणि हिवाळ्यात ऊबदार असते ही खोली. तसेच पावसाळ्यात कोकणात कितीही काहीही केलं तरी माश्यांचा उपद्रव असतोच. आणि त्यात लाइट गेलेले असले तर पंखाही नसल्यामुळे तर जास्तच त्रास देतात माश्या. पण ही खोली मात्र याला अपवाद आहे, कारण काळोखामुळे इथे माश्या जराही नसतात.

एखादं लहान मूल खूप मस्ती करायच्या नादात सैराट झालं असेल आणि झोपायचं नाव घेत नसेल तर ह्या खोलीत नेऊन झोपवलं की हमखास झोपतं ते खोलीत असलेल्या काळोखामुळे आणि गारव्यामुळे. आमच्याकडे अजूनही सुट्टीत दुपारी मुलं डबा ऐसपैस किंवा लपंडाव खेळतात. बोळाची खोली म्हणजे मुलांचा लपण्याचा हुकमाचा एक्काच. इथल्या फडताळात ठेवलेल्या डब्यातले दाणे, गूळ वैगेरे मस्तपैकी चरत लपून बसलेली असतात मुलं ह्या खोलीत. आम्ही कोणी त्याच वेळी खोलीत गेलो आणि दिवा लावला तर मात्र त्यांच्या डोळ्यात एकाच वेळी भीती आश्चर्य आणि ही आत्ता का आलीय इथे असे भाव उमटतात आणि आपसुकच तोंडावर बोट ठेवून प्लीज, सांगू नकोस अशी न बोलता विनंतीवजा आज्ञाही केली जाते. कोणी सर्दी तापाने वगैरे आजारी असेल तर त्याचेही अंथरुण ह्याच खोलीत पडते. मुख्य घराला जवळ असल्याने सतत लक्ष राहाते आणि आजाऱ्याचं हवं नको पाहाणंही सुलभ होतं.

आमचं खूप मोठं कुटुंब आहे कोकणात. नेहमी माणसांची वर्दळ असते घरात. आणि आगरात गडी माणसंही वावरत असतात सतत. एवढय़ा माणसात नवीन लग्न झालेल्या आमच्या मुलांना शहरात मिळतो तसा मोकळेपणा नाही मिळत. पण इथे ही बोळाची खोली त्यांच्या मदतीला धावून येते.

घरात काही मंगलकार्य असेल तेव्हा मात्र ह्या खोलीचं रूपच बदलून जातं. खोली रंगीबेरंगी आणि एकदम कलरफूल दिसायला लागते. निरनिराळ्या प्रकारच्या रेंगीबेरंगी साडय़ा, दागिने प्रसाधनं, अत्तरं, फुलांचे गजरे, गप्पा, हास्याचे चित्कार यांनी खोली भरून जाते. कारण अशा प्रसंगी बायकांची ड्रेसिंग रूम बनते ही खोली. त्या पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात सगळ्यांचा नट्टापट्टा चाललेला असतो. सगळा जामानिमा झाला की हल्ली एखादा सेल्फीही काढला जातो खोलीतून बाहेर पडायच्या आधी. शंभरहून अधिक वर्षांपूर्वी हे घर जेव्हा बांधलं तेव्हा भविष्यात हे असं काही होईल अशी पुसटशी कल्पना तरी केली असेल का ह्या खोलीने?

एकदा एका मे महिन्यात आमच्या घरी खूप पाव्हणे मंडळी जमली होती. त्यात माझ्या एक नणंदबाईही होत्या. दुपारच्या जेवणाची वेळ होती. आधी मुलांची पंगत, मग पुरुषांची आणि मग आम्ही बायका अशी पद्धत आहे आमच्याकडे. जेवायला वेळ होता म्हणून त्या बोळाच्या खोलीत आडव्या व्हायला गेल्या होत्या. बायकांच्या पंगतीसाठी ताटं घेताना अगदी आठवून आठवून, मेळ घालत, कोण जेवलं, कोण राहिलंय अशी बोटं मोजून ताटं मांडली. आम्ही जेवायला सुरुवात केली. माझ्या एक सासुबाई आम्हाला अन्न गरम करून द्यायला उभ्या होत्या. गप्पा मारत मारत सावकाशपणे आमची जेवणं चालली होती. आणि अचानक ह्या माझ्या नणंदबाई येऊन उभ्या राहिल्या. आमचं तर बोलणंच बंद झालं. ‘असे कसे ह्यांना विसरलो’ ही अपराधीपणाची भावना प्रत्येकीच्या चेहऱ्यावर उमटली. पण त्यांनीच सावरून घेतलं. ह्या गोष्टीचा अजिबात इश्यू केला नाही. माझ्या सासुबाईंनी त्यांना पटकन ताट वाढून दिलं आणि त्यांनीही जणू काही झालंच नाहीये असं दाखवून हसतखेळत जेवायला सुरुवात केली. पण तेव्हापासून जास्त पाव्हणे असले की शेवटच्या पंगतीच्या वेळेस बोळाच्या खोलीत कोणी नाहीये ना याची खातरजमा करून घेण्याची सवय आमच्या अंगवळणी पडली आहे.

अशी ही आमची बोळाची खोली. माणसाचं हृदय कसं त्याच्या शरीराच्या आकाराच्या मानाने लहानच असत, तसंच ही खोलीही एकंदर घराच्या आकाराच्या मानाने लहान असली, तरीही आमच्या घराचं हृदयच आहे जणू..

velankarhema@gmail.com