‘वास्तुरंग’ मधील (१८ ऑगस्ट) प्राची पाठक यांचा शौचालयावरील लेख वाचला.  सदर लेख मनाला खूप चटका लावून गेला. खूप बारकाईने या विषयावरील परिस्थितीची मांडणी उत्तमरीत्या केली आहे. खरंच हा प्रश्न किती महत्त्वाचा आणि निकडीचा आहे. आपण विकसित होत आहोत ते फक्त कागदोपत्री. साध्या मूलभूत सुविधाही आपले सरकार पुरवू शकत नाही, ही खंत वाटते.

मी दररोज रेल्वेने मुंबईत प्रवास करतो. शौचालय (सुलभ) ही गोष्ट ‘दुलर्भ’ झाली आहेत असे वाटते. एक तर ती आपल्या भारतीयांमध्ये निषिद्ध मानली जात आहे का, ते ठाऊक नाही. कारण ती एकदम कोपऱ्यात बांधून ठेवलेली असतात. एखाद्याच प्लॅटफॉर्मवर शौचालय बांधलेले असते आणि त्याचा वापर मजबुरीने करावा लागतो. तसेच ते चालू आहे की नाही हेही प्रवाशांच्या नशिबावर अवलंबून असते.

सदर लेख वाचून खूप विचार करत होतो आणि यासंदर्भात काही संस्थांच्या डॉक्युमेंटरी व्हिडीओज्ही पहिले, तसेच शौचालय हे कसे ‘सुलभ’ असावे याची कल्पना मांडली.

१. रेल्वे स्टेशनवरील सुलभ शौचालये एका कोपऱ्यात न बांधता मध्यवर्ती ठिकाणी असावीत. जेणेकरून महिलांना व पुरुषांना सुरक्षेच्या दृष्टीने सुलभ राहील. त्याचप्रमाणे विशिष्ट जागी काही दिशादर्शक फलक (शौचालये कुठे कुठे आहेत) असणे गरजेचे आहेत.

२. शौचालये मुबलक जागेत बांधलेली असणे आवश्यक आहे. तसेच आतील वापरायची संख्या जास्त असावी.

३. रस्ते वाहतूक करताना शौचालयाची मोठी गरज भासते तेव्हा शौचालये ही मोक्याच्या ठिकाणी (सिग्नल किंवा इतर सोयीच्या) चांगल्या पद्धतीची बांधलेली असावीत. तसेच शौचालयाचे दिशादर्शक फलक हे एखाद्या परिसराच्या नावाच्या फलकाच्या बाजूला असणे गरजेचे आहे.

४. शौचालयाचे सफाई कर्मचारी त्यांच्या कामाप्रति एकरूप असणे गरजेचे आहेत. तसेच ते प्रशिक्षित असावे. अन्यथा मनाविरुद्ध केलेल्या कुठल्याही कामाचे परिणाम निकृष्ट दर्जाचे असते.

५. एक मोठी गोष्ट म्हणजे, शौचालयाचा वापर करणाऱ्याने तर आपले सामाजिक काम असल्याप्रमाणे स्वछता राखायला हवी. अन्यथा दुसऱ्यांना दूषणे देवून काय फायदा?

एक सुप्त विचार मनात आहे की, एक मॉडेल म्हणून एखादे शौचालय चालवायला घेणे..

– अजय देवरुखकर, डोंबिवली

आठवण जागवणारी वळचण

‘वास्तुरंग’ (११ ऑगस्ट) मधील यशवंत सुरोशे यांच्या ‘घराची वळचण’ वाचताना साठ- पासष्ट वर्षांपूर्वीच्या आमच्या लहानपणातील गावची मातीची घरे आणि सर्रास प्रत्येक घराला असलेली वळचण आठवल्याशिवाय राहिली नाही. वळचणीच्या पायावर मजबूत लाकडी मेढीवर घर उभे असे. अशा वळचणी घरांना पावसाळ्यात धोका पोचू नये म्हणून चारी बाजूने झापाने वगैरे शाकारल्या जात. घरातील लोकांचा बराचसा वेळ वळचणीवर बसून गप्पागोष्टी करीत जात असे. आम्हा लहान मुलांची त्याकाळी ती हक्काची जागा होती. घराच्या वळचणीवरही लिखाण होऊ  शकते आणि तेही इतक्या उत्तमरीत्या हे वाचून लेखकाला धन्यवाद द्यावेसे वाटतात. काळाच्या ओघात आज ग्रामीण भागातही सिमेंटची पक्की घरे उभी राहिली. गावचे शहरीकरण होत गेले, पण एकेकाळी अशा वळचणी असलेल्या घरातून दिवस काढलेल्यांच्या आठवणींना या लेखातून उजाळा मिळाल्याशिवाय राहणार नाही.

मुरलीधर हरिश्चंद्र धंबा, वेसवी (मंडणगड)