News Flash

छोटय़ा बाथरूमची सजावट

बऱ्याचदा आपण कामाच्या अथवा प्रवासाच्या निमित्ताने शहर- गावांत प्रवास करीत असतो.

माती, बांबू आणि शेण या कच्च्या साहित्यापासून बनवलेले कमी खर्चातील घर (गांधी नु गाम, कच्छ, गुजरात.)

हेमिल पारीख

बऱ्याचदा आपण कामाच्या अथवा प्रवासाच्या निमित्ताने शहर- गावांत प्रवास करीत असतो. अशा वेळी राहण्यासाठी आपण हॉटेलचा पर्याय निवडत असतो. तिथल्या खोलीत प्रवेश करताच आपण नेहमी प्रथम बाथरूमच्या जागेची तपासणी करतो. कारण जागेवर ठेवलेल्या गोष्टी, स्वच्छता, फिनाइलचा दरवळणारा सुवास आणि तिथला चकचकीतपणा पाहून तबियत एकदम खुश होऊन जाते आणि आपल्या घरीपण असेच बाथरूम असावे, असा मोह होतो. पण प्रत्येक घरामध्ये मोठे, प्रशस्त बाथरूम असेलच असे नाही.

अलीकडच्या ट्रेण्डनुसार, बाथरूम आणि शौचालय एकाच ठिकाणच्या जागेत बसविले जाते. त्यामुळेच तिथे बेसिन, शॉवर किंवा अंघोळीची जागा यांसाठी आवश्यक ती जागा असणे महत्त्वाचे असते. मग ती बाथरूमची जागा कितीही का छोटी असेना, या प्राथमिक गोष्टी तिथे असाव्याच लागतात. पण बाथरूमची जागा जरी लहान असली तरी काही छोटे छोटे बदल करून त्याला प्रशस्तपणाचा फील देता येतो.

अशा वेळी सीलिंगच्या काठावर डिझाइन करून अथवा पेण्टिंग्ज्च्या साहाय्याने त्या खोलीला एक प्रकारचा प्रशस्तपणा देता येईल.

बेसिनच्या अथवा अंघोळीच्या जागेला वेगवेगळा रंग अशी तुकडय़ातुकडय़ांत बाथरूमची विभागणी न करता संपूर्ण बाथरूमच्या भिंतींना एकाच रंगात रंगविल्यास छोटीशी जागादेखील प्रशस्त दिसू लागते.

प्राथमिक आणि आवश्यक त्या गोष्टींचे नेमके नियोजन, नेटकी मांडणी आणि आरोग्यदायी वातावरणनिर्मिती केल्यास, छोटीशी बाथरूमची जागादेखील मोठी व प्रशस्त भासू लागते. जागा छोटी आहे म्हणून तुमच्या आवडीनिवडींना मुरड घालू नका. तर त्यासाठी गरज आहे ती छोटय़ा छोटय़ा गोष्टींवर काम करण्याची. या गोष्टी कोणत्या ते आपण पाहू या-

वॉलपेपर- छोटय़ाशा जागेत वॉलपेपरचा वापर अतिशय परिणामकारक ठरतो. अशा वेळी एखादे गडद किंवा वेगळ्या प्रकारचे  पिंट्र डिझाइन असलेल्या वॉलपेपरचा वापर केल्यास खोलीला एक प्रकारचा प्रशस्तपणा जाणवितो.

आरसा- आरशाचा वापर हा नेहमीच त्या त्या खोलीला एक प्रकारचा प्रशस्तपणा प्राप्त करून देत असतो. कारण आरशामधून नेहमीच प्रकाश परावíतत होत असतो. अशा वेळेला तुम्ही पूर्ण भिंतींवर आरसा लावल्यास अथवा भिंतीवर योग्य त्या ठिकाणी लटकविल्यास, जागा छोटी असली तरीही ती अधिक प्रकाशमान व मोठी दिसू लागते.  परिणामी, तुमचे लहान बाथरूम प्रशस्त वाटू लागते.

टाइल्स्-  प्रत्यक्ष उपलब्ध असणारी जागा आणि डोळ्यांना दिसणारी जागा यात एक फरक असतो.  बाथरूमची, संडासाची आणि बेसिनची जागा दाखविण्यासाठी वेगवेगळ्या टाइल्सचा वापर न करता, संपूर्ण भिंतींवर एकाच प्रकारच्या टाइल्स लावल्यास ती जागा सलग असल्याचे वाटते. त्यामुळेच ती जागा अधिक मोठी दिसते. यासाठी मार्बलचा वापर केल्यास निश्चितच आवश्यक तो परिणाम साधता येतो.

फर्निचरचा नेमका वापर- बाथरूममध्ये फर्निचरचा नेमका वापर करावा. अनेक गोष्टींसाठी वेगवेगळे फर्निचर बनविण्यापेक्षा एकाच ठिकाणी अनेक गोष्टी ठेवता येतील अशा प्रकारचा मिरर युनिट अथवा इतर अन्य सुटसुटीत स्वरूपात उपलब्ध असणाऱ्या युनिटस्चा वापर करावा. यामुळे आवश्यक त्या गोष्टी तर ठेवता येतात. शिवाय, बसण्याची जागादेखील नेमकी असल्यामुळे बाथरूममध्ये वावरणे अडचणीचे न ठरता सहज होते.

तुमच्या घरातील बाथरूम जरी प्रशस्त नसले तरी उपलब्ध असलेल्या जागेचा योग्य तो वापर करून तुम्ही तुमच्या बाथरूमला सुटसुटीत आणि आरामदायी असा फील देऊ शकता. त्यासाठी गरज आहे ती, काही गोष्टी करण्याची आणि काही गोष्टी टाळण्याच्या, तर कोणत्या कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात ते आपण पाहू या.

काय कराल

पांढऱ्या रंगाची जादू-  तुमच्या बाथरूमला जर प्रशस्तपणाचा द्यायचा असेल तर पांढऱ्या रंगासारखा उत्तम पर्याय नाही. पूर्ण बाथरूमला पांढरा रंग दिल्यास ती जागा जास्त मोठी दिसू लागते. शिवाय या रंगाचे खास वैशिष्टय़ असे की, जितका अधिक प्रकाश परावíतत होतो, तितकीच ही खोली अधिक उजळून निघते.

विरुद्ध रंगसंगतीचा मोह टाळा- बाथरूमसाठी रंगाची निवड करताना, शक्यतो एकाच रंगाचा वापर करावा. मुळातच ही जागा छोटी असल्याने अशा ठिकाणी विरुद्ध रंगसंगतीचा वापर करू नये. कारण त्यामुळे बाथरूमची भिंत, टाइल्स आणि रंग यांची तुकडय़ा तुकडय़ांत विभागणी होते. परिणामी, छोटी जागा अधिकच छोटी वाटते. व इतर गोष्टींची गर्दी अधिक वाटते. म्हणूनच, या तिन्ही घटकांमध्ये एकसंधता निर्माण होईल, अशा एकाच रंगांची निवड करावी.

शॉवर- छोटय़ाशा बाथरूममध्ये अंघोळीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसणे, ही नेहमीच जाणवणारी अडचण आहे. बाथ टब किंवा इतर पर्याय तिथे उपयुक्त ठरत नाहीत. या ठिकाणी शॉवर बाथ हा पर्याय अधिक उपयुक्त ठरतो. यासाठी शॉवर पाइपची निवड केल्यास, उपलब्ध जागेत कुठेही शॉवर बाथचा आनंद घेता येऊ शकतो.

या गोष्टी टाळा

रंग, वॉलपेपर यांची गर्दी टाळा-  बाथरूममध्ये रंग, वॉलपेपर या प्रत्येक गोष्टींचा वापर करण्याऐवजी कोणत्याही एकाच गोष्टीचा वापर करावा. यामुळे सुटसुटीतपणा दिसून येईल. साधा रंगदेखील या ठिकाणी शोभून दिसतो.

अनावश्यक अ‍ॅक्सेसरीज् टाळा-  बाथरूममध्ये अ‍ॅक्सेसरीज्साठी वेगवेगळे खण ठेवण्यापेक्षा एकाच पॅलेटमध्ये आवश्यक त्या सर्व गोष्टी बसतील याची निवड करा. याचा एक फायदा असा होतो की, आवश्यक आणि नेमक्याच गोष्टी ठेवल्या जातात. जरुरीपेक्षा जास्त वस्तूंची गर्दी झाल्यास पसाराच अधिक दिसून येतो.

वायुविजन-  बाथरूमसाठी रंग, टाइल्स्, अ‍ॅक्सेसरीज् या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितकीच महत्त्वाची असलेली बाब म्हणजे हवा आत-बाहेर जाण्यासाठी असलेली सोय. कारण गिझर अथवा गरम पाणी यामुळे या ठिकाणी एक प्रकारच्या दमट वातावरणाची निर्मिती होत असते. अशा वेळी ही हवा बाहेर न गेल्यास तिथे एक प्रकारचा कुबट वास तयार होतो. जो आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेदेखील हानीकारक असतो. म्हणूनच ही जागा छोटी असो वा मोठी, वायुविजन असणे अतिशय महत्त्वाची बाब आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

शब्दांकन- सुचित्रा प्रभुणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2019 1:41 am

Web Title: article about little bathroom decoration
Next Stories
1 आखीव-रेखीव : ट्विटर, ब्रुनो, स्नोई आणि सजावट
2 ग्राहक संस्था आणि नवीन रेरा आदेश
3 उद्योगाचे घरी.. : कला आणि तंत्रज्ञानाचा मेळ साधणारं दिग्दर्शकाचं ऑफिस
Just Now!
X