पावसाळा संपून दिवाळीदेखील होऊन गेलेली असायची, कोरडय़ा दिवसांची सुरुवात नुकतीच झालेली असायची. आणि एकाद्या दुपारच्या निवांत वेळी त्या शांततेत तय्र्याव तय्र्याव असा आवाज घुमू लागायचा. पाठोपाठ  ‘गादी, उशा, तक्क्ये भरून देणार,’ अशी मारलेली खणखणीत पुरुषी आवाजातील आरोळी वस्तीभर ऐकू जायची.

जुन्या गाद्या, उशा, तक्क्ये वगैरे घेऊन त्यात नवा कापूस भरून परत त्या वस्तू नव्या सारख्या करून देण्याची किमया पिंजारी करून दाखवतो. आज मात्र जे आयुध कापूस पिंजण्यासाठी पूर्वी पिंजारी वापरात होते त्या जागी पिंजारी आता मशीन वापरू लागले आहेत. पण काही वर्षांपूर्वी मात्र कापूस पिंजण्यासाठी अवजड मोठी धनुकली म्हणता येईल असे लाकडाचे पार्टस् जोडून तयार केलेले आयुध वापरात होते. पिंजारी बरेचसे मुसलमान धर्मीय असायचे. उंचीपुरी देहयष्टी, सुरमा घातलेले डोळे, तरतरीत नाक आणि भरघोस दाढी आणि वर पांढरी  मुसलमानी टोपी, अंगात खमीस आणि त्यावर जाकीट, खाली तोकडा लेहंगा किंवा रंगीबेरंगी लुंगी आणि पायात कठोर चामडय़ाचे जोडे. असा पिंजारी खांद्यावरचे त्याचे कापूस पिंजण्याचे अवजड आयुध घेऊन त्या आयुधाला असणाऱ्या वादीवर बोटाने आघात करत, तय्र्याव तय्र्याव आवाज करून वस्तीत आल्याची वर्दी फिरवायचा आणि ज्यांच्या घरातल्या जुन्या गाद्या, उशा, तक्क्ये यांच्यात नवीन कापूस भरून त्या परत नवीन करून घ्यायच्या आहेत असे रहिवासी त्याला घरी बोलावीत. कापूस पिंजल्यानंतर त्यातून बराचसा कापूस वजा होत असे. आणि ज्या वजनाची गादी, उशी किंवा टक्क्या हवा असेल तेवढय़ा नव्या कापसाची भर घालून घ्यावी लागे. त्यासाठी गिरण्याच्या बाहेर असलेल्या दुकानातून किंवा गादी कारखान्यामध्ये दोन-तीन प्रतीचा सुटा कापूस विकत घ्यावा लागे. त्याच वेळी गाद्या, उशा आणि तक्क्ये यांची खोल म्हणजेच कापडदेखील बदलावे लागते. या कापडातदेखील दोन-तीन प्रतीचे आणि अर्थात त्यानुसार दरांचे कापड विकत घ्यावे लागे आणि बहुधा ते दोन-तीन रंगातील उभ्या पट्टय़ा पट्टय़ा असणारे असायचे. कारण पहिले कापड वापरून जीर्ण झालेले असतेच, शिवाय त्याचे टाके उसविताना कापड फाटून पुनर्वापरासाठी निरुपयोगी ठरते. कापूस पिंजून, तो नवीन कापडांच्या (गादीपाट) खोळीत भरण्यासाठी, गादीला किती टाके घालावे लागणार आहेत त्यावर या कामाची मजुरी ठरते. इतर खरेदी-विक्री व्यवहारात ज्याप्रमाणे घासाघीस करण्याची आपली संस्कृती आहे त्याप्रमाणे याबाबतीतही त्या मजुरीच्या दरावरून भरपूर घासाघीस करणे ओघाने आलेच. एकदा त्याचे पक्के झाले की, पिंजारी सर्व गाद्या, उशा, तक्क्ये ज्या ज्या वस्तू नव्याने बनवायच्या आहेत त्या घेऊन वस्तीमध्ये पूर्वी हमखास असणाऱ्या मोकळ्या जागी किंवा चाळीत जिथे मोकळी पण कोरडी जागा असेल तेथे आपला फिरता गादी कारखाना उभा करून घेत असे.

Change in traffic route due to Rath Yatra after ram navami in nashik
नाशिक : रथयात्रेमुळे वाहतूक मार्गात बदल
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
gold, gold all time high, gold investment, commodity market, money mantra, bazar article, gold all time high reasons, gold and global economy, gold in india, global economy,
क… कमोडिटीजचा : सोन्याचा ‘गाझा’वाजा
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?

हाताने कापूस पिंजण्याचे ते लाकडी बोजड साधन, ज्याने ते बनविले त्याच्या तंत्रज्ञानातील कल्पकतेला मात्र दाद द्यावी असे आहे. साधारण पाच-सहा फूट लांब आणि साधारण चार-पाच इंच व्यासाच्या चांगल्या मजबूत बांबूला एका टोकाला त्रिकोणी आकाराचा चपटा लाकडी भाग आणि दुसऱ्या टोकाला तंतू वाद्याला असते तशी तार किंवा वादी पिळून घट्ट करण्यासाठी लाकडी खुंटी. एका बाजूला असलेल्या लाकडी त्रिकोणपासून एक तार किंवा वादी दुसऱ्या टोकाच्या खुंटीला पुरेशी ताणून आवळून अगदी घट्ट बसवलेली असते. त्यावर केलेल्या अगदी लहानशा आघातांनी देखील ती तार किंवा वादी चांगली कंप पावते.

हे साधन एका एखाद्या उंच भिंतीला किंवा अन्य कुठल्या तरी आधारांनी आडव्या स्थितीत टांगून लोंबकळत ठेवायचे. त्याच्या खाली जुन्या गादी, उशा फाडून काढलेला जुना कापसाचा ढीग एखाद्या चटई किंवा सतरंजीवर ठेवायचा. आणि त्या साधनाला असलेल्या ताणलेली तार किंवा वादी त्यात सारून त्या तारेवर एका बाजूला हातातील लाकडी डम्बेल्ससारख्या असणाऱ्या धोटय़ाने आघात करायचा की तार जोरात कंपायमान होऊन, झ्याक झ्याक झिन असा आवाज करत घट्ट झालेला कापूस मोकळा करू लागते. असे वारंवार केल्याने तो गठ्ठे झालेल्या कापसाचा ढीग काही वेळांत पूर्णपणे मोकळा होतो, त्या कापसाचे तंतू एकमेकांपासून वेगळे होऊन मऊ  मऊ  कापूस तयार होतो. असे होताना त्या कापसाचे सूक्ष्म तंतू आजूबाजूच्या वातावरणात स्वैर संचार करू लागतात आणि काही त्या पिंजऱ्याच्या शरीराचादेखील ताबा घेतात. अशा पिंजून मोकळा झालेल्या कापसातील कापसाचाच कचरादेखील सहज बाजूला काढता येतो. पण एवढय़ाने भागत नाही.

कापूस अजून पिंजून घेणे आवश्यक असते. मग त्यासाठी लहान बांबूची धनुकली वापरून तो अधिक बारीक पिंजून काढावा लागतो. ज्याला या गाद्या, उशा बनवून घ्यायच्या असतात त्याला त्याच्या पसंतीचे गादीचे कापड आणि अधिक लागणारा कापूस आणून दिला की त्यापासून नवीन गाद्या, उशा बनविणे हे काम पिंजारी करून देतो. ज्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी असे असे गिऱ्हाईक उशीत भरण्यासाठी शेवरीचा कापूस वापरे. कारण हा कापूस महाग आणि अगदी मऊ  मऊ  असतो. नवीन खरेदी करावा लागणारा कापूस खरेदीसाठी मिलमध्ये काम करणाऱ्या एखाद्या नातेवाईकाचा किंवा मित्राचा सल्ला हमखास घेतला जायचा. कारण प्रत्येक कुटुंबात एक तरी अशी कापड गिरणीत काम करणारी व्यक्ती हमखास मिळायचीच.

कापड गिरणीत काम करतो, तो गिरणीत कुठल्याही हुद्दय़ावर काम करणारा असेना का, तो कापूसतज्ज्ञ किंवा कापूस खरेदीसाठी दर्दी असणारच, असे गृहीत धरण्यात येत असे. तोदेखील एक कर्तव्याचा भाग म्हणून आणि आपल्याला कापसातील सर्व बरे-वाईट कळते अशा थाटात अशा कापूस खरेदीसाठी सल्ला देण्यासाठी आवर्जून वेळ काढून यायचा. जिथे प्रामुख्याने श्रीमंत लोकांची वस्ती असेल अशा ठिकाणी किंवा सावकारी पेढय़ा वा जुन्या दुकानातून गिऱ्हाईकांचे खाली गादी, तक्क्ये अंतरून खरेदी-विक्री व्यवहार केले जायचे अशा ठिकाणी तक्क्ये भरून घेतले जात, कारण अशा ठिकाणीच तक्क्यांचा वापर होत असे. त्यामुळे मध्यमवर्गीय किंवा कामगार वस्तीत जास्त करून फक्त गाद्या, उशाच भरून घेतल्या जात असत. लोड, तक्क्ये वापरणारे नव्हते असे नाही, पण त्यांची संख्या त्या मानाने कमीच.

प्रथम ज्या आकाराच्या गाद्या, उशा बनवायच्या आहेत त्या अकराच्या गादीपाटाचा खोळी पिंजारी हाताशिलाईने बनवून घेतो आणि त्यात जेवढय़ा वजनाच्या गाद्या किंवा उशा गिऱ्हाईकाला हव्या असतील त्या प्रमाणात जुना पिंजलेला कापूस आणि नवीन कापूस मिसळून ती कापूस भरलेली खोळ हातशिलाईने बंद करून टाकतो. अशी कापूस भरलेली गादी जमिनीवर पसरून एका सणसणीत सोटय़ाचे फटके मारून, कापूस सर्वत्र सारख्याच प्रमाणात भरला गेल्याची खात्री झाली की गादीला ठरावीक अंतरावर दाभणाने टाके घातले जातात. त्या टाक्यामुळे गादीत भरलेला कापूस सर्व जागी एकसारखाच पसरलेल्या अवस्थेत राहण्यासाठी चांगली मदत होते. त्यामुळे जितके टाके अधिक आणि सुबक पद्धतीने घातले जातील तितकी गादी अधिक समपातळीत- त्यामुळे आरामदायी  रहाते आणि टिकाऊपणाला

चांगली. या नवीन तयार झालेल्या गाद्या अगदी मऊ  मऊ असल्यामुळे त्यावर प्रथम कोणी झोपायचे

यावरून घरातील लहान मुलांची भांडणे होत असत, कारण हे मऊ  मऊ  गाद्यांवर झोपण्याचे सुख फार दिवस टिकणार नाही हेदेखील अनुभवावरून माहीत झालेले असायचेच.

विकत घेतलेल्या वस्तूचा वापर पुरेपूर करणे हा एकेकाळचा परिपाठ असल्यामुळे जुन्या गाद्या, उशांतील कापूस वापरून परत नवीन बनविलेल्या गाद्या, उशा, तक्क्ये तयार झाल्यानंतर जुन्या खोळी परत घरातील पायपुसणी, भाजी आणण्यासाठी पिशव्या वगैरे बनविण्यासाठी उपयोगात येत असत. तो उपयोग लक्षात घेऊन, जुन्या गाद्या, उशा यांच्या खोळी उसवून काढताना विशेष काळजी घेण्यासाठी घरातील गृहिणी पिंजाऱ्याला बजावत असे. इतके करून कापसाचा कचरा उरत असे, गाद्या भरून घेणारे सायकल वापरणारे असेल तर सायकलच्या सीटवर बसविण्यासाठी एखादी सीटच्या आकाराची लहानशी उशीदेखील बनवून घ्यायला गिऱ्हाईक विसरत नसे.

त्या काळीदेखील गादी कारखाने असायचे, पण आपल्यासमोर आपल्या पसंतीने आणि तेही काटकसर करून, गाद्या भरून घेणे याला लोक अधिक पसंती देत. आता मात्र चांगला भाव दिला की चांगल्या प्रतीच्या तयार गाद्या, उशा वगैरे मिळणे जागोजागी शक्य झाले आहे. इतकेच काय स्पंज किंवा कोयरच्या गाद्या आता मिळू लागल्या आहेत. आणि त्याच घेण्याकडे गिऱ्हाईकाचा कल वाढत आहे. पूर्वी सर्व वस्त्यांतून फिरणारे जुन्या वस्तूंना नवे रूपडे बहाल करणारे वेगवेगळे कारागीर किंवा वस्तू- शल्यविशारद हळूहळू अस्तंगत होत आहेत. त्यात आता या दारोदार फिरून जुन्या गाद्या, उशा, तक्क्ये यांना नवीन करून देणारे पिंजारी हे कारागीरदेखील दिसेनासे होऊ  लागले आहेत. काळाचा महिमा.

 

कापूस अजून पिंजून घेणे आवश्यक असते. मग त्यासाठी लहान बांबूची धनुकली वापरून तो अधिक बारीक पिंजून काढावा लागतो. ज्याला या गाद्या, उशा बनवून घ्यायच्या असतात त्याला त्याच्या पसंतीचे गादीचे कापड आणि अधिक लागणारा कापूस आणून दिला की त्यापासून नवीन गाद्या, उशा बनविणे हे काम पिंजारी करून देतो. ज्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी असे असे गिऱ्हाईक उशीत भरण्यासाठी शेवरीचा कापूस वापरे.

मोहन गद्रे gadrekaka@gmail.com