18 October 2019

News Flash

वास्तु-मार्गदर्शन

वार्षिक सर्वसाधारण सभेने घेतलेला निर्णय हा सर्व सभासदांवर बंधनकारक असतो. त्यामुळे तो त्यांना पाळणे भाग आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अ‍ॅड. श्रीनिवास घैसास

आमच्या सोसायटीत काही वर्षांपूर्वी मोकळी जागा होती, तेथे दोनचाकी आणि चारचाकी गाडय़ा उभ्या केल्या जात असत. त्यावेळी चारचाकी गाडय़ा लहान होत्या. आता संबंधितांनी या छोटय़ा गाडय़ांऐवजी बलेरोसारख्या मोठय़ा गाडय़ा घेतल्या. त्या गाडय़ा तिथे पार्क केल्यावर ये-जा करायला अजिबात जागा उरत नाही. म्हणून सोसायटीने वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सोसायटीच्या मोकळ्या जागेत चारचाकी गाडय़ा ठेवायच्या नाहीत अशा आशयाचा ठराव झाला. असे असूनही हे सभासद ‘आम्ही गाडय़ा ठेवणार तुम्ही काय करता ते बघतो,’अशी भूमिका घेत आहेत. तेव्हा काय करता येईल याबद्दल मार्गदर्शन करावे.

– सुरेश देशपांडे

* वार्षिक सर्वसाधारण सभेने घेतलेला निर्णय हा सर्व सभासदांवर बंधनकारक असतो. त्यामुळे तो त्यांना पाळणे भाग आहे. याबाबत आपण संबंधितांविरुद्ध अनेक प्रकारे कारवाई करू शकता. एकतर त्यांना नियमाप्रमाणे दंड लावू शकता. त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करू शकता. तसेच उपनिबंधक कार्यालय आणि सहकार न्यायालयामध्येदेखील दाद मागू शकता.

ल्ल आम्ही म्हाडा जमिनीवरील रिडेव्हलपमेंट झालेल्या सोसायटीत बिल्डरकडून जागा घेतली. त्यावेळी संस्थेने आमच्याकडून जबरदस्तीने रु. ६५,०००/- (रुपये पासष्ट हजार फक्त) डेव्हलपमेंट फंड यासाठी चेक घेतले. याबाबत आम्हाला असे समजले आहे की, ज्या सदस्यांनी बिल्डरकडून जागा खरेदी केलेली आहे त्यांना अशा प्रकारचे कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तरीसुद्धा संस्थेने वर नमूद केलेले पैसे आमच्याकडून घेतले आहेत. याबाबत आम्ही उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. पण त्या ठिकाणी असे सांगण्यात आले की, या ठिकाणी तक्रार करून काही काम होणार नाही, त्यासाठी आपणाला न्यायालयात खटला दाखल करावा लागेल. कृपया मार्गदर्शन करावे.

– सुधीर केशव भावे, जोगेश्वरी मुंबई

* उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आलेली माहिती खरी आहे. उपनिबंधक कार्यालयाला याबाबत न्यायनिवाडा करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे आपल्याला याबाबत सहकार न्यायालय मुंबई यांच्याकडेच दाद मागावी लागेल. आपण म्हणता तशा अर्थाचा निर्णय याअगोदर झालेला आहे. त्याचा आधारही आपणाला घेता येईल. मात्र खटला कसा दाखल करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी जागेअभावी शक्य नाही तरी आपण एखाद्या तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घ्यावा.

ल्ल आमच्या सोसायटीच्या इमारतीत एका सदस्याने दोन शेजारी शेजारी असणाऱ्या सदनिका विकत घेतल्या. त्यासाठी एकत्र करारनामा केला. त्या दोनही सदनिकांना एकत्र इलेक्ट्रिक मीटर घेतला आहे. त्यांना मालमत्ता कर असेसमेंटप्रमाणे येतो. या ठिकाणी गृहनिर्माण संस्था प्रत्येक सदनिकेसाठी वेगवेगळे मेंटेनन्स बिल लावू शकते का?

– मनोहर गोरे

*  सर्वप्रथम आपण आपल्या इमारतीच्या मंजूर नकाशात (सँक्शन प्लॅन) मध्ये किती सदनिका दाखवल्या आहेत ते पाहावे. जर त्यामध्ये दोन सदनिका असतील तर त्या सदस्याला संस्था दोन मेंटेनन्स बिले लावू शकते. अर्थात त्याला दोन भाग प्रमाणपत्रेही द्यावी लागतील.

ghaisas2009@gmail.com

First Published on May 4, 2019 1:13 am

Web Title: article on architectural guidance