नेरळला घर बांधले आणि मग कल्याणच्या नर्सरीत जाऊन अनेक फुलाफळांची झाडे आणली. पण मुख्य आंब्याची कलमे नंतर आणायची ठरविले होते. मग एका सुट्टीच्या दिवशी आम्ही परत तिथे गेलो. तीन वष्रे वाढविलेली दोन हापूस आंब्याची कलमे आम्ही घेतली. कलमे मोठय़ा अ‍ॅल्युमिनियमच्या लांबट चौकोनी डब्यात होती. माझ्या पतींनी ती बरीच जड असलेली कलमे एक-एक करून, उचलून नर्सरीच्या बाहेर आणली आणि मग आम्ही बराच वेळ वाट पाहिल्यावर आम्हाला स्टेशनपर्यंत जायला एक रिक्षा मिळाली. स्टेशनच्या जवळ रिक्षा थांबल्यावर ती रोपे उचलायला कोणी हमाल मिळेना. मग पतीने मला तिथे थांबायला सांगून एक कलम स्वत: उचलून प्लॅटफॉर्मवर नेले. तेथे एका चांगल्या सद्गृहस्थांना त्याच्याकडे लक्ष ठेवायला सांगून, त्यांनी परत दुसरे कलम उचलले व आम्ही स्टेशनवर आलो. तितक्यात गाडी प्लॅटफॉर्मवर आली आणि दुपारी दारात अति गर्दी नसल्यामुळे त्यांना ती पटकन गाडीत चढविता आली. हे सगळे सोपस्कार होईपर्यंत बरेच लोक त्यांच्याकडे कौतुकाने बघत होते आणि मला, काय सगळे बघतात म्हणून उगाचच कसे तरी वाटत होते. नेरळला कलमे उतरविल्यानंतर परत रिक्षात बसेपर्यंत तेच सोपस्कार झाले आणि कलमांनी आमच्या घरी वाजतगाजत नाही, तरी असे आगमन केले. मग यांनी ते अ‍ॅल्युमिनियमचे डबे चारी बाजूंनी फोडून त्यातील कलमे आमच्या घराच्या समोर गेटच्या दोन बाजूंना लावली, आणि मग चला, आंब्याची झाडे लावली म्हणून आम्हाला एक प्रकारचा वेगळाच आनंद झाला.

आंब्यांच्या दोन कलमांपकी एक कलम ते डब्यातून काढताना त्याला काही इजा झाली किंवा काय, परंतु ते टिकले नाही. परंतु दुसरे कलम छान जोम धरायला लागले. मग आम्ही परत दोन आंब्याची कलमे आणली. पण ती जरा लहान असताना आणली. त्यातील एक न टिकलेल्या आंब्याच्या जागी व एक घराच्या बाजूला मागे लावले. त्यातील एक पायरीचे व एक वेगळ्या प्रकारचे निघाले. घराच्या अगदी मागे एक आंब्याचे झाड आपोआप आलेले आहे. ते झाडही मोठे झालेले आहे. त्याची पाने खूप मोठी आहेत, त्यामुळे ते झाड तोतापुरी किंवा नीलम आंब्याचे असावे, असा मी समज करून घेतला आहे. ते झाड माझे एकटीचे आहे, असे मी नेहमी चेष्टेत सांगत असते.

cat
दुबईमध्ये पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या मांजरीची जीव वाचवण्यासाठी धडपड! कारच्या दरवाजाला लटकणाऱ्या मांजरीचा थरारक Video Viral
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना

या आंब्यांसाठी व इतर झाडांसाठी दोनदा चांगली माती घेतली. गोठय़ात जाऊन गाईचे शेण मागवले, चांगली खते आणली. कधी कधी कीटकनाशके फवारली. दर दोन, तीन दिवसांनी माझे पती सकाळी डोंबिवलीहून लवकरची गाडी पकडून नेरळला जाऊन झाडांना पाणी घालून मुंबईला ऑफिसला वेळेवर जायचे. तसेच प्रत्येक सुट्टीत झाडांना पाणी घालायला जायचे. दोन वर्षांनी आम्ही ठिबक सिंचनाचा पाइप लावून घेतला, त्यामुळे झाडांना नियमित पाणी मिळायला लागले. अजूनही वेळ मिळेल तेव्हा किंवा दर सुट्टीला नेरळला जाऊन माझे पती झाडांना पुरेसे पाणी घालतात.

मग काय, आंब्यांची झाडे डौलाने वाढायला लागली. ती वाढताना बघून एक प्रकारचा सुखद अनुभव यायचा. सहाव्या वर्षी आम्ही आणलेल्या आंब्याला मोहोर यायला लागला आणि ते बघून मीच मोहरून गेले. खूप आनंद झाला. झाडाचा प्रथम येणारा मोहोर शिवरात्रीला शंकर देवाला वाहतात म्हणून तो वाहण्यात आला. सर्व लावलेल्या झाडांना अगदी छोटय़ा छोटय़ा कैऱ्या आल्या. त्यातील एखाददुसरीची चव मी उत्साहात सहज बघितली. कैऱ्या छोटय़ा असल्यामुळे त्या सर्व गळून गेल्या, पण प्रथम आणलेल्या हापूसच्या कलमाला अगदी झाडाच्या मध्ये एकच आंबा टिकून राहिला. हा पिकलेला आंबा अतिशय मधुर लागला.

आणि पहिला असल्यामुळे तर त्याचे अप्रूपही जास्त होते. मग पुढील दोन वर्षी, दोन झाडांना अनुक्रमे प्रत्येकी १५-२०, ४०-५० मोठय़ा कैऱ्या आल्या. मी आणि माझ्या मुलीला झाडांच्या पानांत लपलेल्या कैऱ्या शोधायचा जणू काही छंदच लागला. मग मला किंवा तिला आणखी कैऱ्या दिसल्या की आम्ही ते एकमेकींना आनंदात सांगून, शोधायला सांगायचो. कैऱ्या शोधून मिळण्यात पण मजा असायची. आम्ही नेरळला नसताना एकदा त्यातील काही कैऱ्या व एकदा जवळजवळ २ डझन आंबे कोणी तरी चोरून नेले. आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी ते पिकण्यासाठी गवतात ठेवायला काढणार होतो. मला खूप वाईट वाटले.

आणि मग नंतरच्या वर्षी पहिल्या लावलेल्या दारातल्या हापूसच्या आंब्याने तर आमचीच मजा करायची ठरविले. दोन, तीन वेळाही कैऱ्या मोजून, त्या मोजता येईनात. ही मोजली की ती मोजली असा गोंधळ व्हायला लागला. परत लपलेल्या कैऱ्यापण मधूनमधून दिसायच्या. मग आम्ही कैऱ्या मोजायचा नादच सोडून दिला. झाडाच्या कैऱ्या खूप खाली गेटच्या बाहेरपण आल्या होत्या व त्या येणाऱ्या-जाणाऱ्याला खुणावत होत्या म्हणून मग मागील अनुभवामुळे आम्ही त्या आधीच काढल्या आणि शेजारी, नातेवाइकांना वाटल्या. कधी त्याचे लोणचे, कधी पन्हे केले. त्या झाडाचे जवळजवळ २००-२२५ आंबे आम्हाला मिळाले. गोड व नवीन आंबे म्हणून त्यातलेही बरेचसे आंबे शेजारी व नातेवाइकांना वाटले. सर्वानी आंबे खूप छान होते म्हणून त्याची पावती दिली. पायरीच्या व दुसऱ्या झाडाचेही काही गोड आंबे मिळाले. हापूसचा आंबे असतानाचा लेकुरवाळा आंबा खूपच छान दिसतो आणि आंबे काढल्यावर तो सुनासुना वाटतो.

माझ्या पतींनी केलेल्या कष्टाचे फळ आम्हाला मिळाले आहे. आमच्या गेटजवळील डौलदार, लाडक्या आंब्याने व इतर आंब्यांनी ते सुमधुर फळांच्या रूपानेच आम्हाला दिले आहे. आंबा परत मोहरू लागला आहे. आंब्याच्या झाडांना अशीच वर्षांनुवष्रे फळे येवोत व ती पुढील पिढय़ांनाही खायला मिळोत, उन्हाळ्यात झाडांची गार सावली व वारा मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

n madhurisathe1@yahoo.com