19 September 2020

News Flash

उद्योगाचे घरी.. : ‘माणूस’केंद्री आयटी ऑफिस

मुंबईत अंधेरीत मरोळ इथं असलेलं ‘प्रिन्सटन ब्ल्यू’ या मूळच्या अमेरिकी कंपनीचं भारतातलं आयटी ऑफिस, याला पूर्णपणे अपवाद आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मनोज अणावकर

आयटी उद्योग हा केवळ देशाच्या विकासासाठीच महत्त्वाचा नाही, तर देशाला जगात मानाचं स्थान मिळवून देणारा आणि परकीय चलन कमावून देशाच्या परकीय गंगाजळीत भर टाकणारा असा महत्त्वाचा उद्योग आहे. बीपीएम अर्थात बिझिनेस प्रोसेस मॅनेजमेंट, ई-कॉमर्स, हार्डवेअर, सॉफ्टवेअर निर्यात अशा आयटी उद्योगाच्या अनेक उपशाखा आहेत. १९९८ साली देशाच्या अर्थव्यवस्थेत अवघ्या २ टक्क्यांचा वाटा असलेल्या या उद्योगानं मोठी भरारी घेत गेल्या आर्थिक वर्षांपर्यंत आयटी उद्योगांच्या या विविध उपशाखांमध्ये सुमारे ८ टक्क्यांपर्यंत झेप घेतली. यापुढल्या काळात केवळ देशाबाहेरच नाही, तर देशातही डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटीज, ई-गव्हर्नन्स अशा सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रमांच्या माध्यमातून आयटी क्षेत्राच्या वाढीला मोठी मागणी असणार आहे. अशा या आयटी उद्योगाचं ऑफिस म्हटलं की, सर्वसाधारणपणे डोळ्यांसमोर येतात ती एका छापाची ठोकळेबाज क्युबिकल्स, त्यामध्ये असलेली डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची वर्कस्टेशन्स, चौकोनी कपाटांप्रमाणे असलेल्या लहानमोठय़ा आकाराचे सव्‍‌र्हर ठेवलेली सव्‍‌र्हररूम.. अर्थात, इथल्या माणसांपेक्षा यंत्रांना महत्त्व देणारी आणि त्या यंत्रांची गरज लक्षात घेऊन केलेली ऑफिसची रचना आपल्याला कोणत्याही आयटी ऑफिसमध्ये स्वाभाविकपणे पाहायला मिळते.

मात्र, मुंबईत अंधेरीत मरोळ इथं असलेलं ‘प्रिन्सटन ब्ल्यू’ या मूळच्या अमेरिकी कंपनीचं भारतातलं आयटी ऑफिस, याला पूर्णपणे अपवाद आहे. न्यूजर्सी, प्रिन्सटन इथं भारतीय वंशाच्या प्रमोद सचदेवा यांच्या प्रयत्नातून स्थापन झालेल्या या कंपनीचं हे भारतातलं ऑफिस आहे. या ऑफिसची रचना करताना इथं काम करणारे आयटी इंजिनीअर्स आणि एकूणच कर्मचारी यांना डोळ्यांसमोर ठेवून आणि अधिकाधिक जागा मोकळी कशी राहील, याचा विचार करून ही रचना केल्याचं या कंपनीचे भारतातले प्रमुख अमोल माटेगावकर यांनी सांगितलं. त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून यामागची त्यांची भूमिका उलगडत गेली..

या ऑफिसची रचना करताना प्रामुख्याने कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या?

इथे काम करणाऱ्या आयटी इंजिनीअर्सना या कंपनीशी बांधून ठेवणारं ऑफिस आम्हाला निर्माण करायचं होतं. त्यासाठी आपण केवळ इथले कर्मचारी नाही, तर हे आपलं स्वत:चं ऑफिस आहे, अशी आपलेपणाची भावना त्यांच्यात निर्माण व्हायला हवी. हे ऑफिस त्यांना बाहेरच्या जगात त्यांची स्वत:ची ओळख देणारं असायला हवं आणि त्याचबरोबर कामाच्या व्यापाचा मनावर ताण निर्माण न करता मनोरंजन आणि मजा, तसंच काहीवेळा प्रबोधनही करणारं वातावरण असलेलं ऑफिस आम्हाला तयार करायचं होतं. त्यामुळेच हे ऑफिस तयार करताना या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने साध्य करण्यासाठी या नव्या ऑफिसच्या निर्मितीप्रक्रियेत आणि अंतर्गत सजावटीत आम्ही इथल्या कर्मचाऱ्यांचा विचार घेतला. केवळ विचारच घेतला नाही, तर आमचं जुनं ऑफिस समोरच असल्यामुळे जेव्हा या नव्या ऑफिसचं काम सुरू होतं, तेव्हा हे सगळे इकडे येऊन ते काम कसं चाललंय ते पाहात होते, त्यांच्या सूचना देत होते. यातून होणाऱ्या चर्चामधूनच अंतिम डिझाइन जन्माला आलं. आमच्या ऑफिसमध्ये म्हणूनच एचआर म्हणजे ह्य़ुमन रिसोर्स असा विभाग नाही. कारण इथल्या माणसांना आम्ही ‘रिसोर्स’ म्हणजे साधनसामग्री समजत नाही. ही माणसं हीच आमच्या या व्यवसायाचं खरं भांडवल आहे. म्हणूनच आमच्याकडे या विभागाला आम्ही ह्य़ुमन कॅपिटल असं म्हणतो.

या ऑफिससाठी जागेचं व्यवस्थापन तुम्ही कसं केलं?

एकूणच इथलं वातावरण ‘माणूस’केंद्री कसं राहील, याचा विचार आम्ही या ऑफिसच्या निर्मिती प्रक्रियेत केला. साध्या वर्कस्टेशनचा म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कामाच्या टेबलाचा विचार करायचा झाला, तर दोन टेबलांमध्ये भिंत निर्माण करून विविध कर्मचाऱ्यांना एक दुसऱ्यापासून विभागणाऱ्या उंच भिंती असलेल्या क्युबिकल्सऐवजी आम्ही कमी उंचीचे टेबल विभाजक वापरले (छायाचित्र १). ही विभागणी किंवा माणसामाणसांमधली दरी टाळण्यासाठी एकाच गोल टेबलाभोवती चार ते पाच खुच्र्या ठेवूनही वर्कस्टेशन्स तयार करता आली असती. पण काम करत असताना लागणारी एकाग्रता साधता यावी, आणि क्लायंटबरोबर बोलणं सुरू असेल तर दुसऱ्याच्या कामात अडथळाही येऊ नये, यासाठी हे कमी उंचीचे टेबल विभाजक आम्ही वापरले. शिवाय कधी दुसऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याला किंवा क्लायंटला जर एखाद्या इंजिनीअरच्या बाजूला बसून चर्चा करून लॅपटॉपवर काही काम करायचं असल्यास शेजारी बसायला जागा हवी. त्यामुळे ऑरेंज कलरचे हे ब्लॉक्स वर्क्‍सस्टेशनशेजारी तयार करून दुय्यम बैठकव्यवस्था केली (छायाचित्र १). त्यामुळे त्याच्यावर बसता येतं. आमचे क्लायंट असलेल्या वित्तीय कंपन्या किंवा औषधनिर्मिती कंपन्यांना प्रामुख्याने त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन किंवा ऑनलाइन माध्यमातून आम्ही सेवा पुरवतो. त्यामुळे अशा कंपन्यांचे प्रतिनिधी आमच्या ऑफिसमध्ये फार कमी वेळा येत असल्यामुळे मुख्य प्रवेशद्वाराजवळ फार मोठय़ा स्वागत कक्षाची अथवा वेटिंग रूमची आवश्यकता नव्हती. म्हणून स्वागत कक्ष आटोपशीर ठेवला आहे (छायाचित्र २). आत आल्यानंतर लगेचच डाव्या बाजूला कोपऱ्यात सहा-सात माणसं बसू शकतील अशा कॉन्फरन्स रूमची व्यवस्था केली आहे. यात प्रेझेंटेशन आणि डिस्प्लेसाठी टीव्ही स्क्रीन, तसंच काही तपशीलवार समजावून सांगायचं असलयास त्यासाठी एक्स्प्लनेशन बोर्ड बसवला आहे. ऑफिसमधल्या सगळ्या म्हणजे ३२ जणांची मीटिंग घ्यायची असेल तर ऑफिसच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेत ही मीटिंग घेतो. या भागात मध्यभागी असलेल्या कॉलमपाशी सरकून खाली येणारा स्क्रीन आहे. त्यावर कॉन्फरन्स रूमसारख्या प्रोजेक्टरमधून प्रेझेंटेशन्स सादर करता येऊ शकतात. या कॉलमचा उपयोग वेगवेगळ्या सणांना सजावट करण्यासाठी केला जातो (छायाचित्र ३). प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या बाजूला चहा-कॉफीचं व्हेंडिग मशीन बसवलं आहे. तिथून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला वॉश रूम आहे, तर सरळ गेल्यावर छोटीशी पँट्री केली आहे. तिथे थोडेसे स्नॅक्स किंवा ज्यांना मशीनचा चहा नको, त्यांच्यासाठी चहा करायची सोय आहे. हे जरी आयटी ऑफिस असलं तरी सव्‍‌र्हर रूम हा प्रकारच आमच्याकडे नाही. आमचं सगळं काम क्लाऊडवर होतं. त्यासाठी तीन वेगळ्या स्वतंत्र ब्रॉडबँड लाइन्सचं इंटरनेट कनेक्शन आमच्याकडे आहे.

मघाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ऑफिसमधलं वातावरण हे खेळीमेळीचं राहावं, कर्मचाऱ्यांना आपलंसं करणारं असावं, यासाठी आवश्यक वातावरणनिर्मिती तुम्ही कशी साधली?

ऑफिसमध्ये बहुतेक इंजिनीअर्स आणि कर्मचारी हे तरुण आहेत. त्यामुळे त्यांची आवड लक्षात घेऊन वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटिज आम्ही आखतो. बऱ्याचदा या अ‍ॅक्टिव्हिटिजचं नियोजन हे ह्य़ुमन कॅपिटल विभागाच्या प्रमुख मीनाक्षी देब या करत असतात. दर शुक्रवारी साधारणपणे १५ मिनिटं ते एक तासापर्यंत या अ‍ॅक्टिव्हिटिज आम्ही करतो. कॉन्फरन्स रूमच्या बाहेर म्युझिक कॉर्नर केला आहे. तिथे खरीखुरी वाजवता येणारी म्युझिक इन्स्ट्रमेंट्स ठेवलेली आहेत. त्यामुळे काम करताना जर ताण जाणवला किंवा कंटाळा आला तर या भागात बसून मुलं काम करतात. काही जण गिटार वगैरेही वाजवतात. ऑफिसमधल्या केबिन्सच्या बाहेर बरीच मोकळी जागा मुद्दाम जाणीवपूर्वक ठेवली आहे (छायाचित्र १). शुक्रवारी त्या जागेत अ‍ॅक्टिव्हिटिजसाठी राखून ठेवलेल्या वेळेत ऑफिसमधले कर्मचारी वेगवेगळे गेम्स खेळतात. यात अगदी रस्सीखेचपासून ते ट्रेझर हंट, डम्ब शेराज यासारखे गेम्स किंवा योगावर माहितीपर भाषण यासारख्या अ‍ॅक्टिव्हिटिज आम्ही करतो. त्यासाठी बाहेरून त्या त्या विषयांचे तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यासाठी बोलावतो. केवळ बाहेरूनच तज्ज्ञ बोलावत नाही. एखाद्या विषयाची माहिती जर ऑफिसमधल्या एखाद्याला असेल, किंवा मुद्दाम अभ्यास करून रोजच्या कामाच्या विषयांव्यतिरिक्त माहितीपर संवाद प्रत्येक जण साधायचा प्रयत्न करतो. या सगळ्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खेळीमेळीचं वातावरण आणि एकमेकांशी चांगले मत्रीपूर्ण संबंध राखले जायला मदत होते. अर्थातच, या सगळ्याने ताजंतवानं झाल्यानंतर अधिक हुरूप येऊन सगळे काम करतात. त्यामुळे कार्यक्षमताही वाढते.

लाइटिंग मॅनेजमेंट आणि कलर मॅनेजमेंट यांचं नियोजन कसं केलं?

मेंटेन करायला विशेष प्रयत्न करावे लागत असले तरी कॉर्पोरेट फिल येण्यासाठी मुख्यत: पांढऱ्या रंगाचा वापर करायचा होता. त्याशिवाय इथे काम करणारे बहुतेक जण हे २५ ते ३५ या वयोगटांतले असल्यामुळे, ऑफिसमध्ये यंग आणि व्हायब्रंट फिल येण्यासाठी ऑरेंज रंगाचा वापर फर्निचर आणि भिंतींवर काही ठिकाणी केला आहे (छायाचित्र १). याचा जो एक परिणाम साधला जातो, तो राखण्यासाठी व्हाइट लाइटऐवजी यलो लाइटचा वापर केला आहे. या सगळ्याच्या माध्यमातून सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एकप्रकारचं वॉर्म आणि आपलंसं करणारं वातावरण निर्माण करणं हा यामागचा हेतू होता.

प्रवेशद्वारापाशी असलेल्या स्वागतकक्षात समोरच्या भिंतीवर कंपनीच्या लोगोतली इंग्रजी ‘ढ’ आणि ‘इ’ ही अक्षरं शेजारीशेजारी असताना मराठीतल्या निळ्या रंगाच्या नावात असलेल्या ‘ळ’ या अक्षराप्रमाणे दिसतात. (छायाचित्र २). त्यातून तयार होणारा ओव्हलचा आकार हाच स्वागत कक्षाच्या टेबलसाठी निवडलेला दिसतो. त्यामुळे स्वागत कक्षाचं टेबलही पठडीबाज न होता थोडं वेगळ्या आकारातलं असल्यामुळे लक्ष वेधून घेतं. कंपनीच्या नावात असलेल्या निळ्या रंगाचा वापरही कंपनीच्या नावासाठीच्या प्रकाशव्यवस्थेत तसंच स्वागत कक्षाच्या टेबलामध्ये केलेला दिसतो.

वातावरणनिर्मितीसाठी एखाद्या ऑफिसमधलं फर्निचर, रंगसंगती आणि प्रकाशव्यवस्था या निर्जीव गोष्टी जितक्या कारणीभूत असतात, तितकंच महत्त्वाचं असतं ते तिथलं वर्ककल्चर अर्थात कार्यसंस्कृती. हे लक्षात घेऊनच माणसामाणसांमध्ये निर्माण होणारे नात्याचे बंध आणि तिथल्या कर्मचाऱ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याची असलेली वृत्ती ही या ऑफिसात मुद्दाम प्रयत्नपूर्वक जोपासलेली दिसते.

एडिसन स्टाइलच्या पिवळा प्रकाश देणाऱ्या म्युझिक कॉर्नरमधल्या एलईडी पेंडण्ट दिव्यांमुळे किंवा कॉफी व्हेंडिंग मशीनच्या वर असलेल्या बरण्यांसारख्या असलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये बसवलेल्या दिव्यांमुळे (छायाचित्र ५), तसंच त्यासमोर बसवलेल्या जुन्या ब्रिटिशकालीन घडय़ाळामुळे ऑफिसला एकप्रकारचा अँटिक आणि नॉस्टॅल्जिक फिल येतो. तसंच एकूणच पिवळ्या प्रकाशाचा वापर या सगळ्या रंगसंगतीला जास्तच वॉर्म फील देतो. त्याचा उपयोग अ‍ॅक्टिव्हिटिजच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या भावबंध दृढ करण्याच्या प्रयत्नांना होतो.

थोडक्यात सांगायचं तर, जास्तीत जास्त मोकळी जागा राखून माणूस केंद्रस्थानी ठेवून तयार केलेल्या या आयटी ऑफिसच्या रचनेमुळे हे एक ठोकळेबाज आयटी ऑफिस न वाटता घरासारखं कौटुंबिक वातावरण निर्माण करणारं वेगळ्या धाटणीचं एक ऑफिस अशा रचनेच्या माध्यमातून तयार झालं आहे.

इंटिरिअर डिझायनर

छायाचित्र १ माणसं जोडणारी बैठकव्यवस्था – १) कमी उंचीचे विभाजक असलेली टेबलं

२) मुख्य टेबलाशेजारची दुय्यम बैठकव्यवस्था   ३) ऑफिस प्रमुखांची केबिन

४) एचसी प्रमुखांची केबिन

n anaokarm@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 1:36 am

Web Title: article about mans centre it office
Next Stories
1 निवारा : संस्कृती आणि घरे
2 आखीव-रेखीव : घर कोणाचे?
3 अंगण घराचे आभूषण!
Just Now!
X