कविता भालेराव

ट्विटर, ब्रुनो, स्नोई.. ही नावं वाचून सहजच  तुमच्या लक्षात येईल की ही नावे पाळीव प्राण्यांची आहेत. बऱ्याच घरांमध्ये हे पाळीव प्राणीही त्या कुटुंबातले महत्त्वाचे सदस्य असतात. त्यांना घरातलंच समजलं जातं, लाड केले जातात; आणि तेही आपल्याला जीव लावतात. या पाळीव प्राण्यांसाठी कुटुंबातील सदस्यांच्या मनातही एक खास जागा असते, पण मग आपण घराचे इंटिरीअर करताना त्यांचा विचार करतो का?

घर सजवताना आमच्याकडे पाळीव प्राणी आहेत आणि त्याचाही प्राधान्याने विचार व्हावा, असं खूप कमी लोकांना वाटतं. त्यात बऱ्याचदा जागा हा महत्त्वाचा भाग असतो. बंगला असेल तर प्रश्नच नसतो, पण जर का फ्लॅट असेल आणि बाल्कनी नसेल तर काय? हा प्रश्न योग्यच आहे. पण मी मुंबईत कुटुंबातले लहान-मोठे आणि प्राणी असे सगळे एकाच घरात सुखाने नांदत असलेलं पाहते. जशी आपण आपल्या घरातील सदस्याची काळजी घेतो, घर सजवताना त्यांचा विचार करतो, तसेच हे घर त्यांचेही आहे याची जाणीव अगदी थोडय़ा बदलांतूनही करून देऊ शकतो.

तर यासाठी काय करू शकतो? तर –

*     सर्व प्रथम सुरुवात करू आपण मुख्य दरवाजापासून. बेल वाजली की हे प्राणी धावत दाराजवळ जातात. त्यांना दार उघडता येत नाही, पण कोण आहे, हे अगदी त्यांना जाणून घ्यायचे असते. त्यामुळे सेफ्टी डोअर अगदी गरजेचेच. कारण अनेक जण या प्राण्यांना बघून घाबरतात. किंवा घरातील एखाद्या सदस्याबरोबर जर का कोणी आले असेल तर त्यांच्याही मागेपुढे फिरतात. सेफ्टी डोअरमुळे लोक त्यांना दिसतील, पण लोकांनाही एकदम या प्राण्यांना बघून अंगावर येईल की काय, ही भीती वाटणार नाही.

*     शू रॅकमध्ये एक ड्रॉव्हर ठेवा म्हणजे फिरायला नेताना लागणारा बेल्ट तिथे ठेवता येतो आणि पटकन सापडतो. याशिवाय पेट वाइपस्ही असतात. तेही इथेच ठेवू शकतो. जेणेकरून बाहेरून आल्यावर जर का यांच्या पायाला चिखल वगैरे लागून त्यांचे पाय खराब झाले असतील, तर तिथेच या पेट वाइपने पुसून घेता येतील आणि आपले घर स्वच्छ राहील.

*     फर्निचरचे कोपरे गोलाकार ठेवणे- घरात पाळीव प्राणी असतील तर फर्निचरची रचनाही सुटसुटीत ठेवावी. खूप जवळ जवळ फर्निचर ठेवू नये. कारण प्राणी हे नेहमी आपल्या पायापाशी बसतात, खेळतात. फर्निचरला काचेचे टॉप नसावे, कारण धावत येताना त्यांना इजा होण्याची शक्यता असते.

*     हॉलच्या खोलीला दरवाजा लावून घेणे. आपल्याकडे कोणी पाहुणे आले आणि जर का ते या प्राण्यांमुळे कंफर्टेबल नसतील तर आपण त्या प्राण्याला आत ठेवून मधला दरवाजा लावून घेऊ शकतो. म्हणजे त्यांना घरभर फिरता येते. त्यांना एका रूममध्ये ठेवले तर त्यांना ते आवडत नाही आणि ते दरवाजा वाजवत बसतात. या एका सोयीमुळे त्यांना कोंडून ठेवले असेही वाटतं नाही. शेवटी घर त्यांचेही असते.

*     घरात सहसा सॉफ्ट फरशी तसेच खूप ग्लॉसी फरशीही बसवू नये. अ‍ॅण्टी स्किड म्हणजेच न घसरणारी अशी फरशी असावी. नाहीतर प्राण्यांचे पाय वाकडे होण्याची शक्यता असते.

*     टेक्चरपेंटचा वापर करू नये. कारण त्यावर यांची फर किंवा केस चिकटून राहतात आणि ते साफ करणे अवघड होते. त्यामुळे रंग लावताना हा सेमी ग्लॉस असेल तर पटकन साफ करता येतो. तसेच केन, वायरचे फर्निचर असेल तर प्राणी नखाने कुरतडतात. त्यामुळे हेही टाळावे.

*     आजकाल पेट फ्रेंडली कापड मिळते तेच सोफ्याला वापरू शकता. नाहीतर साधे कॉटन, सिंथेटिक, चामडेही सोफ्याच्या कव्हरसाठी वापरू शकता. यावर पडलेले प्राण्यांचे केस पटकन साफ करता येतात, पण स्क्रॅचेसची भीती असतेच. पडद्याचे कापडही खूप टेक्स्चरचे नसावे साधे कापड, पण वापरण्या योग्य असावे. ब्लाइंडस् (दोरीने ओढता येणारे) प्रकारचे पडदे लावले असतील तर त्यांच्या ओढण्याच्या दोऱ्या जपाव्यात, कारण त्या हलतात तेव्हा त्या पकडण्याचा एक वेगळा खेळ नेहमीच सुरू असतो.

*     खरं तर आपण त्यांना एक जागा ठरवून दिली पाहिजे- त्यांचीच अशी. आजकाल फारच छान डॉग /कॅट बेड मिळतात. त्यांच्या खाण्याचीही एक विशिष्ट जागा ठेवावी, म्हणजे ते तिथेच जाऊन खातात. कारण त्यांच्या खाण्याला एक वेगळा वास येतो आणि तो सगळ्यांनाच आवडतो असं नाही.

*     मांजरीला नेहमीच वर-खाली उडय़ा मारायला आवडतं. आणि थोडय़ा उंचीवर बसून राहायला आवडतं. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण भिंतीवर शेल्फ करून घेऊ शकतो- ज्यावर काहीच ठेवायचे नाही म्हणजे त्या त्यावरून मस्त उडय़ा मारू शकतात. यासाठी एक छोटी भिंतही पुरेशी आहे. सहसा खिडकीजवळ असे शेल्फ करू नये, कारण चुकून खिडकी उघडी राहिली तर पडण्याची शक्यता असते. सतत घरातच असणाऱ्या मांजरी या बाहेरच्या मांजरांप्रमाणे स्मार्ट नसतात.

*     खोलीच्या दरवाजांना खालच्या बाजूला एक छोटा फ्लॅपचा दरवाजा ठेवावा- ज्यातून मांजरांना सहजपणे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाता येईल. ए.सी सुरू असताना आणि रात्री दरवाजा बंद असताना त्यांना ये-जा करणे सोपे होईल.

*     घराला टेरेस किंवा बाल्कनी असेल तर आपण त्यांची झोपायची सोय तिथेच करू शकतो. शिवाय मांजरीचे ट्रे आणि वाळूही (कॅट लिटर) तिथे ठेवता येते. बाल्कनी नसेल तर आपल्याला एक जागा ठेवावी लागते, जिथे आपण या वस्तू ठेवू शकतो.

*     कुत्र्यांना खेळायला आवडते, त्यामुळे त्यांचे बॉल हे त्यांना पटकन मिळतील अशाच जागेवर ठेवावेत.

*     प्राण्यांना वातावरणानुसार उबदार किंवा थंड जागा शोधता येते आणि ते खूपदा तिथेच बसतात. जसे ए.सीच्या आऊट डोअर युनिट खाली. एखादा कोपरा, बाथरूममध्ये किंवा स्टोअरेजच्या खाली.. तेव्हा आपण या जागा नेहमीच स्वच्छ ठेवाव्यात. कारण या आपल्यासाठी अगदीच अडगळीच्या किंवा बिन महत्त्वाच्या जागा आहेत.

*     एक स्वतंत्र कपाट करावे, ज्यात त्यांचे अन्न, बाऊल, शाम्पू, औषधे ठेवावीत.

*     खिडक्या, बाल्कनी यांना नेट लावून घ्यावी. कारण बाहेरील पक्ष्यांवर झेप घ्यायच्या नादात त्यांना इजा होऊ शकते.

*     प्राण्यांचा एक विचित्र वास येत असतो, त्यामुळे व्हेंटिलेशन व्यवस्थित असावे. हा वास कमी यावा म्हणून कँडल लावू नये. ऑटोमॅटिक फ्रेगनन्स मशीन लावावे. कँडल पडून मोठी हानी होण्याची शक्यता असते.

वरवर खूपच छोटय़ा वाटणाऱ्या गोष्टी आपलं मोठं काम सोपं करतात. आपल्या या लाडक्या सदस्यांसाठी तर या फारच महत्त्वाच्या आहेत. आपल्याला जेव्हा त्यांची ओळख जर का कुत्रा किंवा मांजर अशी करून द्यावीशी वाटत नाही, आणि त्यांच्या नावानेच त्यांची ओळख करून देतो; तेव्हा तर त्यांनाही ते घर आपलंसं वाटावं यासाठी आपण त्या प्रकारचं वातावरण निर्माण करणंही आवश्यक आहे.

(इंटिरियर डिझायनर)

kavitab6@gmail.com