मागील लेखात आपण आपल्या बागेतील फुलपाखरांना उपयोगी अशा तीन प्रकारच्या झाडांची माहिती घेतली. आजच्या लेखातून अजून काही प्रजातींची माहिती घेऊ या, की ज्या फुलपाखरांना उपयोगी पडू शकतात.

जमैकन स्पाईक (Jamican Spike) :

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
diy skin care prevent foot odour this summer expert tips on how to keep your feet fresh all day
उन्हाळ्यात घामामुळे पायांना दुर्गंधी येतेय? मग फॉलो करा डॉक्टरांनी सांगितलेले ‘हे’ सोपे उपाय
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

हे झुडूप फुलपाखरांमुळे अनेकांना माहितीचे झालेले आहे. याची फुले छोटी असतात. पण तुरा लांब असतो. हे झाड कडक सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी लावावे. हे मध्यम ते उंच वाढणारे झुडूप असल्यामुळे याची लागवड मोठय़ा कुंडीत करावी. याची वाढ झाल्यानंतर वेडय़ावाकडय़ा वाढणाऱ्या, तशाच खूप उंच वाढणाऱ्या फांद्यांची आवश्यकतेनुसार छाटणी करावी. याच्या फुलात फुलपाखरांबरोबरच सनबर्डसारखे पक्षीही बघायला मिळू शकतात.

पानफुटी (Bryophyllum) :

पानफुटीचे झाड सर्वाना लहानपणापासूनच माहीत असते. आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी याचे पान वहीत किंवा कागदात ठेवून पानातून येणारे नवीन झाड बघण्याची उत्सुकता अनुभवलेली असते. पानफुटीच्या पानांवर रेड पियारो (Red Pierrot) नावाचे फुलपाखरू अंडी घालते. याच्या अळ्या ही पाने खाऊन वाढतात. पानाखाली कोषही करतात आणि त्यातून रेड पियारो नावाचे छोटेसे सुंदर फुलपाखरू बाहेर येते. या झाडाला थोडीशी सावली चालते. पण याची कुंडी अगदी घरात न ठेवता खिडकीत किंवा गॅलरीत ठेवावी. जेणेकरून रेड पियारोला ते सापडू शकेल.

लिंबू (Lime) :

ज्यांच्याकडे थोडी जास्त जागा उपलब्ध असते ते लिंबाचे झाड आपल्या आवारात किंवा मोठय़ा कुंडीत लावू शकतात/ लावतात. लिंबाचे झाड मुळातच हळू वाढणारे झाड आहे. त्यात ते कोरडय़ा हवेचे पीक असल्यामुळे मुंबईसारख्या दमट हवेत नीट वाढत नाही. त्याचबरोबर लाइम बटरफ्लाय ((Lime Butterfly) नावाचे फुलपाखरू या झाडांवर अंडी घालते. त्याच्या अळ्या याची पाने खाऊन वाढतात. पाने खाल्लेली बघून प्रथमदर्शनी साहजिकच ते झाड लावणाऱ्या व्यक्तीला वाईट वाटते. पण जेव्हा आपल्याला हे कळते की या अळ्या मोठय़ा होऊन त्याचे सुंदर असे लाइम बटरफ्लाय बनणार आहे तेव्हा आपण त्याचे निरीक्षण करू लागतो. तसेच या गोष्टी कळल्यावर आपल्याला लिंबावर अंडी घालण्यासाठी भिरभिरणारे लाइम बटरफ्लाय दिसू शकते. लिंबाचे झाड कडक सूर्यप्रकाशाच्या जागी ठेवावे.

कढीपत्ता (Curry Leaf Plant) :

कढीपत्ता म्हणजे स्वयंपाकघरातील एक आवश्यक घटक. याचा वृक्ष होत असल्यामुळे व्यवस्थित जागेत किंवा मोठय़ा कुंडीत लावावे. याची कुंडी कडक सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी ठेवावी. कुंडीतील झाडाची छाटणी करून त्याची वाढ मर्यादित ठेवता येते. या झाडावर कॉमन मॉरमोन नावाचे फुलपाखरू अंडी घालते. त्यामुळे याची पाने काढताना त्यावर कॉमन मॉरमोन फुलपाखराच्या अळ्या नाहीयेत ना त्याची खात्री करून घ्यावी.

अशा अनेक प्रकारच्या झाडांवर फुलपाखरे आपल्या जीवनक्रमातील विविध अवस्था जगत असतात. फुलपाखरांच्या अळ्या हे काही पक्ष्यांचे अन्न असल्यामुळे जेव्हा झाडावर अळ्या असतात तेव्हा त्यांच्या शोधात काही पक्षीही तुमच्या बागेत येण्याची शक्यता असते. पक्ष्यांनी अळ्या खाल्ल्या म्हणून वाईट वाटून घेऊ  नये, कारण ही निसर्गाची रचना आहे. जेवढे काही निरीक्षण करता येईल तेवढे करावे आणि त्याचा आनंद घ्यावा.

अशी ही फुलपाखरे आपल्या बागेत भिरभिरण्याचा अजून एक फायदा आहे. मागील एका लेखातून आपण कुंडीतील भाजी लागवड याविषयी माहिती घेतली आहे. जर आपण अशा भाज्या लावत असाल तर त्यांच्या परागीभवनाचे काम ही फुलपाखरे करतात. त्यामुळे चांगली फळधारणा होण्यास मदत होते.

याचबरोबर मागील लेखात सांगितल्याप्रमाणे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, आपण झाड लावले म्हणजे फुलपाखरे येतीलच असे ठामपणे सांगता येत नाही. कारण त्यांना ते झाड कळेपर्यंत काही कालावधी जावा लागतो. त्याचबरोबर शहरातील वातावरण याचाही परिणाम लक्षात घ्यायला हवा.

अशा प्रकारे विविध गोष्टींचा अंतर्भाव असलेले हे बागकाम मानसिक समाधानाबरोबरच आपल्या तब्येतीसाठी सुद्धा उपयोगी असते.

jilpa@krishivarada.in