22 April 2019

News Flash

अलिशान घरांकडे वाढता कल

गेल्या दशकापासून भारतीय वास्तुरचनेत आमूलाग्र बदल होत आहेत. त्यातील बदलते स्वरूप हे नव्या राहणीमानाची ओळख करून देत आहे.

| January 17, 2015 01:50 am

गेल्या दशकापासून भारतीय वास्तुरचनेत आमूलाग्र बदल होत आहेत. त्यातील बदलते स्वरूप हे नव्या राहणीमानाची ओळख करून देत आहे. बांधकाम क्षेत्रात नव्या बदलाचे वारे हे उच्च प्रतीचे राहणीमान व त्यातही किफायतशीरपणा यांचा मेळ साधण्यावर भर देत आहे. आपली वास्तू ही वैशिष्टय़पूर्ण ठरण्यावर तसंच भविष्यात एक अनोखी वास्तू म्हणून तिची नोंद व्हावी, या विचारानेच वास्तूकडे पाहिलं जात आहे. अगदी कालपरवापर्यंत घरं ही खुराडय़ासारखी आणि गर्दी करून बांधलेली आढळून येत होती. मात्र हे दृश्य बदलत आहे. घरांमधील जिवंतपणा तसंच त्याची पर्यावरणीय अनुकूलता याच्याकडे विशेषत्वाने पाहिलं जात आहे.  
आपलं घर सुंदर दिसावं, त्यातील रचना देखणी असावी, प्रशस्तपणा हवा, समकालीन विचारांशी मिळतीजुळती त्याची रचना ठेवावी, अशा विचारांना त्यातून साकारण्याच्या दृष्टीनेही पाहिलं जात आहे. ही संकल्पना खऱ्या अर्थानं उच्च प्रतीच्या राहणीमानाकडे आपला कल असल्याचे दाखवून देते.
पारंपरिक पद्धतीच्या इमारतींची रचना
उष्णदेशीय हवामानानुसार भारतातील घरांची रचना करण्यात आल्याचं प्रामुख्यानं दिसून येतं. हे बांधकाम करताना सूर्याची ऊर्जा नियंत्रित करण्यावर भर दिला जातो. त्याचबरोबर खिडक्या तसेच बाहेरच्या बाजूनेही अशा पद्धतीचा विचार करून बांधकाम करण्यात आलेलं असतं. हवा खेळती ठेवण्याबाबतदेखील हे तंत्र वापरलं जातं. त्यामुळे उष्णता तसेच ऊर्जा यांचे योग्य संतुलन होण्यास मदत होते. अशा प्रकारची घरं ही नियोजन करून बांधली जातात. यात दिवसाच्या उजेडाचा तसेच नैसर्गिक हवामानाचा व  घरातील त्याच्या खेळतेपणाचा आणि मोकळ्या जागेचा योग्य तो विचार केला जातो.
पर्यावरणीय बाबींचा विशेष विचार
आपलं घर हे आरोग्याच्या दृष्टीनं उत्तम असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते व त्यानुसारच त्याची रचना करण्यावर भर दिला जातो. हे प्रमाण आपल्या प्रकृतीशी समरस असावं, असं प्रत्येक घरमालकाला वाटतं. हा त्यांचा हक्क किंवा अधिकारदेखील आहे. व्यायाम आणि खाण्याच्या बाबी यांच्याशी मिळतीजुळती रचना ही त्याच्या आरोग्याला साथ देते. त्यामुळं घरांची खरेदी करताना नजीकच्या काळात ग्राहक हा त्या नजरेतूनदेखील बघू शकतो. घरात राहणाऱ्या  व्यक्तीचे आरोग्य उत्तम राही ल किंवा घरातील वावतावरण त्याच्या प्रकृतीला योग्य राहील, अशा प्रकारच्या घरांची निर्मिती करण्यावर भर दिला गेला पाहिजे. यात वृद्धत्वाला प्रतिरोध, निरोगीपणाचं समीकरण, घराच्या बांधणीत निलगिरी, बांबू तसेच नैसर्गिक उत्पादनांचा वापर, व्हीओसी रंग, त्याच्या छटा, हवेची गुणवत्ता या बाबी विचारात घेतल्या जातील. एचव्हीएसी प्रणाली, तसेच घरातील हवेची शुद्धता, शुद्ध पाणी या बाबीदेखील पाहिल्या जातील.
नैसर्गिक साहित्यावर भर
अशा प्रकारच्या घरबांधणीसाठी निश्चितपणे नैसर्गिक साधनांवर भर देणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने करण्यात येणारे डिझाइन किंवा रचना, त्याच्यातील गुणधर्म गारवा किंवा उबदारपणा यांचादेखील अभ्यास करून उपयोग करून घेण्याचा कल वाढला पाहिजे. अधिकाधिक मोकळेपणा ठेवण्यावरदेखील लक्ष द्यायला हवं.
स्पाच्या सोयीची न्हाणीघरं
‘स्पा बाथरूम’ ही संकल्पना न्हाणीघरांच्या बाबतीत झपाटय़ानं वाढत आहे. त्यात नावीन्यपूर्ण व आधुनिक सोयीसुविधा तसंच त्यात आरोग्याला उपयोगी पडतील अशी रचना ठेवण्यासाठी आग्रह होताना दिसून येतो. रॉक वॉल किंवा जमिनीवर ग्लास इन्ले तसेच त्याचा उत्तम दिखाऊपणा हे निवासी वास्तुरचनेत हळूहळू अनिवार्य झालं आहे. अशा बाथरूम्स वैविध्यपूर्ण दिसाव्यात, या अनुषंगानं त्याची रचना असावी, यासाठी ग्राहकही आग्रही असतो. मंद प्रकाश, काचांची सजावट, शांतपणा, नेत्रदीपकपणा अशा संकल्पना रुजत आहेत. त्यामुळे त्यानुसार आखणी करणं स्वाभाविकच आहे.
प्रकाशयोजना
जुन्या काळातील खिडक्या किंवा शटर्स प्रकारच्या झडपांची जागा आता नव्या पद्धतीच्या खिडक्या घेत आहेत. त्यातून रात्रीच्या प्रकाशाचा किंवा त्यांच्या छटांचं एक वेगळेपण जाणवेल, याकडे लोकांचा कल आहे. या नव्या संकल्पनेनुसार दोन्ही बाजूंनी अंतर्गत रचना दिवस-रात्रीच्या प्रकाशातील मनमोहक बदल यांना जास्त प्राधान्य दिलं जात आहे.  ढगाळ वातावरणात, ऊबदार हवेत, उन्हाळ्यात, पावसाळ्यातदेखील हा प्रकाशाचा खेळ चांगला आनंददायी ठरेल याकडे काटेकोरपणे लक्ष दिलं जात आहे.
लँडस्केपिंग
सध्याच्या काळात निवासी संकुलांमध्ये लँडस्केप हा अत्यंत महत्त्वाचा घटक दिसून येतो. वेगवेगळी झाडं, झुडपं तसेच वनस्पती यांची योग्य रचना व त्यांची कलात्मकता हे विशेष आनंद देणारे असतात. वेगवेगळ्या रंगछटांची झाडं असतील तर त्यांचं सौंदर्य हे विशेष खुलून दिसतं. त्यातून समृद्धता प्रतिबिंबित होत असते. अधिकाधिक पानांची झाडं किंवा वनस्पती छोटय़ा जागेत किंवा त्याला अनुकूल अशा रचनेनुसार ठेवून हे सौंदर्य साध्य करता येतं. आपल्या घराला अधिक आकर्षक करण्यासाठी तसेच कुटुंबातील वातावरण सौहार्दपूर्ण राहण्यासाठी घरमालक तशी लँडस्केप रचना करवून घेत आहेत.
घरातील शोभिवंतपणा
भिंतीवरील छटा तसेच वेगवेगळ्या माध्यमातून सजवलेले भाग यामुळे घरांचं सौंदर्य खुलून येतं. वेगवेगळ्या दगडांच्या किंवा लाकडांच्या डिझाइन्सपासून तयार केलेल्या आकर्षक गोष्टीदेखील त्यात विशेष भर घालत असतात. घरातील जमीन तसेच भिंती त्यामुळे वेगळा आकर्षकपणा दाखवतात. त्यातील पुरातनपणाला पुनरुज्जीवन दिल्याचा भास देतात. इमारतींचेही सौंदर्य वाढवतात. दरवाजे व खिडक्या यांनादेखील शोभिवंत करतात. त्यामुळे शोभिवंतपणा हा घराच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका वठवणारा भाग ठरतो.
या सर्व बाबींमुळे बांधकाम क्षेत्राला एक नवा आयाम प्राप्त होत आहे.    
सुधीर थोरात
इंटिरीअर डिझायनर

First Published on January 17, 2015 1:50 am

Web Title: a growing trend in luxury real estate