प्राची पाठक

टेबल मॅनर्सबद्दल, लोकांच्या पेहरवाबद्दल, कचरा फेकण्याबद्दल बऱ्यापैकी चर्चा होत असतात. लोक एकमेकांना काही टिप्स देत असतात. कोणत्या हाताने आणि कसे शेकहँड करावे याचे प्रशिक्षणसुद्धा दिले जाते. घरातले कपडे, बाहेरचे कपडे, बाहेरच्या कपडय़ांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे कपडे याबद्दल पुष्कळ बोलले जाते. आपला गेटअप हा महत्त्वाचा असतो, असे सातत्याने िबबवले जाते. कचरा कुठे आणि कसा फेकावा याबद्दलसुद्धा अंमलबजावणी कमी-जास्त असली, तरी निदान जनजागृती झालेली दिसते. पण टॉयलेट्स कसे वापरावेत, वापरून झाल्यावर काय करावे, याबद्दल आपण फारसे बोलत नाही. आपापल्या स्वच्छतेच्या संकल्पनेनुसार आणि समोरच्या उपलब्ध सोयीनुसार लोक टॉयलेट्स वापरत असतात. एकवेळ हॉटेलात चमच्याने काय खावे आणि काटा-चमच्याने काय खावे, हे टेबल मॅनर्स शेअर करायला लोक उत्सुक असतात; पण वेगवेगळ्या प्रकारचे टॉयलेट्स कसे वापरावेत, हे बोलायचीसुद्धा सोय नसते. त्यात बरेचसे अज्ञानदेखील असते.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
save hasdeo forest
हसदेव धुमसतंय, सरकार लक्ष देणार का?
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान

‘आपले आणि त्यांचे’ म्हणजेच भारतीय भांडे आणि पाश्चात्त्य कमोड यावर पुरेशी माहिती न घेता चर्चा झोडणारेदेखील खूपच असतात. सवय मोडायची तयारी नसते. मुळात आपल्या काही सवयी वाईट आहेत, याची जाणीवच नसते. पाणी वाया जाईल का, प्रेशर येईल का, ही नैसर्गिक पद्धत आहे का, असे अनेक मूलभूत प्रश्न लोकांना पडलेले असतात. त्यात परदेशात, भारतातल्या चांगल्या हॉटेलांत, चकाचक मॉल्समध्ये चांगले टॉयलेट्स असतात आणि ते मेंटेनदेखील नीट होतात. तर मग इतरत्र असे काय बिघडलेले असते की अगदी घाण वासाचे, अंधारलेले, कळकट, पचपचीत संडास सर्वत्र दिसतात, असा प्रश्न पडतो. दुष्काळी भागांत खासकरून स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी स्वच्छता कशी राखत असतील? त्यांना पुरेसे पाणी आणि पुरेसा आडोसा संडासाच्या सोयीने उपलब्ध असतो का? स्त्रियांसाठी घरातच संडास नसलेली हजारो लाखो घरं या देशात आहेत. स्त्रियांसाठीच्या सार्वजनिक शौचालय सुविधांविषयी आता कुठे चर्चा होताना दिसतात. शहरातल्या हायवेवर अत्यंत गर्दीच्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकलेला पुरुषसुद्धा आजकाल तितक्या सहज गाडी बाजूला घेऊन मूत्रविसर्जन करून येऊ शकत नाही. स्त्रिया आणि पुरुषांसाठीच सार्वजनिक शौचालयांची स्थिती वाईट असताना तृतीयपंथी लोकांची काय सोय उपलब्ध असते, असा प्रश्नसुद्धा आपल्याला कधी पडतो का? सार्वजनिक ठिकाणी मल-मूत्रविसर्जनाच्या काय सुविधा त्यांना उपलब्ध आहेत? अचानक उद्भवलेल्या आपत्तीतसुद्धा आपत्ती व्यवस्थापनात स्त्रियांसाठीच्या मलमूत्रविसर्जन सोयी उपलब्ध करून दिल्या जातात का? कशा असतात त्या? कशा राखल्या जातात? भूकंप, पूर, दुष्काळ, अपघात वगैरे, वगैरे आपत्तीत स्त्रिया कसे निभावून नेतात? खूपच प्रश्न आहेत. खरे तर, चांगल्या टॉयलेट्सची उपलब्धता नसणे, ही रोजचीच आपत्ती खासकरून स्त्रियांसाठी असते. अधिकाधिक माहिती करून घेऊन आवाज उठवणे, एकत्र येऊन मागणी करणे हेच सध्या तरी उत्तम उपाय आहेत. प्रवासाला गेल्यावर सोबतच्या पुरुष मंडळींना स्त्रियांच्या नैसर्गिक विधींसाठी थांबायची सवय लावणेसुद्धा खूपच महत्त्वाचे आहे. मुळात अशा सुविधा स्त्रियांसाठी कुठे असतील, इथपासून शोधायची वेळ येते, हेही जाणवून दिलेच पाहिजे. अनोळखी लोकांना कसे विचारावे टॉयलेट कुठेय, या मनातल्या संकोचाला दूर केले पाहिजे. प्रवासात असा की घरी, जितके पुरेसे पाणी आपल्या शरीरासाठी आवश्यक असते, तितके प्यायलेच पाहिजे. तुमच्यासाठी किमान पुरेसा आडोसा मूत्रविसर्जनासाठी उपलब्ध करून देणे ही समाजाची जबाबदारी आहे, याची जाणीव इतरांना करून देणे फारच आवश्यक आहे.

त्याच वेळी, आपल्या घरातल्या संडासांचासुद्धा आढावा घेतला पाहिजे. केवळ एखादे केमिकल टाकून दिवसातून, आठवडय़ातून अमुक वेळा संडासाची केवळ फरशी स्वच्छ केली म्हणजे झाले, असे नसते. मुळात इतकी केमिकल्स तिथे ओतायची गरज आहे का, इथपासूनच सुरुवात केली पाहिजे. आपल्या घरातल्या संडासात पुरेसा उजेड आहे का? हालचाल करायला पुरेशी जागा तिथे आहे का? तिथले नळ, पाइप्स गळके आहेत का? जमिनीवरच्या, भिंतीवरच्या टाइल्स अर्धवट बसवून सोडून दिल्या आहेत का? रंगरंगोटी नीट झाली आहे का? तिथे असलेल्या खिडकीची काय स्थिती आहे? काचा तुटलेल्या, तिरपे तारपे आडोसे, पुठ्ठे, प्लॅस्टिक चिटकवलेले अशी परिस्थिती आहे का? अशा अनेक बारीकसारीक गोष्टी तपासून बघूयात. त्यात जमेल त्या सुधारणा करूयात. आपापल्या घरात, ऑफिसांत केवळ भसाभस स्प्रे, केमिकल्स मारून टॉयलेट्स साफ केले जातात की याही बारकाव्यांना बघितले जाते? पान, गुटखा, तंबाखू खाऊन साधं बेसिन वापरणारे घरातले, ऑफिसातले स्त्री- पुरुषसुद्धा ते अतिशय घाण करत असतात. स्त्रियांचे केस बेसिनवर चिकटलेले असणे, हे तर सर्वत्र दिसत असते आणि ते अत्यंत किळसवाणे वाटू शकते. घरातले, बाहेरचे संडास जास्तीतजास्त कोरडे कसे राहतील, याचा विचार करतो का आपण? ज्येष्ठ नागरिक संडास- बाथरूममध्ये पाय घसरून पडणे, ही घरोघरची कथा असते. बाथरूम आहे, ओली होणारच, हे जरी खरे असले, तरी काही सवयी आपल्या आणि इतरांच्या बदलल्या तर बऱ्यापैकी कोरडय़ा राखलेल्या संडास- बाथरूममुळे किती छान सोय होते, ते लक्षात येईल. त्यात कळत- नकळत हात-पाय धुवायला वरचेवर वापरले जाणारे पाणीसुद्धा अत्यंत कमी लागत असते, हेही आपल्या लक्षात येईल. सार्वजनिक ठिकाणच्या शौचालयांबद्दल सातत्याने बोलणे गरजेचे असतानाच आपल्या घरातल्या संडासाच्या वापराला, आपल्या टॉयलेट मॅनर्सनासुद्धा आरपार स्कॅन केले पाहिजे.

करूयात हीच सुरुवात..

prachi333@hotmail.com