‘‘त्या बोक्याला उठव आधी तिथून.’’ दारात पायपुसण्यावर आरामात पहुडलेल्या बोक्याला उठवण्याबद्दल मी झाडू-पोछा करणाऱ्या सुशीलाला सूचना केली. अनेक वर्ष अमेरिकेत  राहिलेल्या माझ्या मुलाला हे संबोधन रुचलं नाही.

‘‘बोका काय म्हणतेस? नाव नाही का त्याला?’’

तो पाळलेला नव्हताच, त्यामुळे त्याला नावही नव्हतं. नागपूरच्या माझ्या माहेरच्या बैठय़ा घरात तो व्हिजिटर होता. भूक लागली की यायचं, म्यांव म्यांव करून दूध मागायचं, चाटून पुसून वाडगा साफ करायचा आणि पायपुसण्यावर ताणून द्यायचं. माझ्या मार्जारप्रेमी वहिनीने पायपुसणं जरा बाजूला करून त्याच्यावर त्याच्यासाठी एक मऊ जुनी साडी अंथरली होती.

‘‘याचं नाव आपण गंगाधर ठेवू.’’ मुलगा म्हणाला.

‘‘आणि तिचं गंगूबाई’’ सुशीला उत्स्फूर्तपणे म्हणाली.

‘ती’ म्हणजे गंगाधरची कधीमधी दर्शन देणारी मैत्रीण. त्याच्यासारखी भीड चेपलेली नाही, त्यामुळे आवारात गाडीखाली किंवा कुंडीच्या मागे लपून बसणारी प्राण्यांमध्ये जोडीदारणीविषयी गोरी – सुंदर अशा भलत्या अपेक्षा नसल्यामुळे सोनेरी राजबिंडय़ा गंगाधरची ही मळकट रंगाची सुमार रूपाची जोडीदारीण. जरा कॅमेराशाय, पण गंगाधर फोटोसाठी छान पोझ देत असताना ही मात्र दडून बसते.

गंगाधरला दूध दिलं असताना गंगू जर जवळपास असली तर तो अर्धे पिऊन 0…बाजूला  होतो आणि ती दबकत येऊन बाकीचं फस्त करते. कधी-कधी दोघं जाडीने एकाच वाडग्यातून दूध पितात. ज्या दिवशी दुधात अंडं घातलेलं असतं (हे माझ्या वहिनीकडून होणारे गंगाधरचे अतिरेकी लाड असं तिची सासू म्हणते) त्या दिवशी मात्र गंगाधरला वाडगा सोडवत नाही. कुठून तरी क्षीण म्यांव ऐकू आलं की तो अनिच्छेनंच बाजूला होतो. सतत माणसांच्या संगतीत राहून त्याला वाटत असावं, बाईच्या जातीला कशाला अंडय़ा बिंडय़ाचे नखरे.’

घरदारच मांजरप्रेमी असल्यामुळे  गंगाधरचे सगळे नखरे चालतात. जरा कुठे एक म्यांव त्याच्या तोंडून आलं की भाऊ लगेच ‘‘त्याला दे गं काही तरी.’’ म्हणून वहिनीला सूचना करतो. पण बरेचदा  तो बाहेरून खाऊन आलेला असला की सरळ  जाऊन त्याच्या  अंथरूणावर  झोपतो. मग दिलेलं दूध प्यायला नाही की ‘माजलाय’ अशी कोणीतरी कमेंट करतं. पण तो नक्की मनात म्हणत असणार, ‘मी कुठे मागितलं होतं? आता म्यांव शिवाय दुसरी भाषाच मला येत नाही त्याला माझा नाईलाज आहे.’

आल्याची वर्दी देणं मी माझं कर्तव्य समजतो. त्यातून कुठला अर्थ काढायचा  हे एव्हाना  तुम्हाला कळायला हवं.

माझ्या तिथल्या वास्तव्यातच गंगूला पिल्लं होण्याची चिन्हं दिसू लागली. ‘‘पिल्लांना जपलं पाहिजे हं गंगाधरपासून.’’ मी म्हणाले.

‘‘नाही, नाही ताई, गंगाधर काही करणार नाही. त्याला कळतं त्याची पिल्लं आहेत ती. त्याच्यात थोडासा माणसाचा अंश आहे. मागच्या वेळीही तो पिल्लांजवळ नुसता बसून असायचा. तरी कशी मेली कोण जाणे?’’ वहिनीच्या या स्पष्टीकरणावर माझ्याकडे ‘नो कमेण्ट्स’ शिवाय कुठलीच प्रतिक्रिया नव्हती.

नंदिनी बसोले nandiniab48@gmail.com