News Flash

अंबरनाथ, बदलापूर..निसर्गसंपन्न वास्तव्याची अनुभूती

मुंबई आणि लगतच्या महानगरांची नव्या लोकसंख्येला सामावून घेण्याची क्षमता संपली असतानाच अंबरनाथ, बदलापूर या चौथ्या मुंबईचा विस्तार वाढतो आहे.

सागर नरेकर

मुंबई आणि लगतच्या महानगरांची नव्या लोकसंख्येला सामावून घेण्याची क्षमता संपली असतानाच अंबरनाथ, बदलापूर या चौथ्या मुंबईचा विस्तार वाढतो आहे. काँक्रीटचे रस्ते, मेट्रो मार्ग, राज्य मार्गाची सज्जता, दोन राष्ट्रीय महामार्गाची पायाभरणी, जलपूर्ती आणि अत्याधुनिक सुविधांमुळे ही शहरे महानगरांकडे लवकरच वाटचाल करतील. पर्यटनाच्या दृष्टीनेही या शहरांमध्ये सुविधा उभारल्या जात असून, त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील नागरिकांनी आता या शहरांकडे मार्गक्रमण सुरू केले आहे.

गेल्या काही वर्षांपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि डोंबिवलीपल्याड थेट अंबरनाथ आणि बदलापूर शहरांना लोक पसंती देत आहेत. एकीकडे टाहुलीची डोंगररांग तर दुसरीकडे उल्हासनदी या नैसर्गिक संपदेत बदलापूर शहर वसले आहे. तर आयुध निर्माण संस्था आणि विस्तीर्ण डोंगररांगेमुळे अंबरनाथ शहराला हिरवेपणा प्राप्त झाला आहे. नैसर्गिक संपदेसोबतच या शहरांचा विकासही गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने झाला आहे. अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांत रस्ते बांधणीला मोठय़ा प्रमाणात वेग आला आहे. दोन्ही शहरांमध्ये सध्याच्या घडीला जवळपास ९० टक्के  रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले गेले आहे. त्यामुळे ज्या वेळी इतर शहरे पावसाळ्यात खड्डय़ांच्या समस्येने ग्रासलेली असतात, त्याच वेळी अंबरनाथ आणि बदलापूर शहरात मात्र खड्डय़ांचे प्रमाण फारसे नाही. स्थानिक नगरपालिका, एमएमआरडीए, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या मदतीने शहरात विविध प्रकल्प होऊ घातले आहेत. दोन्ही शहरांना जोडणारे विविध राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग प्रगतिपथावर आहेत. अंबरनाथजवळून अलिबाग विरार महामार्गाची उभारणी केली जाते आहे. मुंबई, कोकण आणि थेट गुजरातला जोडण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. बदलापूर शहराजवळून जेएनपीटी बडोदा महामार्ग जातो आहे. या मार्गामुळे इतर महामार्गावरचा भार कमी होऊन वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. दोन्ही शहरांमध्ये लवकरच मेट्रोची पायाभरणी होणार आहे. दोन्ही शहरांमध्ये तीन ते चार मेट्रो स्थानके उभारली जाऊ शकतात, त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. मध्य रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे कामही प्रगतिपथावर आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्यामध्ये चिखलोली स्थानकाची निर्मिती होते आहे. त्यामुळे वाहतुकीचे असंख्य पर्याय येथील रहिवाशांना उपलब्ध होणार आहेत.

पायाभूत सुविधांमध्ये पाणी हा मुद्दा गेल्या काही वर्षांत कळीचा बनला आहे. अंबरनाथ शहराचे स्वत:चे चिखलोली धरण आहे. शहरातील एमआयडीसी, उल्हासनदीतून पाणीपुरवठा होतो. बदलापूर शहरालाही उल्हासनदीतूनच पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही वर्षांत दोन्ही शहरांमध्ये मनोरंजनाची नवनवी साधने उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अंबरनाथ शहरात शिवमंदिराचे सुशोभीकरणाचे मोठे काम लवकरच मार्गी लागते आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र येथे विकसित होणार आहे. बदलापूर शहरातही  बाळासाहेब ठाकरे स्मारक हे पर्यटनाचे नवे केंद्र ठरू शकते. दोन्ही शहरांमध्ये मोठय़ा संख्येने उद्याने असून त्यामुळे शहरांना श्वास घेण्याची व्यवस्था झाली आहे.

अंबरनाथ शहर उद्योगी शहर म्हणून परिचित आहे. शहरातील औद्योगिक वसाहत देशातल्या मोठय़ा वसाहतींमध्ये मोडली जाते. त्याचा विस्तारही होतो आहे. त्यामुळे शहरामध्ये मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मितीला वाव आहे. बदलापूर शहरातही औद्योगिक वसाहतीतून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दोन्ही शहरांमध्ये औद्योगिक संकुलांची उपलब्धता आहे.

दोन्ही शहरांमध्ये करोनाच्या काळात मोठय़ा प्रमाणावर आरोग्य व्यवस्था उभारल्या गेल्या. मुंबईच्या जवळ असूनही दोन्ही शहरांनी करोनावर वेळीच नियंत्रण मिळवले. त्यामुळे येत्या काळात याच आरोग्य सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. खासगी क्षेत्रातील नामांकित आरोग्य कंपन्याही लवकरच दोन्ही शहरांमध्ये रुग्णालये सुरू करण्यासाठी हालचाली करत आहेत. त्यामुळे येत्या काळात मुंबई आणि उपनगरात मिळणाऱ्या आरोग्य सुविधा शहरांमध्ये उपलब्ध होणार आहेत.

करोनाच्या काळात टाळेबंदीमुळे नागरिकांची घरातच कोंडी झाली होती. मात्र अंबरनाथ आणि बदलापूर शहराचे भौगोलिक स्थान यामुळे येथील नागरिकांना टाळेबंदीतही मोकळा श्वास घेता आला. दोन्ही शहरांपासून अवघ्या काही मीटर अंतरावर हिरवा निसर्ग उपलब्ध आहे. माळशेज, बारवी, कोंडेश्वर, माथेरान, कर्जत यांसारखी निसर्गरम्य ठिकाणे आणि केंद्र शहरापासून किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे स्थानिक पर्यटनाचा एक सोपा पर्याय या दोन्ही शहरांतील नागरिकांसाठी उपलब्ध आहे. या सुविधांमुळे या परिसरात घरांसाठीची मागणी वाढत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2021 2:37 am

Web Title: ambernath badlapur experience living nature ssh 93
Next Stories
1 अक्रियाशील सभासद : मतदान मुभा
2 बांधकामाचा दर्जा
3 गृहनिर्माण संस्था आणि अकृषिक कर वसुली…
Just Now!
X