15 December 2017

News Flash

पानांवर विविध रंगछटा असलेली झाडे

शोभेच्या वनस्पतींमध्ये त्यांच्या पानांवरील विविध रंगछटा हे या वनस्पतींचे मुख्य वैशिष्टय़ असते.

जिल्पा निजसुरे | Updated: July 22, 2017 12:25 AM

शोभेच्या वनस्पतींमध्ये त्यांच्या पानांवरील विविध रंगछटा हे या वनस्पतींचे मुख्य वैशिष्टय़ असते. यातील काही प्रकार जसे की क्रोटॉन, कॉर्डीलाइन, एल्युमिनियम प्लॅन्ट इत्यादींविषयी मागील काही लेखांतून आपण माहिती घेतली आहे. अशाच काही विशिष्ट रंगछटा असलेल्या प्रजातींविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया.

अलोकेशिया (Alocasia): साधारणपणे अळूच्या पानाच्या आकाराशी साधम्र्य असलेली पाने असलेली ही एक प्रजाती आहे. याच्यात अनेक प्रकार मिळतात. याच्या पानांवरील विशिष्ट रेषा व रंगछटांमुळे ही झाडे अनेकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. पानांच्या आकारातही वैविध्य आढळते. ही झाडे सावलीत चांगली वाढतात. याच्या कुंडीत भरपूर प्रमाणात सेंद्रिय खत घालावे. तसेच मातीत ओलावा टिकून राहील अशा प्रकारे पाणी घालावे. पण त्याचबरोबर पाण्याचा निचरा नीट होईल याकडेही लक्ष द्यावे. मातीतील कंदापासून याची वाढ होते. त्यामुळे कुंडी भरल्यासारखी झाल्यावर दुसऱ्या कुंडीत पुनर्लागवड करावी. पुनर्लागवड करताना झाडे वेगळी करून वेगवेगळ्या कुंडय़ांमध्ये लावावीत.

अल्पिनिया (Alpinia) : या प्रजातीमध्ये अनेक प्रकार उपलब्ध आहेत. साधारणपणे ३ ते ४ फूट वाढणारी ही झाडे मोठय़ा कुंडीत लावावीत. याची पाने मोठी व लांबट आकाराची असतात. काही प्रकाराची पाने हिरवी असतात, तर काहींवर पिवळ्या किंवा पांढऱ्या रेषा असतात. याला फुलांचे तुरेही येतात. ही झाडे सावलीच्या ठिकाणी वाढतात. भरपूर सेंद्रिय खत व मातीत ओलावा असणे याच्या चांगल्या वाढीसाठी गरजेचे आहे. कुंडीत पाणी साचून राहणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि पाण्याचा निचरा नीट होईल असे बघावे.

सेन्सीविएरिया (Sensivieria) : याची पाने सरळ व लांब असतात. पाने गुच्छामध्ये येतात. यात हिरव्या पानांचे, हिरव्या पानांवर पांढऱ्या रेषा किंवा पिवळ्या रेषा असे अनेक प्रकार उपलब्ध असतात. ही झाडे अनेक प्रकारच्या मातीत तसेच विविध वातावरणात चांगली वाढू शकतात. या झाडांना थोडा सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी ठेवावे. अगदीच सावलीच्या ठिकाणी ठेवू नये. या झाडाला इतर झाडांच्या मानाने पाणी कमी लागते. याच्या कुंडीतील माती थोडी सुकी असणे याच्या चांगल्या वाढीसाठी गरजेचे असते.

 

जिल्पा निजसुरे

jilpa@krishivarada.in

First Published on July 22, 2017 12:25 am

Web Title: alocasia sensivieria alpinia marathi articles