15 December 2017

News Flash

घर सजवताना : खिडकी

आधुनिक खिडक्यांचा विचार करता सर्वप्रथम नजरेसमोर येते ती स्लायडिंग खिडकी.

गौरी प्रधान | Updated: August 5, 2017 1:10 AM

आधुनिक खिडक्यांचा विचार करता सर्वप्रथम नजरेसमोर येते ती स्लायडिंग खिडकी

मागे एकदा कुठेतरी ‘घरातील माझा आवडता कोपरा’ या विषयावरील लेखमाला वाचनात आली होती. ज्यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्या घरातील आवडत्या जागेबद्दल लिहिले होते. त्यात बऱ्याच लोकांनी घरातील आवडती जागा म्हणून घरातील एखाद्या खिडकीचा उल्लेख केला होता. मला स्वत:ला देखील माझ्या घरातील हॉलची खिडकी फारच प्रिय आहे. खिडकीच्या कट्टय़ावर बसून खाली रस्त्यावरून जाणाऱ्या गाडय़ा पाहणे असो किंवा रस्त्यावर लांब उभे राहून बोलणाऱ्या दोन व्यक्तींमधील संवादाचा अंदाज लावणे असो, वेळ कसा मजेत जातो. घराचा अविभाज्य भाग असणारी, घरात चैतन्य निर्माण करणारी, घराला जग दाखवणारी आणि भल्या मोठय़ा जगाला आपल्या इवल्याशा चौकटीत बांधणारी ही खिडकी पुरातन काळापासून निरनिराळ्या रूपांत आपल्याला सामोरी आलेली आहे. आपण मात्र फार खोल इतिहासात न शिरता थेट आधुनिक काळातच येऊ या.

आधुनिक खिडक्यांचा विचार करता सर्वप्रथम नजरेसमोर येते ती स्लायडिंग खिडकी. एकामागोमाग एक तावदाने असलेली ही खिडकी अत्यंत कमी जागा व्यापते आणि त्यामुळेच लोकप्रियदेखील आहे. अ‍ॅल्युमिनिअम किंवा यूपीवीसीमध्ये या खिडक्या बनवल्या जातात. जास्त जागा व्यापणारी असल्याने लाकडाचा पर्याय यात विचारात घेतला जात नाही. साधारणपणे चार किंवा पाच ट्रॅकमध्ये हिची तावदाने बसतात. ज्यातील एकात आपण डास किंवा कीटकरोधक जाळीही बसवू शकतो.

मात्र गंजरोधक, टिकाऊ , वजनाला हलका, पण मजबूत आणि तरीही परवडणारा म्हणून अ‍ॅल्युमिनिअमला या खिडक्यांमध्ये मानाचे स्थान आहे. अ‍ॅल्युमिनिअम खिडक्यांचा विचार करता तावदानाची जाडी, वापरल्या जाणाऱ्या अ‍ॅल्युमिनिअमची शुद्धता आणि सर्वात शेवटी त्यावरचे कोटिंग किंवा मुलामा यावर त्यांची किंमत ठरते. अर्थात काच, तिची जाडी आणि टिकाऊपणा याही गोष्टी आहेतच.

तावदानासाठी वापरल्या जाणाऱ्या पाइपला सेक्शन असे म्हणतात. यात पाऊण इंचापासून ते सव्वा इंच जाडीपर्यंत सेक्शन उपलब्ध होतात. अ‍ॅल्युमिनिअम खिडकी घेताना त्याचे सेक्शन ब्रँडेड आहेत याची खात्री करून घ्यावेत. कारण चांगल्या दर्जाच्या अ‍ॅल्युमिनिअमवर अनोडायझिंगसारखी प्रक्रिया करता येते. अनोडायझिंग ही एक इलेक्ट्रो केमिकल प्रोसेस आहे. यामध्ये अ‍ॅल्युमिनिअमच्या सेक्शनवर अनोडायझिंगचा एक पातळ थर चढवला जातो. याच्या उपयोगाने खिडकीचे रंगरूप तर पालटतेच, पण त्याचसोबत तिचा टिकाऊपणाही वाढतो. मुंबईसारख्या ठिकाणी जेथे खारी व दमट हवा आहे तिथे अनोडायझिंगमुळे खिडकीचे आयुष्य वाढते. या खिडक्या फक्त ओल्या फडक्याने जरी पुसून काढल्या तरी पुन्हा नव्यासारख्या दिसू लागतात. अनोडायझिंगमध्ये गोल्डन, कॉपर, सिल्वर असे निरनिराळे रंग देखील उपलब्ध होतात. अनोडायझिंगची महत्त्वाची बाब म्हणजे अनोडायझिंग हे त्या अ‍ॅल्युमिनिअम सेक्शनच्या पृष्ठभागाचाच एक भाग बनत असल्याने त्याचे कधीही पापुद्रे किंवा सालटी निघत नाहीत.

अनोडायझिंगव्यतिरिक्त अ‍ॅल्युमिनिअम सेक्शनला पावडर कोटिंग देखील केले जाऊ  शकते. बऱ्याचदा अनोडायझिंगपेक्षा स्वस्त असल्याने या पर्यायाचा विचार केला जातो. यात अ‍ॅल्युमिनिअमवर चक्क रंगाचा एक थरच दिला जातो. याचा फायदा म्हणजे, हे कोणत्याही रंगात उपलब्ध होते, त्यामुळे आपल्याला आवडेल त्या रंगात आपण खिडकी बनवून घेऊ  शकतो. परंतु वरून रंगाचा जाड थर दिलेला असल्याने कालांतराने याचे टवके उडतात आणि खिडकी खराब दिसते.

अ‍ॅल्युमिनिअम खिडक्यांमध्ये ज्याप्रमाणे स्लायडिंग खिडक्या लोकप्रिय आहेत तशाच केसमेन्ट म्हणजेच आत किंवा बाहेर तावदाने उघडणाऱ्या खिडक्याही छान प्रकारे बनतात.

अ‍ॅल्युमिनिअम खिडक्या कितीही परवडणाऱ्या आणि पटकन उपलब्ध होत असल्या तरीही लाकडी तावदानांच्या खिडक्याही आजही लोकप्रिय आहेत. हे थोडे महागडे काम असल्याने त्या मानाने मागणी मोजकीच. विशेषत: बे विंडो प्रकारच्या खिडक्या बनवताना लाकडी तावदानांना मागणी असते. बे विंडो ही थोडी घराच्या बाहेर काढलेली खिडकी असते. यामध्ये बऱ्याचदा तीन किंवा जास्त तावदाने विशिष्ट कोनांमध्ये बसविलेली आढळून येतात. यामध्ये काही फिक्स तर काही उघडझाप करता येण्याजोगी तावदाने बसविली जातात. परंतु लाकडी खिडकी बनवणे जितके महागडे काम तितकीच त्यांची निगा राखणेही जिकिरीचे. लाकूड असल्याने त्यावर ऊन-पावसाचा तर परिणाम होतोच, पण त्याचबरोबर त्याला नियमित पॉलिश करणे अथवा रंग देणे गरजेचे असते. थोडक्यात हे फारच श्रीमंती थाटाचे काम.

खिडक्यांमध्ये यूपीवीसी हा देखील एक पर्याय आपल्याला माहीत असावा म्हणून उद्धृत करत आहे. यूपीवीसी म्हणजे अनप्लॅस्टिसाइज्ड पॉली विनायल क्लोराइड. हा प्रकार अत्यंत महागडा असून अजून तरी भारतात म्हणावा तितका प्रचलित नाही. याच्या खिडक्या देखील निरनिराळ्या रंगात मिळू शकतात, तसेच लाकूड व अ‍ॅल्युमिनिअम दोन्हीला हा पर्याय ठरू शकतो.

खिडक्यांबद्दल बोलताना फ्रेम जितक्या महत्त्वाच्या तितक्याच किंबहुना थोडय़ा अधिक महत्त्वाच्या असतात काचा. खिडकीची काच जितकी नितळ तितके बाहेरील दृश्य सुंदर. खिडकीची काच निवडताना आपल्या घरात किती सूर्यप्रकाश गरजेचा आहे हे लक्षात घेऊनच निवडावी. क्लिअर काच घेतल्यास त्यातून पूर्ण सूर्यप्रकाश अथवा ऊन आत येऊ  शकते. घरात येणाऱ्या उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे थोडे स्वस्तात काम होण्यासाठी काचेवर एखादी गडद रंगाची फिल्म लावून घेणे. या फिल्म काचेवर बाहेरील बाजूने चिकटविल्या जातात. इथे एक आठवण मुद्दाम नमूद करावीशी वाटते. १९९३ साली मुंबईत जेव्हा बॉम्बस्फोट झाले तेव्हा अनेक लोक त्या बॉम्बस्फोटाच्या हादऱ्याने ज्या खिडक्या फुटल्या त्याच्या काचा लागून जखमी झाले होते. परंतु त्या वेळी एका नामांकित कंपनीच्या काचेवर लावण्याच्या सन प्रोटेक्शन फिल्म येत असत. ज्या खिडक्यांना अशा फिल्म लावल्या होत्या त्या खिडक्यांच्या काचांना तडे गेले. मात्र काच जागच्या जागी राहिल्याने काचा लागून कोणी जखमी झाले नाही. तर अशा तऱ्हेने या फिल्मचा दुहेरी उपयोग झाला. कुशल कारागिराकडून काम करवून घेतल्यास काचेवर फिल्म लावलेली आहे की रंगीत काच आहे हे देखील समजत नाही. परंतु कालांतराने बाहेरील वातावरणाचा परिणाम होऊन या फिल्मची सालपटे निघून काच विद्रुप होते.

याला दुसरा पर्याय म्हणजे खिडक्यांना टिंटेड काच वापरणे. ही काच मुळातच रंगीत असते. हिच्या उपयोगाने आपण घरात येणाऱ्या अतिरिक्त उष्णतेवरही नियंत्रण मिळवू शकतो. शिवाय कितीही काळापर्यंत हिचा रंग देखील आहे तसा राहतो.

या इतर गोष्टींबरोबरच खिडकीच्या काचेची जाडी हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वसाधारणपणे खिडकीसाठी ४ मी.मी. ते ६ मी. मी. जाडीची काच वापरली जाते. परंतु आपले घर जर एखाद्या गर्दीच्या किंवा गोंगाटाच्या ठिकाणी असेल तर मात्र आपण ध्वनीरोधक खिडक्यांचा वापर करायला हवा. यामध्ये खिडकीच्या प्रत्येक तावदानाला मधे थोडी हवेची पोकळी ठेवून दोन काचा अशा रीतीने बसविल्या जातात, की बाहेरील आवाज बऱ्याच प्रमाणात नियंत्रित केला जाईल. इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी की, आवाज कधीही पूर्ण प्रतिबंधित करता येत नाही तर या खिडक्यांचा वापर करून त्याच्या तीव्रतेवर नियंत्रण मिळविता येते. याचा चांगला परिणाम साधायचा असेल तर खिडक्यांची कमीत कमी तावदाने आणि प्रत्येक तावदानात दोन किंवा तीन काचांचा वापर करणे.

ज्याप्रमाणे आवाज नियंत्रणात आणण्यासाठी आपण ध्वनीरोधक खिडक्यांचा पर्याय पाहिला; त्याचप्रमाणे जोरदार आघाताने काच फुटू नये किंवा फुटलीच तर तिचे तुकडे इतस्त: विखरून इजा होऊ  नये याकरिता टफन काचेचा पर्याय निवडावा. टफन काच ही एक सुरक्षित काच आहे. यात विशिष्ट प्रकारे काचेचा आघात सहन करण्याची शक्ती वाढविली जाते, ज्यामुळे कोणत्याही सहज आघाताने ही काच फुटत नाही.

तर खिडकी या विषयावर आपण बरीच चर्चा केली, पण खिडकीचाच एक अविभाज्य भाग म्हणजे सुरक्षा ग्रिल. खिडकीतून कोणी घरात घुसू नये यासाठी किंवा उंच मजल्यावरील घरातून कोणी बाहेर पडू नये अशा सर्व कारणांसाठी सुरक्षा ग्रिलही आवश्यक. १०मी. मी. किंवा १२ मी.मी. जाडीचे लोखंडी रॉड वापरून बनवलेली ग्रिलही उत्तम. ग्रिलचे डिझाइन करताना दोन रॉडमधील अंतर हे असे असावे की त्यातून लहान मूलदेखील बाहेर पडू शकणार नाही, पण त्याचसोबत बाहेरील दृश्यदेखील अडणार नाही. शिवाय ग्रिलला एक तरी भाग उघडता येणारा असलाच पाहिजे जेणेकरून घरात आग वगरे लागल्यास घरातून खिडकीवाटे बाहेर पडता येईल. सुरक्षा ग्रिल लावताना आपण जर केसमेन्ट म्हणजेच बाहेरील बाजूस उघडणारी खिडकी घेत असू तर खिडकीची तावदाने पूर्ण उघडतील इतकी ती बाहेर घ्यावी. अशा ग्रीलला बॉक्स टाइप ग्रील म्हटले जाते. यात आपण फुलझाडांच्या कुंडय़ादेखील ठेवू शकतो.

तर मला खात्री आहे की, तुमच्या घरातील खिडकी बनवताना तुम्ही नक्कीच वरील गोष्टींचा विचार करून बनवाल. मग तुमची खिडकीही तुम्हाला खूप काळपर्यंत साथ देईल हे नक्की!

(इंटिरियर डिझायनर)

गौरी प्रधान ginteriors01@gmail.com

First Published on August 5, 2017 1:10 am

Web Title: window design ideas
टॅग Window