17 July 2019

News Flash

वस्तू आणि वास्तू : घरातल्या दारांचे सौंदर्य आणि देखभाल

दारं ही सुरक्षेच्या दृष्टीनेसुद्धा अतिशय महत्त्वाची असतात. केवळ पार्टशिन, आडोसा इतकंच त्यांचं काम नसतं.

(संग्रहित छायाचित्र)

प्राची पाठक

आपल्या घरात किती दारं आहेत, याचा हिशेब आपण सहसा मांडून बसत नाही. रंगकाम करताना, घराची साफसफाई करताना, अनेक दिवसांसाठी गावाला जायचं असेल तर याची जाणीव होते. मग आपण घराची दारं, खिडक्या आवर्जून तपासून घेतो. एरवी सर्व घर साफ होतं, खोल्यांमधली जाळी-जळमटी काढली जातात. पण दारं अशी आवर्जून साफ केली जात नाहीत. दारं किरकिर करायला लागली तरी त्यांच्याकडे लक्ष दिलं जातंच असं नाही. ती लागणं बंद झाली, पावसाने फुगली, कुलुपं लागेनाशी झाली, दारांमुळे साधणारा आडोसा खराब झाला तरच त्यांच्याकडे थोडं लक्ष दिलं जातं. एरवी आपण सणासुदीला ज्या दारांवर तोरणं लावतो, त्याच दारांना नीटसे स्वच्छ ठेवत नाही. त्यांच्याकडे हवं तितकं लक्ष देत नाही. त्यांची साफसफाई तर दूरच राहिली. एरवी घरांना रंग देतानासुद्धा दार तर चांगलं आहे की, त्याच्यावर कशाला खर्च करा, असा साधारण दृष्टिकोन असतो. दाराच्या आकार आणि प्रकारानुसार त्यावर काम देखील पुष्कळ करावं लागतं. एका छोटय़ा खोलीला रंग द्यायला जितका वेळ लागू शकतो, तितकाच वेळ एकेका दाराला ठाकठीक करण्यात, रंग देण्यात जाऊ शकतो. दारं ही सुरक्षेच्या दृष्टीनेसुद्धा अतिशय महत्त्वाची असतात. केवळ पार्टशिन, आडोसा इतकंच त्यांचं काम नसतं.

अशा महत्त्वाच्या दारांचा घरोघरचा एक फेरफटका मारून येऊ! वेगवेगळे भडक स्टिकर्स चिटकवायला एकदम सोयीची जागा, असं या दारांकडे बघितलं जातं. कोणीही कसलंही स्टिकर दिलं, की लाव दारांवर हा एकेकदा लोकांचा छंद असल्याचं दिसून येतं. देवदेवतांचे भडक फोटो, कसलेसे मंत्र, वेगवेगळ्या हिरो-हिरोईन्सचे फोटो, कॅलेंडर्स, शकुनाचं काही, धुळकट पिरॅमिड्स.. असं बरंच काही दारांच्या पुढे-मागे चिकटवून ठेवलेलं असतं. हे स्टिकर्स अतिशय भडक, बटबटीत दिसतात, असं बोलायची सोय ‘स्टिकर भक्त’ ठेवत नाहीत. कोणाचं काही महत्त्वाचं असेल सुद्धा आणि कोणाची आवड देखील असेल, पण दारांच्या सौंदर्याला हे स्टिकर्स सहसा मारक ठरतात.

ग्रीलच्या दारांवर कधीकाळच्या सणावाराच्या माळांचे अवशेष शोधता येतात. ते धागेदोरे पुढच्या सणावारांना आणखीन अपडेट होत राहतात. दाराला तोरण लावण्यासाठी केलेल्या सोयी अशा धाग्यादोऱ्यांनी पार टम्म फुगून जातात इतक्या भरून गेलेल्या असतात. अर्ध्या तोडलेल्या माळा आणि वाळून गेलेली कधीकाळची फुलं-पानं दारांना आणखीन विद्रूप करत असतात. जुने आकाशकंदील, कधीकाळच्या लायटिंगच्या माळा, दुधासाठी, वर्तमानपत्रासाठी लटकवून ठेवलेल्या मळक्या-फाटक्या पिशव्या अशीच दारं सर्वसाधारण दिसत राहतात. त्यात त्यांच्या कडी-कोयंडय़ांना हाताचे डाग पडलेले असतात. ठरावीक जागी ती दारं अतिशय मळून गेलेली असतात. दारांच्या डिझाइन्समध्ये धूळ साठलेली असते, ती क्वचितच साफ होते. दारांवर कशाकशाचे शिंतोडे उडालेले असतात. रंग देताना, पॉलिश करताना वगरे काही भाग सोडून दिलेला असतो. मागच्या बाजूने जाळी लागलेली असतात. दार भिंतीला जोडलेले असते तिथे भिंतीत छोटय़ा छोटय़ा गॅप्स तयार झालेल्या असतात. त्यात पाली, कीटक नांदत असतात. किरकिरणाऱ्या दारांना तेल, ऑइल सोडताना ते जास्त सोडलं जातं आणि त्याचे ओघळ बिजागरीच्या जागी दिसून येतात. त्यावर आणखीन कचरा जाऊन चिकटतो. दारांना ऑइल/तेल सोडायचंच असेल, तर साध्याशा सीरिंजमध्ये भरून अथवा उदबत्तीच्या खालच्या काडीला तेलात बुडवून कमीत कमी तेलात त्यांची किरकिर बंद करता येते. तेल सोडून झाल्यावर ते भाग एखाद्या कापडाने पुसून घेता येतात. जेणेकरून त्या सांध्यांमध्ये तेलामुळे घाण चिकटत जाणार नाही. या अगदी साध्या गोष्टीसुद्धा डोळसपणे बघायच्या असतात. त्यातूनच बारकाईत स्वच्छता होते, सौंदर्य राखले जाते.

बाहेरच्या दारांवर काहीतरी प्रतीकं लावलेली असतात. एखादे देवाचे मॉडेल, एखादे शो पीस, एखादा धातूचा सूर्य, एखादा गोल फिरणारा हनुमान, काय आणि काय! या गोष्टी एकदा टांगल्या की त्यांची देखभाल किती जण करतात? त्या स्वच्छ राहतात का? म्हणायला देवाची मूर्ती, पण अतिशय धूळखात लटकलेली असते ती! त्यापेक्षा अशी भक्ती दारावर न आणलेली बरी, असंच वाटतं! घराच्या आतल्या दारांमागे तर काय काय दडवून ठेवतात लोक! कपडे टांगलेले असतात. ते एकावर एक साठत जातात. त्या ओझ्याने दारं फरशीवर घासायला लागतात. निखळून येतात. प्लॅस्टिकच्या पिशव्या जमा करायला जणू हीच जागा आहे, अशा पिशव्या देखील इथे टांगून ठेवलेल्या असतात. दारांची कुलुपं लागून जाऊ नाहीत, म्हणून त्यांना कोणी फडकी बांधून ठेवतात. मागच्या बाजूने खिळेच खिळे ठोकून ठेवतात. चाव्या, वॉल हँग लटकवायला देखील हीच एक जागा लोकांना सापडलेली असते. दाराच्या मागे काही डिसेंट सोयी करायला हरकत नसते. पण त्यांची देखभाल करत राहिलं पाहिजे. त्यांच्याकडे सौंदर्य म्हणून देखील बघायला पाहिजे. केवळ कोंबाकोंब करायला एक जागा म्हणून याकडे बघायला नकोय. संडास-बाथरूमची दारं तर आणखीनच वाळीत टाकलेली असतात. त्यांचा दर्जा देखील चांगला नसतो. त्यांची देखभाल क्वचितच होते. त्यांचे आडोसे पुरे पडत नाहीत, तरी अशीच दारं रेटली जातात. त्यांच्याकडेही एकदा नजर टाकायला हवी असते!  म्हटलं तर साधीशी गोष्ट आणि म्हंटल तर दुर्लक्षित! म्हणूनच आपल्या घरातल्या सर्व दारांचाच एक आढावा घेऊ. जुन्या पुराण्या शो-पिसेसपासून सजावटीच्या साहित्यातून, भडक स्टिकर्सपासून, लटकलेल्या सामानापासून त्यांना मुक्ती देऊ या!

prachi333@hotmail.com

First Published on March 2, 2019 2:01 am

Web Title: article on beauty and care of door to door