12 December 2019

News Flash

वतल

वतलाच्या चुलीचे तोंड बाहेरून असते. बाथरूमच्या भिंतीत एक मोठे भगदाड पाडून त्याला गोलाकार दिलेला असतो.

(संग्रहित छायाचित्र)

नंदिनी देशमुख

वतल हा शब्द तसा कानाला ऐकायला अगदीच ओबडधोबड वाटत असला तरी त्याच्या सहवासात मिळणाऱ्या ऊबेला तोड नाही. वतल म्हणजे खेडय़ामध्ये घरोघरी पाणी तापवण्यासाठी न्हाणीघरात केलेली मोठी चूल. (इथे न्हाणीघरात हा शब्द मुद्दाम वापरला, कारण बाथरूम आणि वतल या शब्दांचे कॉम्बिनेशनच मुळात जुळत नाही. बाथरूम म्हटले की हिटर आणि गिझर असेच शब्द यायला हवेत.)

या वतलाच्या चुलीचे तोंड बाहेरून असते. बाथरूमच्या भिंतीत एक मोठे भगदाड पाडून त्याला गोलाकार दिलेला असतो. म्हणजे त्यावर पाणी तापवण्यासाठी ठेवायचा हंडा व्यवस्थित बसेल. बाहेरच्या बाजूने वतल पेटवण्याची सोय केलेली असते. खेडय़ातल्या बायकांचे सकाळी उठल्याबरोबर करायचे पहिले काम म्हणजे ‘वतलाला पेटत घालणे.’ किंवा घरकामाला जर गडी असेल तर तो सकाळी आल्याबरोबर आधी वतलाला पेटत घालतो, म्हणजे घरातील मंडळी सकाळी उठल्याबरोबर त्यांना तोंड धुवायला गरम पाणी हजर! शिवाय वतलाखाली घालायला वापरण्यात येणारे इंधन म्हणजे प्रामुख्याने तुऱ्हाटय़ा (तुरीच्या झाडाच्या वाळलेल्या काडय़ा), वाळलेला कडबा, (कुणी याला धांडे म्हणतात), सणकाडय़ा, रानशेण्या गोवऱ्या आणि थापलेल्या गोवऱ्या. रानशेण्या गोवऱ्या म्हणजे रानात पडलेले शेणाचे पोवटे जसेच्या तसे वाळून तयार झालेली गोवरी. या गोवऱ्या दिसायलाही खूप छान दिसतात. कारण त्याला नसíगकपणेच एक गोल असा वेटोळा आकार आलेला असतो. या गोवऱ्यांची राखोंडी तोंड धुवायला अगदी मऊ असते म्हणून ती उत्कृष्ट समजली जाते. चवीलाही ती एकदम खमंग असते. घरी हाताने थापलेल्या गोवऱ्यांची चव वेगळीच लागते. कारण शेण हाताने कालवल्यामुळे त्याची चवही बदलते. शिवाय हाताने कालवल्यामुळे त्यात माती, खडे असे इतरही बरेच काही मिसळल्या जाते. हल्ली लहान मुले जशी पेस्ट किंवा मंजन खातात तसे आमच्या लहानपणी आम्ही या रानशेण्या गोवऱ्यांची राखोंडी खात असू. गरोदर बायकांना तर ही राखोंडी खाण्याचे डोहाळे लागत. त्याशिवाय एखाद्या झाडाचे एखादे मोठ्ठे खोड त्या वतलात घालून ठेवलेले असे. म्हणजे ते जाळ धरून ठेवी. बाकी या छोटय़ा छोटय़ा काडय़ा भुर्रकन जाळून जात. ते खोड कितीतरी दिवस थोडे थोडे जळत राही. जाळ विझवल्यानंतर या खोडाचे कोळसे बाजूला करून त्यावर पाणी शिंपडून ठेवीत. तेच कोळसे नंतर स्वयंपाकघरात शेगडीसाठी वापरले जात. सकाळी उठल्यावर या कोळशांच्या शेगडीवर आई गरम गरम पानगे भाजून न्याहारीला देत असे. त्याबरोबर तूप आणि शेंगदाण्याची चटणी किंवा गूळ आणि तूप. मला तर वाटते आईच्या हातची ही न्याहारी म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट न्याहारी होय. शिवाय हा सगळा इंधनफाटा घरचा असल्यामुळे खर्चात कपात होई ती वेगळीच.

थंडीच्या दिवसांत या वतलापुढे पाय लावून, सगळयांनी मिळून शेकत बसण्याची मजा तर काही औरच. दिवाळीच्या सुट्टीत एकत्र जमलो की आम्ही सगळी बहीण-भावंडे तशी बसत असू. वेळ कसा जायचा तेच कळायचे नाही. मग म्हशीच्या धारा काढल्यानंतर आई किंवा काकी जेव्हा ओरडत तेव्हा नाईलाजाने उठावे लागे.. कारण सकाळच्या त्या प्रसन्न वातावरणात आमच्या गप्पाही अशा रंगत की तिथून उठायला मनच होत नसे. कधी कधी सकाळीच आई किंवा काकी वांग्याचे भरीत करायचे असेल तर वांगी वतलात भाजायला टाकत. त्याच्याशीपण आम्ही खेळत असू आणि अहाहा.. त्या तशा भाजलेल्या वांग्याच्या भरीताची चव अजूनही मनात रेंगाळतेय.

वतलावरचा तो हंडा म्हणजे एक प्रेक्षणीय वस्तू असते. तांब्या किंवा पितळेचा असलेला तो जड हंडा खालून अगदी काळाभोर असे. त्याचा मधला भाग थोडा तांबूस किंवा पिवळा  दिसे आणि वर तोंडाच्या काठाशी पुन्हा काळाभोर. कधी कधी कणकम्मा तो हंडा घासायची तेव्हा त्याचा तो मधला तांबूस किंवा पिवळा असणारा भाग एकदम उजळून निघायचा. बस! बाकी जशाला तसाच.

सगळ्यांच्या अंघोळी झाल्यानंतर शेवटी एक हंडा भरून घातला आणि त्याच्या खालचा सगळा विस्तू विझवून टाकला तरी त्या नुसत्या धगीने त्या हंडय़ातील पाणी संध्याकाळपर्यंत गरम राहत असे. थंडीच्या दिवसांत शेतावरून घरी परत आलेल्या पुरुष माणसांना पाय धुवायला हे गरम पाणी दिले जाई. ते गरम पाणी पायावर पडले की त्यांचा सगळा शीणभागच हरपून जाई. आम्हीसुद्धा गावाकडे गेलो की संध्याकाळी फिरायला शेतावर किंवा नदीवर जात असू आणि मग परत आल्यावर या वतलातील गरम पाण्याने पाय धुण्यासाठी न्हाणीघरात जाऊन एकमेकांशी झटापट करीत असू. आता हे चित्रच बदलले आहे. बाहेरून घरी परत आल्यानंतर पाय धुणे हा प्रकारच नामशेष होत चालला आहे. नळाचे थंडगार पाणी पायावर घेऊन शहारे येण्यापेक्षा किंवा पाय ओले करण्यापेक्षा तसेच पाय घेऊन सोफ्यावर बसून टी.व्ही.चा रिमोट हातात घेणे आपण जास्त पसंद करतो.

माझ्या माहेरी न्हाणीघर खूप मोठे होते. त्यामुळे वतलाखाली कितीही मोठा जाळ घातला, कितीही सरपण घातले तरी न्हाणीघरात धूर कोंडायचा नाही. आणि एकदा का जाळाने पेट घेतला की मग धुराचे नामोनिशाण राहायचे नाही. नंतर लग्न होऊन सासरी आले. सासरचे  न्हाणीघर थोडे लहान होते आणि एक छोटीशीच खिडकी होती. पहिल्यांदाच मी अंघोळीला पाणी काढून घेतले आणि दुसऱ्यांसाठी पुन्हा पाणी गरम रहावे म्हणून वतलाखाली सरपण घालून अंघोळीला गेले. दार आतून बंद करून घेतले तर काय! वतलाखालच्या जाळाने अजून पेट घेतलाच नव्हता आणि सगळे न्हाणीघर धुराने भरून गेले होते. माझ्या नाका-तोंडातून डोळ्यांतून अक्षरश: पाणी यायला लागले आणि घशात सगळा तो कडवट वास अडकला. सासरी आल्यानंतर असे कडू घोट पचवावे लागतात हे त्यावेळी पहिल्यांदा वतलाने शिकवले. जुन्या गोष्टी सगळ्या हळूहळू काळाच्या पडद्याआड जात आहेत. पण जुन्या वडीलधाऱ्या माणसांच्या प्रेमाची ऊब ज्यांनी अनुभवली त्या ऊबेप्रमाणेच ही वतलाची ऊब ज्यांनी अनुभवली असेल त्यांच्या ती कायम आठवणीत राहण्यासारखी आहे.

या वतलाच्या जशा गोड आठवणी आहेत तशीच एक कडू आठवणही आहे. आम्ही लहान असताना आमच्या गावातील एका प्रतिष्ठित घरातील नुकत्याच लग्न होऊन आलेल्या एका सुनेचा न्हाणीघरातील या वतलाच्या ज्वाळांनी बळी घेतला होता. खरे-खोटे करत त्याची शहानिशा करत बसण्याचे ते वय नव्हते. आणि मोठय़ा लोकांच्या काही गप्पा चालू असतील तर आम्हा लहान मुलांना तिथे बसायची मनाई असे.

एकंदरीत कडू-गोड आठवणींचा असा हा वतल मात्र मनाच्या एका कोपऱ्यात घर करून बसला आहे.

nandini.deshmukh@gmail.com

First Published on February 9, 2019 1:39 am

Web Title: article about hitter and geyser
Just Now!
X