प्राची पाठक

दूरवरून कोणतीही इमारत बघितली तर काय चित्रं दिसतं? कुठे वेडय़ावाकडय़ा कपडय़ांच्या दोऱ्या बांधलेल्या असतात. कपडे वाळवण्यासाठी, कपडे उन्हात टाकण्यासाठी, त्यावर जमेल तसे आणि जमेल तितके कपडे लोक वाळत घालत असतात. कुठे केबल्स लोंबकळत असतात. त्यातच टीव्हीचे सेट टॉप बॉक्सेस गर्दी करून असतात. तारांना, दोऱ्याला इकडून तिकडून लटकलेल्या फाटक्या पतंगी, कापडाच्या चिंध्या लोंबकळत असतात. इमारतींच्या खिडक्यांच्या ग्रीलमध्ये लोक घरातलं सगळं नकोसं सामान कोंबून कोंबून भरून ठेवतात. कुठे झाडांनी गॅलरी एकदम गच्च भरून गेलेली असते. त्या त्या घरात जरा सूर्यप्रकाश त्या खिडकीतून आत जात असावा की नाही, असा प्रश्न पडतो. कुठे नकोसे किंवा जास्तीचे गॅस सिलेंडरसुद्धा लोक खिडकीच्या ग्रीलमध्ये ठेवतात. कुठे घरातले स्टूल, तुटक्या खुच्र्या ठेवायची ही जागा असते. घरातली रद्दी, नकोशी फडकी, रंगकाम-सुतारकाम-गवंडीकाम याचे उरलेसुरले सामान खिडकीच्या ग्रीलमध्ये सरकवून दिलेले असते. आजकाल ऑनलाइन शॉपिंगला मोठालं पॅकिंग मटेरियल घरात येतं. ती खोकी पुढेमागे लागतील म्हणून जपून ठेवायचा कल असतो. ते सगळं सामान गॅलरी अथवा खिडकीच्या ग्रीलला खेटून साठवलं जातं. कधी कपडे वाळत घालायच्या काठय़ा, लांब पट्टय़ा, लोखंडी गज, घरातल्या लहान मुलांच्या नकोशा सायकलीदेखील याच अडगळीत टाकल्या जातात. हे सामान कधी अचानक पावसात भिजते. जे लागेल, लागेल करत साठवून ठेवले जाते, तेव्हा कदाचित बऱ्या दर्जाचे ते सामान असते. पण ऊन, वारा, पावसात, वरच्या गॅलरीतून पडणाऱ्या पाण्यात, उडून आलेल्या आणि अडकलेल्या केसांच्या बुचक्यात ते अतिशय खराब होऊन जाते. त्यामुळे, नंतर कधी आवरसावर करताना ते सर्व सामान काढून फेकून द्यायचाच एककलमी कार्यक्रम करावा लागतो.

खिडकीतून डास ते कबूतर आणि मांजरी ते मनुष्यप्राणी येऊ नये, इतक्या विस्तृत रेंजमध्ये लोक खिडक्यांची सुरक्षा पाहात असतात. कबुतरांचा त्रास नकोसा होत असूनही शहरांमधले कबूतरखाने आणि त्यांना दाणे टाकत राहणारी अनावश्यक भूतदया काही कमी होत नाही. अनेकदा हाऊसिंग सोसायटय़ा या कबुतरांच्या जाळीचासुद्धा एकच पॅटर्न ठरवून घेतात. म्हणजे इमारतीच्या बा सौंदर्यात समानता तरी आढळेल! नाहीतर, हर एक घरी वेगळ्या आकार, प्रकार, रंगाची जाळी बसवली जाते. पावसाळ्याच्या आधी अनेक घरं आणि इमारती निळे प्लॅस्टिक शीट अंथरून घेतात. जेणेकरून गळक्या छताचा बंदोबस्त होईल. तेव्हाही सर्व परिसर दोन-चार विशिष्ट रंगांच्या प्लॅस्टिक शीटने भरून गेलेला दिसतो. हे उरलेले शीट पुढच्या वर्षी वापरू म्हणून लोक पावसाळ्यानंतर काढून ठेवतात. पुढच्या वर्षीपर्यंत त्याचे पार तुकडे तुकडे होऊन जातात. ते सर्वत्र विखुरले जातात. असे मिळेल त्या जागेत खुपसून ठेवलेले प्लॅस्टिक शीट्ससुद्धा खिडक्यांच्या ग्रीलमध्ये जागोजागी दिसतात. हे सर्व सामान ठरावीक काळात तपासलं नाही, त्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर तिथे अडगळ वाढत जाते. भंगार सामान साचत राहते.

डासांसाठी अथवा कबुतरांसाठी बसवलेल्या जाळ्यांचे तुकडे उरलेले असतात. ते पुरेसे मोठे नसतात आणि आपलं काम तर झालेलं असतं. तेही लागेल कधी म्हणून पडू द्यायचा कल असतो. खरे तर, ते सामान आवश्यकच असते. छोटीशी दुरुस्ती, गॅप त्याने भरून काढता येते. एखादी जाळी कशाने फाटली तर तिथे असे तुकडे बसवता येतात. पण ते नीट राखून ठेवले न गेल्याने त्यांचा वापर करता येत नाही हे विशेष. अशा कामांना बोलावलेले लोक असं अर्धवट सामान वापरायला सहसा तयार नसतात. ते नवीनच वस्तू मागून घेतात. त्यामुळे आधीचे आणि नव्यातले उरलेले, अशी दुप्पट अडगळ साठत जाते. ए.सी.च्या आउटलेट्समध्येही कागद, प्लॅस्टिक पिशव्या, कचरा कोंबून ठेवलेला असतो. कधी पॅकिंग लागेल म्हणून ठेवलेलं असतं. काही जास्तीचे खिळे, स्क्रू देखील कुठे कुठे पडलेले असतात.

आपल्या घरातल्या झाडून सर्व खिडक्यांना, गॅलरीला एकदा भेट द्या. तिथे कुठे कुठे आणि काय काय कोंबून ठेवलेलं आहे, ते एकदा तपासा. वापरून टाकता येण्याजोग्या गोष्टी वेगळ्या करून स्वच्छ करून नीट रॅप करून ठेवा. जेणेकरून पुढील काळात त्या वापरताना धूळ साफ करण्यापासून तयारी नको. इतर अडगळ का साठली आहे, आपला वस्तू साठवून ठेवायचा ट्रेंड काय आहे, ते स्वत:च स्वत:पुरते जाणून घ्या. त्यावर हळूहळू का होईना, पण ठरवून काम करायला लागा. घरातली सर्व समृद्ध आणि असमृद्ध अडगळ टप्प्याटप्प्याने मार्गी लावून आपल्या घरालाच जरा मोकळा श्वास, उजेडी हवा देता येईल का, ते बघू या!

prachi333@hotmail.com