News Flash

वॉटरप्रुफ्रिंग : वेळीच घातलेला एक टाका..

इंग्रजीत एक म्हण आहे ‘स्टिच इन टाइम सेव्झ नाइन’. इमारतीच्या बाबतीत ती पुरेपूर लागू पडते.

इंग्रजीत एक म्हण आहे ‘स्टिच इन टाइम सेव्झ नाइन’. इमारतीच्या बाबतीत ती पुरेपूर लागू पडते. लोखंडाच्या सळ्या आणि सिमेंट काँक्रीट ही एक अत्यंत अनुरूप अशी जोडी निसर्गाने मानवाला दिली आहे. किंबहुना त्यामुळेच आपण आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या उत्तुंग इमारती पाहत आहोत. मुळात काँक्रीट हा एक प्रचंड ताकदवान असा पदार्थ आहे, परंतु एका विशिष्ट दबावा खाली त्याची ताकद शून्य ठरते व त्यातून साकारलेली वस्तू कोलमडून पडते. असे होऊ  नये म्हणून त्या दबावाविरुद्ध आधारासाठी तेवढय़ाच ताकदीची सळ्यांची जाळी उभारली जाते, जेणेकरून कॉँक्रीट व सळ्या या एकत्रितरीत्या सर्व प्रकारचा दबाव झेलून इमारतीला जागेवरती भक्कम स्वरूपात उभी धरून ठेवतात. काँक्रीट किंवा सळ्या यातील कुठच्याही पदार्थाची ताकद, कोणत्याही कारणामुळे आवश्यकतेपेक्षा कमी झाली तर परिणामी इमारत अस्थिर होते व तिचा विनाश जवळ येऊन ठेपतो. म्हणूनच इमारतीच्या निगराणीमध्ये इमारतीच्या ढाच्याची काळजी घेणे अत्यंत जरुरीचे ठरते. इमारतीच्या ढाच्यावर ज्याला कोर सेक्शन असे म्हणतात, तिचे आयुष्य अवलंबून असते. काँक्रीट व सळ्या नैसर्गिकरीत्या एकमेकाला घट्ट धरून ठेवतात व त्यापासून आर. सी. सी. हा नवीन पदार्थ बनतो. हा पदार्थ प्रचंड ताकदवान असला तरी त्याला शत्रूही भरपूर आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे पाणी!

सिमेंटवर रासायनिक क्रिया होऊन त्यातून खडी व रेतीसकट एक बंध निर्माण होण्यासाठी नेमक्या प्रमाणात पाण्याची गरज असते. जरुरीपेक्षा पाणी कमी अथवा जास्त झाल्यास काँक्रीटची प्रत खालावते. आजकाल आवश्यक त्या ताकदीचे, एकसंध, एकाच प्रतीचे काँक्रीट पुरविणाऱ्या, निव्वळ काँक्रीट बनविणाऱ्या कंपन्या अस्तित्वात आल्या आहेत. त्यांनी मूळ पदार्थात इतर काही रसायने घालून अप्रतिम दर्जाचे काँक्रीट बाजारात आणले आहे. इंजिनीअरच्या जरुरीप्रमाणे हवे त्या प्रकारचे हवे तेवढे काँक्रीट या कंपन्या देऊ  शकतात. रस्त्यातून जाताना खूप वेळा आपण एक विचित्र ट्रक बघतो, ज्याच्यावर एक मोठ्ठा ड्रम हळू फिरत असतो. हीच ती रेडी मिक्स काँक्रीट वाहवून नेणारी गाडी. अलीकडच्या काळात आर. एम. सी. म्हणजे रेडी मिक्स काँक्रीटचा वापर सर्रास असला तरी आज उभ्या असलेल्या बहुसंख्य इमारती या याच काँक्रीट या प्रकारातून बांधल्या गेल्या आहेत व त्यामुळे त्यांचे प्रश्न हे जास्त तीव्र व निराळ्या प्रकारचे आहेत.

काँक्रीट सतत क्रयशील व उत्तम स्थितीत राहण्यासाठी त्याचा स्र्ँ अथवा सामू हा ११ ते १२ मध्ये असावा लागतो. आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे रासायनिक काराणांमुळे हा जर का ६ ते ७ वर आला तर काँक्रीटचा अक्षरश: भुगा अथवा माती होते व ती भुरुभुरु पडू लागते. अशी पावडर होण्यासाठी इतरही काही कारणे असू शकतात. जसे की सिमेंट व रेतीचे व्यस्त प्रमाण, रेतीमध्ये माती व इतर पदार्थाची भेसळ, काँक्रीट तयार करण्यासाठी वापरलेलं पाणी अशुद्ध किंवा मीठयुक्त वगैरे. पावडर ही पुढची पायरी असून विध्वंसाची सुरुवात ही लहान सूक्ष्म अशा पिनहोल किंवा केशप्रती भेगांनीच होते व त्याला सततची चालना ही दरवर्षी त्या इमारतीच्या भागात पावसाचे पाणी मुरण्यामुळे होते. काँक्रीटचा जिवाभावाचा सखा म्हणजे लोखंडी सळ्यांची जाळी. काँक्रीट व लोखंडी जाळ्या कशा असाव्या, त्यांचा आकार कसा असावा, त्यांची जाडी किती असावी वगैरे गोष्टींची गणितं स्ट्रक्चरल इंजिनीअर मांडतो व तो ढाच्याला मूर्त रूप देतो. आपण सळ्या बारकाईने बघितल्या तर आपल्याला दिसून येईल की त्यांना निरनिराळ्या प्रकारचे पीळ असतात. काही सळ्यांवर रसायनाचे थर असतात, काही चकचकीत असतात तर काहींवर रंग असतो. हे सर्व त्यावर केलेल्या रासायनिक क्रियांमुळे असते व हे करण्यामागचे कारण म्हणजे सळ्यांचा काँक्रीटबरोबर घट्ट बंध असावा व त्यांच्यावर गंजण्याची क्रिया होऊ  नये. पीळ हे ताकद व घट्ट पकड वाढविण्यासाठी असतात. सळ्यांची जाळी ही अत्यंत लवचीक अशी असते व ती इमारतीला क्षमतेच्या अध्यात पूर्ण हालचाल करण्यास आधार देते. आपल्याला जरी इमारत म्हणजे एका जागेवर असलेला ठोकळा वाटला तरी वस्तुस्थिती तशी नसते. इमारतीच्या काही भागांमध्ये हालचाल असते व ती तशीच ठेवावी लागते. आपल्याला फक्त ती जाणवत नाही एवढेच. हालचालीत अडथळा आणल्यास भेगा निर्माण होतात. एखाद्या विमानतळाची इमारत अथवा मॉल किंवा मोठय़ा लांबलचक बिल्डिंगमध्ये आपण काही ठरावीक अंतरावर जमिनीवर लांबचलांब अल्युमिनियम  किंवा ब्रासच्या पट्टय़ा बसवलेल्या पाहतो. ही त्या दोन भागामधील हालचाल सुलभ करण्यासाठी केलेली विशेष योजना असते व वॉटप्रूफिंगच्या दृष्टिकोनातून हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो.

सळ्यांचे लोखंड हे लवचीक प्रकारात मोडणारे असते व त्याच्यावर रासायनिक क्रिया झाल्यास ते गंजते. तसेच काँक्रीट हा एक संपूर्ण असा सॉलिड मास नसून त्याला असंख्य अशी सूक्ष्म छिद्रे असतात. कित्येक वेळा काँक्रीटची प्रत वाढविण्यासाठी खास द्रव्ये घालून मुद्दाम छिद्रे निर्माण केली जातात. या छिद्रांमधून काँक्रीटचा ब्लॉक पाणी शोषून घेतो. या पाण्याचा प्रवास जेव्हा सळ्यापर्यंत होतो तेव्हा रासायनिक क्रिया सुरू होऊन सळ्या गंजण्यास सुरुवात होते. जर बांधकामाच्या वेळेस अशुद्ध अथवा मीठयुक्त पाण्याचा वापर झाला असेल तर ही क्रिया फार वेगाने सुरू होऊन जवळपासच्या भागात त्वरेने पसरते.

या क्रियेमध्ये सळ्या गंजून सिमेंटशी असलेला त्यांचा बंध तुटतो, सळ्यांचे तुकडे पडून त्यांचा आकारमान रोडावतो. ही क्रिया ज्या भागात होते तेथे काँक्रीट सडून पोकळी निर्माण होते ज्याला काबोर्नेशन असे म्हणतात व तो भाग सूज आल्यासारखा फुगतो. तेथे हळूहळू मोठय़ा भेगा दिसू लागतात. या भेगा इमारतीला हानीकारक असतात. दर वर्षी येणाऱ्या पावसात ही क्रिया दुप्पट जोमात फैलावते. विचार करा सळ्यांचे तुकडे पडले आहेत, बाहेरील काँक्रीटवर खोल भेगा पडल्या आहेत, मूळ गाभ्यात काँक्रीट सडत आहे व हा भाग एका कॉलमचा किंवा बिमचा आहे. त्या इमारतीचे काय होईल?

हे सर्व, पाणी आतमध्ये आल्यामुळे झाले. पण ते तेथेच थांबते का? नाही. हे पाणी गाभा क्षेत्रात जाऊन तेथून इतर भागात फिरू लागते. परिणामी तो भागसुद्धा आतून सडू लागतो. काही काळातच संपूर्ण इमारत अस्थिर बनून धोकादायक बनते.

अशा इमारतीचे काम टेकू देऊन जाणकार कॉन्ट्रॅक्टरकडूनच करून घ्यावे लागते. हे काम अत्यंत नाजूक, धोकादायक व महाग अशा प्रकारचे असते. सिमेंटच्या दोन थरांत काही मिनिटांचा अवधी गेला की लगेचच तेथे दोन थरांमध्ये दरार येते व ते एकजीव होऊ  शकत नाही. सेटिंगमधील फरकामुळे हे होते. रिपेरिंगच्या वेळेस या गोष्टीची खास दखल घेणे आवश्यक असते व ताकद व खबरदारी या दृष्टिकोनातून पॉलिमरसारख्या महाग वस्तूंचा वापर करावा लागतो. एवढे करूनही बिल्डिंग पुन्हा तिच्या पुनस्र्थितीत येऊ  शकत नाही.

या परिस्थितीतून वाचायचे असेल तर अशी परिस्थिती येऊ  न देणे हाच त्याच्यावरचा उत्तम उपाय आहे व तो इमारतीच्या वॉटरप्रूफिंगमार्गे जातो. बापृष्ठभाग हा सतत निसर्गाचा मार खात असतो. त्यातून बरीचशी झीज होत असते. ती वेळीच भरून काढून इमारतीचे रक्षण केल्यास तिचे आयुष्य वाढते व खर्चात बचत होते. निव्वळ वेळीच खबरदारी घेऊन योग्यते उपाय योजले तर पुढील मोठय़ा व्यापातून व खर्चातून वाचणे शक्य आहे.

वर नमूद केलेल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अनुभवाने अगोदरच माहीत असतात. पण जेव्हा त्या विशिष्ट कोनातून पुन्हा बघितल्या जातात तेव्हा त्याचे महत्त्व अधोरेखित होते व त्यातूनच दिसून येते की वॉटप्रूफिंग ही किती प्राथमिक आवश्यक गरज आहे.

शैलेश कुडतरकर shaileshkudtarkar81@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 2:06 am

Web Title: water proofing in buildings 3
Next Stories
1 वास्तु-मार्गदर्शन
2 स्वयंपाकघर
3 उद्यानवाट : कुंडीत झाडे लावताना..
Just Now!
X