आनंद कानिटकर

मंदिर स्थापत्याचा दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियातील प्रवास बघायचा असेल तर भारतातील प्राचीन काळातील मंदिरांचा आढावा घेणे गरजेचे आहे. भारतात इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून दगडात कोरलेल्या प्राचीन लेणी आढळतात. परंतु भारतातील मंदिर स्थापत्याचा विचार करताना अनेकदा प्रसिद्ध गुप्त घराण्यातील राजांच्या काळात म्हणजे इसवी सन चौथ्या, पाचव्या शतकात (सुमारे १५०० वर्षांपूर्वी) निर्माण झालेल्या मंदिरांपासून सुरुवात केली जाते. कारण या काळातील दगड आणि विटांनी बांधलेली मंदिरे अजूनही देवगड, सांची, भितरगाव इत्यादी ठिकाणी उभी असलेली आढळतात. परंतु गुप्त घराण्यातील राजांपूर्वीच्या काळातील शिलालेखांतून, शिल्पांतून, साहित्यातील उल्लेखांतून आणि भारतातील काही उत्खननांत सापडलेल्या पुरातत्त्वीय पुराव्यांवरून इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासूनचे (सुमारे बावीसशे वर्षांपूर्वीचे) मंदिरांचे अस्तित्व, त्यांचा आकार, तलविन्यास (प्लॅन) लक्षात येतो.

Loksatta vasturang On the occasion of Gudi Padwa home purchase investment
गुढीपाडवा आणि गृहखरेदी
Know About RBI History
भारतीय रिझर्व्ह बँक झाली ९० वर्षांची, बँकेची सुरुवात कशी झाली?
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद
Hanuman mandir in pakistan | A 1500 Year Old Shri Panchmukhi Hanuman Mandir Is In Karachi Pakistan
पाकिस्तानातील १५०० वर्षे जुने श्री पंचमुखी हनुमानाचे मंदिर तुम्हाला माहितीये का?

राजस्थानातील चितोडपासून जवळ असलेल्या घोसुंडी या गावातील विहिरीत सापडलेल्या इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातील एका शिलालेखात संकर्षण आणि वासुदेव या देवतांच्या पूजनाकरिता ‘पूजा शिला प्राकार’ निर्माण केला गेला होता आणि त्याला ‘नारायणवाटिका’ असे नाव होते हा उल्लेख केला आहे. येथून जवळच असलेल्या नागरी या गावातील हाथी बाडा या जागेत अकबराने चितोडवर स्वारी करताना हत्ती बांधले होते, त्यामुळे त्याला हाथी बाडा असे नाव पडले. या जागेला असणारी भिंत ही मोठय़ा शिळांनी बनवलेली आहे. या भिंतीच्या दक्षिणेच्या बाजूच्या एका दगडावर एक लेख सापडला होता, जो घोसुंडी येथे सापडलेल्या लेखाशी मिळताजुळता होता. त्यावरून डॉ. भांडारकर यांनी हाथी बाडा म्हणजेच नारायण वाटिका असावी आणि ही हाथी बाडाची भिंत मूळच्या नारायण वाटिकेची भिंत असावी असा निष्कर्ष मांडला होता. तिथे झालेल्या उत्खननात एकात एक दोन लंबवर्तुळाकार भिंती असलेली स्थापत्य रचना आढळली होती. यातील आतली लंबवर्तुळाकार वास्तू म्हणजे मुख्य गाभारा सुमारे १० मीटर लांब आणि ३.५ मीटर रुंद तर बाहेरील लंबवर्तुळाकार वास्तू म्हणजे बाहेरील भिंत ही १४ मीटर लांब होती. या दोन्ही वास्तूंच्या मध्ये १.८ मीटर रुंदीची जागा होती, जी प्रदक्षिणा पथ म्हणून वापरली जात असावी. लाकूड आणि माती वापरून हे मंदिर बांधण्यात आलेले होते. या मंदिराचा काळ इ.स. पूर्व तिसरे शतक असावा असा संशोधकांचा तर्क आहे. याच मंदिरात  शिलालेखात नमूद केलेली संकर्षण आणि वासुदेवाची पूजा केली जात असावी.

मध्य प्रदेशातील विदिशा येथे खांब बाबा नावाने ओळखला जाणारा स्तंभ हा इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात ग्रीक राजा अँटिअल्कायडस याच्यातर्फे तक्षशिलेहून काशीपुत्र भागभद्र राजाकडे आलेला ग्रीक दूत हेलिओडोरस याने उभारलेला आहे. या हेलिओडोरसने हा गरुडध्वज वासुदेवासाठी म्हणजे वासुदेवाच्या मंदिरासमोर उभारला असावा. त्या शिलालेखात हेलिओडोरसचा उल्लेख भागवत असा केला आहे. म्हणजे तो वैष्णव होता.

याशिवाय याच परिसरात अजून एका स्तंभाचा तुकडा सापडला- ज्यावरदेखील शिलालेख कोरलेला होता. या खांबाच्या तुकडय़ावरील खंडित शिलालेखानुसार तो स्तंभ ‘भगवंताच्या उत्तम प्रासादाचा गरुडध्वज’ होता. म्हणजे हेलिओडोरसच्या गरुडध्वजाखेरीज इतरांनीही त्या परिसरात गरुडध्वज उभारले होते आणि हा वासुदेवाचा उत्तम प्रासाद असल्याने कदाचित हेलिओडोरसने, जो स्वत:ला भागवत म्हणवून घेतो, त्याने अजून एक गरुडध्वज त्या मंदिराच्या परिसरात उभारला असावा.

डॉ. भांडारकर यांना हेलिओडोरसने उभारलेल्या स्तंभाच्या आसपासच्या भागात केलेल्या उत्खननात एका मंदिराचे अवशेष सापडले होते. त्यावरून तेथे लंबगोलाकार गाभारा आणि त्यात प्रवेश करण्यासाठी चत्यकमान असलेले प्रवेशद्वार होते हे लक्षात येते. याशिवाय या मंदिराभोवती दगडी वेदिकादेखील होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील मंदिराला शिलालेखात प्रासाद म्हणून संबोधले आहे.

गुडीमल्लम (चित्तूर जिल्हा, आंध्र प्रदेश) येथील परशुरामेश्वर मंदिरात असलेले सुमारे पाच फूट उंचीचे प्राचीन शिविलग इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातील असल्याचे संशोधकांचे मत आहे. या शिविलगाच्या पुढील बाजूस शिवमूर्ती अर्धउठावात कोरली आहे. या शिविलगाच्या चारी बाजूने सव्वा मीटर लांबीरुंदीची वेदिका (कठडा) उभारलेली होती, जी अजूनही दृष्टीस पडते. प्राचीन काळी हे शिविलग या वेदिकेमध्ये कोणत्याही मंदिराशिवाय होते. कालांतराने इ.स. पहिल्या ते तिसऱ्या शतकात शिविलग आणि वेदिकेच्या बाजूने त्यावर चापाकार apsidal) मंदिर उभारले गेले, तर मध्ययुगात या मंदिराच्या प्रदक्षिणापथावर खांबांनी युक्त बांधकाम करण्यात आले. या आधीच्या लेखात बघितल्याप्रमाणे, गर्भगृह आणि तेथील मूर्ती हा मंदिराचा गाभा असल्याने त्यात बदल केले जात नाहीत. त्याप्रमाणे येथेही मूळचे बावीसशे वर्षांपूर्वीचे शिविलग आणि त्याभोवतीची वेदिका तशीच ठेवून त्याभोवती मंदिर उभारण्यात आले.

सोंख (मथुरा) येथे उत्खननात सापडलेल्या एका चापाकार apsidal’) मंदिर हे  वस्ती आणि आजूबाजूच्या रस्त्यांच्या मध्यभागी होते. पूर्व-पश्चिम असलेले हे मंदिर मूळचे छोटेखानी होते आणि नंतर त्याचा विस्तार करण्यात आला. या मंदिराचा मूळ गाभारा ३ मीटर लांबीरुंदीचा चौकोनी गाभारा होता. त्याचे रूपांतर नंतर चापाकार गाभाऱ्यात झाले. सोंख येथील या मंदिराचा काळ संशोधकांच्या मते इ.स. पहिले ते दुसरे शतक असावा. या काळात नऊ टप्प्यात या मंदिराचा विस्तार करण्यात आला. येथीलच दुसऱ्या एका चापाकार गाभाऱ्याचे मंदिर एका उंच जोत्यावर बांधलेले असून, त्या मंदिराच्या आवारात काही खोल्यादेखील होत्या. या मंदिराच्या आवाराला नक्षीकाम केलेली दगडी वेदिका (कठडा) होती. तसेच दगडी स्तंभ आणि तोरण असलेले प्रवेशद्वारही होते. हे तोरण असलेले प्रवेशद्वार सांची येथील स्तूपाच्या प्रवेशद्वारासारखे होते. येथे सापडलेल्या मूर्तीवरून तसेच या प्रवेशद्वारावरील नाग आणि नागी यांच्या शिल्पांवरून सोंख येथील हे मंदिर नागाचे मंदिर असावे.

आंध्र प्रदेशातील नागार्जुनकोंडा (प्राचीन विजयपुरी) येथील उत्खननात सापडलेल्या पुराव्यांवरून आणि इक्ष्वाकु राजांच्या दानलेखांतून लक्षात येते की येथे एकोणीस मंदिरे होती. यातील काही मंदिरांच्या दानलेखांतून राजाचे नाव येत असल्याने त्यांचा इ.स. तिसरे ते इ.स. चौथे शतक हा काळ ठरविणे शक्य होतेच, परंतु ती मंदिरे कुठल्या देवतेची होती हेदेखील लक्षात येते. उत्खननात या मंदिरांचा पाया सापडला आहे. यातील सर्व मंदिरे एकसारखी होती असे मात्र नाही. काही मंदिरे लंबवर्तुळाकार आकाराच्या गाभाऱ्याची होती, तर काही चापाकार आकाराच्या गाभाऱ्याची.

यातील पाच मंदिरे शिव आणि कार्तिकेयाची होती. इक्ष्वाकु राजा एहुवल याचा सेनापती एलिसिरी याने उभारलेल्या सर्वदेव मंदिराला शिलालेखात या मंदिराला ‘मंडप प्रासाद’ असे संबोधले आहे. हे सर्वदेव मंदिर म्हणजे कदाचित अनेक देवांचे मंदिर असावे.

इक्ष्वाकु राजा एहुवल चंटमुल याच्या राजपुत्राने एक शिव मंदिर उभारले होते. या शिव मंदिराचा गाभारा चापाकार (apsidal) होता. या गाभाऱ्याच्या समोर थोडय़ा अंतरावर एक मंडप होता, त्यापुढे ध्वजस्तंभ होता आणि या सर्वाभोवती प्राकार (भिंत) होता. याच राजाच्या काळात बांधल्या गेलेल्या दुसऱ्या एका मंदिराचा गाभारा लंबवर्तुळाकार होता आणि त्यासमोर मंडप उभारलेला होता. नागार्जुनकोंडा येथेच सापडलेल्या एका कार्तिकेयाच्या मंदिराचा गाभारा चौकोनी होता. तेथे कार्तिकेयाची एक खंडित मूर्तीदेखील सापडली होती.

वरील सुरुवातीच्या मंदिरांच्या पुराव्यांवरून लक्षात येते की सुरुवातीला यक्ष, नाग यांच्या मूर्तीची पूजा ज्याप्रमाणे उघडय़ावर केली जात असेल, त्याचप्रमाणे शिव, विष्णू यांच्या

प्रतिमांचे पूजन खुल्या आकाशाखाली केले जात असेल. परंतु त्या मूर्तीभोवती वेदिका (कठडा) उभारून त्या मूर्तीभोवतीची पवित्र जागा अधोरेखित केली जात असे. कालांतराने त्यावर लाकडी छत उभारून अथवा लाकूड, मातीच्या भिंती करून त्या मूर्ती असलेल्या त्या पवित्र जागेचे रूपांतर कुटीवजा देवगृहात करण्यात आले.

कालांतराने या देवगृहाच्या लाकडी रचनेचे रूपांतर विटा आणि दगड वापरून केलेल्या देवगृहात झाले, जी दीर्घकाळ टिकू शकत होती. याच छोटय़ा चौकोनी किंवा लंबवर्तुळाकार गाभाऱ्याच्या बाजूने प्रदक्षिणापथ आणि समोरील जागेत अंतराळ, मंडप, मुखमंडप, इत्यादी स्थापत्य रचना निर्माण करून त्याला मंदिराचे सुधारित स्वरूप मिळाले. गाभाऱ्यावर विशेषत: चौकोनी आकाराच्या गाभाऱ्यावर अनेक मजली शिखर बांधले जाऊन त्याला प्रासादाचे स्वरूप देण्यात आले.

kanitkaranand@gmail.com