स्मिता कौस्तुभ खांडेकर

आम्ही नवरा-बायको मुंबईत शिकलो, वाढलो, नोकरी केली आणि घसघशीत वन.बी.एच.केमध्ये बरेचसे आयुष्य गेले. चाळिशी येता येता जेव्हा स्वत:च्या व्यवसायासाठी नवऱ्याच्या मूळ गावी-कोल्हापुरात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला तेव्हा धाकधूक होतीच, पण नवीन शहरात राहायचे सुप्त आकर्षणही होते. मुंबईत गच्चीतली बाग असणे आणि सकाळी साडेआठ वाजता गोरेगावला बोरिवलीहून आलेल्या लोकलमध्ये चढणे हे सारखेच- म्हणजे केवळ अशक्य! कोल्हापुरात यायला मात्र मला एक मोठे आकर्षण होते ते म्हणजे इथे आमच्या घराला असलेली मोठ्ठी गच्ची! इथे आल्यावर जशी जमेल तशी गच्चीतली बाग करायची हा निश्चय केला आणि आम्ही दोघांनी पूर्णही केला.

कुठली रोपं आणायची, कुठून आणायची, कुठल्या कुंडय़ा कोणत्या रोपाला योग्य ठरतील यावर चर्चा झाली (महाराष्ट्राचा आद्य गुण- चर्चा करणे)! चच्रेअंती हे ठरले की माळीदादांची मदत घेऊन पुढे जायचं.

सुदैवाने आम्हाला अतिशय सज्जन आणि हुशार माळी दादा लाभले (हे लाभायला पूर्वजन्मीचे पुण्य लागते). आणि मग आम्ही रोपं घ्यायच्या मोहिमेवर गेलो. दोन-तीन प्रकारचे गुलाब, तीन-चार प्रकारची जास्वंद, मनी प्लांट, शोभेच्या झाडाचे ३/४ प्रकार, पांढरी आणि लाल सदाफुली, मोगरा, रातराणी, जाई-जुई यांचे वेल आणले. कृष्ण आणि राम तुळस यांना पर्यायच नव्हता. याशिवाय शेजाऱ्यांनी कापूर तुळशीचे रोप दिले. एका वाढदिवसाला गेले तेव्हा रिटर्न गिफ्ट म्हणून सुंदर केशरी गुलाबाचे कलम मिळाले. माझ्या वसईच्या नणंदेनी कलकत्ता पानाचा वेल दिला. असं करत करत आमची बाग फुलू लागली. अजून एका मत्रिणीने अबोलीचं रोपटं दिलं आणि आमची गच्ची छोटय़ाशा सुंदर रोपटय़ांनी अगदी भरून गेली.

पहिले काही दिवस मजा येत होती, मात्र दीड महिन्यात बागेची जबाबदारी लक्षात येऊ लागली. आठवणीने पाणी घालणे, पिवळी पडलेली, वाळलेली पाने काढणे, माळी दादांबरोबर उभं राहून खत कसं घालावं, पाने कशी खुडावी हे शिकत गेले. हळूहळू पोटच्या दोन मुलांबरोबर अजून तीस-एक झाडमुलं कधी वाढवू लागले ते कळलंच नाही.

जसजशी बाग बहरू लागली तसतसे विविध प्राणी-पक्षी येऊ लागले. बागेच्या एका कोपऱ्यात पाण्याचे मोठे भांडे भरून ठेवायला सुरुवात केली आणि वेगवेगळे पक्षी, खारुताईंची सोय झाली. गुलाबाची रोपटी बहरली तसा माकडांचा त्रास वाढला. माकडांना गुलाबाच्या कळ्या, फुलं आणि कोवळी पाने खायला आवडतात हे लक्षात आले. मात्र ते करताना, माकडेच ती, झाडांची पूर्ण नासधूस करतात. त्यामुळे माकडांचा आवाज आला की पळत जाऊन गुलाबाच्या कुंडय़ा घरात आणायला मी शिकले आणि  मुलालाही शिकवलं. अजूनही हा त्रास महिन्यातून तीन-चार वेळा असतोच. अर्थात, आपण माकडांच्या राहायच्या जागेवर अतिक्रमण केलंय म्हटल्यावर हे होणे साहजिकच होते, आमच्या इमारतीच्या मागे भरपूर मोकळी जागा आणि दाट, उंच चिंचेच्या झाडासारखी बरीच ऑस्ट्रेलियन झाडं आहेत. त्यामुळे छान सावली असतेच, पण झाडांवर बागडणारे खंडय़ा, भारद्वाज, कोकीळ, पोपट, साळुंकी यांसारखे असंख्य पक्षी सतत भेटत राहतात. एका झाडावर ब्राह्मणी घारीचे घरटेही आहे आणि जवळ रंकाळा तलाव असल्याने, घारीने आज काय शिकार केली त्याचं उरलंसुरलं गच्चीत बघायला मिळतं.

संध्याकाळी शांत वातावरणात आणि कोल्हापूरच्या स्वच्छ हवेत गच्चीत फिरत माझ्या झाडमुलांचे लाड करणे हा माझा आवडता उद्योग! ही मुलंही बोलतात, नाराज होतात, खूश होतात; त्यांनाही कौतुक आवडतं आणि फोटो काढल्यावर अजून खुलतात. अशावेळी डोक्यात एकच ओळ फिरत राहते- झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया..

smita2504@rediffmail.com