17 July 2019

News Flash

घर सजवताना : खुर्ची पुराण

फर्निचर या विषयावर लिहायचे असे ठरवले आणि डोक्यात फर्निचरची, माफ करा विचारांची प्रचंड गर्दी होऊ लागली.

(संग्रहित छायाचित्र)

गौरी प्रधान

फर्निचर या विषयावर लिहायचे असे ठरवले आणि डोक्यात फर्निचरची, माफ करा विचारांची प्रचंड गर्दी होऊ लागली. तसे तर दिवसभरात घरात, घराबाहेर सतत फर्निचर या विषयाशी आपला संपर्क येतच असतो. थोडंसं विनोदानेच बोलायचं झालं तर, फर्निचरच्या गराडय़ातच आपण जगतो. मग अशी परिस्थिती असताना सुरुवात तरी कुठून करावी हा माझ्यासमोर मोठ्ठा प्रश्न होता.

थोडंसं विचार करता याला उत्तर आले ‘खुर्ची’, होय खुर्चीच. जेव्हा इतर कोणत्याही फर्निचरशी माणसाचा संबंध आला नसेल अशा अनादी काळापासून माणूस खुर्चीचा वापर करत असावा. इथे खुर्चीचा अर्थ चार पाय दोन हात टेकायला पाठ असा अभिप्रेत नाही बरं! तर कोणतीही बैठक व्यवस्था उदा. अगदी एखादा आदिमानव देखील लाकडाच्या थोडय़ा आरामदायक वाटणाऱ्या ओंडक्यावर बसलाच असेल नं. किंवा त्यातल्या त्यात जो मुख्य किंवा राजा त्याला बसण्यासाठी एखादा विशेष दगड असावा. तर अशा आद्य फर्निचर खुर्चीबद्दल आपण आज बोलू.

तसे तर खुर्च्यामध्ये अनेक प्रकार पडतात. म्हणजे घरात वापरण्याच्या खुर्च्या, ऑफिसमधील खुर्च्या, सार्वजनिक समारंभात दिसणाऱ्या खुर्च्या. परंतु आपण मात्र घर आणि घराशी संबंधित वापराच्याच खुर्च्याचा विचार करणार आहोत.

सर्वप्रथम यात आपण डायिनग चेअरचा विचार करणार आहोत. या खुर्चीच्या नावातच हिचे घरातील स्थान समजून येते. जुन्या काळी जेव्हा लाकडाचे आणि बरीच कलाकुसर केलेली डायिनग टेबले वापरली जात तेव्हा त्यासोबतच्या खुर्च्यादेखील लाकडात कोरीव काम केलेल्या पाठीला तसेच सीटला फोम व वरून कापडाचे आच्छादन लावलेल्या अशा असत. पुढे पुढे कमी तेच जास्तचा जमाना आल्यावर सर्वाच्या खिशाला परवडतील, कमी जागा व्यापतील आणि उचल ठेव करायला सोप्या पडतील अशा खुर्च्या वापरण्याची पद्धत आली. आता तर लाकडासोबतच प्लास्टिक आणि मेटलच्या खुर्च्यानाही तितकीच मागणी आहे.

डायिनग चेअरची स्वत:ची अशी काही वैशिष्टय़े आहेत. एक तर या खुर्च्या आकाराने फार मोठय़ा नसतात. पाठ टेकण्याची व्यवस्था अशा प्रकारे असते की पाठीचा कणा ताठ रहावा. शिवाय शक्यतो या खुर्च्याना हात नसतात किंवा असल्यास ते टेबलच्या उंचीच्या खालीच येतील अशा प्रकारे असतात.

डायिनग चेअरचाच भाऊबंद म्हणता येईल असा असतो बार स्टूल. बार स्टूल म्हटले की अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. अगदी खरे की प्रत्येक घरात काही बार नसतो. परंतु आधुनिक इंटीरिअरमध्ये बार स्टूल आपण बारव्यतिरिक्त देखील काही ठिकाणी वापरू शकतो. हे स्टूल निरनिराळ्या उंचीमध्ये मिळतात, पण शक्यतो साधारण खुर्चीतून हे थोडे उंचच असतात. म्हणूनच यात पाय हवेत लटकून राहू नयेत यासाठी फुटरेस्टची रचना केलेली असते. हे स्टूल बॅक रेस्टशिवाय किंवा अगदी लहानशा बॅकरेस्टसोबत येतात. तुमच्या घराला मोठ्ठी गॅलरी असेल तर तिथे एखादे उंच टेबल उभे करून त्याभोवती जरी हे स्टूल ठेवले तरी गॅलरीला छान रूप येईल.

बऱ्याच घरांमध्ये हल्ली वेगळ्या अभ्यासिकेचा समावेश केलेला दिसून येतो. इथे स्टडी चेअरला मग पर्याय नाही. स्टडी चेअर घेताना शक्यतो रिव्होल्व्हिंग अर्थात स्वत:भोवती फिरणारी आणि कॅस्टर किंवा व्हील लावलेलीच घ्यावी. रिव्होल्व्हिंग चेअरमुळे माणूस आरामदायकरीत्या बराच वेळ काम करू शकतो, थकवाही जाणवत नाही. याही खुर्चीची पाठ ही ताठ बसता येईल अशीच असावी. खुर्चीला हात असल्यास उत्तम. स्टडी चेअरवर बराच वेळ बसून काम होत असल्याने ती शक्यतो कापडाने किंवा लेदरने आच्छादित असावी आणि अँथ्रोपॉमेट्रिक डेटाच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी परिपूर्ण देखील असावी.

हे तर झाले सर्वसाधारण खुर्च्याचे प्रकार जे आपल्या सर्वाच्याच परिचयाचे आहेत. पण खुर्च्याचे कूळ फार मोठे. आपण आता थोडक्यात इतर कोणकोणत्या प्रकारच्या खुर्च्या आपल्या घरात वापरू शकतो याचा आढावा घेऊ या.

यात सर्वप्रथम नंबर लागतो आरामखुर्चीचा. पूर्वी घराघरांमध्ये दिसणारी आरामखुर्ची जागेच्या अभावामुळे अलगद नाहीशी झाली. पण आपल्यापैकी अनेकांना कल्पना नसेल  वेगवेगळी इतर रूपे घेऊन ती पुन्हा बाजारात स्थानापन्न झालीये बरं! लहानशी तरीही अत्यंत आरामदायक अशी रॉकिंग चेअर हे त्याचंच रूप. परंतु काही वेळा रॉकिंग चेअर ठेवण्याइतपतही जागा घरात नसते, अशा वेळी पर्याय म्हणून आपण ग्लायडर चेअरचा विचार करू शकतो. ही कमी जागेत तर मावतेच, पण तरीही रॉकिंग चेअरपेक्षाही भन्नाट अनुभव देते. यात बसून मागे पुढे होताना थेट झोपाळ्यात बसल्याचा भास होतो.

अनेकदा असंही होतं की जागा तर घरात भरपूर आहे, पण पारंपरिक फर्निचर नको, काहीतरी आधुनिक हवं; तर थोडी आधुनिकतेशी जवळीक साधणारे, प्रचंड आरामदायक, पण बरीच जागा व्यापणाऱ्या रिक्लायनरला पसंती द्यायला काहीच हरकत नाही. छान मऊ मऊ शक्यतो लेदर किंवा रेक्झिनने आच्छादलेले रिक्लायनर कधी सोफ्याप्रमाणे तर कधी पाय पसरून आरामात बसायला उत्तम पर्याय. याचा उपयोग ज्या घरात एक वेगळी टी. व्ही. ची खोली आहे अशा ठिकाणी पुरेपूर होतो.

खुर्च्यामधील आणखी एक प्रकार म्हणजे लक्षवेधी खुर्च्या. खरे तर या खुर्च्या या गाळलेल्या जागा भरण्यासाठी असतात. गोंधळलात नं! कोणत्याही डिझायनर खुर्च्या या सदरात मोडतात. यांचा घरात बसण्यासाठी वापर होतोच, पण शोभेसाठी जास्त. यात व्हिक्टोरियन पद्धतीच्या किंवा फ्रेंच पद्धतीच्या खुर्च्याचा समावेश होतो. आधुनिक डिझाइनच्या थोडय़ा विचित्र आकारांच्या खुर्च्यादेखील आपण एखादा रिकामा कोपरा किंवा कॉन्सोलच्या बाजूची रिकामी जागा भरण्यासाठी करू शकतो.

आजकाल घरोघरी व्हिडीओ गेम वैगेरे खेळण्याचेदेखील प्रमाण वाढले आहे. अशा शौकिनांसाठी खास गेमिंग चेअर देखील बाजारात उपलब्ध आहेत. या खुर्च्याचे वैशिष्टय़ असे की गेम खेळण्यासाठी लागणाऱ्या बऱ्याचशा सुविधा या खुर्चीतच पुरवल्या जातात, अगदी इनबिल्ट स्पीकरसहित. शिवाय शरीराला योग्य स्थितीत ठेवण्याचे कामही ही खुर्ची करत असल्याने, फार काळ एका स्थितीत बसल्याने उद्भवणाऱ्या शारीरिक व्याधीही जडत नाहीत.

तर असे हे खुर्ची पुराण खरे तर न संपणारेच, यात रोज नवनवी भर पडतच राहणार, आपण फक्त लक्ष ठेवून राहायचं.

(इंटिरियर डिझायनर)

pradhaninteriorsllp@gmail.com

First Published on March 2, 2019 1:54 am

Web Title: article on chair