स्वयंपाकघरात लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत कोणाला काय आवडेल त्या पदार्थाची रेलचेल असते. रुचकर पदार्थाचे सुवास या खोलीत दरवळत असतात. गरम चपातीचा वास, आंबेमोहोर तांदळाच्या खिचडीचा घमघमाट, अनेक पक्वानांचा चमचमीत सुवास, दणदणीत फोडणीचा दरवळ पसरला की घरातील माणसांची आपोआपच भूक चावळते. मांसाहाराचा दरवळ तर शेजारीपाजारीही पोहोचतो.

माणसाच्या आनंदाचा मार्ग पोटातून जातो, त्याप्रमाणेच घराच्या आनंदाचा मार्ग स्वयंपाकघरातून जातो असं म्हणायला हरकत नाही. स्वयंपाकघ हे घराचं हृदय. घरातली स्त्री आणि स्वयंपाकघराचं एक प्रेमळ नातं निर्माण झालेलं असतं. ती घरात जितका वेळ असते त्यातील अर्धाअधिक वेळ तरी स्वयंपाकघरातच जातो. केवळ स्त्रीच नाही तर घरातील प्रत्येक व्यक्ती रोज या स्वयंपाक मंदिरात हजेरी लावतेच. याच स्वयंपाकघरात अग्नीदेवतेचा वास असतो. जीवन म्हणजेच पिण्याचे पाणी असणाऱ्या पाण्याचा माठ म्हणा की फिल्टर हा अग्रस्थानी असतो. इथलं बेसिन म्हणजे नळातून येणाऱ्या पाण्याचा चैतन्याचा झरा. छोटे मोठे सगळेच ज्याची उघडझाप करतात अशी एक दार असलेली थंडगार तिजोरी म्हणजे फ्रिज हा सगळ्यांचाच लाडका असतो. पदार्थाला एकसंध धरून ठेवणारे वाटण म्हणा की एखादी चटपटीत चटणी करण्यासाठी लागणारा मिक्सर दिवसातून एकदा तरी भिरभिरतोच. काही स्वयंपाकघरांमध्ये ओव्हन नावाची छोटीशी गुहा असते- ती घंटो का काम मिनटो में करायला बरेचदा गृहिणीला फायदेशीर ठरते. सोबत भट्टीचंही काम होतं. सुबकशा मांडणीवर किंवा ट्रॉलीत धान्य, कडधान्याच्या बरण्या बगीच्यातील एकाच आकारातल्या फुलझाडांप्रमाणे निटनेटक्या ठेवलेल्या दिसतात. मांडणी किंवा ट्रॉलीतील नित्यनियमाने लागणारी भांडी शाळकरी मुलांप्रमाणे शिस्तीत बसलेली असतात आणि कधी कधी दंगेखोर मुलांप्रमाणे इकडून तिकडे दंगाही करत असतात. अजून एक गमतीशीर गोष्ट या स्वयंपाकघरात असते, तो म्हणजे खाऊचा डबा. या डब्यामुळे घरातील बाळगोपाळ इथे नित्य वावरत असतात. बहुतांशी घरात डायनिंग टेबल हे स्वयंपाकघरातच असतं. टेबल नसलं तरी बरीचशी कुटुंबं याच खोलीत जेवणासाठी पंगत घालून बसतात. अशा वेळी येथे गृहलक्ष्मी प्रसन्न झालेली दिसते. कारण तिचं स्वयंपाकघरातील मूळ उद्दिष्ट पार पाडलेलं असतं.

काही स्वयंपाकघरांत काही संस्कार, रूढी पाळल्या जातात. पटल्या न पटल्या तरी वरिष्ठांच्या इच्छेसाठी मानल्यास त्यांना आनंद देऊन जातात. कलाकौशल्य जपण्याचं स्वयंपाकघर हे स्त्रीचं हक्काचं स्थान. अगदी मग त्याच्या सजावटीपासून ते वेगवेगळ्या चविष्ट पदार्थाच्या पाककृती बनवण्यासाठी, स्वयंपाकघराच्या स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या टिप्सनेही स्त्री आपलं कौशल्य पणाला लावत असते. स्वयंपाकघरामध्ये झुरळ, मुंग्या, पाली यांना अटकाव करण्यासाठी स्वच्छतेबरोबरच विविध उपाययोजना राबविल्या जातात. म्हणजे स्वयंपाकघराला लसीकरण केलं जातं आणि या मंडळींचा हल्ला झालाच तर कीटकनाशकांचा मारा करून वेळीच शत्रूला गार करावं लागतं.

लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत कोणाला काय आवडेल त्या पदार्थाची रेलचेल इथे असते. रुचकर पदार्थाचे सुवास या खोलीत दरवळत असतात. गरम चपातीचा वास, आंबेमोहोर तांदळाच्या खिचडीचा घमघमाट, अनेक पक्वानांचा चमचमीत सुवास, दणदणीत फोडणीचा दरवळ पसरला की घरातील माणसांची आपोआपच भूक चावळते. मांसाहाराचा दरवळ तर शेजारीपाजारीही पोहोचतो. इथे भांडीही एकमेकांशी गप्पा मारू लागतात. पातेलं-पळी, तवा-कालथा, कढई-झारा, वाटी-चमचा यांचे परस्परांशी संवाद चालू होतात. कुकरची शिट्टी स्वयंपाक सुरू असल्याची सूचना देते.

दिवाळी, होळीसारखे सण आले की स्वयंपाकखोली कशी पदर खोचून सज्ज झालेली दिसते. रोजच्या सामानाबरोबर सणांच्या पदार्थाचे सामान विशेष पाहुणे म्हणून स्वयंपाकखोलीत विराजमान होते. ठेवणीतली भांडी बाहेर येऊन शायनिंग मारू लागतात. स्त्रियांसाठी आणि स्वयंपाकघरासाठी एक्ट्रा डय़ूटी चालू होते, पण ती आनंदाने केली जाते. काही ठिकाणी ही भूमिका पुरुषही बजावत असतात, कोणी कर्तव्य म्हणून तर कोणी आवड म्हणून. मास्टरशेफची मूळ शिकवण याच विद्यालयातून प्रथम घेतलेली असते ना!

कधी कधी आपण कंटाळा आला म्हणून किंवा कुणाकडे काही कार्यक्रमानिमित्त जेवायला जातो तेव्हा हे स्वयंपाकघर एकटं पडतं. थोडं हिरमुसल्यासारखं वाटतं. पण थोडा आराम मिळाल्याने दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघराची मालकीण आणि स्वयंपाकघर नवीन जोमाने आपल्या कामात दंग होतात. अन्नपूर्णादेवी प्रसन्नपणे दोघांवर मायेचा पाझर घालत असते.

प्राजक्ता म्हात्रे prajaktaparag.mhatre@gmail.com