मंदिराच्या बाह्य़भिंतीवर वरच्या बाजूस ‘भस्ममोहिनी’ ही मूर्ती ९० अंशाच्या कोनात अशी बसवलीय की तिच्या डोक्यावर पडलेला पाण्याचा थेंब नंतर नाकाच्या शेंडय़ावर मग वक्षस्थळावर आणि शेवटी पायाच्या अंगठय़ावर पडतो.
कर्नाटकातील बेलूर येथील भगवान विष्णूच्या मंदिराला वास्तुकलेतील एक अप्रतिम नमुना म्हणून गौरवण्यात आलंय. ही देखणी कलाकृती पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मात्र वेळ हवा आणि गाईडची सोबतही!
या मंदिराला ‘चेन्नाकेशवा मंदिर’ असं म्हणतात. कन्नड भाषेत चेन्ना म्हणजे अतिसुंदर आणि केशव म्हणजे विष्णू. अशा या अत्यंत सुंदर मंदिरामुळे या ठिकाणाला तीर्थस्थानाचं महत्त्व प्राप्त झालं आहे. बेलूरला ‘दक्षिण भारताची काशी’ म्हणतात ते याच कारणासाठी.
इथल्या अद्भुत कारागिरीची झलक प्रवेशदारातून आत शिरतानाच जाणवते. मंदिराला दोन प्रवेशद्वारं आहेत. त्यातील पूर्वद्वारावर एक सुरेख गोपूर उभारलंय. हे गोपूर १३९७ मध्ये बांधलं. देवळाबाहेर ३८ फूट उंचीचा जो दीपस्तंभ आहे, त्याच्या पायालगतचा एक कोपरा चक्क अधांतरी आहे. खालून पेपर सरकवून त्याची खात्री करून घेता येते.
होयसाला वंशाच्या ‘विष्णुवर्धन’ राजाने १११६ मध्ये हे मंदिर बांधायला सुरुवात केली आणि पुढे १०३ वर्षांनी म्हणजे १२१९ मध्ये राजाच्या तिसऱ्या पिढीतील वीर बल्लाळ (द्वितीय) याने हे काम पूर्णत्वाला नेलं. या वास्तूच्या निर्मितीपाठीही दोन प्रवाद आहेत. एक म्हणजे विष्णुवर्धन राजाने ‘तलक्काड’ येथील घनघोर लढाईत चोला घराण्यावर जो मोठा विजय मिळवला, त्या विजयाच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे भव्य मंदिर उभारलं तर काहींचं म्हणणं विष्णुवर्धनने जैन धर्मातून वैष्णव (हिंदू) धर्मात प्रवेश केला आणि भगवान विष्णूंना हे मंदिर समर्पित केलं. काहीही असो, गेली ९०० वर्षे नियमितपणे सकाळ-संध्याकाळ पूजाअर्चा होणारं हे विष्णूचं एकमेव मंदिर आहे एवढं निश्चित.
मुख्य मंदिर एका उंच चबुतऱ्यावर उभं असून, चहूबाजूंनी मोकळी जागा आहे. या जागेत राम-सीता, लक्ष्मी, भूदेवी (पृथ्वी) या देवदेवतांची छोटी-छोटी मंदिरं आहेत. सर्व मंदिरांचं बांधकाम दगडी असल्यामुळे आत शिरल्या-शिरल्या एकदम थंडावा जाणवतो. पूर्वेला मुख्यद्वार, ईशान्येला तलाव नैर्ऋत्येला बगीचा व आग्नेय दिशेला रसोई अशी रचना त्या काळच्या वास्तुशास्त्राची जाणीव करून देते.
मुख्य मंदिरात प्रवेश करताना आपली नजर समोरच दिसणाऱ्या विष्णूच्या अप्रतिम मूर्तीवर खिळून राहाते. काळ्याभोर दगडातील ६ फूट उंचीच्या चतुर्भुज अशा विष्णुमूर्तीच्या अंगावरील भरजरी साडी आणि डोक्यापासून पायापर्यंतचे सुवर्णालंकार पाहताना क्षणभर मन चक्रावतं. एवढय़ात गाईडचे शब्द कानावर येतात..‘भस्मासुराचा वध करणारा विष्णुचा हा मोहिनी अवतार..’ या मोहिनीची भूल येणाऱ्या-जाणाऱ्या भक्तांवर न पडली तरच नवल!
गाभाऱ्याच्या दरवाजाच्या वरच्या बाजूस हवा आत-बाहेर खेळण्यासाठी जाळीदार नक्षी कोरलेली आहे. (अर्थात दगडात) या जाळीवर जी चित्रं रेखाटली आहेत, त्यातून ११ व्या शतकातली आभूषणं, वेशभूषा, केशभूषा तसेच त्या काळची एकूण संस्कृती यासंबंधीची झलक दिसून येते. मुख्य मंदिरात शिरताना जे दार आहे, त्यावर मध्यभागी गरुड आणि त्याच्या सर्व बाजूंनी विष्णूचे दशावतार कोरले आहेत. नरसिंह हे होयसाला वंशांचं कुलदैवत. त्यामुळे हिरण्यकश्यपूची आतडी बाहेर काढणारा नरसिंह अवतार मंदिरात ठिकठिकाणी दिसतो.
गर्भगृहाबाहेरील सभामंडपाचं छत ११ फूट उंच असून आत एकूण ४८ खांब आहेत. या प्रत्येक खांबावरील नक्षीकाम वेगवेगळं. यापैकी एकावर सर्वच्या सर्व विष्णूच्या छब्या कोरल्या आहेत. या नरसिंह खांबाची रोज पूजा होते. बाकी बहुतेक खांबांवर स्त्रियांच्या सुंदर मूर्त्यां दिसतात. या मूर्तीना विष्णुवर्धन राजाची राणी ‘शान्तालादेवी’ हिचा चेहरा दिला आहे. अशा दहा हजाराच्या वर सुंदऱ्या तिथे आहेत. त्यांच्या वेशभूषा पाहताना त्या काळी स्त्रिया किती प्रगत होत्या ते समजतं. उदा. एक स्त्री शिकार करून परततेय. (तिच्या अंगावर शिकारीची आयुधं आहेत.) बाजूला चालणाऱ्या तिच्या दासीच्या खांद्यावर राणीने केलेली शिकार आहे. कोणी व्हायोलिनसारखं वाद्य वाजवतेय तर कोणी ड्रम बडवतेय. एकीच्या ओठांवर तर बासरीही विराजमान झालेली दिसली. एक सुंदरी साधुसंताच्या वेषात पद्मासनात बसलेली तर दुसरी भविष्य सांगत होती. सगळ्यात कडी म्हणजे एक अप्सरा तर अत्याधुनिक पोशाख करून, केसांचं पॉनिटेल बांधून कुत्र्याला साखळी बांधून फिरायला घेऊन निघालेली..
या शिल्पांच्या नुसत्या केशरचनेमधील वैविध्य म्हणाल तर त्यात साधनाकट, बॉनकट, शोल्डरकटपासून एकूण ६२० प्रकार आहेत. नीट निरखून बघायचं तर ३/४ दिवस तरी मुक्काम करायला हवा. कपडय़ांचं म्हणाल तर तिथे पारंपरिक वस्त्रांसोबत ‘बरमुडा’ आणि ‘बाथसूटही’ हजर होता. आठशे-नऊशे वर्षांपूर्वीची ती फॅशन पाहताना आपला ‘आ’ वासलेलाच राहातो.
मंदिराच्या भिंतींवर व निमुळत्या शिखरावर बाहेरच्या बाजूने पौराणिक कथांमधील अनेक दृश्यांचं इतकं सूक्ष्म चित्रण केलंय की ते पाहतानाही आपला जागोजागी पुतळा होतो. उदाहरण सांगायचं झालं तर दशमुखी रावण कैलास पर्वत डोक्यावर घेऊन उड्डाण करतोय, त्या पर्वतावरील गप्पांत रममाण झालेले शिवपार्वती, आजुबाजूची नाना प्रकारची झाडं, त्यावरची फळं, ती फळं खाणारी माकडं, झाडवेलींवरून सरपटणारे साप-नाग असे १५/२० फुटांवरचे बारकावे खालूनही स्पष्ट दिसतात. अर्जुन पाण्यात बघून, वरच्या फिरत्या माशाचा वेध घेतोय, या शिल्पातील धनुष्याला कान लावला तर पूर्वी म्हणे सा रे ग म प.. हे सूर ऐकू येतं. तदनंतर अल्लाउद्दीन खिलजीने केलेल्या स्वाऱ्यांमुळे हानी पोहचून हे सूर लुप्त झाले. मंदिराच्या बाह्य़भिंतीवर वरच्या बाजूस ‘भस्ममोहिनी’ ही मूर्ती ९० अंशाच्या कोनात अशी बसवलीय की तिच्या डोक्यावर पडलेला पाण्याचा थेंब नंतर नाकाच्या शेंडय़ावर मग वक्षस्थळावर आणि शेवटी पायाच्या अंगठय़ावर पडतो. महात्मा गांधी १९३४ मध्ये बेलूरला या मंदिरामध्ये आले होते, तेव्हा त्यांनी ही गोष्ट तपासून पाहिली असं सांगतात. बाहेरील सर्व शिल्पांत खालची बॉर्डर हत्तींची. या देवळाचं सर्व सामान (म्हणजे मोठमोठे दगड) इथवर हत्तींनी वाहून आणलं, त्यांची कृतज्ञता अशा प्रकारे अजरामर केलीय. असे एकूण ६२० हत्ती. प्रत्येक हत्ती वेगळा. हे वेगळेपण शोधताना आपल्या मेंदूला मुंग्या येतात.
या मंदिरातील शिल्पकला एवढी उच्च की नर्तकींच्या हातातली दगडी बांगडी तसंच बोटातली दगडाची अंगठीही पुढे-मागे होते म्हणे. (म्हणेच कारण हात लावून बघणं तर दूरच, उलटं या सर्व मूर्ती एवढय़ा उंचावर की त्यांच्याकडे बघताना मान मोडून येते.) मात्र भरतनाटय़म करणाऱ्या सुंदरींची त्या त्या दिशेला वळलेली हाता-पायांची बोटं खालूनही स्पष्ट कळतात. वादकांच्या गळ्यातील डमरूची एक बाजूही वाजवून वाजवून आत गेलेली सर्वसामान्य डोळ्यांनाही जाणवते.. खरं तर एवढे सूक्ष्म तपशील रेखाटताना एखाद्या चित्रकारालाही घाम फुटावा! या शिल्पकारांनाही आपल्या कलेचा एवढा सार्थ अभिमान की, मुख्य मंडपातली ‘नरसिंह’ स्तंभावरील एक मध्यवर्ती जागा त्यांनी भावी शिल्पकारांसाठी आव्हान म्हणून मुद्दाम रिकामी ठेवलीय.
एवढय़ा कठीण दगडांमध्ये इतकी नाजूक कलाकुसर कशी बरं केली असेल या प्रश्नाचं उत्तरंही तिथेच मिळालं. बेलूरच्या जवळच असलेल्या ‘टुमकूर’ गावात ‘सोप स्टोन’ नावाचा मऊ दगड मिळतो. त्यावर खोदकाम करणं सोपं (!) जातं. नंतर हवा, पाणी, ऊन लागल्यानंतर हा मऊ दगड हळूहळू वज्रादपी कठोरानी बनतो. दर १० वर्षांनी हे नक्षीकाम विशिष्ट अशा रसायनाने साफ केलं जातं आणि त्यावर मेणाने तुकतुकीत पॉलिश करण्यात येतं. अशा देखभालीमुळे देशातीलच नव्हे तर परदेशातील पर्यटकांचे पायही इथे आवर्जून वळतात.
या देखण्या विष्णुमंदिराचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ज्या कलाकारांनी हे सुंदर मंदिर उभारलं, त्यांनी आपली नावे आतल्या खांबांवर व बाह्य़ भिंतीवर कन्नड भाषेत कोरून ठेवली आहेत. मात्र ती पाहताना आपल्या महाराष्ट्रातील ‘नाही चिरा नाही पणती..’ अशा असंख्य कारागिरांच्या आठवणीने गळ्यात आवंढा दाटतो, एवढं खरं!