22 November 2017

News Flash

दादरायण अर्थात जिनेपुराण

आजच्या टॉवर युगापूर्वीच्या एकमजली ते चारमजली इमारती डोळ्यासमोर आल्या.

अलकनंदा पाध्ये | Updated: September 9, 2017 1:50 AM

गेल्या आठवडय़ात डेंटिस्टकडे गेले होते. अलीकडेच त्यांनी त्यांचे क्लिनिक एका नव्या टॉवरमध्ये पाचव्या मजल्यावर हलवले आहे. तिथून बाहेर पडल्यावर मुद्दामच जरा शरीराला व्यायाम म्हणून लिफ्टऐवजी जिन्याकडे मोर्चा वळवला, पण इतक्यात ‘‘ताई, या दादरात आमचे काम चाललेय, तुम्ही लिफ्टने जावा.’’ असा सल्ला तिथे सुतारकाम करणाऱ्या एका कामगाराने दिल्यावर क्षणभर गोंधळले. कारण जिन्याचा पर्यायी शब्द म्हणजे दादर आता बऱ्यापैकी अडगळीत गेलाय. मी मुकाटय़ाने लिफ्टने तळमजल्यावर आले. एका कोपऱ्यात चुपचापपणे अंग चोरून बसलेल्या दादराकडे म्हणजेच जिन्याकडे पुन्हा माझी नजर गेली आणि घराचा.. किंबहुना प्रत्येक इमारतीचा अविभाज्य भाग असलेल्या, पण आजकाल दुर्लक्षित असलेल्या जिन्यांबद्दलचे विचारच माझ्या डोक्यात घोळू लागले.

आजच्या टॉवर युगापूर्वीच्या एकमजली ते चारमजली इमारती डोळ्यासमोर आल्या. ज्याला लिफ्टची सोय नसायचीच. तिथले सर्व वयोगटांतील रहिवासी वर्षांनुवर्षे (म्हणजे डायरेक्ट वरच्या प्रवासाला जाईपर्यंत) रोज या जिन्याचा वापर करूनच कामधंद्याला किंवा बाजारहाटासाठी जात होते. कित्येक इमारतीत तर पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत असे, त्या वेळी तर अशा कित्येक रहिवाशांना तळमजल्यावरून ४ जिने चढून पाणी भरताना मी पाहिले आहे. त्या वेळी कुणी सांधेदुखी किंवा इतर रोगांनी त्रस्त नव्हते की काय, असा गमतीदार प्रश्न मला अनेकदा पडतो. आजकाल अगदी पहिल्या मजल्यावर जाण्यासाठीसुद्धा फक्त प्रौढांसाठीच नाही तर तरुण मंडळींसाठीसुद्धा लिफ्टचा वापर अनिवार्य झालाय.. माणसाला सोयीसुविधा मिळाल्या की माणूस त्याच्या आहारी जाऊन सवयीचा गुलाम बनतो हेच खरं..

आज दुर्लक्षित झालेल्या जिन्यांशी बऱ्याच जणांच्या एके काळच्या आठवणी नक्कीच निगडित असतील. ज्या वेळी टी.व्ही. वगैरे करमणुकीची साधने नव्हती तेव्हा इमारतीच्या कुठल्याही मोकळ्या जागेत उदा. गॅलरी, चौक, अंगण किंवा जिने यासुद्धा मुलांसाठी खेळायच्या जागा होत्या. जिन्याच्या पायऱ्यांवरसुद्धा खेळण्याचे अनेक प्रकारचे खेळ शोधले जायचे. जिन्याच्या कठडय़ांचा घसरगुंडीसारखा उपयोग व्हायचा आणि पायऱ्यांवर ठिक्कर किंवा आंब्याची कोय वापरून नेम फेकून खास खेळ चालायचे तर कधी जिन्याच्या पायऱ्यांवर बसून जिवाभावाच्या सख्यांचे हितगुजही चालायचे. आणि गिरगावातील अनेक इमारतींच्या जिन्याखालच्या चिंचोळ्या जागेने शिलाईकाम.. घडय़ाळ दुरुस्ती, इस्त्री करणाऱ्यांची वर्षांनुवर्षे पोटापाण्याची सोय केलेली आजही आपल्याला पाहायला मिळते.

लहानपणी गावकडच्या घरातील माडीवर जाण्यासाठी असलेल्या कोपऱ्यातील एका वेळी जेमतेम एक माणूस चढू-उतरू शकेल अशा उंच उंच पायऱ्यांच्या जिन्याची थोडी धास्तीच वाटायची; तीही खासकरून रात्रीच्या वेळी. कारण माडीवरच्या कंदिलाच्या प्रकाशात ये-जा करताना पडणाऱ्या सावल्यांची खूप भीती वाटायची. पण त्या अवाढव्य घरांना जागेची टंचाई नसूनही इतके अरुंद जिने का बांधत असावेत हे न उलगडलेले कोडेच आहे.

जिन्यांचे प्रकार तरी किती.. काही वर्षांपूर्वीपर्यंत जोपर्यंत लाकूड मुबलक प्रमाणात उपलब्ध असायचे तेव्हा बऱ्याच इमारतींचे जिने लाकडी असायचे. आजही आपल्याला कित्येक जुन्या इमारतींत लाकडी कठडा, लाकडी पायऱ्या असलेले जिने पाहायला मिळतात. लाकडाच्या पायऱ्या वापरून पुढे गुळगुळीत होऊन पाय घसरण्याचा धोका म्हणून पायरीच्या कडेला धातूची पट्टी लावलेली असते. पण बऱ्याचदा त्यातच कुणाचा पाय अडकून कुणाची घसरगुंडी व्हायची भीतीही असतेच. तसेच त्या पट्टय़ांवर बसवलेले खिळे बऱ्याचदा उचकटून वर आलेले असतात आणि त्यात अनेक स्त्रियांच्या साडय़ा अडकून घाईने जिना उतरणाऱ्या स्त्रियांची धडपडायची तरी भीती किंवा साडय़ा फाटायची भीती. अर्थात आजकाल बहुतांश स्त्रियांच्या सुटसुटीत पोशाखामुळे या अपघाताचे प्रमाण कमी झाले असावे. आजकालच्या इमारतींना लाकडाऐवजी सिमेंटचे जिने, ज्याच्या पायऱ्या काही वेळा सिमेंटच्या, कधी ग्रॅनाईटच्या किंवा इतर प्रकारच्या लाद्यांच्या असतात. कठडेही आता सिमेंटचेच असतात.

मुंबईतल्या मध्यवर्ती रेल्वे स्टेशनचे तर नावच दादर आहे. कारण म्हणे तिथे पूर्वी म्हणजे मुंबई विस्तारत असताना परळ आणि माहीमला जोडणारा जिना किंवा पायऱ्या होत्या. जुन्या जमान्यात बांधलेल्या कित्येक रेल्वे स्टेशनचे जिने तर दणकट लोखंडाचे आहेत, ज्यावर चौकोनी जाळी दिसते. स्टेशनवरच्या जिन्याविषयी विचार करताना लक्षात आले की, आजकाल वाढत्या प्रवासी गर्दीमुळे अनेक रेल्वे स्टेशन्सवर किमान ५०-६० पायऱ्यांचे उंचच उंच जिने नव्याने बांधले आहेत. ‘पुलाचा उपयोग करा आणि अपघात टाळा’ अशा पाटय़ा स्टेशनवर बघायला मिळतात किंवा सूचना ऐकू येतात. पण रेल्वेचे बांधकाम खाते असे उंच उंच पूल बांधताना प्रवास करणाऱ्या हार्ट पेशंट.. अपंग.. गर्भवती स्त्रिया किंवा इतरही प्रवाशांचा जराही विचार का करीत नाही याचे उत्तर कोण देणार? अर्थात काही स्टेशन्सवर आता मेट्रो, मोनो रेल्वेप्रमाणेच सरकत्या जिन्यांची सोय झालीय, पण जिन्याला पूर्ण पर्याय देऊ  शकेल इतकी नाही.

विमानतळ किंवा मोठे मोठे मॉल्स किंवा काही अत्याधुनिक ठिकाणांचा अपवाद वगळता  भारतात इतरत्र अजून सरकत्या जिन्यांची संख्या तुरळकच म्हटली पाहिजे. आहेत त्या ठिकाणीही त्याचा वापर करायला आपण भारतीय प्रचंड घाबरत असतो. जिने सरकत असताना आपला पाय नेमका कधी ठेवावा किंवा कधी त्यावरून उतरायचे याचा अंदाज न आल्याने काही जण त्यावरून धडपडतात आणि कायमचा धसका तरी घेतात किंवा तसे काही आपल्या बाबतीत होऊ  नये म्हणून कुणी त्याच्या वाटेलाच जात नाही. आज जरी ही परिस्थिती असली तरी कालांतराने हे जिनेसुद्धा आपल्या सवयीचे होतीलच.

जिन्यांचे प्रकारही किती असावेत? साध्यासुध्या इमारतींच्या जिन्यांशिवाय आपल्याला जुन्या काळच्या खासकरून कौटुंबिक हिंदी सिनेमातील आलिशान बंगल्याच्या भव्य दिवाणखान्यातील वरच्या मजल्यावर दोन दिशांकडे वळणारे संगमरवरी पायऱ्यांचे जिने नक्कीच लक्षात असतील. त्यातला महालसदृश बंगला.. त्यातील खानदानची इज्जत सांभाळणारी माणसे बघत असताना बऱ्याचदा त्यातील नाटय़ भडक होत जाई आणि मग.. त्या जिन्यावरून कुणी गडगडत खालच्या पायरीशी येऊन शुद्ध हरपून बसे किंवा काही वेळा नायक-खलनायकांची मारामारी त्या जिन्यावर चाले. तेव्हा कुणी जिन्याच्या कठडय़ाला लटकत जीव वाचवायचा प्रयत्न करी किंवा कुणी कुणाला कठडय़ावरून खाली फेकायचा प्रयत्न करी. तसेच वैशिष्टय़पूर्ण जिने म्हणजे.. गोलाकार जिने. सिनेमाचाच संदर्भ द्यायचा तर ‘तेरे घर के सामने’ चित्रपटातील देवआनंद आणि नूतनच्या ‘दिल का भवर करे पुकार..’ गाण्यातील कुतुबमिनारच्या गोलाकार जिन्यांची पाश्र्वभूमी प्रत्येकाला गाण्याइतकीच स्मरणात राहिलीय. मोठमोठय़ा ऐतिहासिक वास्तूलाच असे गोलाकार जिने असतात असे मात्र मुळीच नाही. पूर्वी माझ्या मामाच्या घरमालकांच्या घराला असलेला अत्यंत दणकट लोखंडी खांबाभोवती गोलाकार गिरकी घेतलेला लोखंडी जिना अजूनही मला स्पष्ट आठवतोय. त्याच्या लोखंडी पायऱ्यावरही सुरेख नक्षीकाम होते. अलीकडेच एका मैत्रिणीच्या पेंट हाऊसमध्ये गेले होते, तिथेही घरातूनच वरच्या खोल्यांत जाण्यासाठी सुरेख गोलाकार जिना बघितला, ज्याच्या पायऱ्या चक्क मजबूत काचेच्या होत्या. तिने ग्वाही दिली तरी मला मात्र चढउतार करताना उगाचच काच फुटेल की काय, याची भीती वाटत होती.

आजकालच्या उंच उंच इमारतींमध्ये लिफ्टची सुविधा असते. इमारतीच्या आकारानुसार एकपेक्षा अधिकही लिफ्ट्स असतात. परंतु जिने बऱ्याचदा त्यामानाने अरुंद बांधलेले दिसतात. काही वर्षांपूर्वी मंत्रालयात आग लागली तेव्हा तिथल्या ऐसपैस जिन्यांमुळे तिथल्या माणसांच्या लोंढय़ाला तिथून सुखरूप बाहेर पडणे शक्य झाले असा जाणकार वास्तुरचनाकारांनी निर्वाळा दिल्याचे आठवतेय. एरवी दुर्लक्षित बनलेल्या जिन्यांची उपयुक्तता बहुमजली इमारतींमध्ये जेव्हा वीजपुरवठा खंडित होतो किंवा लिफ्टमध्ये काही बिघाड निर्माण होतो तेव्हा मात्र निश्चितच अधोरेखित होते.

अलकनंदा पाध्ये

alaknanda263@yahoo.com

 

First Published on September 9, 2017 1:50 am

Web Title: architecture in ladder