22 January 2018

News Flash

सुनील गावस्करांचं गोव्यातलं आलिशान सेकंड होम

गावस्कर आपल्या कुटुंबासहीत काही दिवसांपूर्वी गोव्यात फिरण्यासाठी आले होते.

स्वाती चिकणे | Updated: May 20, 2017 12:46 AM

सेलिब्रिटी, सुप्रसिद्ध खेळाडू, व्यक्ती यांच्याविषयी लोकांना जिव्हाळा, प्रेम असतं. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टींविषयी त्यांच्या चाहत्यांना कुतूहल असतं. अशा ख्यातनाम व्यक्तींची घरं हा सामान्यांसाठी आकर्षणाचा विषय असतो. या प्रसिद्ध व्यक्तींचं सेकंड होम हादेखील सामान्यजनांसाठी कुतूहलाचा विषय असतो.

आज अनेकजण आपलं सेकंड होमही असावं अशी इच्छा बाळगून असतात. गोव्यात भारतीयांच्या एका लाडक्या क्रिकेटपटूने आपलं सेकंड होम साकारलं आहे. तो आहे आपला आवडता लिटल मास्टर, क्रिकेटपटू सुनील गावस्कर. त्याने आपल्या वरळीतील राहत्या घराव्यतिरिक्त गोव्यात एक आलिशान सेकंड होम विकत घेतलं आहे. गोव्यातील आसगाव इथे अतिशय शांत आणि निसर्गरम्य परिसरात हे घर आहे. छोटासा राजवाडाच असावा असं हे घर आहे. इसप्रावा ग्रुपच्या इसप्रावा व्हिला इथे गावस्कर यांनी हे घर घेतलं आहे. गावस्करांचं हे घर पाच हजार चौरस फुटामध्ये साकारलं आहे. यामध्ये स्विमिंग पूल, फ्लॉवर गार्डन अशी विविध वैशिष्टय़ं आहेत. या व्हिलाच्या चोहीकडे हिरवळ असल्याने इथलं वातावरण अतिशय थंड व सुखद आहे. या व्हिलाच्या फर्निचरपासून फ्लोरिंगपर्यंत सर्व काही विशिष्ट धाटणीचं आहे.

सध्या  घरांच्या बांधणीत थीम होम हा ट्रेंड नवा आहे. अशाच प्रकारे सुनील गावस्करचं हे घर इंडो-युरोपियन कलाकृतीने सज्ज असलेलं बीच होमप्रमाणे आहे. इथलं फर्निचर हे राजवाडय़ातील फर्निचरप्रमाणे करण्यात आलं आहे. घराच्या सजावटीसाठी निवडण्यात आलेल्या टाइल्स या विशिष्ट थीमप्रमाणे सजविण्यात आल्या आहेत.

घराच्या सभोवताली विशिष्ट वनस्पती, फुलांची व ६ प्रकारच्या फळांची झाडं लावण्यात आली आहेत. फुला-फळांची ही बाग एका व्हिलातील स्विमिंग पूलच्या बरोबर मागच्या बाजूस आहे. त्यामुळे बागेतल्या या हिरवळीचे प्रतिबिंब स्विमिंग पूलमध्ये दिसेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या व्हिलात नोकरांना राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. गोव्यातील आसगाव हे ठिकाण प्रदूषणविरहित व जास्त वर्दळीचं नसल्याने अशाच शांत आणि निसर्गरम्य ठिकाणाची निवड केल्याचं सुनील गावस्कर यांनी सांगितलं.

गावस्कर आपल्या कुटुंबासहीत काही दिवसांपूर्वी गोव्यात फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी इसप्रावाकडूनच काही दिवसांसाठी राहण्यासाठी एक व्हिला घेतली होती. इथलं वातावरण व सुसज्ज अशा साधनसुविधा आवडल्याने सुनील गावस्कर यांनी हे घर विकत घेण्याचा निर्णय घेतला.

गावस्कर यांच्या या व्हिलाची नेमकी किंमत सध्या तरी विकासकाकडून सांगण्यात आलेली नाही, मात्र हे घर ६ ते ८ कोटीच्या दरम्यान असल्याचं त्यांच्याकडून नमूद करण्यात आलं. तर याव्यतिरिक्त इन्फोसिस, स्पाइसजेट या मोठय़ा कंपन्याही आपल्याशी जोडल्या असल्याचं इसप्रावाचे सीईओ निभ्रांत शहा यांनी संगितलं. तेव्हा गावस्कर व त्यांच्या कुटुंबीयांसाठी हे सुंदर गोवन घर त्यांचं एक ड्रिम होम ठरलं आहे.

गोव्यातील आसगाव हे ठिकाण प्रदूषणरहित आहे. ते जास्त वर्दळीचंही ठिकाण नाही. अशाच शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी सेकंड होम घेण्याची माझी इच्छा पूर्ण झाली.

– सुनील गावस्कर

स्वाती चिकणे

First Published on May 20, 2017 12:46 am

Web Title: sunil gavaskar luxurious villa in goa
  1. No Comments.