* माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. मी लग्नापूर्वी आईबरोबर राहत होतो. त्या वेळी आई आणि मी असे दोघांनी मिळून पैसे उभे करून १ बीएचके क्षेत्रफळ असलेली सदनिका खरेदी केली. त्यासाठी आईने तिच्या नावावरचे घर विकून पैसे दिले व मी कर्ज काढले व माझ्या नावे सदर सदनिका घेतली. त्यानंतर माझे लग्न झाले. माझ्या आईचे आणि पत्नीचे पटत नाही म्हणून मी भाडय़ाने घर घेऊन वेगळा राहत आहे. त्यामुळे माझी आर्थिक ओढाताण खूप होत आहे. म्हणून मी आईला सांगितले, की आपण वन रूम किचनची सदनिका घेऊ व तिथे तू राहा व ही मोठी सदनिका विकून टाकू. त्यातील फरकाच्या पैशाने माझ्यावरचा आर्थिक बोजा कमी होईल. याला माझ्या दोन बहिणींनी (ज्या माझ्याहून मोठय़ा असून त्यांची लग्नकार्ये पूर्वीच झालेली आहेत) त्याला हरकत घेतली आहे. या पाश्र्वभूमीवर मला मार्गदर्शन करावे.
१) मी १ बीएचके सदनिका विकूशकतो का?
२) माझ्या बहिणी यात अडथळा आणू शकतात का?
३) भविष्यात पुढे बहिणींचा त्रास न होण्यासाठी मी कोणती कागदपत्रे
बनवून ठेवणे इष्ट ठरेल?
 प्रशांत चव्हाण

* आपल्या समस्येवरील उत्तरे ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळी असू शकतात; परंतु आपण दिलेल्या माहितीच्या आधारे त्याची उत्तरे पुढीलप्रमाणे –
क्र. १ – आपण सदर सदनिका विकू शकता, मात्र आईने ती रिकामी करून दिली पाहिजे व आईने विकण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्रदेखील दिले पाहिजे. या गोष्टी केल्यास आपण सदर सदनिका विकू शकता. सदर सदनिका विकल्यावर आपण जर वन रूम किचन क्षेत्रफळाची सदनिका आईच्या नावावर घेतल्यास आपल्याला सदर व्यवहारात भांडवली नफ्यावर प्राप्तिकर भरावा लागण्याची शक्यता आहे. तेव्हा तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे इष्ट ठरेल.
क्र. २ – तुमच्या बहिणींना आईची साथ असेल तर तुमच्या या व्यवहारात अडथळा आणू शकतात. कारण या ठिकाणी आईने घर विकून आलेले पैसेसुद्धा या सदनिका खरेदीच्या वेळी वापरलेले आहेत. ते घर आईचे स्वकष्टार्जित होते किंवा कसे याबाबत स्पष्टता असती तर त्याबाबत अधिक सविस्तरपणे उत्तर देता आले असते.
क्र. ३ – भविष्यात बहिणींचा त्रास न होण्यासाठी (जर आपल्या आईचे घर हे स्वकष्टार्जित असेल तर) पुढील गोष्टी करून घेता येतील. १) आईचे इच्छापत्र करून ते नोंदवून ठेवावे. त्यात घर विकत घेताना असणारी सर्व परिस्थिती आपण स्वकष्टाने कसे घर घेतले व आता मुलाला ते पैसे का दिले आहेत याबाबत सविस्तर वर्णन त्यामध्ये करावे व मुलींना लग्नात त्यांना द्यायचे होते ते दिले आहे असादेखील उल्लेख आणावा. मात्र सदर इच्छापत्र (मृत्युपत्र) हे वैध ठरण्यासाठी योग्य त्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. जागेअभावी या सर्व गोष्टी या ठिकाणी सविस्तर देणे अशक्य आहे.

ghaisas_asso@yahoo.com