19 October 2019

News Flash

वास्तुसंवाद : संवाद.. वास्तू, वस्तू आणि व्यक्तींचा!

घराची अंतर्गत रचना आणि त्यामागे दडलेल्या अंतर्गत रचनाशास्त्राची मांडणी विशद करणारे सदर.

(संग्रहित छायाचित्र)

सीमा पुराणिक

घराची अंतर्गत रचना आणि त्यामागे दडलेल्या अंतर्गत रचनाशास्त्राची मांडणी विशद करणारे सदर.

दूरच्या प्रवासाहून बऱ्याच दिवसांनी घरी येऊन दार उघडल्यावर तुमची घरावर फिरणारी नजर.. त्या क्षणी मनाला स्पर्श करून गेलेल्या आपल्या घराबद्दलच्या हळुवार भावना.. किंवा अगदी आपल्याच खोलीतील आपल्या स्टडीटेबलवरील छानशा टेबललॅम्पवरची धूळ बोटांनी हळूच पुसून बघताना, त्या लॅम्पशी झालेला मूकसंवाद.. आठवतो का तुम्हाला?

असा संवाद हा वास्तू, तेथे असलेल्या विविध वस्तू, फर्निचर आणि तेथे राहणाऱ्या व्यक्ती यांच्यातले अतूट नाते दर्शवतो.

दिवाणखान्यातील आपल्या आवडीच्या पडद्याचा रंग काळानुरूप थोडासा विटला किंवा कसलासा डाग त्या पडद्याला लागला तरी घरातील गृहिणीचा जीव कसनुसा होतो, याचे कारण तिचे घरावर असलेले प्रेम.

आपल्या लाडक्या आरामखुर्चीचा एखादा स्क्रू थोडासा जरी सैल झाला, की आजोबा नातवंडांच्या मस्तीला दोष देत का होईना लगेचच हत्यारांची पेटी काढतात. त्याचप्रमाणे दिवाणखान्यातील बैठकीची व्यवस्था ( सोफा चेअर्स, सेंट्रल टेबल, इ.)  आणि इतर वस्तू जागच्या जागी असतील यासाठी घरातील आजी कायम सतर्क असते.

अहो एवढंच कशाला, आपण नोकरी करतो त्या ऑफिसमध्येही आपल्या टेबलाला एखादा स्क्रॅच आला तरी आपल्या नजरेतून सुटत नाही.

मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या घराला, घरातल्या वस्तूंना जिवापाड जपत असतो. त्या वस्तूंची मांडणी आणि घराची व्यवस्था यात दुसऱ्याने बदल केला तर आपल्याला ते रुचतही नाही.

परंतु घरातल्या या वस्तूंच्या मांडणीचेही एक शास्त्र आहे. जसे शहराची रचना तेथील रस्ते, घरे, बाजारपेठा, मंदिरे- ही जी नगररचना करताना ठरवावी लागते, त्याचप्रकारे घरातील वस्तूंची रचना अथवा मांडणी ही जर नेटकी आणि सुटसुटीत असेल तर ते घर दिसायला तर आकर्षक दिसतेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्याची उपयुक्तता वाढते.

या लेखमालेत आपण घराच्या अंतर्गत रचनेचा आणि त्यामागे दडलेल्या अंतर्गत रचनाशास्त्राचा विचार करू या.

अंतर्गत रचनाशास्त्र अर्थात इंटिरिअर डिझायनिंग हे एक स्वतंत्र व्यावसायिक क्षेत्र किंवा करिअर होऊ शकतं. २१ व्या शतकात या विषयाला अधिकाधिक महत्त्व प्राप्त होऊ लागलं आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि बदलती आर्थिक व्यवस्था.. काळानुरूप स्त्रीचे अर्थार्जनासाठी आणि करिअरसाठी बाहेर पडणं.. या सगळ्याच गोष्टींमुळे अंतर्गत रचनाशास्त्राला एक वेगळीच कलाटणी मिळाली आणि मग मध्यमवर्गीय कुटुंबालाही या शास्त्राची मदत घ्यायची गरज निर्माण झाली. शास्त्र म्हटले की, शास्त्रज्ञ-जाणकार हाही आलाच.

अशा या अंतर्गत रचनाकाराने (इंटिरिअर डिझायनर) अंतर्गत रचना करताना तीन मुख्य मुद्दय़ांचा विचार करणं आवश्यक असतं.

१) जागेचा सुयोग्य वापर (Space Utilisation)

२) जागेच्या वापरासंबंधीची सहजसुलभता (Comfort)

३) जागेचा आकर्षकपणा (Aesthetics)

बऱ्याच वेळा आपल्याला जाणवते की इंटीरिअर डिझायनिंग या संकल्पनेला केवळ जागेचे सुशोभीकरण (Aesthetics) याच विषयाशी जोडले जाते. परंतु इंटिरिअर डिझाइन म्हणजे फक्त घराची अंतर्गत सजावट असं नसून, त्या जागेतील सूर्यप्रकाशाचा स्रोत आणि त्याचं परावर्तन, दरवाजा-खिडक्यांचे लोकेशन, त्यांची दिशा, तसंच त्या जागेचा वापर करतानाचं उद्दिष्ट, तेथील व्यक्तींच्या गरजेनुसार वस्तूंचं आयोजन आणि मांडणी.. रचनेतील समतोल (Visual Balance), या वस्तूंचा वापर करताना त्या जागेतील व्यक्तींना मिळणारी सुलभता (Comfort) आणि चलनवलन करताना त्या व्यक्तींना मिळणारा सहजपणा (movement).. या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा विचार जाणकाराने करून घरातील व्यक्तींना योग्य तो सल्ला देणे अपेक्षित असते.

वर वर पाहता इंटिरिअर डिझाइन हा शब्द डिझाइन आणि सुंदरता यांच्याशी जोडला असला तरी इंटीरियर डिझाईन हा मूळत: तांत्रिक (टेक्निकल) विषय आहे, असे म्हटले तरी फारसे वावगे होणार नाही. कला, शास्त्र आणि तंत्रज्ञान (आर्ट्स, सायन्स आणि टेक्नॉलॉजी) या तीनही विषयांचा सुरेख मेळ तुम्हाला इथे दिसेल.

ज्याप्रमाणे रंग, पोत, धनाकार, रचना, प्रमाण (Proportion), समतोल (Balance) इत्यादी डिझाइन प्रिन्सिपल्सचा विचार अंतर्गत रचनाकार घराचे त्रिमितीय चित्र बघताना करतो, त्याचप्रमाणे Civil & Electrical Engineering, Plumbing, Carpentary, Painting Technology, Air Conditioning Systems, Sound Insulation अर्थात Acoustics, Fabrication या आणि अशा बऱ्याच शास्त्रीय आणि तांत्रिक विषयांचे ज्ञान अंतर्गत रचनाकाराला असणे आवश्यक आहे.

प्रिय वाचकहो, या लेखमालेतील पहिल्या भागातील पहिल्या लेखात मी इथेच तुमची रजा घेते. इंटिरिअर डिझायनर ने अंतर्गत रचना करताना, कोणकोणत्या गोष्टींचा विचार किती सखोलपणे करणे गरजेचे आहे हे पाहू पुढील लेखात.

seemapuranik75@gmail.com

(सिव्हिल इंजिनीअर,  इंटिरिअर डिझायनर)

First Published on January 5, 2019 1:42 am

Web Title: article about dialogues vaastu objects and individuals