20 November 2017

News Flash

फर्निचर : बेस युनिट

मागील लेखात आपण टी. व्ही. युनिटच्या वॉल पॅनलिंग संबंधित माहिती घेतली.

अजित सावंत | Updated: May 13, 2017 1:58 AM

बेस युनिट हा टी. व्ही. युनिटचा अविभाज्य घटक आहे.

मागील लेखात आपण टी. व्ही. युनिटच्या वॉल पॅनलिंग संबंधित माहिती घेतली. या लेखात आपण बेस युनिटची माहिती घेऊ या. बेस युनिट हा टी. व्ही. युनिटचा अविभाज्य घटक आहे. टी. व्ही. युनिटमध्ये एक वेळ वॉल पॅनलिंग नसेल तरी चालू शकेल, पण बेस युनिटशिवाय टी. व्ही. युनिट पूर्ण होऊ शकत नाही. भिंतीवर किंवा पॅनलिंगवर टी. व्ही. माऊंट करायचा नसेल तर पेडस्टल स्टँडवर ठेवता येतो. आणि अर्थातच तो पेडस्टल स्टँड  ठेवण्यासाठी बेस युनिट हवेच. अशा वेळेस वॉल पॅनलिंग न करता केवळ बेस युनिटने काम भागू शकेल. टी. व्ही. कोणत्या प्रकारचा आहे, त्यावर बेस युनिटची साईझ ठरते. फ्लॅट स्क्रीनऐवजी जर नॉर्मल टी. व्ही. असेल तर त्या टी. व्ही. च्या डेप्थप्रमाणे बेस युनिटची डेप्थ ठरवावी लागते. नॉर्मल टी. व्ही. साठी साधारणपणे २४ इंचाची डेप्थ गरजेची असते. पण खरं तर आत्ताच्या काळात नॉर्मल टी. व्ही. वापरण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. बहुतांश घरात छोटा का होईना, फ्लॅट स्क्रीन टी. व्ही.च  वापरला जातो. फ्लॅट स्क्रीनसाठी बेस युनिटची डेप्थ १६ ते १८ इंच  इतकी असते. उंची साधारणपणे १५ ते १८  इंच इतकी असते व रुंदी चार फूट इतकी असते. ही रुंदी लिव्हिंग रूमच्या लेआऊटप्रमाणे ठरवली जाते. अर्थात कमी जास्त करता येते. बेस युनिटच्या मधल्या भागात काचेचे शटर असलेले कंपार्टमेंट बनवले जाते. या कंपार्टमेंटमध्ये सेट टॉप बॉक्स  डी. व्ही. डी प्लेयर, होम थियेटर अशी अप्लायन्सेस ठेवली जातात. ही सगळी अप्लायन्सेस रिमोट कंट्रोलने चालत असल्याने काचेचे शटर बनवणे गरजेचे आहे. हे कंपार्टमेंट  साधारणपणे दीड फूट रुंदीचे असते. ही रुंदीदेखील सेट टॉप बॉक्स, डी. व्ही. डी. प्लेयर इ. च्या आकारावर ठरते. या कंपार्टमेंटमध्ये बेस युनिटच्या उंचीनुसार व आपल्या गरजेनुसार ग्लास शेल्व्ज (shelves)  करून घ्याव्यात व या शेल्व्जमुळे तयार होणाऱ्या कप्प्यांमध्ये मध्यभागी इलेक्ट्रिक सॉकेट्स करून घ्यावीत; जेणेकरून सगळ्या अल्पायन्सेसना इलेक्ट्रिक सप्लाय देता येईल. तसेच याच कप्प्यांमध्ये टी. व्ही. पासून येणाऱ्या वायर्स सोडल्या जातात. ज्या या सेट टॉप बॉक्स, डी. व्ही. डी. प्लेयर्सला जोडल्या जातात. बेस युनिटमध्ये सहसा स्पीकर्स ठेवले जात नाहीत. पण जर ठेवायचेच असतील तर ते उघडे ठेवावेत. त्यांस शटर्स करू नयेत. वुफर कधीही बेस युनिटमध्ये ठेवू नये. वुफर नेहमी जमिनीवर ठेवला जातो. होम थिएटरचे वायरिंग करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हितावह ठरते. बेस युनिट हे अनेक प्रकारे डिझाइन करता येते. त्यावर ग्लास टॉप ठेवता येतो. बेस युनिट जमिनीस न टेकवता स्कर्टिग लेव्हलवर लावावे, जेणेकरून बेस युनिटखालून केर काढता येतो. बेस युनिटवर काही छान दिसणाऱ्या अ‍ॅक्सेसरीज ठेवाव्यात. बेस युनिटच्या काचेची शटर्स असलेल्या कंपार्टमेंटच्या बाजूला रिमोट, डी. व्ही. डी. इ. ठेवण्यासाठी ड्रॉवर्स बनवावेत. टी. व्ही. युनिट हे वापरण्यास सोपे व दिसावयास सुंदर असावे. लिव्हिंग रूमचा लेआऊट, इंटिरियर थीम, टी. व्ही. वर इतर अप्लायन्सेसचा अभ्यास व बजेट या सगळ्या गोष्टींचा विचार करून टी. व्ही. युनिटचे वॉल पॅनलिंग व बेस युनिट योग्यरीत्या डिझाइन करता येते, जे सुंदर दिसेल व उपयुक्तही ठरेल.

(इंटिरियर डिझायनर)

अजित सावंत ajitsawantdesigns@gmail.com

First Published on May 13, 2017 1:58 am

Web Title: tv units tv wall units tv cabinets tv cabinet stands furniture