वाडे- चाळींमध्ये असलेल्या अंगणाची गंमतच न्यारी होती. शिवाय दाराबाहेर ऐसपैस जागा आणि एक-दोन मजले असल्यामुळे लांबच्या लांब गॅलरी असायची. उन्हाळ्यामध्ये खालच्या मजल्यावरचे (तळमजला) बिऱ्हाडकरू अंगणात ‘खाटा’ टाकायचे. मग साऱ्या वाडा-चाळीतील पुरुष मंडळी शतपावली झाली की या खाटांवर बसून पार दिल्लीपर्यंतच्या गप्पा मारायचे. भले स्वत: जिथे राहत असत तिथला आजूबाजूचा परिसर न का बघितलेला असो.. पण दिल्ली मात्र यांची तोंडपाठ! जणू काही पंतप्रधान म्हणजे यांच्या रोजच्या उठण्या-बसण्यातले होते. इतक्या खात्रीने त्यांच्याबद्दलही गप्पा रंगत. आणि दिल्लीचं विमान पार अमेरिका, इंग्लंडला जाऊन यायचं. याची साक्ष ही वाडा- चाळीतील ‘अंगण’ असे. तर कॉलेजीयन्स मंडळी. अर्थातच तरुण मंडळी एखाद्या सिनेमावर गप्पा, नाहीतर परदेशी विशेषत: क्रिकेट किंवा टेनिसच्या मॅचेस असतील तर एखाद्या घरातील रेडिओवर नाहीतर गॅलरीमध्ये ट्रान्झिस्टर घेऊन ऐकण्यात दंग असायची तर हायस्कूलमधील मंडळी अंगणात बसून पत्त्यांमधील विविध खेळ खेळत, तर बच्चे कंपनीला एखादे आजोबा रामरक्षा, अथर्वशीर्ष, गीतेमधील अध्याय शिकवीत, मग त्यांना गोष्ट सांगत. अशा वेळी म्हणजे उन्हाळ्यामधील रात्रीतले अंगण म्हणजे मोठय़ा कुटुंबाचे गेट-टू-गेदर चालू आहे की काय असेच वाटे. मग हळूहळू ही मंडळी आपापल्या घरी जायची, मग हायस्कूलमधील मंडळी लपंडाव खेळायची. साधारण बाराच्या आसपास आपापल्या घरातून वळकटी आणायचे आणि अंगणामध्ये झोपून जात तर कॉलेजकुमार गॅलरीमध्ये झोपत. मोठा हौद असायचा, पण अंगणात आणि गॅलरीत झोपणाऱ्या मंडळींना कधी डास चावलेत अन् आजारी पडलेत असे कधीच ऐकिवात नव्हते. त्यामुळे गुडनाइट, ओडोमॉस, डास जायची उदबत्ती असले प्रकार त्यावेळी नव्हतेच. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये दुपारच्या वेळात गॅलरीत पत्ते, कॅरम, सापशिडी, बुद्धिबळ, नाव-गाव, आडनाव.. माझ्या आईचं पत्र, पट, तर मुली हे पण खेळ खेळत. पण कधी कधी त्या सागरगोटे, भेंडय़ा (हळू आवाजात) काचा पाणी, ठिकरी, कधी कधी भातुकली खेळायच्या. तर संध्याकाळी अंगणामध्ये लगोरी, दगड का माती, आप्पा-रप्पी, डॉजबॉल, लंगडी, डबा ऐसपैस, खांब खांब खांबोळी खेळत. हौदावरून आठवण झाली, त्यावेळी हौदात रंग घालून सारा वाडा चाळीतले लोक रंगपंचमी खेळत. अगदी आजी-आजोबांच्या वयाचेही यात सामील होत. मग कोरडी भेळ आणि उसाचा रस याचा सर्वजण मिळून आस्वाद घेत. मग सर्व मुलं-मुली हौद स्वच्छ करत. कारण दुसऱ्या दिवशी भांडी आणि कपडे धुवायला पाणी हवे असायचे. त्यावेळी वॉशिंगमशीन नव्हतीच.

काळानुरूप परिवर्तन घडत असते. तसे अंगणाबाबतही  झाले. मोकळे मैदान मोकळी हवा गेली. अन् या अंगणाची जागा पार्किंगने घेतली. हवेशीर घरे (अगदी २/३ च खोल्या होत्या) गेली अन् फ्लॅट आले. सर्व काही बंद! पूर्वीसुद्धा काही घरांमधील महिला नोकरी करायच्या, पण एकत्र कुटुंब म्हणजे सासू-सासरे, दीर-नणंद यांच्या साथीने (विश्वास ठेवून) आपल्या मुलांना ठेवून नोकरीवर जात असे. पण त्यावेळी घरपण होते. त्यामुळे आजच्या स्त्रीसारखी तिला तारेवरची कसरत करावी लागत नव्हती. मुले घरकोंबडी नव्हती. आज मुले टीव्ही, कॉम्प्युटर, फेसबुक, मोबाइल, व्हॉट्सअप यात गर्क असतात. यांचे हेच अंगण.. त्यात मोकळ्या जागेत ते असे खेळतात. नाहीतर अगदी रस्त्यावर नाही, पण बोळात क्रिकेटची हवा असते. तेच अंगण आहे आज! आता रस्त्यावरील फुटपाथवरील कट्टय़ावर गप्पा.. आता रस्ता हेच अंगण! पण या अंगणामध्ये जीवघेणे खेळ होतात, सिग्नलचे नियम तोडून बऱ्याच जणांना पुढे जायची घाई असते मग दामटायचे वाहन जोरात. काही वेळा दुर्घटना घडू शकते, कधी जीव गमवावा लागतो तर कधी कधी कायमचे अपंगत्व येते.. अशा घटना या अंगणांमध्ये घडूनसुद्धा कोणाचेच डोळे उघडत नाहीत याचेच आश्चर्य वाटते? लोकलमध्ये लोंबकाळणारी माणसे दिसली की सुद्धा मनात भीतीची पाल चुकचुकते!

आजकाल शहरांमध्ये अशी स्थिती दिसते. तिथे मोकळे अंगणच नाही. घराघरांमध्ये जाग असायची.. अगदी दुपारीसुद्धा वाडा-चाळींमध्ये दार घराचे सदैव उघडेच असायचे, त्यामुळे चोऱ्यामाऱ्या नव्हत्या.. महिला-मुलींची छेड काढली तरी आजच्या सारखे दृश्य नव्हते. (असले तरी प्रमाण कमी होते) आज घराचे दार सदैव बंदच असते..

या अंगणामध्ये जशी रंगपंचमी खेळली जायची तशी होळीही शत्रू पक्षाच्या नावाने बोंबा मारून साजरी केली जायची. दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवडीला होळीच्या तापलेल्या निखाऱ्यावर तांब्याच्या घागरीत पाणी ठेवून तापवले जायचे. मग उकडलेल्या कैरीचा गर अंगाला लावून या पाण्याने अंघोळ केली जायची. (विशेषत: लहान मुलांना) तर पहिल्या पावसात अंगणात भिजायला जायचे. गारा वेचायच्या अन् खायच्या! मनसोक्त भिजण्याची तृप्ती म्हणजे काय असते ते अंगणातूनच कळायचे.. पावसाच्या पाण्याने अंगणातील भिजलेल्या मातीचा सुगंध वर्षभर साठवून ठेवायचा.. तर थंडीमध्ये रात्री अंगणात शेकोटी पेटवून मस्त गप्पा, गाण्याच्या भेंडय़ा नाहीतर भुता-खेतांच्या गप्पांना ऊत येई.. मग आई वर्ग गरमगरम आले-गवतीचहाची पाने घालून केलेला चहा आणून देत आणि पावसात मस्त भिजून झाल्यावर गॅलरीत बसून गरमागरम भजीवर ताव मारायचा.

त्यावेळचे शहरांमधील अंगण ते अंगणच होते, हवेहवेसे वाटणारे (सर्व ऋतूंमध्ये). तिथली मजा, गंमत न्यारी होती! कारण अंगणात दोन-तीन मोठी झाडे असायचीच. एखादे नारळाचे, एखादे पारिजातकाचे, पेरूचे नाही तर तत्सम झाडे असायची. बाकी प्रत्येकाने आपल्या दारासमोरच्या अंगणात (तळ मजल्यावर राहणारे) गोकर्ण, गुलबक्षी, गुलाब, तुळस अशी छोटी- मध्यम झाडे-वेली लावलेल्या असत. पहाटे पहाटे प्राजक्ताचा सडा! झाडांवर किलबिलणाऱ्या चिमण्या, बुलबुल असे पक्षी.. मनच प्रसन्न होऊन जायचे. अंगणात सडा घालून रांगोळ्या रेखाटल्या जायच्या, दिवाळीत तर मोठ्ठाल्या रांगोळ्या काढल्या जायच्या.. त्यातच, किल्ले बांधले जायचे. किल्ले अन् आकाशकंदील करायची लगबग बघण्यासारखी असायची, हे सारे अंगणातच! किल्ले तयार झाले की हौदाच्या नळावरच हातपाय धुवून मग साऱ्यांचा एकत्र फराळ- तोही अंगणातच.. गणपतीमध्ये विविध कलांचे कार्यक्रम, रोज रात्री आरती आणि दहा-अकरा दिवस प्रसादांची रेलचेल असायची. भरपेट प्रसाद, त्यामुळे रात्री घरी स्वयंपाक नसायचाच! खिरापतींमुळे प्रत्येक गृहिणीला नवीन नवीन खाद्यपदार्थ बनवायची संधी मिळायची. अंगणामध्ये गोल करून मग खिरापत दिली जायची.. अर्थात आरती-अथर्वशीर्ष झाल्यावरच! प्रत्येक सणाचा, प्रत्येक ऋतूंचा आनंद ‘सामूहिक’रीत्या मिळायचा तो फक्त अंगणामध्येच. पण असे अंगण प्रत्येकजण स्वच्छ ठेवायचा! अगदी हौदापासून ते सार्वजनिक शौचालय-बाथरूम सकट! म्हणूनच आजही असे वाटते की आजच्या पिढीला अंगणातली ही गंमत मिळावी.. परिवर्तन घडतेच. कुणी सांगावे, जुनं ते सोनं पुन्हा येईल अन् त्यात अंगणाचासुद्धा समावेश होईल!