* माझी सदनिका मी लिव्हलायसन्सवर भाडय़ाने एकाच भाडेकरूला दिलेली आहे. दर वेळी मी कराराचे नूतनीकरण करीत असतो. अगदी सुरुवातीला मी पोलीस स्टेशनला कराराची प्रत देऊन लेखी कळविले आहे. भाडेकरू तोच असल्याने प्रत्येक वेळी पोलीस स्टेशनला कळविण्याची आवश्यकता नाही असे मला वाटते. तरी याबाबत मार्गदर्शन व्हावे.
– आर. जी. तेलवणे, डोंबिवली.

* आपले म्हणणे जरी खरे असले तरी आपण प्रत्येक वेळी भाडेकराराचे नूतनीकरण करता याचाच अर्थ तो नव्याने करता. तुमच्या म्हणण्याप्रमाणेच जर चालावयाचे ठरले तर मग करार नूतनीकरणाची तरी काय आवश्यकता आहे? पण असे नसते प्रत्येक नूतनीकरणाच्या वेळचा करार हा वेगवेगळा समजला जातो. तेव्हा आपण प्रत्येक नूतनीकरणाचे वेळी संबंधित पोलीस स्टेशनला व गृहनिर्माण संस्थेला कराराची प्रत देऊन तांत्रिक बाबींची पूर्तता करणे इष्ट होय.

* सभासदाव्यतिरिक्तच्या व्यक्तींनी माहितीच्या अधिकारात संस्थेच्या दप्तरातील काही कागदपत्रे वा त्यांच्या प्रतींची मागणी केली तर त्याची पूर्तता करणे आपल्यावर बंधनकारक आहे का?
– आर जी. तेलवणे, डोंबिवली.

* गृहनिर्माण संस्थेला माहितीचा अधिकार लागू नाही. त्यामुळे त्यावर कागदपत्र देण्याचे बंधनकारक अशा अर्थाची उत्तरे अनेक उपनिबंधकांनी दिलेली आहेत. तरीसुद्धा आपण याबाबत आपल्या उपनिबंधकांना पत्र पाठवून त्याबाबत मार्गदर्शन मागावे त्याची पूर्तता करावी. दरम्यानच्या काळात उपनिबंधक कार्यालयाला पाठविलेल्या प्रतीची एक प्रत माहिती मागणाऱ्या व्यक्तीला कव्हरिंग लेटरसह रजिस्टर पोस्टाने पाठवावे व त्यात उपनिबंधकांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करू असे लिहावे. म्हणजे त्याला ३० दिवसांत उत्तर न दिल्याचा दोष आपणावर येणार नाही. हे सुचविण्याचे कारण म्हणजे एकतर गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी हे विनामोबदला काम करीत असतात. त्यांच्या त्रासात आणखी भर नको.

* त्या इसमाने साधा अर्ज केला व तो आपल्या संस्थेचा सदस्यही नाही तर त्याला त्याच्या मागणीप्रमाणे कागदपत्रांच्या प्रती पुरविणे बंधनकारक आहे का?
-आर. जी. तेलवणे, डोंबिवली.

* माहितीच्या अधिकाराखाली एखाद्या बिगर सदस्य इसमाने मागणी न करता साधा अर्ज लिहून काही कागदपत्रांच्या प्रतीची मागणी केली तर त्याची पूर्तता करण्याची जरूर नाही.

* एखादी व्यक्ती आपल्या पत्नी अथवा मुलगा अथवा मुलीला सहयोगी सदस्य म्हणून मुद्रांक शुल्क न भरता व नोंदणी न करता भाग प्रमाणपत्रावर त्यांचे नाव नोंदवू शकते का? २) जर मालक वारला त्याने त्याच्या पत्नीच्या नावाने नामांकन केले आहे तर त्याच्या भागप्रमाणपत्रात पत्नीच्या नंतर मुलगा अथवा मुलीचे नाव सहयोगी सदस्य म्हणून (स्टॅम्पडय़ुटी व रजिस्ट्रेशन न करता) करता येईल का?
-महेश चव्हाण, मुंबई.

* आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर असे की, एखादी व्यक्ती (अर्थात या ठिकाणी असे गृहीत धरले आहे की सदर व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तरी गृहनिर्माण संस्थेची सदस्य आहे.) आपल्या भागप्रमाणपत्रामध्ये सहयोगी सदस्य म्हणून आपल्या पत्नी वा मुलगा वा मुलीचे नाव घालू शकते. त्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची, तसेच डय़ुटी भरण्याची आवश्यकता नाही. उपविधीमध्ये दिलेल्या नमुन्याप्रमाणे अर्ज करून आवश्यक ती फी भरून त्या व्यक्तीला ज्याचे नाव योग्य वाटेल त्याला ती व्यक्ती सहयोगी सदस्य बनवू शकते.

तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, आपण मृत सदस्याच्या पत्नीला नामांकनाच्या जोरावर विना स्टॅम्प डय़ुटी व विनारजिस्ट्रेशन संस्थेचे सदस्य बनवू शकता. व तिचे नाव भाग प्रमाणपत्रावर चढवू शकता; परंतु त्याच वेळी त्याच्या मुलाचे अथवा मुलीचे नाव सहयोगी सदस्य म्हणून चढवू शकत नाही. नामांकनाच्या जोरावर जी व्यक्ती सदस्य होते ती खऱ्या अर्थाने पूर्णपणे सदर सदनिकेची मालक बनत नाही. इतर वारसांनी त्याचे हक्क सोडून दिल्यावर ज्या वेळी ती पूर्णाशाने गृहनिर्माण संस्थेची सदस्य होईल त्या वेळी ती सदस्य या नात्याने त्यांच्यापैकी कोणलाही सहयोगी सदस्य म्हणून बनवून घेऊ शकेल. त्यासाठी उपविधीमधील सांगितलेल्या गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे.

* मी २००१ साली एक गुंठा जागा घर बांधण्यासाठी स्टँप पेपरवर घेतली. सर्व व्यवहार पूर्ण केला. त्या जागेवर मी पाया घातला सन २००४ मध्ये. स्थानिक ग्रामपंचायतीत रीतसर नोंद केली. सन २००५ पासून मी त्या जागेचा कर भरत आहे. आता ज्या व्यक्तीकडून ती जागा घेतली त्या व्यक्तीचा मुलगा आता याला हरकत घेऊ लागला आहे. तुम्ही माझ्या वडिलांना फसवून जागा घेतली आहे. मी जर त्याविरुद्ध न्यायालयात गेलो तर मला न्याय मिळेल का?
-जालिंदर साबळे, अहमदनगर.

* आपल्या प्रश्नातून काही गोष्टी स्पष्ट होत नाही त्या अशा- १) सदर जागेचे खरेदीखत नोंद केलेले होते का? २) सदर जागा गावठणात मोडते का? ३) सदर जागा बिनशेतीकडे वर्ग झाली आहे का? ४) सदर जागा अद्यापही शेतजमीन आहे का? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय आणि प्रत्यक्ष कागदपत्रे पाहिल्याशिवाय आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे शक्य नाही. तरीपण खरेदीखत नोंदणीकृत असेल तर आपणाला न्यायालयात त्या अनुषंगाने दाद मागता येईल.

* ५ डिसेंबरच्या ‘वास्तुरंग’ मध्ये लिहिल्याप्रमाणे आपल्याजवळ जन्मदाखला, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, एलआयसी किंवा विमा योजना कागदपत्र, बँक बचत खाती व लॉकर व या पत्त्यावर येणारी पत्रे एवढी कागदपत्रे पुरावा म्हणून आहेत तर आम्हाला पुनर्विकसित इमारतीत नवीन जागेत हक्क मिळेल का?
-अतिश दाते, मुंबई.

* वर दर्शविलेली सर्व कागदपत्रे आपणाकडे असतील तर प्रथमदर्शनी तरी आपण पुनर्रचित नवीन इमारतीत मिळणाऱ्या जागेसाठी आपण आपला हक्क मिळवू शकाल. आपण आपल्या कागदपत्रांसह आपल्या बिल्डरकडे आपणाला जागा मिळावी, असा दावा करावा
श्रीनिवास घैसास – ghaisas200@gmail.com